अजयचे वैवाहिक जीवन पार उद्ध्वस्त व्हायला आले. त्याने अधिकारी साजीद खानचे पाय धरले. तुम्ही काहीही करा पण मला यातून वाचवा. माझी काहीही चूक नसताना नुसता मन:स्ताप झाल्याचे तो सांगू लागला. अजय आणि साजीद खान माझ्या घरी आले. आणि तिची समजूत कशी घालायची यावर तासभर खलबतं केली. पण बाई काही केल्या समजून घेईना ते अंक आणि त्यातील फोटो फाडून त्याचा बोळा करून तिने अजयच्या तोंडावर मारला. तिचे रौद्र स्वरुप पाहून आम्ही काढता पाय घेतला.
– – –
मान मोडेपर्यंत दिवसभर कष्ट करणार्या पुरुषाला बक्कळ पैसा मिळत असेल खरा. पण थकल्या भागल्या शरीराला कुणा सुंदरीने हळुवार हातांनी, प्रेमाने मसाज केला तर किती निवांत झोप लागत असेल, नाही तो आनंद तोचि जाणे.
बायका रोज ब्युटी पार्लरमध्ये जातात. तसे पुरुषही जायला लागलेत. बॉडी फिट राहण्यासाठी अधूनमधून मसाज करून घेण्यासाठी अनेक जण लेडीज मसाज सेंटरमध्ये जातात. बायकोने डोक्यावर कितीही तेल चोळपटले तरी डोकं धरून बसणार्या नवरोबांना सेंटरमध्ये मसाज करून घेतल्याशिवाय झोप लागत नाही. वातानुकूलित खोलीत मंदधुंद वातावरणात सुवासिक तेलाने अंगभर मसाज करणार्या बायकांचा धंदा हल्ली तेजीत चालला आहे.
आयुर्वेदिक औषधांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने मसाज करणारी केंद्रं जागोजागी आहेत. अगदी मान टाकलेले रुग्ण उपचार करून घेतल्यानंतर ताठ मानेने चालताना मी पाहिलेत. परंतु अशाच काही केंद्राच्या नावाखाली अनैतिक धंदे करणारी छोटी मोठी मसाज केंद्रंही बरीच वाढली आहेत.
आमच्या बातमीदाराने यावर संशोधन करून बरीच महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून आणली होती. `मसाज केंद्रे की कुंटणखाने’ असा मथळा देऊन बातमी प्रसिद्ध करण्याचे ठरले. त्यासोबत आवश्यक फोटो घेण्याचा प्रयत्न त्याने केला, पण म्हणतात ना `जेनु काम तेनु थाय, बिजा करे सो गोता खाय’- त्याला फोटो घेता आले नाहीत म्हणून ती जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मसाजच्या नावाखाली कुंटणखाने चालतात हे दर्शविणारे फोटो काढून आणा, असे संपादक म्हणाले. बॉसने काम सांगितले की चटकन `येस बॉस’ म्हणण्याची मला सवय आहे. तसे मी कबूल केले खरे, पण फोटो काढायचे कसे? बातमीदार सांगतो त्याप्रमाणे कुंटणखाना चालू असेल तर कोणाला डिर्स्टब करून कसे काय फोटो घेता येतील? बरे घेतलेच तर ते प्रसिद्ध कसे काय करू शकतात संपादक? मी बरेच विचारमंथन केले. काहीही होवो, संपादकांनी आदेश दिलाय तर आपण हार मानायची नाही. काम फत्ते करायचे असे ठरवून कॅमेरा घेतला आणि मसाज सेंटर शोधायला सुरुवात केली.
अशी ठिकाणं फार शोधावी लागत नाहीत. ती लगेच मिळतात. एका इमारतीबाहेर मसाज सेंटरच्या पाट्या लावलेल्या पाहून आत गेलो. पहिल्या मजल्यावर एका खोलीबाहेर एका तरुणीने माझे सुहास्यवदनाने स्वागत केले. आत उंच लाकडी पलंग होता. भिंतीवर कायाकल्प विधी, शिरोधारा वगैरे क्रियाकर्म करत असतानाची चित्रे लावली होती. मला काय झालं आहे असे तिने विचारले. मी अंग दुखत असल्याची तक्रार केली. तिने एक पंचा गुंडाळायला दिला आणि कपडे काढून उताणे झोपायला सांगितले. मी कॅमेर्याची बॅग समोर ठेवली आणि झोपलो. एका सुवासिक तेलाने तिने सर्वांग रगडायला सुरुवात केली.
