□ ऐन निवडणुकीत मोदी सरकारचा धर्माच्या आधारावर अहवाल.
■ अखेर मूळ औकातीवर आले. बिना जनगणनेचा अहवाल पण काढून दाखवला. आणखी किती हवेत अच्छे दिन?
□ महाराष्ट्राची ‘महानंद’ गुजरातच्या मदर डेअरीच्या घशात.
■ दिल्लीचे मिंधे लाचार बेकायदा सत्तेत बसले आहेत समृद्धीच्या सूत्रधारासोबत, ते महाराष्ट्र लुटून सुरतेच्या स्वाधीन करायलाच!
□ नॉनव्हेज खातो म्हणून विलेपार्लेत गुजराती बिल्डरने मराठी माणसाला घर नाकारले.
■ मराठी माणूस यांच्या भजनी लागून गरबो रमायला लागलाय, छटपूजा करायला लागलाय, कीर्तनांच्या जागी प्रवचनांना जायला लागलाय… शिवाय, धर्माच्या आधारावर असाच भेदभावही करायला शिकलाय… फळं तर भोगावी लागतीलच ना!
□ निवडणुकीच्या नावावर काहीही खपवून घेणार नाही – हायकोर्टाने निवडणूक आयोगाचे कान उपटले.
■ त्याला बिचार्याला का बोल लावता? तो वरून आलेले आदेश पाळणारा इमानी नोकर आहे.
□ मोदी ड्रामा करतील, लक्ष ढळू देऊ नका – राहुल गांधी यांचा इशारा.
■ रडून झालं, बेताल बडबडून झालं, आता आणखी कोणतं नाटक पाहायला लागणार आहे, याची कल्पना करवत नाही.
□ पराभवाच्या भीतीने आढळरावांना पुढे केले – रोहित पवार यांचा अजित पवारांवर हल्ला.
■ पराभव निश्चितच आहे, कोण पुढे आणि कोण मागे, याने फरक काय पडतो?
□ अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदार – डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा पलटवार.
■ जबाबदारीने विधाने करणारे पंतप्रधान अशी इतिहासात त्यांची नोंद कधीच होणार नाहीये मुणगेकर साहेब! जबाबदारीने काही बोलले असते, तरच आश्चर्य होतं.
□ महाराष्ट्रातील ड्रग्स विक्रीतून लष्क ए तोयबाला मनी सप्लाय; मिंधे सरकारकडून मुद्दाम टाळाटाळ – प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट.
■ हे सत्ताधारी निर्लज्जपणे आपल्याला उठता बसता देशभक्तीचे पाठ पढवत असतात आणि जो यांना विरोध करतो त्यांना पाकिस्तानी ठरवून मोकळे होत असतात.
□ कपिल पाटलांची रॅली आली अन् महिलांनी दरवाजे लावले; भाजप व मिंधे गटावरील संताप अनावर.
■ यांच्यासाठी संसदेची दारं बंद होतील ४ जून रोजी.
□ मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या वाकलन गावाची दैना; पाणी नाही, रस्त्यांची दुरवस्था.
■ अहो, त्यांना त्यांच्या सख्ख्या मुलाच्या भवितव्यासाठीच केवढी यातायात करावी लागते आहे, दत्तक गावांकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? समजून घ्या.
□ भिवंडीत भाजपला बंडखोरीची लागण.
■ ४ तारखेनंतर पाहा. जो मागे राहील, तोच बंडखोर ठरेल.
□ हरयाणात भाजप सरकार गॅसवर.
■ शिशुपालाचेही शंभर अपराध कधी ना कधी पूर्ण होतातच…
□ ईडीला दणका; केजरीवाल तुरुंगाबाहेर.
■ त्यांना काही लाज ना लज्जा! मालकांनी छू केलं, हे धावले, धोतराचा, पोटरीचा, मिळेल त्याचा लचका काढला, याचंच समाधान…
□ ८७ हजार एसटी कर्मचार्यांचे वेतन रखडले; राज्य शासनाचे धोरण आडमुठे.
■ पगाराशिवाय काम कसं करणार कोणी? सगळ्यात आधी ती व्यवस्था केली पाहिजे ना?
□ मतदानाच्या टक्केवारीत साडेपाच टक्क्यांची वाढ होतेच कशी? – इंडिया आघाडी शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला धारेवर धरले.
■ ४ तारखेला कदाचित याचं उत्तर मिळेल… तेव्हा स्फोट होईल.
□ ५० हजार बेरोजगारांना मिंधे सरकारने दाखवला ठेंगा.
■ मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून चालतायत ते… कौतुक नहीं करोगे उनका?
□ लोकशाहीवर विश्वास नसणार्यांसोबत जाणार नाही – शरद पवारांनी धुडकावली मोदींची ऑफर.
■ बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न आहेत सगळे. सगळे लोक मोदीभक्तांइतके निर्बुद्ध आहेत का?
□ भाजपच्या आक्षेपार्ह जाहिराती आल्या अंगाशी – बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
■ गुन्हा दाखल, पण पुढे काय? काहीही होणार नाही.
□ विरोधकांची गळचेपी करणार्या मिंधे सरकारला झटका; शिवसेनेचे एम. के. मढवी यांना जामीन.
■ अजून तरी देशात कायदा शिल्लक आहे, तोवरच आशा आहे.
□ कळवा, मुंब्रा, दिव्यात २०० बेकायदा बांधकामांचे ‘टॉवर’.
■ नंतर आपोआप नियमित करून घेतले जाणार आहेत, याची त्यांनाही कल्पना आहे.