`प्रबोधन`च्या दुसर्याच अंकात प्रबोधनकारांनी `अंबाबाईचा नायटा` या लेखात छत्रपती शाहू महाराजांवर कठोर टीका केली. हा लेख `प्रबोधन`ची ओळखच बनला. त्याने या नियतकालिकाची दिशा निश्चित केली.
– – –
`प्रबोधन’ नियतकालिकाच्या प्रत्यक्ष आणि वैचारिक उभारणीतही छत्रपती शाहू महाराजांचा सर्वाधिक मोलाचा हातभार होता. शाहू महाराजांनी सत्यशोधक पत्रकारितेच्या चळवळीला नव्याने उभारी दिली होती. त्याचाच एक भाग म्हणजे `प्रबोधन`ची निर्मिती होती. प्रबोधनकारांचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र होतं. पण त्याला शाहू महाराजांची साथ होती आणि सर्व प्रकारचा आधारही होता. या दोन महापुरुषांचा स्नेह इतका घनिष्ठ होता की तो कोरड्या विशेषणांमधे मावू शकत नव्हता. तरीही `प्रबोधन`च्या दुसर्याच अंकात प्रबोधनकारांनी शाहू महाराजांवर जळजळीत टीका करणारं स्फुट लिहिलं.
शाहू महाराजांनी केलेल्या मदतीचा किंवा त्यांच्या थोरवीचाही दबाव प्रबोधनकारांनी स्वतःवर येऊ दिला नाही. हा त्यांचा पत्रकार आणि संपादक म्हणून मोठेपणा होता. त्यांनी आपली मतं लपवली नाहीत. जी घटना घडली त्यावर आपलं मत व्यक्त करणं त्यांना योग्य वाटलं. त्यांनी ते थेट केलं. अगदी शाहू महाराजांची एखादी गोष्ट चुकली असेल, तरीही ती त्यांना दाखवून देणं त्यांना आवश्यक वाटत होतं. आपलं नियतकालिक आताच कुठे सुरू झालंय, असा व्यावहारिक विचारही त्यांनी केला नाही.
हा लेख लिहिण्यास कारण काय होतं, याविषयी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार लिहितात, `१९२१ साली कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्यात काही मराठा विद्यार्थी घुसले आणि त्यांनी देवीची पूजा करून मंदिरातील पूजाअर्चेचे नियम धाब्यावर बसवले. पुजार्यांनी तक्रार करताच कोल्हापूर पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना पकडून लॉकअपमध्ये टाकले. ही बातमी प्रसिद्ध होताच प्रबोधनकारांना सात्त्विक संताप आला आणि त्यांनी प्रबोधनातून खुद्द महाराजांच्यावरच तोफ डागली.`
प्रबोधनच्या दुसर्याच म्हणजे १ नोव्हेंबर १९२१च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खरं तर सविस्तर लेख नव्हता. ते एक स्फुट होतं. पण या बंदुकीच्या छोट्या गोळीत विद्रोहाचा दारूगोळा दाबून भरलेला होता. अंबाबाईचा नायटा या नावापासूनच त्याचा ज्वालाग्रही बाज लक्षात येतो. कोणत्याही टिप्पणीशिवाय प्रबोधनकारांचा हा मूळ लेख आहे जसाच्या तसा वाचणं आवश्यकच आहे. मराठी कळणार्या प्रत्येक माणसाने तो वाचायला हवा, म्हणून तो इथे देत आहे.
इथून पुढे प्रबोधनकारांचे शब्द…
नायटा केव्हाही झाला तरी वाईटच. त्यातल्या त्यात अंबाबाईचा नायटा म्हणे फारच वाईट! कोल्हापूरची इतिहासप्रसिद्ध अंबाबाई अनेक शतकांचा आपला बौद्धपणा टाकून कोल्हापुरी चळवळ्यांच्या चळवळीत आपल्या चिडचिडणार्या नायट्याची चुरचुरीत फोडणी घालण्यासाठी आता जागृत झाली आहे. हे अंबाबाईचे देवस्थान मोठे जागृत खरे! काही दिवसांपूर्वी दोनतीन मराठे जातीच्या मुलांनी गाभार्यात जाऊन या जागृत अंबाबाईची भिक्षुकाच्या मध्यस्तीशिवाय पूजा केली. या गोष्टीमुळे भिक्षुक पुजार्यांनी `अंबाबाई विटाळली` असा भयंकर कोलाहल केला.
