सकाळी दहाच्या ठोक्याला इन्स्पेक्टर बिराजदार ड्यूटीवर पोहोचले, तेव्हा ठाणे अंमलदाराच्या समोर एक आजी बसलेल्या होत्या.
“हां आजी, बोला!“ हवालदार सावंतांनी आजींकडे बघून थोड्याशा वैतागलेल्या स्वरातच सुरुवात केली.
“साहेब, आमच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये रोज दणदणीत आवाजाचे फटाके उडवतात. कानठळ्या बसतात हो, म्हातार्या माणसांना सहन होत नाही ते. आता काही दिवाळी नाही, की कुठला सण नाही. कशासाठी फटाके उडवतात ते? तुम्ही कधी कारवाई करणार त्यांच्यावर? निदान बघून तरी जा एकदा!“ आजींनी त्यांचं गार्हाणं मांडलं. वंदननगर भागातून आलेल्या या आजींना बराच वेळ बाहेरच वाट बघत बसावं लागल्यामुळे त्या वैतागलेल्या होत्या.
“होय आजी, बघतो. तुम्ही नका त्रास करून घेऊ!“ सावंतांनी नेहमीच्या पद्धतीनं आजींना शांत करायचा प्रयत्न केला, पण आजी ऐकून घेणार्या नव्हत्या.
“अहो दोन दिवस अशीच उत्तरं देताय तुम्ही. साहेबांशी बोलायचं का आता? आमचा थोडा तरी विचार करा ना..!“ आजी हट्टालाच पेटल्या आणि आतमध्ये असलेल्या बिराजदारांच्या कानावर हे संभाषण गेलं. तसंही त्यांचं बाहेर लक्ष होतंच. त्यांनी बेल वाजवून सावंतांना आत बोलावून घेतलं.
“साहेब, अहो काही मेजर नाहीये. पोरं फटाके उडवणारच. त्यांना काय दम देणार? दोन दिवसांपास्नं कटकट चाललेय म्हाता…“ ते `म्हातारीची` म्हणणार होते, पण बोलता बोलता थांबले. पटकन सावरून घेतलं.
“आजी दोन दिवसांपास्नं इथे चकरा मारतायंत. दरवेळी कसं समजवायचं, सांगा साहेब!!“
“त्या दोन दिवस चकरा मारतायंत, याचाच अर्थ त्यांना होणारा त्रास सहन करण्यापलीकडचा आहे ना, सावंत? छोटी गोष्ट असती, तर त्यांनी एवढा फॉलो अप घेतला नसता. नक्की काय त्रास आहे, ते आपण बघायला हवं. तुम्ही एक माणूस पाठवून द्या, त्याला म्हणावं त्या भागात जाऊन नीट चौकशी कर, त्यांची तक्रार समजून घे. मग बघू काय करायचं ते.“ बिराजदारांनी सूचना केली.
“अहो पण साहेब….“
“मी सांगतोय ना, सावंत? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का माणूस पाठवायला?“ असं विचारल्यावर मात्र सावंतांना काही उत्तर देता येईना.
“पाठवतो साहेब. जयहिंद!“ म्हणून त्यांनी निरोप घेतला. बाहेर येऊन आजींना `आज नक्की बघतो,` असं सांगून परत पाठवून दिलं. कॉन्स्टेबल वाडेकरला त्या भागात जाऊन सगळी माहिती घेण्याची सूचना केली. आता तरी आपल्या डोक्याला थोडी शांतता मिळेल आणि इतर कामांकडे लक्ष देता येईल, असं त्यांना वाटलं. “ड्यूटीवरून घरी येताना वाटेत थांबून
गॅलरीत लावायला दोन कुंड्या घेऊन या, तुमच्या भागात वाटेवरच एक चांगली नर्सरी आहे,“ असा निरोप बायकोनं दिला होता, तोही सावंतांना आठवला. आज आणतो, उद्या आणतो करत त्यांनी बायकोलाही आठ दिवस गंडवलं होतं. आता तिच्याकडूनही बरंच काही ऐकून घ्यावं लागणार होतं. त्यापेक्षा लवकरात लवकर कुंड्या घेऊन जाव्यात, असा विचार त्यांनी केला आणि उरलेलं काम आटपायला सुरुवात केली.
“त्या आजींचा पुन्हा काही फोन आला का, सावंत?“ बिराजदारांनी दुसर्या दिवशी सकाळी विचारलं.
