□ महाविकास आघाडीच्या विकासकामांवरील स्थगिती उठवली; ईडी सरकारला दणका.
■ यांचे दिल्लीतले पिताश्री देशाचा सगळा विकास आपणच केला, असं सांगतात, इतरांनी काहीच केलं नाही, असा त्यांचा आव असतो; तोच प्रकार इथे करायला गेले, तो अंगलट आला.
□ ‘मिंधें’च्या राज्यात लाचखोरी वाढली.
■ खोके सरकारकडून वेगळी काय अपेक्षा ठेवायची?
□ कर्नाटकात भाजप आमदाराकडे सापडले सहा कोटींचे घबाड.
■ भाजपवाल्यांकडे आहेत, म्हणजे ते सचोटीने कमावलेलेच असणार हो, हे कितीही झाले भ्रष्ट तरी कायम श्रेष्ठ!
□ ममता बॅनर्जींचे ‘एकला चलो रे’, विरोधी पक्षांच्या एकजुटीपासून दूर.
■ भाच्यामुळे हात ईडीच्या दगडाखाली अडकलेले आहेत म्हणून वाघीणीचीही म्याँव मांजर होऊन बसलेले आहेत.
□ मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली; अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल.
■ कायदा-सुव्यवस्था यांनीच पोसलेल्या मवाल्यांच्या हातात गेलेली आहे… ढासळणार नाही तर काय!
□ सरकार पडणार आहे, हे माहिती असल्यामुळेच फसवणीसांच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस – आदित्य ठाकरे.
■ जी पूर्ण करण्याची वेळ येणारच नाही, ती वचने देण्यात कंजुषी का करायची आदित्यजी!
□ मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील जीडीआयपीआरमध्ये ५०० कोटींचा जाहिरात घोटाळा.
■ रोजच्या रोज सगळ्या पेपरांची पहिली पानं बरबटवतायत जाहिरातींनी, तो याहून मोठा घोटाळा आहे.
□ किरीट सोमय्यांच्या तालावर ईडी नाचतेय- हसन मुश्रीफ यांच्या वकिलांचा हायकोर्टात दावा.
■ जोडीला सीबीआय गाणी गातेय, ते सांगायचं राहिलं…
□ हायकोर्टाच्या नव्या इमारतीसाठी जागा देण्याबाबत निर्णय घ्या- न्यायालयाने राज्य सरकारला बजावले.
■ तुम्ही येताजाता राज्य सरकारचे कान पकडणार आणि हे खुनशी राज्य सरकार इमारतीसाठी जागा देणार?
□ पोलीस दल सक्षम बनवण्यात सरकार उदासीन; हायकोर्टाने उत्तर मागवले.
■ पोलिसांनी फक्त यांच्या आदेशानुसार विरोधकांची मुस्कटदाबी करायला हवी, त्यांचा भार तिजोरीवर नको; जनता उचलते तो भार चिरीमिरीच्या स्वरूपात! मिंधे करून टाकले पोलिसांना!
□ देशातील सर्व संस्था संघाच्या कब्जात- राहुल गांधी.
■ त्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया गेली ७५ वर्षे सुरू आहे, त्यातला बहुतेक काळ तुमचा पक्ष सर्वसत्ताधीश असूनही झोपून राहिला… आता तंबूत शिरलेल्या ऊंटाने तंबू ताब्यात घेतला राहुलजी!
□ गुजरात समुद्रात ४२५ कोटींचे ड्रग्स जप्त.
■ जप्त झालेले इतके असतील, तर सुटलेले किती असतील आणि कुठे कुठे गेले असतील? मोदीभक्त सतत तारेत असतात, त्याचं रहस्य हेच तर नसेल ना?
□ सत्ताधारी पक्षाला निवडणुकीची भीती वाटते; अजित पवार यांचा हल्लाबोल.
■ निवडणुकीत महाशक्तीची हवा पंक्चर होणार आहे, हे त्यांनाही नीट माहिती आहे.
□ देशात दररोज ६१ महिलांच्या आत्महत्या.
■ नारीशक्तीचा सन्मान राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सरकारच्या अपयशाची आणखी वेगळी कोणती पावती हवी.
□ विरोधकांसाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नावच काफी आहे – उपनेत्या ज्योती ठाकरे.
■ महाराष्ट्रातील आम जनतेसाठी शिवसेना म्हणजे ठाकरे आणि फक्त ठाकरे, हे डुप्लिकेट शिवसेनावालेही पक्के जाणून आहेत.
□ मिंधे गटाची झुंडशाही सुरूच; शिवाईनगर शाखेचा कब्जा घेण्याचा डाव.
■ मवालीगिरी करून शाखा बळकावाल, पैसे वाटून लोकांना मिंधे बनवाल; पण सच्च्या शिवसैनिकाची ज्वलंत निष्ठा कशी विकत घ्याल?
□ शेतकर्यांनी मोदींना पोस्टाने कांदे पाठवले.
■ काळीजशून्य राज्यकर्ते आहेत ते… त्या कांद्यांची भजी करून खातील.
□ न्यायालयाचे आदेश आणि एफआयआरची कॉपी सोमय्याला आधी कशी मिळते : न्यायालयाचे चौकशीचे आदेश.
■ हा बागडबिल्ला ठरावीक माणसांवर आरोप करतो, इतरांच्या बाबतीत त्याची वाचा बसते, हे पाहता न्यायालयाने आधीच ही विचारणा करायला हवी होती- देर सही दुरुस्त दणका दिला, हे मात्र खरे.
□ खत देताना जात विचारण्याचा केंद्र सरकारचा अश्लाघ्य उद्योग.
■ जातनिहाय जनगणना तर करायची नाही, पण आपल्या निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी जातीय समीकरणं तर जाणून घ्यायची, यासाठी हा आचरटपणा केला गेला आहे… लोक जात सोडत नाहीत, जात पाहून मत देणं सोडत नाहीत, तोवर खतही जात पाहूनच मिळणार.