‘आयपीएल’चा १७वा हंगाम समारोपाच्या दिशेने वाटचाल करू लागला असतानाच त्याच्यात कमालीचे रंग भरले गेलेत. एकीकडे संजीव गोयंकांच्या थयथयाटामुळे के. एल. राहुल खचलाय, तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या राज्यकारभारामुळे रोहित शर्माची मुंबई इंडियन्समधील अस्वस्थता वाढतेय. तिसरीकडे विराट-गावस्कर वाग्युद्ध चांगलंच रंगलंय. क्रिकेटमधल्या या साथीदारांच्या भावना समजून घेऊन त्यांना धीर देण्याच्या हेतूनं महेंद्रसिंग धोनीनं झूमच्या साहाय्यानं एका आभासी बैठकीचं आयोजन केलंय. त्या (काल्पनिक) बैठकीचंच हे थेट प्रक्षेपण.
– – –
केएल राहुल : ‘आयपीएल’ सिर्फ तीन चीजों से चलता है. प्रâस्ट्रेशन… प्रâस्ट्रेशन… प्रâस्ट्रेशन… और मैं प्रâस्ट्रेशन हूं! ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळल्याची जखम भळभळत होती. मग अभिषेक शर्मा आणि
ट्रॅव्हिस हेडनं चौकार-षटकारांची आतषबाजी आमच्या गोलंदाजांच्या ठिकर्या पाडल्या. ट्वेन्टी-२० सामन्याचं रूपांतर चक्क टेन-१०मध्ये केलं. या दोन धक्क्यांतून सावरत नाही, तर आमचे लखनवी नवाब संजीव गोयंका यांनी आमची लायकीच काढली की… किती पैसे घेतोस आणि काय आऊटपुट देतो, असं चारचौघांत विचारलं…. (राहुल हुंदके देऊ लागला.)
महेंद्रसिंह धोनी : (सहानुभूती प्रकट करताना) रो मत राहुल, ये तो दुनिया की रीत है… ‘आयपीएल’ म्हणजे प्रâँचायजी क्रिकेट. मालक पैसे टाकतात. त्यांच्यासाठीचा हा निव्वळ बिझनेस. याच गोयंकांनी काही वर्षांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जवर बंदी असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्स नावाचा संघ खेळवला होता. त्यांचा माझ्यावरही विश्वास नव्हता, म्हणून त्यांनी माझी थेट कर्णधारपदावरून हकालपट्टी करून स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व सोपवलं होतं. काय तर म्हणे, युवा आणि कामगिरी करणारा कर्णधार हवा. मलाही वाईट वाटलं. पण मी शोक करीत बसलो नाही, खचलो नाही. पाहा, ४२व्या वर्षीही खेळतोय. माझा पाय दुखावतोय. पण मी यष्टीरक्षणातही करामती दाखवतोय आणि फटकेबाजी करीत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतोय. स्मिथनं चेंडू फेरफार प्रकरणी क्रिकेट डागाळलं. नंतर तो परतला, पण त्याची रया हरवलीय. आता तो वर्ल्डकपच्या संघातही नाही.
विराट कोहली : माहीभाई आहेत, म्हणून ‘आयपीएल’च्या टीव्ही प्रेक्षकसंख्येच्या आकड्यांचा उच्चांक गाठला जातोय.
रोहित शर्मा : चिकू, एकदम करेक्ट. माही, विराट आणि मी आपण तिघं खेळतोय म्हणून ‘आयपीएल’ची शान आहे. बाकीच्या सामन्यांना पाहा, क्रिकेटचाहते फारसे रस घेत नाहीत…
(इतक्यात राहुलला सासरेबुवा अभिनेते सुनील शेट्टी यांचा फोन येतो. म्हणून तो सर्वांना थांबण्याची सूचना करतो. सगळेच त्याला दुजोरा देतात.)
शेट्टी : अंजली…
राहुल : पप्पा, तुमची अंजली म्हणजे शिल्पा शेट्टी डान्स शोमध्ये परीक्षक असेल किंवा योगासनांचा सराव करीत असेल… मी राहुल!
शेट्टी : राहुल, ‘आयपीएल’ तुला विसरून जाईल, हे होऊच शकत नाही आणि तू ‘आयपीएल’ला विसरून जावं, हे मी कदापि होऊन देणार नाही. ए…. तू सोडून दे लखनऊचा संघ. मी जय शाहशी बोलून पुढच्या वर्षी अख्खी टीमच खरेदी करतो.