मराठा? ब्राह्मणेतर? आणि त्यांच्या पोरांनी या भिक्षुकशाहीच्या तुरुंगातल्या शुद्ध अंबाबाईची स्वतः पूजा करून तिला अशुद्ध करावी? कोल्हापुरापासून पुण्यापर्यंत एकच हाहाकार उडाला. `राष्ट्रीय` केसरीकारसुद्धा अंबाबाईच्या या विटाळाला `भयंकर अत्याचार` मानून, आपल्या मामुली विवेकभ्रष्टतेच्या हुंदक्यात मोठमोठ्याने हेल काढून रडू लागले. भिक्षुकशाहीच्या कंपूत एवढ्या जबरदस्त निराशेच्या धरणीकंपाचे धक्के बसू लागले की ज्या इंग्रेजी सरकारला त्यांनी `सैतानी` ठरविले आहे, त्यांचे बूट चाटण्यासाठी भिक्षुकी जिव्हा तारायंत्रातून भराभर लांबलचक झाल्या. इंग्रज सरकार जर अन्यायी, अत्याचारी व सैतानी आहे, तर त्यांच्या गव्हर्नराकडे किंवा रेसिदंट प्रतिनिधीकडे अंबाबाईच्या नायट्याची दाद मागण्यासाठी राष्ट्रीय प्राण्यांनी लगट करावी, हा शुद्ध बेशरमपणा असला तरी तो आजपर्यंतच्या त्यांच्या चारित्र्याला साजेशोभेसाच आहे.
आम्हांला फार आशा होती की या अंबाबाईच्या नायट्याच्या बाबतीत करवीरकर छत्रपती काही मुत्सद्देगिरी दाखवितील. परंतु ज्या मराठा समाजाचे ते `जन्मसिद्ध` नायक आहेत, ज्या समाजाचा, राजकीय, सामाजिक व विशेषतः धार्मिक दर्जा उन्नतावस्थेला नेण्याचे कर्तव्यकंकण महाराजांनी उघड उघड आपल्या हाती चढविले आहे, आणि ज्यांनी क्षात्र जगद्गुरुच्या एका नवीनच पीठाला निर्माण करण्याची धडाडी व मनोधैर्य प्रत्यक्ष दाखविले आहे, त्या छत्रपती सरकारने आपल्या पोलीस खात्याकडे अंबाबाईचा हा नायटा बरा करण्याची कामगिरी सोपविलेली पाहून फार वाईट वाटते. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या अनेक पत्रव्यवहारावरून आता असे समजते की या कोल्हापुरी पोलिसांनी नुकतेच तेथील हायस्कुलातून काही मराठे जातीचे विद्यार्थी अंबाबाईच्या नायट्याच्या संशयाने पकडून नेले आहेत. ही गोष्ट जर खरी असेल तर ती अस्पृश्योद्धार करण्याच्या कामी सक्रीय मनोधैर्य दाखविणार्या छत्रपती सरकारच्या चारित्र्याला कलंकित करणारी आहे. ही राजनीती नव्हे, समाजनीती नव्हे व धर्मनीती तर नव्हेच नव्हे.