आता कसं वाटतंय? विचारलं पण दुखतच नव्हतं कुठे, तर काय सांगणार! फार बरं वाटू लागलेय म्हणालो. पत्रकार लोकांचे कपडे उतरवतात असं ऐकून होतो. या बाईने पत्रकाराचेच कपडे उतरवले, याची खंत वाटली. आयुष्यात पहिल्यादाच कुणा परस्त्रीकडून मसाज करून घेताना बरं वाटलं आणि मी चक्क झोपी गेलो. तासाभराने उठून पाहिले खोलीत कुणीही नव्हतं. सर्वांग तेलाने माखलेले. मी टॉवेलने अंग पुसले, कपडे घातले आणि तिचे पैसे देऊन टाकले.
या बाईने काहीही गैरवर्तन केले नाही. कुठेही अश्लीलता नव्हती. तिने शास्त्रोक्त पद्धतीने मसाज केला आणि मी इथे कुंटणखाना चालतो म्हणून फोटो कुणाचा काढायचा?
मी बाहेर पडलो आणि संपादकांना फोन करून सर्व सांगितले. ते म्हणाले, हरकत नाही. ती चांगली माणसं असतीलही, पण तू अजून शोध घे तेथेच आसपास तुला मिळेल फोटो. मी बराच फिरलो आणि थकलो. दुसर्या दिवशी त्या बातमीदाराला फोन करून विचारले तर तो बातमीवर ठाम होता. मी म्हटलं, तू चल माझ्याबरोबर आणि दाखव कुठे कुंटणखाना चालतो ते. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. त्याने मला सुखलाजी स्ट्रीट येथे नेले. तेथील वातावरण, पान खाणार्या बायका आणि त्यांचे विचित्र चाळे पाहून येथे खरोखर अनैतिक व्यवहार होत असावेत असे वाटले. आम्ही आत डोकावून पाहिले व आत येऊ का, असे विचारले. पण बायका आमच्यापेक्षा चतुर निघाल्या. त्यांना संशय आला आणि त्यांनी कॅमेर्याची बॅग बाहेर ठेवून आत येण्यास सांगितले. बॅग बाहेर ठेवून माझा हेतू साध्य होणार नव्हता. मी काढता पाय घेतला. आम्ही दुसरीकडे गेलो, पण तेथेही धोका वाटला. हात हलवत आम्ही ऑफिसमध्ये परतलो.
फोटो मिळत नाही तर बातमीला अनुसरुन रेखाचित्र काढायचे ठरले. चित्रकाराने तीन चार रेखाचित्रं काढून दाखवली, पण संपादकांना एकही पसंत पडेना. ते म्हणाले आपण मॉडेलिंग करून वेळ मारून नेऊ. मसाज सेंटरवर जसा मसाज करतात त्याचे नाट्यरुपांतर करून फोटो काढून घेऊ. त्यासाठी दोन मॉडेल म्हणजे एक पुरुष आणि एक बाई पाहिजे होती. आम्ही अनेकांशी बोललो, पण अशा विषयासाठी कुणी तयार होईना. पोलीस खात्यात साजीद खान नावाचा एक अधिकारी माझा मित्र होता. त्याला सांगताच एका फोनवर दोन मॉडेल्सची त्याने व्यवस्था केली. अजय आणि चंदा. दोघांचा एकमेकांशी काही परिचय नाही फक्त ओळखीतून मदत करण्यास आलेले दोघेही मध्यमवर्गीय घरातील युवक-युवती. फोटो कशासाठी आणि कसा काढायचा आहे ते त्यांना समजून सांगण्यात आले. हो नाही म्हणता दोघेही पोझ द्यायला तयार झाले. पण फोटो घ्यायचे कोठे? एका हॉटेलच्या मॅनेजरला विनंती केली. तो म्हणाला तुम्ही येथे खाऊ पिऊ शकता. आराम करा हवा तर एक दिवस. पण फोटो काढू नका. उद्या वर्तमानपत्रात फोटो आला तर पोलीस छापा टाकून धंदा बंद करतील.