राहुल : पप्पा, मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, मी नंतर बोलतो तुमच्याशी.
शेट्टी : हिंमत कशी झाली त्याची?
(राहुल फोन कट करतो. सर्व जण हा संवाद ऐकून एकमेकांकडे पाहू लागतात.)
धोनी : राहुल, तू कोणत्या परिस्थितीतून जातोयस, हे मी समजू शकतो. असे प्रसंग येतात आयुष्यात. काही वर्षांपूर्वी ‘कॉफी वुईथ करण’मध्ये तू आणि हार्दिकनं तुमची प्रामाणिक मतं मांडलीत आणि वादाच्या भोवर्यात सापडलात. पण त्यानंतर दोघांनीही आपल्या मैदानातल्या कामगिरीनं स्वत:ला सिद्ध केलंत. त्यामुळे ‘दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल…’ हे नेहमी लक्षात ठेव.
रोहित : माहीभाई, नाव काढू नका त्या गुजरातच्या कुंग फू पंड्याचं. त्यानं मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हिरावलं आणि पाहा संघात कुणाचा कुणाला पायपोस राहिलेला नाही. मुंबईनं साखळीतच गाशा गुंडाळलाय. मी पाच वेळा मुंबईला किताब जिंकून दिलाय. पण हार्दिक मला काहीच किंमत देत नाही. एका सामन्यात तर मला त्यानं फिल्डिंगला सीमारेषेवर पाठवलेलं. किती वाईट वाटलं असेल. लोकांनी मला ‘हिटमॅन’ म्हणून निस्सीम प्रेम दिलंय. मुंबईची अस्मिता मी जपलीय आणि हा छ… (आवंढा गिळून स्वत:वर नियंत्रण मिळवलं.) आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये बघतो त्याला! माझा किती मोठा फॅन-फॉलोअर बेस आहे माहिती आहे ना? (एसीच्या गारव्यातही रोहित घामाघूम झाला. वरच्या बंद फॅनकडे पाहून आणखी शोकाकुल झाला.)
धोनी : रोहित शांत राहा. एसी वाढव, फॅन लाव. चला हवा येऊन द्या! मागच्या वर्ल्डकपला तो काही सामन्यानंतर दुखापतींमुळे बाहेर पडला होता. (सांत्वन करीत) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं!
विराट : माहीभाई, तुम्हाला हार्दिकचा जाम पुळका येतो. (फिरकी घेत.)
धोनी : क्रिकेटपासून दूर जायला लागलात की तुमचं असं होतं. क्रिकेटमुळे या पंड्या बंधूंचे दिवस पालटले. आलेलं ऐश्वार्य सांभाळणं, हेसुद्धा एक प्रकारचं शिवधनुष्यच पेलण्यासारखं आहे. विनोदजींची कथा तर सर्वश्रुत आहेच.
राहुल : हो, आम्ही ऐकलीय…
रोहित : ‘मुंबै मेरी जान’ आहे. पण या संघात आता परक्यासारखं वाटतंय. पुढच्या वर्षी एक तर हार्दिक नाहीतर मी…
विराट : इरादा पक्का, तर ‘हिटमॅन’ दे धक्का!
राहुल : मलाही लखनऊची हवा मानवत नाही. पुढच्या वर्षी काडीमोड अटळ. काव्याचा मला फोन आलेला हैदराबादचा कप्तान होशील का?
विराट : माहीभाई, तुम्ही, मी आणि रोहित आपण सीनियर क्रिकेटपटू सचिव जय शाह यांना भेटूया. वाटल्यास क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटू. या संघमालकांचा रूबाब वाढतच चाललाय. त्यांच्यासाठी आचारसंहितेची मागणी ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीला करू.
धोनी : असं होईल का?
(आपण काय बोलून गेलो, याची जाणीव झाल्यावर वातावरण शांत करण्यासाठी विराट थोड्या मनोरंजक सुरात…)
विराट : एजी, ओजी मै हूं मनमौजी…
रोहित : अरे, मनमौजी. सन्नीसरांवर तू इनकॅमेरा केलेली टीका सध्या जबरदस्त गाजतेय.
(विराट आता लालबुंद झाला. तो आता स्ट्राइक घेत उत्तुंग फटकेबाजी करणार, याची कल्पना सर्वांनाच होती. धोनीनं त्याच्याकडे नजर वळवली.)
