मराठी टीव्ही प्रेक्षकांसाठी तो उत्तम निवेदक होता. टीव्हीवर त्याच्यासमवेत काम करणार्या आम्हा मित्रांसाठी मात्र तो वृत्तनिवेदकापलीकडे बराच कोणीतरी होता. म्हणजे कोण होता?
एका वाक्यात सांगायचं तर तो उत्तम माणूस होता.. उत्तम नागरिक होता. अतिसज्जन, अतिमृदू बोलणं, वागणं. इतरांना मदत करण्यासाठी सतत तत्पर असा आमचा हा प्रदीप भिडे नावाचा जगन्मित्र..!
दिवस कृष्णधवल दूरदर्शनचे होते. पडदा काळया पांढर्या रंगाचा असला तरी तेव्हाचे निर्माते कार्यक्रमात रंग भरण्याचे काम करत होते. कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार करण्याची स्पर्धाच त्यांच्यात लागली होती. अशा वातावरणात प्रदीपनं या दुनियेत प्रवेश केला.
कोणाशी कसलीही स्पर्धा न करता त्यानं आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वानं निर्मळ आणि नम्र स्वभावानं, प्रामाणिक कार्यसंस्कृतीनं स्वतःचं स्थान निर्माण केलं. दृष्यमाध्यमासाठी आवश्यक असलेल्या देखण्या व्यक्तिमत्वाचा भागही त्यात अर्थातच होता.
तरी पण दूरदर्शन या सरकारी माध्यमात शिरकाव मिळणं प्रदीपला तितकसं सोपं गेलं नाही. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटची पत्रकारितेची पदवी असूनही टीव्ही वृत्तविभागानं त्याला स्टाफवर घेतलं नाही. कारणं तत्कालीन वृत्तप्रमुखाला ठाऊक. दूरदर्शनच्या इतर विभागात मात्र प्रदीप भिडे या पुणेकर तरुणाचं स्वागत झालं. नवसाक्षरता मोहिमेसाठी सुरू केलेल्या टीव्ही मालिकेत निवेदनाचं काम करण्यासाठी प्रौढ व्यक्तीची गरज होती. प्रौढ दिसण्यासाठी प्रदीप या तेव्हाच्या तरुणाला त्यावेळी मिशा लावाव्या लागल्या होत्या.
टीव्ही माध्यमाची ताकद आणि शक्यता तेव्हा दूरदर्शनवरले कलावंत आणि निर्माते स्वतःच चाचपून पाहात होते. माध्यम सरकारी नियंत्रणाखाली असल्यानं हे काम सोपं नव्हतं. ज्याला ज्या विषयातलं कळत नाही त्या विषयातल्या विभागात त्याची नेमणूक करण्याच्या सरकारी खाक्यानुसार ‘कामगार विश्व’ नावाच्या कार्यक्रमासाठी सहाय्यक निर्माता म्हणून काम करण्याची जबाबदारी सुरवातीला प्रदीप भिडेवर येऊन पडली. नाव ‘कामगार विश्व’, पण कार्यक्रमात सहभाग कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योजकांचा. या विनोदाकडे दुर्लक्ष करून प्रदीप तिथं नेटकं आणि चोख काम करायचा. प्रदीपच्या अंगभूत गुणांना या कामात वाव नव्हता; पण टीव्ही कार्यक्रम निर्मितीची तांत्रिक अंगं शिकून घेण्यासाठी प्रदीपला ही उमेदवारी उपयोगी पडली. काही अपवाद वगळता कॅमेर्यासमोर उभे राहणार्या बुजुर्ग कलाकार आणि निवेदकांना निर्मितीच्या तांत्रिक अंगाची माहिती नसते आणि ती मिळवावी अशी त्यांच्यापाशी इच्छाही नसते. कार्यक्रमनिर्मिती क्षेत्रात काम केल्याने प्रदीपला अनायसे या क्षेत्रातील तांत्रिक आणि आर्थिक आणि व्यवस्थापकीय अंगाची जान पहेचान झाली.
कामगारविश्वातून बाहेर पडल्यावर नंतरच्या काळात प्रदीपने बरेच माहितीपट आणि जाहिरातपट बनवले. निर्मितीतंत्राचं हे प्रशिक्षण तिथं कामी आलं.
