सातारच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांना सत्तेवरून खाली खेचण्याचं भिक्षुकशाहीचं कारस्थान आणि त्याविरोधात रंगो बापूजी यांनी केलेला संघर्ष याचा शंभर वर्षांपूर्वी हरवलेला इतिहास प्रबोधनकारांनी पुन्हा शोधून काढला. त्याची सुरुवात अशी झाली…
– – –
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात ब्राह्मणी गटात पोरकटांचा बाजार उरेल, ही छत्रपती शाहू महाराजांची भीती खरी ठरली. महाराजांनी बहुजनांच्या जागृतीसाठी चालवलेल्या चळवळीविरोधात गरळ ओकण्यासाठी पुण्यातली वर्तमानपत्रं सरसावली. त्यात न. चिं. केळकर हे संपादक असणारा `केसरी` आघाडीवर होता. केळकरांनी शाहू महाराजांवर टीका करणारा `स्वराज्यद्रोही छत्रपती` या भयंकर शीर्षकाचा अग्रलेख लिहिला. त्यामुळे महाराष्ट्रभरातला बहुजन समाज संतापला. गावोगाव `केसरी`च्या निषेधाच्या सभा झाल्या. त्यात दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी `कुलकर्णीलीलामृत` नावाचं व्यंगात्मक पोथीवजा पुस्तक प्रकाशित केलं. `केसरी`ने त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यामुळे वाद आणखी चिघळला. पुण्याच्या भवानी पेठेत शाहू महाराज सभेसाठी आले होते. तेव्हा सनातन्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. दगड फेकणार्यांना गर्दीने जागच्या जागी ठोकून काढलं. पण त्यामुळे वाद वाढतच गेला.
अशा ज्वलंत पार्श्वभूमीवर मुंबईच्या पन्हाळा लॉजवर प्रबोधनकारांची शाहू महाराजांची भेट झाली. त्याला या दोघांशिवाय फक्त दिवाण सर रघुनाथराव सबनीस हजर होते. या बैठकीचं सविस्तर वर्णन प्रबोधनकारांनी `माझी जीवनगाथा`मध्ये केलं आहे. ब्राह्मण पेशव्यांचं राज्य गेलं, मात्र मराठा संस्थानिकांची सत्ता कायम राहिली, याचा राग असलेल्या ब्राह्मणी वर्चस्ववादी मानसिकतेतून शाहू महाराजांचा द्वेष होतोय का, यावर चर्चा सुरू होती. त्यात वेदोक्त प्रकरण, सत्यशोधक चळवळ, जोशी वतन असे विषय येत गेले. पण ही चर्चा एका वेगळ्याच वळणावर गेली. त्यात झालेला संवाद असा…
छत्रपती शाहू महाराज : ब्राह्मण हात धुवून पाठी लागलेला छत्रपती मीच असेन का?
प्रबोधनकार : आपल्यापेक्षा भयंकर छळाला सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तोंड दिलेले होते.
छत्रपती शाहू : प्रतापसिंह? म्हणजे आमचे बुवासाहेब महाराज की काय?
प्रबोधनकार : होय, तेच ते. त्यांचा इतिहास वाचाल, ऐकाल, तर म्हणाल त्यांच्या छळापुढे हा छळ म्हणजे दर्या में खसखस. आपल्याला तो इतिहास माहीत नसावा.
छत्रपती शाहू : मग सांग की तो.
महाराजांनी आज्ञा केली. प्रबोधनकारांनी तब्बल दोन तास छत्रपती प्रतापसिंह यांच्या पदच्युतीची आणि त्यांचे निष्ठावान सेवक रंगो बापूजी यांनी त्याविरुद्ध दिलेल्या लढ्याची कहाणी ऐकवली. या कहाणीतले करूण प्रसंग ऐकून महाराजांचे डोळे पाणावत होते.
छत्रपती शाहू : भयंकर इतिहास आहे हा म्हणायचा! अजूनपर्यंत आम्ही आपलं समजत होतो की बुवासाहेब महाराजांनी खरोखरच इंग्रेजांविरुद्ध काही कट केला. म्हणून त्यांना पदच्युत नि हद्दपार करण्यात आले. हा इतिहास लिहून छापून बाहेर पडलाच पाहिजे.
प्रबोधनकार : सध्या अलाहाबादचे विख्यात इतिहासकार मेजर बी. डी. बसू इंग्रेजीत तो लिहित आहेत. नुकतेच ते मला भेटून गेले आणि त्यांना मी माझ्या संग्रहातले बरेचसे मराठी मोडी दस्तऐवज भाषांतर करून दिले आहेत.