विराट : सन्नीसरांना माझा स्ट्राइक रेट खटकतोय. त्यावर ताशेरे ओढतायत. पण मी गेली १५ वर्षं संघाला जिंकवत आलोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून मैदानावरील परिस्थिती तुम्हाला आजमावता येईल, याची काय खात्री? ही माझी प्रतिक्रिया चॅनेलनं वारंवार दाखवली, म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांना माहीत नाही का, ‘आयपीएल’च्या टीआरपीचं गणित ज्यांच्यावर अवलंबून असतं, त्यात मीही एक आहे.
रोहित : विराटचं म्हणणं अजिबात चुकीचं नाही. सन्नीसर नेहमीच ज्ञान पाजळत असतात.
विराट : लॉकडाऊनमध्ये सन्नीसरांनी माझ्या आणि अनुष्काच्या क्रिकेटसरावाविषयी केलेलं भाष्य अजूनही मी विसरलेलो नाही. स्ट्राइक रेटबाबत तर गावस्कर यांनी बोलूच नये. १९७५च्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ६० षटकं हे सलामीवीर मैदानावर होते आणि या महाशयांनी १७४ चेंडू खेळून धावा केल्या फक्त नाबाद ३६. वनडेमध्ये त्यांच्या खात्यावर एकमेव शतक. माझ्यावर खात्यावर ५० शतकं आहेत. नशीब त्या काळात ट्वेन्टी-२० क्रिकेट नव्हतं. नाही तर…
धोनी : विराट, तुझं वैफल्य स्वभाविक आहे. पण, तू त्यांच्यावर टीका करताना आपली पातळी सोडू नकोस. ते मोठे क्रिकेटपटू आहेत. ते कसोटी क्रिकेटच्या काळातले. भारताला देशात आणि परदेशात विजय मिळवून देण्याचा विश्वास दाखवणारे. त्या काळात वेस्ट इंडिजचे द्रुतगती गोलंदाज आग ओकायचे. पण गावस्कर निधड्या छातीनं मैदानावर उभे राहायचे. त्यामुळे गावस्करसारख्या थोरामोठ्यांच्या विश्लेषणामुळे नाऊमेद होऊ नकोस. तू तिकडे लक्ष देऊ नकोस. मी आणि सचिननंही कधीही कोणत्याही टीकेकडे लक्ष दिलं नाही. फक्त पुढील सामना हेच लक्ष्य, अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा हेच लक्ष्य दिसतं, तसं क्रिकेटपटूनं जगावं.
विराट : परमपूज्य माहीमहाराज की जय!!! माहीभाई, काही केल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचं नशीबच पालटत नाही. एकापेक्षा एक वीर संघातून खेळले. पण ‘आयपीएल’चा चषक अजूनही जिंकण्याचं भाग्य लाभलं नाही. (रोहितचा ऊर अभिमानानं भरून आला) त्या स्मृती मानधानानंही आरसीबीला महिला ‘आयपीएल’चं विजेतेपद जिंकून दिलं, पण आमची पाटी कोरीच. ‘आयपीएल’ जिंकण्याची गुरूकिल्ली असा एखादा क्रॅश कोर्स घे ना, आम्हा सर्व अपयशी संघांसाठी. अन्यथा, यंदा अखेरचा हंगाम असल्यास पुढील वर्षी बेंगळूरुचा कोच हो!
(निवृत्तीचा विषय येताच धोनीच्या चेहर्यावर स्मित झळकलं आणि तो भावनिकही झाला.)
धोनी : माहीत नाही, आणखी किती हंगाम खेळेन. ‘यलो आर्मी’ म्हणजेच चेन्नईचे पाठिराखे मला बळ देतात.
राहुल : माहीभाई, तुम्ही खेळत राहा. (रोहितनंही दुजोरा दिला.)
धोनी : (वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी…) तुम्हा सर्वांचं दु:ख गंभीर आणि गहिरं आहे. निलेश साबळेला सांगून ‘रडताय ना, रडायलाच पाहिजे’ असा एखादा कार्यक्रम तयार कर म्हणून.
विराट : वाह, दादा वाह!
धोनी : आता एकमेकांचे उणे-दुणे काढू नका. पुरे झाली शोकजत्रा, आता वर्ल्डकप १५ दिवसांवर आलाय. त्यावर लक्ष केंद्रित करा. रिझल्ट काय ते महत्त्वाचं नसतं. पण प्रोसेस महत्त्वाची असते! मागच्यासारखं उपविजेतेपद नको. रोहित-विराट, वर्ल्डकप जिंकून या!
(सर्वांना आपापल्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. त्यामुळे ही झूम मीटिंग संपुष्टात आली.)