“नाही साहेब. काल माणूस पाठवला होता ना आपण! त्यानं त्या पोरांना फटाके उडवू नका सांगितलंय. झालं, मिटलं ते प्रकरण,“ सावंतांनी आत्मविश्वासानं सांगितलं.
“नक्की मिटलं?“ बिराजदारांनी असा प्रश्न का विचारावा, असा प्रश्न सावंतांना पडला.
“होय साहेब.“
“कुणाला पाठवलं होतं?“
“कुठे, साहेब?“
“कुठे म्हणजे काय? वंदननगर भागात.“
“हां, तिकडे!
कॉन्स्टेबल वाडेकरला पाठवलं होतं. तो जाऊन आजींना भेटून आला.“
“भेट झाली? नक्की?“
“होय, साहेब. तो स्वतः भेटला, आजींशी बोलला. आता काही तक्रार नाहीये त्यांची,“ सावंतांनी छातीठोकपणे सांगितलं आणि बिराजदारांनी त्यांच्याकडे रोखून बघितलं.
“सावंत, बाहेरच्या माणसांना उडवाउडवीची उत्तरं देता, तशी आपल्या साहेबाला तरी देऊ नका. कुणीही गेलं नव्हतं त्या भागात. आजींना कुणीही भेटलेलं नाहीये. आज सकाळीच पुन्हा त्यांचा फोन आला होता, तो मी घेतलाय. आता काय ते नीट आणि स्पष्ट सांगा!“ असं म्हटल्यावर मात्र सावंतांची बोबडी वळली. त्यांनी खरंतर एका
कॉन्स्टेबलला निरोप दिला होता, पण `जाता जाता जाऊन ये,` असं सांगितल्यामुळे त्यानंही ते गांभीर्यानं घेतलं नाही आणि सावंतांनीही पुन्हा त्याला काही विचारलं नाही. त्यामुळे त्या विषयावर काहीच घडलं नव्हतं. आता स्वतः बिराजदारांनी यात लक्ष घालायचं ठरवल्यामुळे सगळं पोलीस स्टेशन हललं.
“तुम्हाला जायला जमेल की मी जाऊ?“ असंच साहेबांनी विचारल्यामुळे सावंतांना सगळी कामं सोडून पहिल्यांदा तिकडे जाणं भाग पडलं.
आजी पोलीस स्टेशनमध्ये आल्या, तेव्हा त्यांचा पत्ता, फोन नंबर सगळं त्यांनी नीट लिहून घेतलं होतं, पण आता वंदन नगर भागात तो पत्ताच सापडत नव्हता. त्यांनी दिलेल्या नंबरवर कुणीच फोन उचलत नव्हतं. त्यांनी वंदन नगर भागात सगळीकडे शोध घेतला, तिथे कुणीच फटाके वगैरे उडवल्याचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली नाही. साने नावाचं कुणी या भागात राहत नाही, तुम्हाला चुकीचा पत्ता मिळाला असेल, असं सगळ्यांनी सांगितल्यामुळे सावंत वैतागले. त्यांचे चार तास वाया गेले होते, शिवाय हाती काहीच लागलं नव्हतं. आजही कुंड्या घरी न्यायचं राहून जायला नको, म्हणून तिथूनच ते नर्सरीपाशी गेले. बाईक लावली, त्याचवेळी मागून दुसर्या बाईकवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या बाईकला धडक दिली. सावंत पडता पडता वाचले.
“दिसत नाही का रे?“ त्यांनी दरडावून विचारलं आणि खाली उतरून त्यांना जाब विचारायला जाणार, तेवढ्यात ते दोघं मोटरसायकल न थांबवता तसेच पळून गेले. तेवढ्या घाईत सावंतांनी नंबर मात्र टिपून ठेवला. तेवढ्यात कंट्रोल रूममधून फोन आला. एका चौकात अपघात झाला होता, तिथे बंदोबस्तासाठी जावं लागणार होतं. सावंत पुन्हा स्वतःवर, आयत्या वेळच्या कामांवर चरफडले.
दुसर्या दिवशी बिराजदार साहेबांसमोर रिपोर्टिंग करताना त्यांचा सगळा राग निघाला.
“साहेब, सांगत होतो, ह्यात काही हाताला लागणार नाही. ही म्हातारी माणसं वेळ जात नाही म्हणून कशासाठीही फोन करत असतात. त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं की आपलाच वेळ वाया जातो,“ सावंतांनी त्यांचा त्रागा व्यक्त केला. बिराजदार मात्र अजूनही हे मानायला तयार नव्हते की एखाद्या वृद्ध व्यक्तीने कारण नसताना पोलिस स्टेशनच्या चकरा मारल्या असतील, फोन केला असेल. तोसुद्धा एवढ्या वेळा. कुठेतरी काहीतरी चुकतंय, असं त्यांना जाणवत होतं.
