इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रश्नाच्या ऐवजी चुकून उत्तरच छापले गेल्याचा गोंधळ घडला. आणि या पद्धतीने परीक्षा मंडळाची दरवर्षी काहीतरी नवीन गोंधळ घालण्याची जी परंपरा होती ती पुढेही चालू राहिली हे बघून मन भरून आले. एकवेळ आपण परीक्षा घेणार नाही पण परंपरेला मात्र चुकणार नाहीत. मराठी माणसाची ख्यातीच तशी आहे.
मागच्या वर्षी ‘मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही, आधी निर्णय घेतो आणि मग ते योग्य आहेत हे सिद्ध करतो,’ या रतन टाटांच्या वाक्यावर परीक्षेत प्रश्न विचारला. दुसर्याच दिवशी रतन टाटांनी वृत्तपत्रातच जाहीर केलं की मी असे काही म्हणालेलोच नाही. लगेचच परीक्षा मंडळावर सगळ्यांनी आग ओकायला सुरुवात केली. मी म्हणते, नसतील काही म्हणाले टाटा, पण कोणीतरी म्हणाले असेलच. नावात काय आहे? परीक्षा मंडळाचे काम आधीच एवढे अवघड. त्यात असल्या छोट्या छोट्या गोष्टींचा कीस पाडायचा म्हणजे फार झालं. मुळात या प्रश्नाच्या उत्तरासाठी जे काय २-३ गुण असतील, ते विद्यार्थ्यांना फुकटच मिळणार. एवढी चांगली गोष्ट बघायची सोडून आगपाखड काय करायची?
मला तर मुळातच परीक्षा या गोष्टीचीच भयंकर भीती वाटते. म्हणजे ते ‘जब वी मेट’मधील गीतला सारखे ट्रेन सुटल्याचे स्वप्न पडते, तसे मला अजूनही परीक्षेला बसल्याचे स्वप्न पडते. स्वप्नात नेहमी गणिताचाच पेपर असतो. मी सगळी तयारी करून पेपरला बसते आणि समोर इतिहासाचा पेपर येतो. शाळा-कॉलेज सुटून एवढी वर्षं झाली तरी अफजल खान आणि काळ-काम-वेग हे माझी पाठ सोडायला तयार नाहीत.
इतिहासातील सनावळींचा तर मी इतका धसका घेतलेला आहे की जितका इंग्रजांनी गांधीजींचा आणि अफजुल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतला नसेल. साधी लोकल ट्रेनने निघाले आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ट्रेन जाणार अशी घोषणा झाली तरी मी जोरात जन्म १९ फेब्रुवारी १६३० आणि मृत्यू ३ एप्रिल १६८० असे ओरडते. मग, एका गुणाचा प्रश्न आहे. इतक्या वर्षांनंतरही इतिहास नावाची रणधुमाळी अजून आमची मान सपासप कापून काढते आहे.
गणित, भूमिती हे तर आमचे आजन्म शत्रू आहेत. गणितातील एक एक संज्ञा ऐकायलाच अशा भयानक वाटतात की ते ऐकूनच आम्हाला पोटशूळ उठावा. विभाजक कुठला आणि विभाज्य कुठला हे गणित शाळा संपेपर्यंत त्रास देत होतं. विशालकोन, काटकोन, लघुकोन अशा सगळ्या कोनांनी आमच्या बालवयाच्या कुठल्याच कोनावर अतिक्रमण करायचं सोडलं नव्हतं. वर्गमूळ आणि घनमूळ काढताना तर मूळव्याध बाहेर येते की काय असे सगळ्यांचे चेहरे झालेले असत. बरं परीक्षेत प्रश्न सुद्धा असे असत की ज्याचं नाव ते. ‘एका वर्गसमीकरणाचे मूळ अमुक असेल तर त्या दुसर्या वर्गसमीकरणाचे मूळ शोधा.’
मुळात असं कोणाच्या मुळावर उठणं हा काही माझा पिंड नाही त्यामुळे हा प्रश्न मी डोक्यातून समूळ काढून टाकत असे.
‘एका कॉलनीत काही घरांत घेतले जाणारे दूध लिटरमध्ये १, ३, २, ४, ४, ५, २, ३ असे आहे. तर त्या कुटुंबांमधील दूध वापराचा मध्य, मध्यक व बहुलक काढा.’ असे विचारल्यावर मी मध्य दूध, मध्यक दही आणि बहुलक चहा असे लिहिले होते, यात मला ० गुण देण्यासारखे काय होते, हे मला आजतागायत समजलेले नाही.
जी कथा गणिताची, त्याहूनही भयानक कथा विज्ञानाची होती. रसायनशास्त्र हा तर विद्यार्थ्यांना नापास करण्यासाठी काढलेला विषय आहे, असे माझे मत अजूनही ठाम आहे. आपल्या शरीराला ऑक्सिजन आवश्यक असतो तर तो ओढून आत घ्या ना. त्यांचे सूत्र कशाला माहिती करून घ्यायचे आहे? तहान लागली तर पाणी प्यावे, त्याचे रासायनिक सूत्र माहिती झाल्याने ते पाणी थंड लागणार आहे का?
चुन्याची निवळी तर आमच्या वाईटावरच टपलेली होती. चुन्याच्या निवळीतून ‘सीओ२’ वायू जाऊ दिल्यास ती कशी होते? या प्रश्नाचे उत्तर मी लिहिले होते की, वायू जाऊ दिल्यावर काय होते ते माहिती नाही, पण चुन्याच्या निवळीत पाणी टाकले की ती पातळ होते आणि मग पानावर लावलेला तिचा विडा शेजारचा राजू काका खातो. तो त्यात तंबाखू देखील घालतो. तंबाखूचे रासायनिक घटक माहिती करून घ्यायचे असल्यास राजू काकांशी संपर्क साधा.
