आपण आपल्या हातात पाण्याचा ग्लास अगदी सहजी धरतो. तोच अवघा शंभर-सव्वाशे ग्रॅम वजनाचा ग्लास आपण तासभर धरला तर आपला हात दुखू लागेल आणि तोच ग्लास आपण दिवसभर धरून ठेवला तर तर आपल्या स्नायूंना इजा होऊ शकते. आपल्याला वैद्यकीय उपचार घ्यायला लागू शकतात. त्यामुळे ग्लास वेळीच खाली ठेवणे गरजेचे आहे. हा संदेश देणारी गोष्ट आपण ऐकलेली, वाचलेली असते. तरीही आपण आपल्या पूर्वायुष्यातील दुःखाचा, संकटाचा, चिंतांचा ग्लास सतत सोबत घेऊन फिरत असतो.
‘मैं जिंदगी का साथ निभाता चला, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया’ हे फक्त आपल्याला हिंदी सिनेमातील गाण्यापुरतं पटतं. एरवी आपण राग, लोभ, द्वेष, मत्सर, अपमान, दुःख अशा सगळ्या भाव-भावना, मावत नसतानाही कपडे ट्रंकेत दाबून कोंबून ठेवावेत तशा कोंबून ठेवतो. आपण उगाचच भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो, दुःख वाटून घेत राहतो, जुन्या काळातील अन्यायाचा, अपमानाचा बदला घेण्याच्या हेतूने डूख धरून राहतो आणि या सगळ्यापायी आपला वर्तमान जगायचं राहून जातं. बर्याचदा ऐकून, वाचून, विचार करून आपल्या लक्षात येतं की, जे घडून गेलंय ते आता आपण बदलू शकत नाही. ते विसरून जाणे हेच आपल्या हिताचे आहे. घडून गेलेल्या काळाचा विचार करणे हे आपल्या दुःखी असण्याचं कारण आहे. त्यामुळे हा अनावश्यक विचार करणेच थांबवायला हवे. पण हे ठरवायला सोपं असलं तर कृतीत आणायला कठीण आहे. कारण विचार हे सासुरवाडीच्या पाहुण्यांसारखे असतात. कितीही नाही म्हटलं तरी ते येतातच!
सार्वजनिक जीवनात देखील, इतिहासातले दगड वर्तमानात वाहायला आपल्याला आवडतात. इतिहासातील कर्तबगार व्यक्तीच्या जीवनापासून काही धडे घेण्याऐवजी तो आपल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा किंवा गावचा कसा होता हे सांगण्यासाठी आपली धडपड असते. इतिहासात आपला झालेला पराभव दगाबाजीमुळे झालेला असतो. आपण हरलो तरी अतुलनीय शौर्य गाजवलेले असतं. आपण जिंकलो तेव्हा शत्रुपक्षानेही शौर्याबद्दल आपले गुणगान गायिलेले असतात. आपण शत्रूच्या गावा-शहरांची केलेली लूट आपल्या पराक्रमाची निशाणी असते. शत्रूने मात्र निर्दयपणे आपली गावं बेचिराख केलेली असतात. इतिहासात शत्रूने आपली धर्मस्थळे उद्ध्वस्त केली म्हणून आपल्याला वर्तमानात ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू पाडायच्या असतात. गँग्ज ऑफ वासेपूरमधल्या फैजल सारखा आपल्याला (ठाऊकही नसलेल्या, इतिहासात होऊन गेलेल्या) बाप का, दादा का, भाई का असा सगळ्यांचा बदला घ्यायचा असतो. ही बदल्याची भावना आपण चोवीस तास मनात बाळगतो आणि त्या बदल्यात स्वास्थ्य गमावून बसतो.
आपण सगळ्यात जास्त कसली चिंता करीत असू, तर ती म्हणजे चार लोक काय म्हणतील! ज्यांचं आपल्या जीवनात, आपल्या वाढण्यात, यशापशयात, घडण्या-बिघडण्यात कसलंही स्थान नसतं त्या अनामिक चारचौघांच्या धास्तीने आणि त्यांच्या कलाने आपण आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेत असतो किंवा टाळत असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अडचणीच्या वेळी कामी येईल म्हणून, आपल्या घराची एक किल्ली शेजार्यांकडे असावी ही सूचना आम्ही इतकी मनावर घेतलीय की आम्ही आयुष्याची किल्लीही समाजातील ‘चारचौघांकडे’ देऊन ठेवलीय.