“सावंत, पुन्हा त्या आजींचा फोन येईल, तेव्हा मला द्या. मी बोलतो,“ असा निरोप बिराजदारांनी देऊन ठेवला.
दुसर्याच दिवशी पोलिस स्टेशनचा लँडलाइन खणखणला आणि साने आजींचा फोन आहे, हे लक्षात आल्यावर सावंतांनी तो बिराजदारांकडे ट्रान्सफर केला.
“आजी, तुमच्या घराच्या जवळ ती चहाची टपरी आहे ना, तिथे आणि त्या परिसरात सगळीकडे आम्ही पोलिसांची एक टीम तैनात केलेय. हे पोलीस युनिफॉर्ममध्ये नाही, साध्या कपड्यांत असतील, त्यामुळे कुणाला ओळखू येणार नाहीत. जी मुलं फटाके उडवतात आणि आणखीही बर्याच गोष्टी तिथे चालतात ना, त्या सगळ्याच आता उघड होतील. तुम्ही बिनधास्त राहा,“ बिराजदारांनी निरोप दिला आणि सावंत गोंधळून बघत राहिले.
“साहेब, एवढ्याशा गोष्टीसाठी आपली टीम कशी पाठवणार? त्या आजींना तरी कुठून शोधणार? त्यांचा खरा पत्ता, त्यांचं खरं नावही आपल्याला माहीत नाही,“ सावंतांनी तक्रार केली. बिराजदार मात्र निश्चिंत दिसत होते.
दुसर्याच दिवशी सकाळी अकराच्या सुमारास त्या चहाच्या टपरीवर एक वयस्कर बाई बिस्किटचा पुडा न्यायला म्हणून आलेल्या दिसल्या. बिस्किट घेणं हा फक्त बहाणा होता, हे त्यांच्या हावभावावरून चटकन लक्षात येत होतं. टपरीवरच चहा घेत असलेली एक तरतरीत बाई त्यांच्यापाशी आली आणि म्हणाली, “आजी, तुमचा नातू इथे वाट बघतोय, चला.“ आजींनी न समजल्यासारखा चेहरा केला, पण ती बाई त्यांना आग्रहाने घेऊन गेली. पोलिसांच्या गाडीजवळ इन्स्पेक्टर बिराजदार वाटच बघत होते. आजी आणि ती बाई आपल्या दिशेने येताना बघून ते अलर्ट झाले.
“हे चांगलं काम केलंत, कदम मॅडम. तुम्ही आता जरा चहा घेऊन या, तोपर्यंत मी बोलतो आजींशी,“ असं म्हणून बिराजरदारांनी कॉन्स्टेबल मधुरा कदम यांना पाठवून दिलं. आता त्यांनी आजींशी बोलायला सुरुवात केली. त्यांना एकदम उलटतपासणी घेतल्यासारखे धाडधाड प्रश्न विचारून चालणार नव्हतं. टपरीवर आमची माणसं आहेत, असं सांगितल्यावर आजी अंदाज घ्यायला त्यांच्यापाशी येणार, याची बिराजदारांना पूर्ण कल्पना होती. आता त्या सापडल्याच आहेत, तर बिथरू नयेत, त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, ते कळावं, एवढाच बिराजदारांचा उद्देश होता.
आजींशी इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्यांनी मुद्द्याला हात घातला.
“कुणाबरोबर राहता, आजी?“ त्यांनी विचारलं आणि आजींचा चेहरा एकदम बदलला. चेहर्यावर थोडी अस्वस्थता, भीती पसरली.
“एकटीच राहते. ती फटाके उडवणारी मुलं पकडा आधी. समोरच्या फ्लॅटमध्ये… तिथे राहतात. रात्री अपरात्री येतात, भीती वाटते… दारातही अडवतील. उद्या काहीही करतील…भीती वाटते…“ असं काहीतरी तुटक, अस्पष्ट असं त्या बोलत राहिल्या. त्यांना आणखी काही विचारून उपयोग नाही, हे बिराजदारांच्या लक्षात आलं. जाताना बरोबर कुणी यायची गरज नाही, असंही आजींनी बजावलं आणि त्या एकट्याच चालत गेल्या.
