अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल मेषेत, मंगळ वृषभेत, केतू तुळेत, बुध मकरेत, रवि-शनि-नेपच्युन कुंभ राशीत, शुक्र मीनेत, चंद्र मकरेत, त्यानंतर कुंभ आणि मीन राशीत. दिनविशेष – १८ फेब्रु. महाशिवरात्र, १९ फेब्रु. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २० फेब्रु. सोमवती माघ अमावस्या
मेष : राश्यांतर करून आलेला रवी, व्यय भावातील शुक्र आणि अस्त शनी यांच्यामुळे आनंददायक अनुभव येतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. महाशिवरात्री काळात सुखद अनुभव येतील. नव्या नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. कामानिमित्त देशांतर्गत प्रवास होईल. कुटुंबासमवेत विदेशात सहलीला जाल. संततीच्या असमाधानकारक शैक्षणिक स्थितीमुळे चिडचिड होईल. अनावश्यक खर्च वाढेल. शनि-मंगळाची दृष्टी अष्टम भावावर असल्याने विचारपूर्वक कृती करा. साहसी निर्णय महागात पडेल.
वृषभ : कलाकारांना भरभराटीचा काळ आहे. नवीन कामे हातात पडतील, आर्थिक बाजू भक्कम होईल. पाच मार्चपर्यंत शनि अस्त असल्याने व्यवसायाची गाडी मंदावू शकते. नव्या संधीचा अंदाज घेऊन कृती करा. अन्यथा फसवणूक होऊ शकते. विद्यार्थीवर्गाला परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये चांगले यश मिळेल. १८ ते २० तारखेच्या दरम्यान बुध, चंद्र युती भाग्यात असल्याने समयसूचक निर्णयाचा चांगला फायदा होईल. शेअर बाजारातून चांगला लाभ मिळेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणार्यांकडे पैसा खेळेल.
मिथुन : हाती घ्याल ते तडीस न्याल. आपल्या क्षेत्रात, व्यवसायात घवघवीत यश मिळेल. नव्या ऑर्डर मिळतील, जुनी येणी वसूल होतील. हंस योगात गुरु, मालव्य योगात शुक्र, त्यामुळे प्रॉपर्टीबाबतची व कर्जाची कामे मार्गी लागतील. सीझनल व्यावसायिकांची चांगली कमाई होईल. भावंडांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या बाबतीत काही अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद झाल्याने बदली होऊ शकते. अपमानामुळे मन अस्थिर राहील. भ्रमनिरास, अपयश पदरी येईल.
कर्क : महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. संततीला दुखापत होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपयश मिळेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. वादात संयम बाळगा. प्रतिक्रिया देऊ नका. मंगळ लाभभावात असल्याने काही बाबतीत यश मिळेल. पण आनंद अल्पकाळच टिकेल. भाग्यातील शुक्र-गुरु युती आपले भाग्य बदलू शकते. प्रवास, तीर्थयात्रा, सहल यातून चांगले अनुभव येतील.
सिंह : राशिस्वामी रवी सप्तमभावात असल्याने दाम्पत्य जीवनातील धुसफुशीत भर पडेल. व्यवसायातील भागीदाराबरोबरचे मतभेद वाढतील. कोर्ट-कचेरीच्या कामात अपयश आल्याने समंजसपणाची भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढा. नव्या नोकरीrचा निर्णय विचार करूनच घ्या. नवे घर घेण्याचा विचार मार्गी लागेल. राजकारणात अपयश येईल. योगकारक मंगळामुळे काम मार्गी लागेल.
कन्या : जन्मजात आरोग्यसमस्यांचा त्रास होईल. काळजी घ्या. बाहेरचे खाणे पिणे टाळा. पोटाचे विकार निर्माण होऊ शकतात. दाम्पत्यजीवनात चांगला काळ आहे. नोकरीनिमित्त परदेशात जावे लागू शकते. छंद, मनोरंजन क्षेत्रात व लेखक, पत्रकार, संपादकांना यशदायक काळ आहे. संततीकडून चांगले यश मिळेल.
तूळ : प्रेम प्रकरणात सावध राहा. फसवणूक व मनस्ताप होईल. रवि पंचम भावात असल्याने बुद्धिजीवींनी विशेष सावधगिरी घ्यावी. १५ मार्चपर्यंतचा काळ खडतर राहील. खेळाडूंना अपयश मिळेल. षष्ठम भावात गुरु-शुक्राचे विपरीत राजयोग ही काही प्रमाणात जमेची बाजू राहील. आप्तस्वकीय मदतीला येतील. हातून दानधर्म होईल. संततीला उच्चशिक्षणासाठी विदेशात पाठवण्याच्या प्रयत्नांना मार्चनंतर यश मिळेल.
वृश्चिक : रवि सुखस्थानात, सोबत शनि-नेपच्युन, त्यामुळे खूपच खबरदारीने निर्णय घ्यावे लागतील. नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी अंगावर पडेल. त्यात काळजी घ्या. हातून मोठी चूक झाल्यास करियरवर परिणाम होईल. पंचमभावातील उच्चीच्या शुक्र-गुरु युती योगामुळे संततीचा उत्कर्ष होईल. कलाकारांसाठी उत्तम काळ आहे. वाहनांची काळजी घ्या. थकीत कर्जाचा प्रश्न मार्गी लावा.
धनु : मेहनत रंग नही लायेगी. कामासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल, खूपच धावपळ होईल. सुखस्थानातील गुरूचा हंसयोग आणि शुक्रामुळे होणारा मालव्य योग कामे मार्गी लावतील. अडकून पडलेले काम पुढे सरकेल. घरात शांतता ठेवा, वादात उत्तर देऊ नका. नवी गुंतवणूक करण्याचा प्लॅन लांबणीवर टाका. व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहील. उधारी वसूल होईल. चांगले काम पदरात पडेल. गोड बोलून काम मार्गी लावा.
मकर : पैसे सांभाळून वापरा. धन भावात रवि-शनि-नेपच्युन युतीमुळे संपत्तीत नुकसान होईल. १५ मार्चपर्यंत आर्थिक व्यवहार पुढे ढकला. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. संततीला चांगले यश मिळेल, मानसन्मान मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. कामानिमित्ताने छोटेखानी प्रवास होईल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ राहील. नवीन ओळखी होतील, त्यांचा चांगला फायदा भविष्यकाळात होईल. बुद्धिजीवी वर्गासाठी उत्तम काळ आहे.
कुंभ : कामात अडचणी येतील. अत्यंत संयमाने नवे काम करा. आत्मविश्वास ढिला पडेल. त्यामुळे निर्णयात चूक होऊ शकते. आर्थिक नियोजन करून निण&य घ्या. मिष्टान्नभोजनाचा योग आहे. गायक. लेखकांना अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत, शेअर, लॉटरीमधून लाभ होईल. खिशात चांगले पैसे राहतील. त्याचा योग्य वापर करा. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळा.
मीन : उत्तम रिझल्ट मिळतील. व्यवसायात वृद्धी करण्यासाठी जोखीम घेण्यास हरकत नाही. नवीन गुंतवणूक अभ्यासपूर्वक करा. शेतीत लाभदायक काळ आहे. स्थावर मिळकतीतून लाभ मिळतील. सहल, करमणुकीसाठी परदेशप्रवास होईल. अनपेक्षित लाभ होतील. १८ ते २० या तारखा विशेष लाभदायक राहतील. विदेशात प्रवास करताना फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.