आपण केवळ आपल्याच वैयक्तिक आयुष्यातील नकोशा घटनांचं, आठवणींचं, चिंतांचं गाठोडं घेऊन फिरतो असं नव्हे, तर बर्याचदा इतरांची आणि सामाजिक बाबींचीही ओझी आपल्या मानगुटीवर वागवत राहतो. प्राचीन काळी कधीतरी एका समाजाने दुसर्या समाजावर केलेल्या अन्यायाबद्दल त्या समाजाच्या आजच्या पिढीने माफी मागावी अशी आपली अपेक्षा असते. पूर्वी उत्तर प्रदेशात की कुठेतरी घडलेल्या घटनेबद्दल आता महाराष्ट्र बंद ठेवण्याची हाक मध्यंतरी एका संघटनेने दिली होती. हे म्हणजे शेजार्याला जुलाब होत होते म्हणून आपण शौचालयात जाऊन बसण्यासारखे आहे.
भारतीय उपखंडातील लोक चिंता खूप करतात असं मध्यंतरी एका एनजीओने केलेलं सर्वेक्षण प्रसिद्ध झालं होतं (ती एनजीओ देखील भारतीय उपखंडातीलच असणार. नाहीतर, कोण किती चिंता करते याची चिंता करायचं त्यांना काय काम?). त्यांच्या मते युरोप-अमेरिकेत नागरिकांना सामाजिक सुरक्षितता असल्याने त्यांना भविष्याची फारशी चिंता नसते. याउलट भारतीय उपखंडातील लोक आपल्या वृद्धापकाळाच्या उत्पन्न आणि वैद्यकीय सेवेच्या अनिश्चिततेमुळे खूपच चिंताग्रस्त असतात. अनिश्चिता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे भविष्यातील अनिश्चिततेबद्दल आपल्याला चिंता वाटणे आणि ती अनिश्चितता कमी करण्यासाठी धडपडणे समजू शकतो. पण जगात इतरत्र ही अनिश्चिता प्रामुख्याने भविष्याबद्दल असते आपल्याकडे तर, इतिहासाचे पुनर्लेखन नव्या जोमाने सुरु असल्याने, आपला भूतकाळ देखील अनिश्चित आहे.
खरं तर, कुठलीही चिंता न करता आजचा दिवस सकारात्मकता आणि आनंद पसरवीत जगण्यासाठी डिस्कवरी चॅनेलचा समालोचक हा आपला रोल मॉडेल असायला हवा. अरे इथे, नट्टापट्टा करून आलेल्या मैत्रिणीची प्रशंसा करतानाही आपण कद्रूपणा करत ‘हम्म बरी दिसतेस’ इतकंच म्हणतो आणि तिथे तो डिस्कवरी चॅनेलवरील समालोचक, पालीला, वटवाघळाला, दगडाला आणि ओंडक्याला पाहून आ वासून ‘वॉव’ असे उदगार काढतो, हे मनसोक्त दाद देणं त्याच्याकडून शिकता यायला हवं.
माणसाने भूतकाळाचे भूत मानगुटीवर घेऊन फिरू नये. परीक्षेत किंवा प्रेमात अपयश आलं म्हणून निराश होऊन आत्महत्या करणारे, प्रियकर किंवा प्रेयसीने धोका दिला म्हणून आयुष्यभर लग्न न करता डिमॉनिटाईझ झालेल्या हजाराच्या नोटेसारखं आयुष्य जगणारे लोक, हे भूतकाळाचे भूतग्रस्त आहेत. मी म्हणतो, आपल्याला वर्तमान खर्या अर्थाने जगायचा असेल तर इतरांच्या चुकांसाठी त्यांनाच नव्हे तर आपल्या चुकांसाठी स्वतःलाही माफ करता आले पाहिजे. ‘आठ वर्षात मान खाली घालायला लागेल अशी एकही कृती माझ्या हातून झाली नाही’ असे जाहीरपणे म्हणणार्या, कित्येक घोडचुका (ब्लंडर्स) करूनही त्याबद्दल खेद वाटणे सोडाच उलट ते अभिमानाने मिरवणार्या ‘ब्लंडर्स प्राइड’चा आदर्श आपल्यासमोर असताना, आपल्या हातून गतकाळात झालेल्या छोट्यामोठ्या चुकांबद्दल चिंता करून आपण स्वतःला वर्तमानात शिक्षा करणे हे म्हणजे टकल्या माणसाला शाम्पूवर सबसिडी दिल्यासारखं आहे.