लहानसहान निर्मिती करण्याचा हा उद्योग प्रदीपनं उत्साहानं केला. याला कारण सिनेमा आणि नाटक या माध्यमाविषयी त्याला असलेली उपजत ओढ. रत्नाकर मतकरींच्या नाटकात त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतरच्या काळात माधव गडकरींनी नाट्यसमीक्षेचं सदर लिहायची कामगिरी प्रदीपवर सोपवली. पुणे गणेश फेस्टिव्हलमधल्या आकर्षक सूत्र संचालनाबद्दल प्रदीपला विशेष पुरस्कार मिळाला. सलग वीस वर्षे त्यानं ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
उद्योग जगतातील वावरामुळे इन-हाऊस प्रॉडक्शन्सची कंत्राटं प्रदीपला सहजगत्या मिळत गेली. त्याआधी एका बहुराष्ट्रीय कंपनीसाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून त्याने काम पाहिले होतं. तिथला अनुभवही प्रदीपला या मिनी निर्मिती उद्योगासाठी उपयोगी पडला. प्रसन्न व्यक्तिमत्व आणि संभाषण कलेवरलं प्रभुत्व हे प्रदीपच्या व्यावसायिक यशामागचं इंगित म्हणता येईल.
विविध सांस्कृतिक उपक्रमात सूत्रसंचालनाची, निवेदनाची, मुलाखतीची कामं मिळवायला प्रदीपला फार सायास करावे लागले नाहीत. त्यामागेही हेच कारण असावं. काही कामासाठी संस्थाचालकच त्याच्या घरी येऊ लागले.
प्रदीप अजातशत्रू होता. जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीशीही तो दिलखुलास संवाद साधू शकायचा. वैर हा शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हता. ‘माध्यम क्षेत्रात अशा प्रकारचं महत्त्वाचं स्थान मिळाल्यावर प्रदीपने मागे वळून पाहिलं नाही’ असं टिपिकल विधान करायचा मोह होतो. पण ते ठीक होणार नाही. कारण आमचा हा मित्र यशाच्या प्रत्येक टप्प्यावर मागे वळून आपल्या भूतकालीन वातावरणाकडे पाहात आला. आणि अभिमानाने पाहात आला. रयत शिक्षणसंस्थेत मराठी, संस्कृत आणि हिंदी विषय शिकवणारे आपले आईवडील, शिक्षण या क्षेत्राची त्यांना असलेली ओढ… त्यांच्या साध्या राहणीचे शाळकरी वयात झालेले संस्कार, त्या काळातील मध्यमवर्गीय राहणीतील मूल्यव्यवस्था या सर्व पर्यावरणाचे आपल्या मानसिकतेवर झालेले परिणाम प्रदीप विसरू शकत नव्हता. त्याच्या जाहीर भाषणात आणि खाजगी संभाषणात हे भान सतत जाणवायचं.
प्रदीपच्या काम करण्याच्या पद्धतीत, इतरांसमवेत त्यानं केलेल्या व्यवहारात ही जाणीव स्पष्ट आढळून यायची. जाहिरातपटासाठी प्रदीप मार्वेâट रेट आकारात असे. पण सेवाभावी संस्थांना अल्पदरात माहितीपट निर्मिती करून देत असे. श्रद्धानंद महिलाश्रम या संस्थेवर त्यानं तयार केलेला परिचयपट याचं उत्तम उदाहरण आहे.
कंपन्यांसाठी माहितीपट बनवताना उच्चपदस्थ अधिकारी वर्गाचा हस्तक्षेप वाढू लागल्यावर प्रदीपने हा व्यवसाय सोडून दिला. नंतरच्या काळात प्रदीप प्रत्यक्ष समाजोपयोगी कामं करू लागला. अंधेरीतल्या त्याच्या घराजवळच्या पडीक जमिनीच्या विघातक वापराला आळा घातला आणि ती जागा त्यानं एका सुंदर बगिच्यात रुपांतरित केली. अशा कामासाठी आपलं ग्लॅमर वापरून नोकरशहांकडून कामं करून घ्यायला त्याला कधीच संकोच वाटला नाही. माहीम वाचनालयाच्या कार्यकारिणीवर असताना देखील अशीच लक्षणीय कामगिरी करून प्रदीपनं अल्पावधीत वाचनालयाचा विकास घडवून आणला.
प्रसारमाध्यमातून मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर लोकोपयोगी कामासाठी करणारे प्रदीप भिडेसारखे टीव्ही स्टार विरळाच म्हणावे लागतील. प्रसिद्धी माध्यमात थोडीबहुत प्रसिद्धी लाभली की राजकीय क्षेत्रात शिरणारे आणि लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे कलाकार अवतीभोवती बरेच आढळतील.
निवेदन, सूत्रसंचालन या आधुनिक व्यवसायाला कलेचा दर्जा आणि प्रतिष्ठा देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्यात प्रदीप भिडे या आमच्या मित्राचं नावं अग्रक्रमाने घ्यावे लागेल.