छत्रपती शाहू : मेजर बसू. म्हणजे ते `राइज ऑफ द ख्रिश्चन पॉवर` ग्रंथ लिहिणारे तेच ना? ते आपले काम चोख करतीलच म्हणा. पण आपलंही काही कर्तव्य आहे की नाही? केवढे प्रचंड कारस्थान हे! यावर कुणीच कसं काय आजवर कुठं लिहिलं नाही ते? महाराष्ट्रात हजारो लेखक, कवी, नाटककार दरसाल शेकडो ग्रंथ काढतात. त्यांना हा सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास लिहिण्याची बुद्धी का नाही होत?
प्रबोधनकार : सरकार, ती कशी होणार? सगळे कलमबहाद्दर पडले एका पराचे भट बामण. हा इतिहास प्रकाशात आणून त्यांनी काय आपल्याच सग्यासोयर्यांची अब्रू चव्हाठ्यावर ठेवायची?
छत्रपती शाहू : पण तू तर नाहीस ना त्यांच्या परांचा? हे बघ, तुझे इतर विषय ठेव आजपासनं गुंडाळून नि लाग हा सातारचा इतिहास लिहायच्या कामाला.
मी : सरकार, गेली २०-२५ वर्षं मी या प्रकरणाचे जुने कागदपत्रं गोळा करीत आहे. मोठमोठे चार रूमाल भरले आहेत. सगळे कागद मोडी लिपीत. त्यांचे फुरसदीने बाळबोधीकरण करीत असतो.
छत्रपती शाहू : आता मला या सबबी नकोत. वाटेल तर रजा काढून कोल्हापूरला येऊन रहा नि तेथे ग्रंथ पुरा कर. काय लागेल तो खर्च माझा. पुस्तक दरबारकडून छापून प्रसिद्ध करू. वाटेल तर दे नोकरीचा राजीनामा नि चल कोल्हापूरला.
शाहू महाराजांचा हा प्रस्ताव प्रबोधनकारांनी स्वीकारलेला दिसत नाही. पण रंगो बापूजी या चरित्रग्रंथाच्या निवेदनात प्रबोधनकार सांगतात, `शाहू महाराजांचे उत्तेजन मिळाल्यामुळे, या इतिहासाचे मिळेल तितके साहित्य गोळा करण्याच्या उद्योगाला मी लागलो. काम चालू आहे अशा सबबीवर दीड दोन वर्षे सहज निघून गेली.` याच निवेदनात प्रबोधनकारांनी या बैठकीतला थोडा वेगळा तपशीलही दिला आहे. तोदेखील महत्त्वाचा आहे. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानाबाहेर कोणतीही चळवळ करू नये अशी सूचना करणारं पत्र मुंबईच्या इंग्रज सरकारने महाराजांना पाठवलं होतं. त्याला महाराजांनी खणखणीत उत्तरही दिलं होतं. या बैठकीत महाराजांच्या आज्ञेने दिवाणसाहेबांनी ते पत्र प्रबोधनकारांना वाचायला दिलं.
त्यानंतर काय झालं ते प्रबोधनकारांच्या शब्दात वाचायला हवं, `वाचून झाल्यावर, यात नवीन काय आहे? ही तर इतिहासाची पुनरावृत्ती आहे! या पत्रात मला तर छत्रपती प्रतापसिंहच बोलतो आहेसा दिसतो, असे उद्गार सहज माझ्या तोंडातून बाहेर पडले. महाराज एकदम चमकले नि मला म्हणाले, `प्रतापसिंह छत्रपती? म्हंजे आमचे बुवासाहेब महाराज कीं काय? त्यांची भाषा या पत्रात? ही काय भानगड?’ साक्षात छत्रपतीपुढे एका दिवंगत छत्रपतीची कहाणी सांगण्याचा असा अवचित योग आल्यामुळे, मीही मोठ्या अवसानात येऊन, सत्वधीर प्रतापसिंह आणि स्वराज्यनिष्ठ रंगो बापूजी यांचा इतिहास, दीड दोन तासांच्या अस्खलित प्रवचनाने महाराजांना ऐकवला. त्यांच्या डोळ्यांतून सारखा अश्रूप्रवाह वहात होता.’ कोल्हापुरात येऊन लवकरात लवकर हा इतिहास लिहून काढण्याचा प्रस्ताव शाहू महाराजांनी मांडल्याचंही या निवेदनात आलं आहे.
