शरीर आपले आहे, ते कसे ठेवायचे हे आपल्या हातात असते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडू शकते हे आपण लक्षात ठेवायला हवे. माझ्याकडे येणार्या मंडळींची वेट लॉसची प्रगती कशी आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात एक अॅप विकसित केले आहे, त्याचा देखील चांगला फायदा होत आहे.
– – –
अनेक जणांची व्यवसायात उतरण्याची इच्छा असते, पण बर्याचदा झगडून देखील मार्ग सापडत नाही, समोर पर्याय नसल्यामुळे त्यांना नोकरीत रमावे लागते. व्यवसाय सुरु करण्यासाठी नशिबाची साथ असावी लागते का, या प्रश्नाचे उत्तर ‘हो ‘असेच आहे. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. कसा ते पुढे वाचा.
बारा वर्ष मी एका नामांकित बीपीओ कंपनीत चांगल्या पदावर काम करत होतो. माझ्या कामाचे स्वरूप बैठे होते. त्यात शिफ्टमध्ये काम, त्यामुळे माझे वेळापत्रक विस्कळीत असायचे. त्या काळात माझे वजन ९२ किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. सात वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही. एके दिवशी विमाननगरमधल्या माझ्या घराच्या परिसरात कामानिमित्ताने बाहेर पडलो होतो. अचानक चक्कर येऊन पडलो. मग काय सुरु झाल्या तपासण्या आणि डॉक्टरांच्या फेर्या… त्यात रक्तदाब वाढल्यामुळे हा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले होते. मग वाढलेले वजन कमी करण्यासाठी सायकलिंग, व्यायाम, जिम, धावणे, असे उपक्रम सुरु झाले. पण काही केल्या वजन कमी होत नव्हते. एके दिवशी मित्राने खास वजन या विषयावर काम करणार्या एका तज्ज्ञाची ओळख करून दिली. त्यांनी मला एक वेट लॉस प्रोगॅम दिला. त्यात ८० टक्के भर हा डाएटवर आणि उर्वरित २० टक्के भर व्यायामावर दिला होता. आपण हे करून पाहूया काय होते ते म्हणून सुरु केले. त्यात खंड पडू न देता ते सुरु ठेवले आणि काही दिवसांमध्ये २२ किलोने वजन उतरले होते. आपल्याला हा मार्ग सापडला, त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नोकरी सांभाळून या क्षेत्रात काम करायचे ठरवले. सुरुवातीला अर्धवेळ सुरु केलेले हे काम नंतर इतके वाढले की त्यासाठी दिवस पुरेनासा झाला. एका अपघाताने मला वेगळा मार्ग दाखवत या व्यवसायात आणले आहे, त्यामुळे नशीब कुणाला कधी कुठे घेऊन जाईल याचा अनुभव यामधून मला मिळाला आहे.
इंजिनिअरिंगचे शिक्षण
पुण्यातल्या एसएसपीएममधून बीई इलेक्ट्रिकची पदवी घेतली, तेव्हा मी त्यात नोकरीच्या फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. नोकरी मिळवण्यासाठी माझे आटोकाट प्रयत्न सुरु होते. पण काही केल्या ती मिळत नव्हती. अखेरीस एका टप्प्यावर ठरवले की हातात पडेल ती नोकरी घ्यायची आणि कामाचा श्रीगणेशा करायचा. नोकरीची शोधाशोध सुरु असतानाच एका बीपीओ कंपनीत कामाची ऑफर आला. कोणताही मागचा पुढचा विचार न करता ती मी हातात घेतली. काम सुरु झाले तसतशी प्रगती करत करत मी कन्सल्टन्ट पदापर्यंत जाऊन पोहचलो. पगार पण चांगला होता. सगळे सुखासुखी चालले होते. पण मला शिफ्टच्या कामाचा कंटाळा येऊ लागला होता. त्यामुळे मानसिक अस्वस्थता देखील वाढत चालली होती. पण दुसरा काही पर्याय समोर नव्हता, त्यामुळे डोळयांवर कातडे ओढून ती नोकरी मी करत होतो. बीपीओमध्ये माझे काम होते ते मार्केट रिसर्चमध्ये. दुसर्या कोणत्या कंपनीत नोकरीची संधी आहे का, याचा शोध घेत होतो. तेव्हा हैद्राबाद, गुडगाव, बंगळुरू या ठिकाणी जॉब होते. मला काही कारणामुळे घरापासून लांब जाणे शक्य नव्हते, त्यामुळे हातात असणारा जॉब सुरू ठेवला होता.