एक मित्र म्हणाला, भूतकाळात आपल्या हातून झालेल्या चुका, अपराध, चारचौघात झालेला अपमान, प्रेयसी/ प्रियकराशी झालेला ब्रेकअप, आपल्यावर झालेला अन्याय, आलेला राग, काही कारणाने हातून निसटलेल्या संधी हे कितीही विसरू म्हटलं, तरी ९९ टक्के लोकांना ते विसरता येत नाही. समजा, आपण जिच्यासाठी आयपीएस बनण्याचं स्वप्न पाहून रात्रंदिवस अभ्यास करत होतो ती भंगारवल्यासोबत पळून गेली तर ते दुःख आपल्याला जन्मभर विसरता येईल का? त्यामुळे हे दुःख असं विसरू न शकणारे ९९.९९ टक्के लोक मूर्ख आणि तू एकटाच तेवढा शहाणा असं तुला म्हणायचं आहे काय? मी म्हटलं, बहुसंख्य लोकांना चिंता करणं टाळता येत नसलं तरी चिंता करणं हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अपायकारक असून त्यामुळे आपल्याला वर्तमानात निरामय जगण्याचा आनंद घेता येत नाही हेच सत्य आहे.
एखाद्या मताचे लोक बहुसंख्य असणे, एखाद्या वस्तूचा खूप खप असणे किंवा एखाद्या व्यक्तीची प्रचंड लोकप्रियता असणे याचा अर्थ ते मत, ती वस्तू किंवा ती व्यक्ती बरोबर आहे असं नसतं. भारतभरातील देशी दारूच्या दुकानातून संत्रा किंवा बडिशेप फ्लेवर जेवढा एका दिवसात खपतो तेवढा जगदाळेंचा अमृत किंवा जॉनी वॉकर वर्षभरातही खपत नाही. म्हणून काय संत्रा आणि बडीशेप फ्लेवरची देशी दारू, सिंगल माल्टपेक्षा भारी ठरत नाही.
राग, लोभ, द्वेष, मत्सर, असूया, अपमान, दुःख अशा नकारात्मक गोष्टींना आपल्या आयुष्यात थारा न देता, त्यांच्यापाठी आपली ऊर्जा वाया न घालविता माणसाने सकारात्मक राहून कटू अनुभव देणार्यांना माफ करावं, कटू अनुभव विसरून पुढे चालावं या उद्देशाने दरवर्षी २३ जूनला ‘नॅशनल लेट इट गो डे’ साजरा केला जातो. रोज सकाळी झोपेतून उठता बरोबर, गतकाळातील अशा शेकडो नकारात्मक गोष्टी आपल्या समोर येतील. पण आपल्याला आजचा दिवस खर्या अर्थाने जगायचा असेल, आनंदात घालवायचा असेल तर या चिंतामणरावांना हात जोडून सांगता आलं पाहिजे, ‘जाऊद्या ना भाऊसाहेब!’
भूतकाळात घेतलेल्या निर्णयांबद्दल खेद करण्यात काही अर्थ नसतो. निर्णय चुकलेला जरी असला तरी आपण एक वेगळा मार्ग चोखाळल्याचं समाधान मानत माणसाने पुढे निघावं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही पश्चातापाचे, खेदाचे प्रसंग असतात. कित्येक दिवस, महिने, वर्षे ही भावना आपलं काळीज पोखरत राहते. दरम्यानच्या काळात ती घटना, ती माणसं, ते काम आपल्या आयुष्यात तितकंसं महत्वाचं राहिलेलं नसतं. त्या नकारात्मक भावनेचं गाठोडं वेळीच डोक्यावरून उतरवून भावना ताईलाही सांगता आलं पाहिजे, ‘जाऊद्या ना ताईसाहेब!’