दोन मॉडेल मिळाले, आता एक खोली भाड्याने हवी होती. खूप प्रयत्न केले पण कोणी सहकार्य करेना. लाखाच्यावर खप असणारे साप्ताहिक महिला वर्गात अतिशय लोकप्रिय होते. महिला वाचकवर्ग अधिक असल्यामुळे त्यांना आवडेल रुचेल असे साधे सोज्वळ छायाचित्र मुखपृष्ठासाठी हवे होते. शेवटी माझ्या घरीच फोटोसेशन करुया असे मी ठरवले. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरची मंडळी बाहेरगावी गेली होती. घरी मी एकटाच होतो. दुपारच्या वेळी लोक जेवून झोपी जातात. त्या सुमारास दोघांना घेवून मी घरी आलो. मी राहतो गिरगावातील एका चार मजली बिल्डिंगमध्ये. इथे कुणाकडे जरा काही खुट्ट झाले की बातमी सर्व खोल्यांतून वार्यासारखी पसरते. मी दार खिडक्या लावून घरात फोटोसेशन उरकून घेतले. काम संपल्यानंतर तिघे घराबाहेर पडलो तर बिल्डिंग हाऊसफुल्ल. प्रत्येक मजल्यावर प्रत्येकजण त्या बाईकडे संशयित नजरेने बघू लागला.
पंधरा दिवसांनी घरचे सुट्टीवरून परत आले. माझ्या आईला शेजारच्या बायांनी नको नको ते रंगवून सांगितले. आमच्या मातोश्रीसुद्धा धार्मिक वृत्तीच्या देवभोळ्या. त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनाही मुलगा फुकट गेल्याचे वाटू लागले. ती कोण बाई होती आणि दरवाजे खिडक्या लावून आत काय करत होते, म्हणून वडिलांनीही माझी हजेरी घेतली. दुसरीकडे काम व्यवस्थित केले म्हणून संपादकांनी शाब्बासकी दिली. तेवढेच मनाला समाधान वाटले. दोन दिवसांनी तो अंक महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. रेल्वेच्या प्रत्येक बुक स्टॉलवर, गावखेड्यातील एसटी स्टँडवर दर्शनी भागी विक्रीस ठेवण्यात आला. काही वाचकांच्या आवडीचा विषय असल्यामुळे अंकही हातोहात खपला.
मॉडेलपैकी अजय विवाहित होता. त्याच्या सासर्यांनी गावाकडे अंक पाहिला आणि त्यांचे माथे भडकले. जावई वाममार्गाला लागला, बाहेरख्याली झाला, असा त्यांचा समज झाला. त्यांनी मुलीला खरमरीत पत्र लिहून फोटोचे कात्रणही मुंबईच्या घरी पाठवले आणि नवर्याला जाब विचारावा असे त्यात म्हटले. जे व्हायचे होते तेच झाले. वडिलांचे पत्र वाचून मुलगी संतापली. नवरा कामावरून घरी येताच. घरी म..हा..भा..र..त! भांडीकुंडी, पोळपाट लाटणे जे हाती मिळेल त्या शस्त्राने लढाई सुरू झाली. अजयला दोन वेळचे जेवण मिळणे बंद झाले. घरी बायको असताना बाहेरून बाईकडून मसाज करुन घेतो हे कोणत्याही बायकोला आवडणार नाही. तसे इतरही नातेवाईक घरी येऊन बोलू लागले. अजयचे वैवाहिक जीवन पार उद्ध्वस्त व्हायला आले. त्याने अधिकारी साजीद खानचे पाय धरले. तुम्ही काहीही करा पण मला यातून वाचवा. माझी काहीही चूक नसताना नुसता मन:स्ताप झाल्याचे तो सांगू लागला. अजय आणि साजिद खान माझ्या घरी आले आणि अजयच्या बायकोची समजूत कशी घालायची, यावर तासभर खलबतं केली. मॉडेलिंग म्हणजे काय असते, इतर मासिकांसाठी स्त्रीपुरुषांनी कसे मॉडेलिंग केले आहे ते दर्शविणारे फोटो आणि अंक आम्ही जमा केले. ते सर्व घेऊन अजयच्या घरी गेलो. त्याच्या बायकोला ते दाखवून तिची समजूत घातली. पण बाई काही केल्या समजून घेईना. ते अंक आणि त्यातील फोटो फाडून त्याचा बोळा करून तिने अजयच्या तोंडावर मारला. तिचे रौद्र स्वरुप पाहून आम्ही काढता पाय घेतला.
एका फोटोसाठी एका प्रेसफोटोग्राफरला काय काय करामती कराव्या लागतात आणि त्यातून काय अनर्थ होऊ शकतो, त्याचे हे एक उदाहरण आहे. पुढं अजून बरंच काही…