परीक्षकांनी मुळातच माझ्यावर भयंकर अन्याय केलेला आहे. रसायनशास्त्र असो, भौतिक असो वा जीवशास्त्र. आमचे मास्तर कायमच आमच्या विरोधात प्रश्नपत्रिका काढत आलेले आहेत.
‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ,’ हे संतांनी म्हणलेले असूनही परीक्षेत मात्र त्याचा अवलंब करण्यास आम्हाला सक्त मनाई होती.
माझ्यातील कलागुण खरे बहरले ते भाषा विषयांत. त्यातही व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांनी काही मला चांगले गुण मिळू दिले नाहीत.
आम्ही आमच्या वकुबाप्रमाणे सगळ्या म्हणी तयार केलेल्या होत्या. जसे की- पन्नास गुण महापुण्य, आयत्या परीक्षेवर गुणोबा, मी मागते पन्नास गुण, मास्तर देती साठ.
आम्हाला एक तारे नावाचे मास्तर मराठी शिकवायला होते. नेमकी त्याच वर्षी मराठीत म्हण आली- आधीच तारे त्यात गेले वारे.
परीक्षेत तीच म्हण आली आणि कोणीतरी ती लिहिली- आधीच तारे, त्यांच्या प्यांटमध्ये गेले वारे.
एका मुलाने केलेल्या चुकीची शिक्षा संपूर्ण वर्गाने भोगली होती.
काही बाबतीत मी प्रचंड प्रामाणिक होते. जसे की ‘म्हणाRचा अर्थ लिहा’ असा प्रश्न आला. म्हण होती- आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.
त्यावर्षी टिळकांचा इतिहास अभ्यासाला होता. टिळकांच्या टरफलांच्या तालावर लिहिले- मी रामेश्वरला गेलेले नाही, त्यामुळे नक्की कुठे आग लागली ते मी सांगू शकत नाही.
दुसरी म्हण आली- ‘एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारू नये.’ मी अर्थ लिहिला- मी पेपर वाईट लिहिला म्हणून गुरुजींनी वाईट गुण देऊ नयेत.
‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक…’ कृपया जीवशास्त्राचे प्रश्न भाषा विषयात विचारू नयेत.
परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत तर बडवून काढायचा शिरस्ता आमच्या पिढीत होता. वर्गातील जवळपास कित्येक घरांत परीक्षा झाली की आईबाप आपापल्या क्षमतेप्रमाणे पोराला हाणून काढत. निकाल येण्याची वाट बघण्याचे पेशन्स त्यांच्यात नव्हते, असे मला खेदाने म्हणावे लागेल. आता एरवी मार खाल्लाच आहे, तर तो सार्थ करणे आमचे कर्तव्य असल्याने आम्हीदेखील परीक्षेत अगदी काठावरचे गुण घेत असू. फार जास्त लाड करून, मागेल त्या वस्तू विकत घेऊन देऊन जसे आमच्या आईबाबांनी आम्हाला लाडावून ठेवले नाही, तद्वत, उगीचच भरमसाठ गुण घेऊन त्यांच्या अपेक्षा वाढू नयेत याची आम्हीही पुरेपूर काळजी घेतली. ९०-९५ टक्क्यांचे फाजील लाड आम्हाला परवडणारे नव्हतेच. पुन्हा पुन्हा त्याच वर्गात आम्हाला बसवून परत असल्या पोरट्यांना शिकवणे मास्तरला जड जायचे, त्यामुळे मास्तरच आम्हाला पुढच्या वर्गात ढकलायचे.
शाळेत असताना आईबाबा म्हणायचे, फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, कॉलेजात एवढं काही नसतं. कॉलेजच्या वर्षात म्हणाले, आता थोडंच राहिलं. पण तेव्हा लक्षात आलं नाही की ती परीक्षा फार सोपी होती. त्यात काय लिहायचं याचा अभ्यासक्रम आपल्याला ठाऊक होता. नंतर खुल्या जगात अभ्यासक्रम माहिती नसताना परीक्षेला सामोरे जावे लागले, तेव्हा मात्र काठावर ३५ गुण देणारे मास्तर आणि १०० गुणांची प्रश्नपत्रिका पुन्हा हवीशी वाटू लागली. आपण कल्पना देखील करू शकणार नाही अशा गोष्टींवर रोज आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि उत्तर ठाऊक नसण्याची परवानगी तिथे नसते.
आयुष्याचं सूत्र सोडवताना ‘एच२ओ’ हे सूत्र सोपं वाटू लागलं आहे. वेगाने धावणार्या आयुष्याचं गणित सोडवताना काळ काम वेगाची छापील उदाहरणेच बरी वाटू लागली आहेत. सोशल मीडिया, राजकारण यातील शिवराळ भाषा ऐकली की मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील व्याकरण किती मधाळ होते असे वाटू लागले आहे. घटनेत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवल्यावर नागरिकशास्त्र कुठे राहिले असे वाटायला लागले आहे.
रोज सकाळी उठून नवीन प्रश्न समोर येतात. रोज एक नवीन परीक्षा असते. एकंदर काय, तर आपण कायमच परीक्षार्थी आहोत याची जाणीव आता वारंवार होऊ लागलेली आहे.