त्या भागात पाहणी करताना सावंतांचं एका बाईककडे लक्ष गेलं आणि त्यांचे डोळे चमकले. त्यांना एकदम आठवलं. हीच… हीच ती बाईक! ते कुंड्या घ्यायला गेलेले असताना त्यांना धडक देऊन जाणारी. त्यांनी नंबरही टिपून घेतला होता, तो तपासून बघितला. त्यावरून त्यांची खात्रीच झाली. त्यांनी तशी बिराजदारांना कल्पना दिली आणि त्यांच्याही डोक्यात जे विचार चालू होते, त्याला बळ मिळाल्यासारखं झालं.
“टीमला तयार राहायला सांगा. कंट्रोललाही कळवून ठेवा,“ बिराजदारांनी सूचना केली. रात्री पोलीस टीम वंदननगर भागात पोहोचली. आजींची ज्या ठिकाणी भेट झाली, त्याच्याच समोरच्या बिल्डिंगमधल्या दुसर्या नंबरच्या फ्लॅटमध्ये काही हालचाली दिसत होत्या. याच ठिकाणी सावंतांना ती बाईक दिसली होती. आत्ताही ती तिथेच होती. नागरी वस्तीचा भाग असल्यामुळे जास्त दक्षता घेण्याची गरज होती. बिराजदारांनी आणखी थोडा वेळ जाऊ दिला आणि सगळीकडे सामसूम झाल्यावर सहकार्यांना सूचना केल्या.
स्वतः बिराजदार गन सरसावून तयार झाले. त्यांच्याबरोबर एक सबइन्स्पेक्टर, एक सहायक निरीक्षक, दोन हवालदार, दोन कॉन्स्टेबल होते. बिराजदारांनी खूण केल्यावर सावंतांनी पुढे जाऊन त्या फ्लॅटची बेल वाजवली आणि तो लपला. आतून थोडा वेळ काहीच प्रतिसाद आला नाही. पुन्हा बेलला हात जाईपर्यंत आतून कडी उघडल्याचा आवाज झाला आणि सगळी टीम अलर्ट झाली. दार किलकिलं झालं आणि कॉन्स्टेबलने दारावर लाथ मारली.
एकदम पाण्याचा लोंढा आत घुसावा, तशी टीम आत घुसली आणि पटापट दिवे लावले गेले. काही वेळ जोरदार आरडाओरडा, ढकलाढकलीचे आवाज ऐकू आले. काही क्षणांत पोलिसांच्या टीमने तिथे असलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. मोहीम यशस्वी झाली होती.
शोधाशोध केल्यावर फ्लॅटच्या एका अंधार्या खोलीत चार मुलं कोंडून ठेवलेली आढळली. त्यांचे हात पाय, तोंड बांधून ठेवलेलं होतं. बिचारी तशाच अवस्थेत झोपली होती. त्यांना नीट खायलाप्यायलाही दिलं नसावं, हे जाणवत होतं. पकडलेल्या तिघांपैकी दोघांचे चेहरे सावंतांनी लगेच ओळखले. त्यांना धडक देऊन जाणारे हेच ते दोन मोटरसायकलस्वार होते! त्यावेळीच सापडले असते, तर या मुलांचे हाल थोडे कमी झाले असते, हेही त्यांच्या लक्षात आलं.
पोलीस स्टेशनमध्ये येऊन, सारखा फोन करून आजी ज्या धोक्याबद्दल सांगायचा प्रयत्न करत होत्या, तो हाच होता. या फ्लॅटमध्ये काहीतरी वाईट घडतंय हे त्यांच्या लक्षात आलं होतं, पण त्याच भागात राहत असल्यामुळे आपण संकटात सापडू शकतो, अशी भीती त्यांना वाटत होती. म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी पोलिसांना सावध करून गुन्हेगारांना त्यांच्या तावडीत देण्याचा प्रयत्न केला होता. मुलं फटाके उडवतात, त्रास होतो, असं सांगून काहीतरी कारणाने त्यांना पोलिसांचं तिकडे लक्ष वेधून घ्यायचं होतं.
बिराजदारांनी वेळीच हा धोका आणि आजींचा इशारा ओळखल्यामुळे गुन्हेगारांना जेरबंद करता आलं. या तिघांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मुलांचं अपहरण केलं होतं. त्यापैकी तिघं एका कुटुंबातली होती, चौथा त्यांचाच लांबचा नातेवाईक होता. एका कामासाठी त्यांना राबवून घ्यायचं आणि नंतर एखाद्या गुंडांच्या टोळीच्या ताब्यात देऊन टाकायचं, असा त्यांचा डाव होता. आजींच्या दक्षतेमुळे आणि पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे तो उधळला गेला.