अशी आहे ग्रहस्थिती
शुक्र-राहू-हर्षल मेषेत, १९ जूनपासून शुक्र वृषभेत, बुध वृषभेत, केतू तुळेत, शनि (वक्री)- कुंभेत, गुरु-मंगळ-नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकरेत, चंद्र मकरेत, त्यानंतर कुंभ मीन आणि सप्ताहाच्या अखेरीस मेष राशीत. दिनविशेष – २४ जून रोजी योगिनी एकादशी.
मेष – शुक्राच्या द्वितीयेतील राश्यांतरामुळे आनंददायक अनुभव येतील. चांगली आर्थिक प्राप्ती होईल. मिष्टान्न भोजनाचे योग आहेत. संस्मरणीय घटनांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल. लाभातील वक्री शनि अनपेक्षित लाभ मिळवून देईल. व्ययस्थानातील गुरूमुळे धार्मिक यात्रांचे योग जुळून येतील. कामानिमित्ताने धावपळ वाढेल. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. संततीसौख्य मिळेल. नोकरी-व्यवसायात सर्व गोष्टी अनुकूल राहतील.
वृषभ – अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. आठवडा उत्साहवर्धक जाईल. हातून दोन कामे जास्त होतील. प्रवासाचे योग जुळून येतील. विदेशात जाण्याचे नियोजन प्रत्यक्षात येईल. शुक्र प्रचंड बळ देईल. आगामी काळ चांगला राहील. शनि महाराज दशमात असल्यामुळे मनासारखी कामे होतील. कौटुंबिक कार्ये पार पडतील. संततीच्या बाबतीत शुभवार्ता कानावर पडेल. मुलांना शिक्षणात भरघोस यश मिळेल. किरकोळ आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन – अनपेक्षित लाभ होतील. शेअर बाजार वा अन्यत्र केलेली गुंतवणूक चांगला लाभ देईल. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागेल. प्रवासात मनस्तापदायक घटना घडू शकते. दाम्पत्यजीवनात आनंद वाढेल. दशमातील गुरु आणि मंगळामुळे करियरमध्ये स्थिरता येईल. सरकारी नोकरांसाठी उत्तम काळ आहे. व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. काहींना बक्षीसरूपात चांगले लाभ मिळतील. समाजोपयोगी कामातून आनंद मिळेल.
कर्क – महागड्या वस्तूची खरेदी कराल. मातुल घराकडून चांगले लाभ मिळतील. १९ जूनपासून लाभात येणारा शुक्र फायदा करून देईल. मंगळाचे भाग्यातील भ्रमण, सोबत गुरु, २१ ते २३ दरम्यान सोबत येणारा चंद्र अविस्मरणीय अनुभव देईल. सुखस्थानातील राहूचा फारसा त्रास राहणार नाही. संततीबाबत विलक्षण अनुभव येतील. धार्मिक, आध्यत्मिक क्षेत्रात हातून चांगले कार्य घडेल. गुरुचे खरे स्वरूप अनुभवण्याचा काळ. वकिलांना यश मिळेल.
सिंह – सप्तमातील वक्री शनि आणि योगकारक मंगळ यामुळे शुक्लकाष्ठे वाढतील. विचारपूर्वक पावले टाका. १९ जूनपासून राश्यांतर झालेला शुक्र घोडदौड सुरु ठेवेल. रवीचे लाभातील भ्रमण बुद्धीच्या जोरावर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरवेल. नवीन मित्र जोडाल. सरकारी योजनेतून लाभ मिळतील. कर्जाची प्रकरणे निकाली लागतील. संततीच्या कामाची प्रशंसा होईल.
कन्या – इच्छा पूर्ण होतील. लक्ष घालाल तिथे यश मिळेल. अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकार मिळेल. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळेल, त्यातून आवक वाढेल. परदेशभ्रमणाचे योग आहेत. प्रवासात नवीन ओळखी होतील. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ आहे. आरोग्याची काळजी घ्या, अरबट चरबट खाणे टाळा.
तूळ – शुक्राचे अष्टमातील भ्रमण, गुरु-बुध-शुक्र त्रिकस्थानात, त्यामुळे विपरीत राजयोगाचा काळ राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. अडकलेले काम झटपट मार्गी लागेल. रवीच्या भाग्यातील राश्यांतरामुळे धार्मिक किंवा शिक्षण संस्थांमध्ये महत्वाची जबाबदारी हाती येईल. प्रवास घडतील. वडीलधार्यांकडून सहकार्य मिळेल. शनि महाराजांची दृष्टी सप्तम भावावर असल्याने जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. नोकरदारांना अधिकारप्राप्तीचे योग आहेत. भागीदारीत चांगले सहकार्य मिळेल.
वृश्चिक – अभियांत्रिकी, केमिस्ट्री या विषयात शिक्षण घेणार्या मुलांना चांगले यश मिळेल. चांगली संधी चालून येईल. खेळाडूंना स्पर्धेत चांगले यश मिळेल. काहींना शिष्यवृत्ती मिळेल. प्रेमप्रकरणात हमखास यश मिळेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. भागीदारीत उत्तम लाभ मिळतील. आयात-निर्यात व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचे योग. वायदे बाजार, शेअर, कमिशन अशा ठिकाणी चांगली कमाई होईल.
धनु – संगीत क्षेत्रातील मंडळी, अभिनेते यांच्यासाठी काळ चांगला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतील. नोकरीत बढती मिळेल. जमिनीचे व्यवहार करणार्यांसाठी उत्तम काळ आहे. रवीच्या सप्तमातील भ्रमणामुळे वैवाहिक सौख्य मिळेल. १९ आणि २० तारखेला काळजी घ्या. बंधुवर्गाबरोबर गैरसमज होऊन वादाचे प्रसंग घडू शकतात. ते टाळा आणि नाते बळकट करा. मन अस्वस्थ होऊ शकते. गुरुचिंतनातून आनंद मिळेल.
मकर – शुक्राचे पंचमातील भ्रमण साहित्य व करमणूक क्षेत्रातील मंडळींसाठी खूपच लाभदायक ठरेल. नव्या ऑफर येतील. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल. पत्रकार, संपादक यांना उत्तम काळ आहे. नवी गुंतवणूक कराल. घरात कुरबुरीचे प्रसंग घडतील, त्याकडे दुर्लक्ष करा. नव्या वास्तूसंदर्भात पुढे जाण्यास हरकत नाही. संघटन क्षेत्रातील मंडळींचे कौतुक होईल.
कुंभ – आर्थिक लाभासाठी काळ उत्तम आहे. कर्जाची कामे सहज पार पडतील. शुक्राचे सुखस्थानातील भ्रमण आनंददायी आहे. वडिलार्जित व्यवसायात वृद्धी होईल. नोकरीच्या ठिकाणी सांभाळून राहा, वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा नस्ती आफत येईल. आर्थिक देवाण घेवाणीत पथ्ये पाळा, पुढे त्रास होणार नाही. आंधळा विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. नवीन गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे.
मीन – खर्चात वाढ होईल. आर्थिक देवाण घेवाण आवाक्याबाहेर राहील. व्यवहार काळजीपूर्वक करा. नोकरीनिमित्ताने घरापासून लांब जावे लागेल. १९ आणि २० तारखेला आईची काळजी घ्या. बोलताना जरा जपून राहा. हट्टी स्वभाव दूर ठेवा. गुरुबल चांगले राहणार असल्याने विवाह, मुंज यांसारखी शुभकार्ये घडतील.