त्यानंतर महाराज पुढच्या प्रत्येक भेटीत प्रबोधनकारांना पहिला प्रश्न विचारायाचे, कधी लिहितोस हा इतिहास? दरम्यान मेजर बसूंनी स्टोरी ऑफ सातारा हा ग्रंथ प्रकाशित झाला. प्रकाशक रामानंद चटर्जी हे प्रबोधनकारांचे मित्र होते. त्यांनी तो ग्रंथ प्रबोधनकारांना पाठवला. त्याच्या प्रस्तावनेतही बसूंनी नोंदवलं आहे की प्रबोधनकार लवकरच या विषयावर पुस्तक लिहिणार आहेत. प्रबोधनकारांचं हे पुस्तक तेव्हा `लवकरच` प्रसिद्ध झालं नाही. पण प्रबोधनकारांनी या विषयाचा ध्यास फार पूर्वीपासून घेतला होता. अगदी लहानपणीच त्यांची रंगो बापूजींच्या चरित्राची तोंडओळख झाली होती. त्याविषयीची कहाणी त्यांनी रंगो बापूजी ग्रंथाच्या निवेदनात लिहिली आहे. ती थोडक्यात अशी…
`मर्हाठी शाळेत शिकत असताना मोडी वाचनाचा अभ्यास मला नियमाने करावा लागत असे. निरनिराळ्या तेढ्याबाक्या वळणांचे अनेक मोडी कागद परीक्षेत घडाघडा वाचावे लागत. त्यासाठी पनवेलच्या मामलतदार कचेरीतल्या जुन्या रिकार्डातल्या जाडजाड चोपड्या मुद्दाम शाळेत आणवून विद्यार्थ्यांकडून त्या वाचवून घेत. मोडी वाचनाच्या या अभ्यासासाठी माझ्या वडिलांनी एक दिवस (सन १८९६) मला एक छापील मोडी मजकुराचे पुस्तक आणून दिले. लंडन येथे शिळाछापावर छापलेले हेच ते रंगो बापूजीचे मोडी पुस्तक. त्या पुस्तकाचे नि रंगो बापूजीचे महत्व मला त्यावेळी ते काय वाटणार? पुढे ते पुस्तक संग्रहातून नाहीसे झाले. आणि मलाही त्याचे काही वाटले नाही. इतर अभ्यासाची पुस्तके नाहीशी होतात, त्यातलेच हे एक.
पण पुढे त्याच पुस्तकासाठी मुंबई, पुणे येथल्या बुकसेलरांच्या जुन्या ग्रंथांचे गठाळे उपसण्याचा प्रसंग येईल; कलकत्ता, लाहोर, दिल्ली, मद्रास, अलाहाबाद, येथल्या आणि लंडनांतल्याही अनेक नामांकित बुकसेलराकडे पत्रावर पत्रे पाठविण्याची निकड लागणार, याची मला कल्पनाही नव्हती. अखेर सन १९१९ साली `या दुर्मिळ पुस्तकाची एक प्रत कलकत्ता येथील कॅम्ब्रे आणि कंपनीच्या संग्रहाला आहे. त्याची किंमत ते ७५ रुपये मागतात. पाहिजे असल्यास व्हीपीने रवाना करण्याची व्यवस्था ठेवतो,` अशी कै. बाळकृष्ण आत्माराम ऊर्फ रायबहादूर भाईसाहेब गुप्ते, कलकत्ता म्युझियमचे क्युरेटर, यांची मला अचानक तार आली. त्यावेळी दरमहा अवघे ४० रुपये कमावणारा मी तरुण धडपड्या संसारी! संसाराच्या तोंड मिळवणीसाठी शिकवण्या करून आणखी जेमतेम ४०-५० कसेबसे हाती यायचे! पण माझ्या फाटक्या खिशाचा कसलाही विचार न करता, मी उलट तार पाठविली की ग्रंथ तात्काळ व्हीपीने पाठवून द्यावा. त्यावेळी पोष्टात वरचेवर सूचना देऊन एकेक महिनाभर व्हीपी थोपवून ठेवता येत असे. ग्रंथाची व्हीपी येताच मी पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली नि रक्कम जमा करायच्या मागे लागलो. माझे मित्र माझ्यासारखेच फाटक्या खिशांचे! तरीही कोणी ५, कोणी २ तर कोणी १० अशा देणग्या देऊन, रु. ७५-१२-० जमा होताच, ता. ७ एप्रिल १९१९ रोजी मी त्या अनमोल ग्रंथाचा ताबा घेतला.
ग्रंथ हातात येताच त्याचा अभ्यास सुरू झाला. एकहाती, एकटाकी, एवढा २५०-३०० पानांचा ग्रंथ मोडी लिपीत स्वतःच्या हाताने लिहून लंडनला शिळाप्रेसवर छापवून घेणार्या रंगो बापूजीच्या कौशल्याने नि कर्तबगारीने माझे डोळे दिपले. त्या पुरुषोत्तमाविषयी हृदयात आदराचा, आश्चर्याचा नि कौतुकाचा दर्या बेफाट उसळू लागला. सातारच्या अखेरच्या सत्वधीर प्रतापसिंह छत्रपतीच्या अस्सल मराठशाही मानीपणाचा नि सत्यासाठी सर्वस्वावर लाथ मारणार्या त्याच्या पीळदार तडफेचा प्रत्यक्ष प्रत्यय पटल्यावर, मर्हाठी इतिहासातल्या या उपेक्षित भागाचे संपूर्ण संशोधन करण्याचा माझा निश्चय बळावला.`