मुख्य वादाचा प्रश्न एवढाच की अंबाबाई ही हिंदू धर्माची एक देवता आहे, तिचे देऊळ जैनांनी बांधलेले असो नाहीतर बौद्धांनी खोदलेले असो, ते हिंदू देवतेचे देऊळ आहे. अर्थात हिंदू म्हणविणार्या प्रत्येक व्यक्तीला मग ती ब्राह्मण असो, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असो, ब्राह्मणेतर किंवा ब्राह्मणेतरेतर असो. त्या देवतेची पूजाअर्चा स्वतः करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार ज्या देवळांत मान्य केला जात नाही, जेथले देव व देवता या भिक्षुकी जेलरांच्या तुरुंगवासात खितपत पडल्या आहेत, ज्यांचे पूजन मराठ्यांसारख्या उच्चवर्णीय क्षत्रियांसही करता येत नाही, जेथे दुराग्रही जातिभेद नाठाळ पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे महाद्वारावर ब्राह्मणेतरांवर बेगुमानपणे तुटून पडत आहे, असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थाने समजण्यापेक्षा उनाडटप्पूंचे पांजरपोळ मानायला काही हरकत नाही, आणि असल्या या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फर्लांगदर्शक दगड धोंड्यापेक्षा फाजील महत्त्वही कोणी देऊ नये. ज्या अंबाबाईला भिक्षुकांची कैद झुगारून देता येत नाही, ती अंबाबाई आम्हा दीनदुबळ्यांचे भवपाश तोडणार ती काय! ही शोचनीय दु:स्थिती पाहिली म्हणजे हिंदू देवळे जमीनदोस्त करणारे अफझुलखान, औरंगजेब एक प्रकाराने मोठे पुण्यात्मे होऊन गेले, असे वाटू लागते.`
या लेखातल्या पहिल्याच वाक्यात कोल्हापूरच्या अंबाबाईला मूळ बौद्ध ठरवून प्रबोधनकार पहिला फटका मारतात. झालेला प्रसंग सांगून त्यावरच्या पुण्यातील सनातनी ब्राह्मणांचा गट आणि त्यांची वकिली करणारी केसरीसारखी नियतकालिकं यांच्या प्रतिक्रिया किती चुकीच्या आहेत, हे साधार पटवून देतात. पुढे ते शाहू महाराजांवर नेमकी टीका करतात. पण त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा सन्मानही करतात. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचं सांगतात. शेवटी या लेखाचं सार असणारी धर्मचिकित्सा पाहायला मिळते. विशेष म्हणजे ती चिकित्सा त्यांच्या हिंदुत्ववादाच्या चौकटीत येते. प्रत्येक हिंदूला प्रत्येक हिंदू देवतेची पूजा करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही आणि श्रेष्ठकनिष्ठ भेदाभेद पाळणार्या सोवळ्याओवळ्याची तर नाहीच नाही. जिथे देवाच्या नावाने त्यांच्या भक्तावरच केवळ जातिभेद म्हणून अत्याचार होत असतील, तर अशा देवतांना महत्त्व कशासाठी द्यायचं, हे सांगताना प्रबोधनकारांची लेखणीतली धार दिसते. शेवटच्या वाक्यात तर ते जिव्हारी घाव घालतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
हा लेख वाचल्यावर शाहू महाराज प्रबोधनकारांवर रागवले नाहीत, उलट पुढच्याच आठवड्यात थेट प्रबोधनकारांच्या ऑफिसासमोर गाडी लावून उभे राहिले. ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती. प्रबोधनकारांना घेऊन त्यांच्या मुंबईतल्या बंगल्यात पन्हाळ लॉजवर आले. तिथे काय झालं तेही प्रबोधनकारांच्या शब्दांत, `बैठक बसली. `काय ल्योका कोदंडा, लइ वांड झालास?` महाराजांचा पहिला सवाल. तो कसा, मी विचारले. त्यावर त्या स्फुटावर बरीच चर्चा झाली. `अरे, एकदम सार्या गोष्टी साधत नाहीत. आस्ते आस्ते सगळाच बंदोबस्त मी करणार आहे,` यापेक्षा विशेष कसलाच काही थांगपत्ता त्यांनी लागू दिला नाही. पण केलेल्या टीकेबद्दल मात्र त्यांनी मनाला काहीच लावून घेतले नाही, असा स्पष्ट खुलासा झाला.`
आजही मराठी पत्रकारिता आहे. पण त्यात प्रबोधनकारांसारखे टीका करणारे संपादक उरले नाहीत आणि छत्रपती शाहूंसारखे त्या टीकेला मोठ्या मनाने स्वीकारणारे राज्यकर्तेही उरले नाहीत.