लाइफस्टाइलवर परिणाम
नोकरीच्या वेळापत्रकाचा माझ्या लाइफस्टाइलवर परिणाम झाला होता. माझे काम बैठ्या स्वरूपाचे असल्यामुळे माझे वजन ९२ किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. कामाला शनिवार-रविवार सुटी असायची. त्यामुळे त्या दिवशी बाहेर हॉटेलिंग व्हायचे. चायनीज पदार्थ, बिर्याणी यांचा मनसोक्त आनंद घेणे नियमितपणे सुरु होते. त्यातच घराजवळ चक्कर येऊन पडलो आणि रक्तदाब वाढल्याचे निष्पन्न झाले. तिथून पुढची वाटचाल झाली. तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांत माझे वजन २२ किलोने वजन उतरले तेव्हा आपण नोकरी सांभाळून ज्यांना वजनाची समस्या भेडसावते आहे, त्यांना मदत, मार्गदर्शन करावे, असे ठरवून मी आणि माझी पत्नी स्मिता आम्ही दोघांनी काम करण्यास सुरवात केली. वेट लॉस प्रोग्रॅमचे प्रशिक्षण घेतले, त्यामध्ये कशा प्रकारे मार्गदर्शन करायचे हे समजावून घेतले. त्यानंतर आमच्या सोसायटीमधल्या दोघाजणांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांना काही दिवसांत चांगला रिझल्ट मिळाला. त्यामुळे आमच्या या उपक्रमाची माऊथ टू माऊथ पब्लिसिटी सुरु झाली. हळू हळू काम वाढू लागले.
२०१४ मध्ये नोकरीला रामराम
वेट लॉस प्रोग्रॅमचे काम वाढू लागले. त्यातील आमदनी नोकरीच्या तुलनेत चांगली होती. त्यामुळे २०१४मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ त्यात उतरण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमात व्यायामापासून सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यांचे नियोजन, खाण्याच्या वेळा, पदार्थ याबरोबरच न्यूट्रिशनचा समावेश करून ते वेळापत्रक त्या व्यक्तीला देणे, व्यायाम कोणते, कसे, कधी करायचे याचे एक वेळापत्रक देणे; प्रोग्रॅम सुरु झाल्यानंतर त्या व्यक्तीशी रोज संपर्क साधून त्याची प्रगती जाणून घेणे, अशा प्रकारचे काम सुरु झाले. या कामात मी थोड्याच काळात चांगला रमून गेलो. चांगले रिझल्ट मिळत आहेत म्हणून अनेक जण त्याच्याशी जोडले गेले. बीपीओ कंपनीतले काही जण माझ्याकडे जोडले गेले होतेच. हळूहळू कामाचा व्याप वाढत गेला.
घरातून झाला होता विरोध
नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसायात उतरण्याचे ठरवले, तेव्हा घरातून खूप विरोध झाला. घरातल्या मंडळींनी बंधने घातली. तुझा व्यवसाय चालेल का, जर चालला नाही तर काय करायचे, पुढची तुझी प्रगती कशी होणार, असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. पण मी त्यात पूर्णवेळ उतरण्यावर ठाम होतो. मला खात्री होती, हा व्यवसाय आपल्याला चांगला हात देणार. त्यामुळे घरच्या मंडळींच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा चांगला फायदा झाला.
काही अनुभव असेही आणि तसेही
वेट लॉस प्रोग्रॅम सुरु केल्यानंतर तो व्यवस्थित पूर्ण करणार्या मंडळींना त्याचे निश्चितपणे चांगले परिणाम दिसतात. ती मंडळी त्याचा प्रसार करतात. त्यामधून नवीन माणसे जोडली जातात. वाढलेल्या वजनामुळे काहीजणांना डिप्रेशन आलेले मी पाहिले होते. पण हा प्रोग्रॅम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ते त्यामधून बाहेर पडून आनंदी जीवन जगत आहेत. काही जण हा प्रोग्रॅम फॉलो करताना चुकतात, त्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, नंतर ते शंख करत बसतात, असेही काही अनुभव आले आहेत. शरीर आपले आहे, ते कसे ठेवायचे हे आपल्या हातात असते; त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते हे आपण लक्षात ठेवायला हवे. माझ्याकडे येणार्या मंडळींची वेट लॉसची प्रगती कशी आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात एक अॅप विकसित केले आहे, त्याचा देखील चांगला फायदा होत आहे. भविष्यात हा व्यवसाय वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे, पैसे येतील जातील; पण सर्वात महत्वाचे आहे ते फिटनेस टिकवणे.
शब्दांकन – सुधीर साबळे