आशियाई वातावरण असो वा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारखे वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरण असो; चेतेश्वर पुजारा हिंमतीने किल्ला लढवतो. भारताच्या अनेक देदीप्यमान विजयातील तो शिलेदार. गतिमान क्रिकेटमध्येही कसोटी क्रिकेटची परंपरा जपणारा पुजारा कारकीर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. या निमित्ताने त्याच्या कारकीर्दीचा वेध.
– – –
भारतीय बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याची भिंत असणे, हे गेले एक तप भारताच्या कसोटी संघाला तारते आहे… मग खेळपट्टी देशातली फिरकीसाठी पोषक असो वा परदेशातली उसळणारी… तो ‘त्या’ द्रुतगती मार्याची मुळीच पर्वा करीत नाही. मैदानावर प्रदीर्घ काळ ठाण मांडणे, हे त्याचे शिस्तीचे कार्य. गोलंदाजाचा अंत पाहणारी चिवट झुंज हे त्याचे वैशिष्ट्य. त्यामुळेच चेतेश्वर पुजाराकडे प्रचलित ठोकताळे बांधून पाहणे चुकीचे ठरेल. त्याच्या अनेक खेळींप्रसंगीचे मैदान, वातावरण, परिस्थिती हे सारेच प्रतिकूल. पण प्रतिकूलतेतून अनुकूलता सिद्ध करणारा हा दुर्मीळ कसोटीपटू.
पुजारा म्हणजे आधुनिक राहुल द्रविड… एकेकाळी ‘द वॉल’, ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून ओळखला जाणारा द्रविड हा भारतीय कसोटी संघाचा तारणहार होता. द्रविडने व्हीव्हीएस लक्ष्मणच्या साथीने अनेकदा किल्ला लढवल्याच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्यामुळे द्रविड-लक्ष्मण यांना भारतीय क्रिकेटमधील राम-लक्ष्मण जोडी असे कौतुकाने म्हटले जायचे. त्यांच्या कालखंडानंतर ती जागा घेतली पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या जोडीने. सूर हरवलेला रहाणे गेली काही वर्षे भारतीय संघाबाहेर आहे, पण पुजारा ‘द न्यू वॉल’ हे बिरूद सार्थ करीत भारतीय कसोटी संघातून दमदार फलंदाजीचा नजारा पेश करीत आहे.
नवी दिल्लीला शुक्रवारपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी ही पुजाराच्या कारकीर्दीतील १००वी कसोटी. त्याच्या शतकी कारकीर्दीत भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय मिळवले. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या ‘सेना’ राष्ट्रांमध्ये वेगवान गोलंदाजांना अनुकूल वातावरण. त्यामुळे तिथे आशियाई फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. पण या मैदानांवरही तो खंबीरपणे उभा राहतो, हीच त्याची खासियत.
२००८मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आल्यापासून ट्वेन्टी-२० क्रिकेटचे वादळी वारे जोराने वाहू लागले. आता तर देशोदेशीच्या लीग क्रिकेट कार्यक्रमपत्रिकेत आल्याच आहेत. याशिवाय ‘द हंड्रेड’, ‘टी-१० लीग’ यासुद्धा आता अवतरल्या आहेत. या वार्यांमध्ये सध्या एकदिवसीय क्रिकेटसुद्धा अस्तित्वासाठी झुंज देते आहे. पण पुजारा हा तंत्रशुद्ध फलंदाज. धावांचा वेग गतिमान असावा, हे त्याच्या फलंदाजीत कुठेच नव्हते. त्यामुळे नाणावलेली नवतरूण क्रिकेटपटू मंडळी आर्थिक कमाईचे इमले बांधत असतानाही पुजाराने आपल्या वेगळेपणाने स्वत:ला आजही टिकवून ठेवले आहे. ‘आयपीएल’पूर्व क्रिकेटमध्ये इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटचे एक वेगळे महत्त्व होते. तेथील करार मिळणे हे प्रतिष्ठेचे मानले जायचे. त्या कराराचा आकडासुद्धा लक्ष वेधायचा. कालौघात कौंटी क्रिकेटकडे देशोदेशीच्या क्रिकेटपटूंनी पाठ फिरवली. पण कौंटी क्रिकेटमध्ये खेळणे, हा आजही पुजाराचा शिरस्ता. फटक्यांची अस्त्रे-शस्त्रे तो इथे आजमावतो.
पुजाराचा जन्म राजकोटचा. वडील अरविंद आणि काका बिपिन हेसुद्धा सौराष्ट्रकडून रणजी क्रिकेट खेळले आहेत. त्याच्या आई-वडिलांनी बालपणीच चेतेश्वरची गुणवत्ता ओळखली. वडिलांनी क्रिकेटचे धडे द्यायला प्रारंभ केला. तो १७ वर्षांचा असताना त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. पण, पुजाराने क्रिकेट प्रशिक्षण आणि वयोगटांच्या क्रिकेटमध्ये धावांचे सातत्य राखतानाच बिझनेस अॅडमिनिस्ट्रेटर या विषयातली पदवीसुद्धा घेतली. मग १९ वर्षांखालील क्रिकेट त्याने गाजवले. २००६च्या युवा विश्वचषकात त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीससुद्धा मिळाले होते. त्यानंतर पुजाराने स्वत:ला रणजी क्रिकेटमध्ये सिद्ध केले. सौराष्ट्रने २०१२-१३च्या हंगामात प्रथमच उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. यात पुजाराचे योगदान महत्त्वाचे होते. पुढच्याच हंगामात त्याने तीन प्रथम श्रेणी त्रिशतके झळकावली. २०१५-१६, २०१८-१९ या हंगामांमध्ये उपविजेतेपद आणि २०१९-२०मध्ये विजेतेपद हा सौराष्ट्रचा यशोप्रवास पुजारामुळेच साध्य झाला. २३५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १८,१२१ धावा त्याच्या खात्यावर जमा आहेत.
पुजाराने २०१०मध्ये कसोटी पदार्पण केले, तेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध. युवराज सिंगच्या जागी पुजाराचा समावेश करण्यात आला. गौतम गंभीर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दुखापती झाल्याने बंगळूरुच्या दुसर्या कसोटीत पुजाराला संघात स्थान मिळाले. या कसोटीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुजाराला राहुल द्रविडच्या जागी तिसर्या क्रमांकावर पाठवण्याची रणनीती आखली. पण तिथेही त्याने ७२ धावांची खेळी साकारत लक्ष वेधले. ऑगस्ट २०१२मध्ये पुजाराने न्यूझीलंडविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली. या मालिकेत आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुजाराने सातत्याने धावा केल्या. एक हजार धावांचा वेगाने टप्पा पार करणारा तो दुसरा भारतीय फलंदाजसुद्धा ठरला. २०१३च्या दक्षिण आफ्रिका दौर्यात ७०च्या सरासरीने त्याने सर्वाधिक २८० धावा केल्या. पुजारा भारतीय कसोटीचा संघाचा अविभाज्य भाग झाला.
दरम्यानच्या काळात एकदिवसीय संघातसुद्धा त्याला संधी चालून आली. पण कधी दुखापतीने, तर कधी कामगिरीमुळे त्याला या प्रकारात टिकता आले नाही. २०१४चा इंग्लंड दौरा इंग्लंडसाठी खडतर ठरला. त्यानंतर त्याने संघातील स्थानही गमावले. पण २०१५मध्ये मुरली विजयला दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेविरुद्ध मिळालेल्या संधीचे पुजाराने सोने केले. अखेरच्या निर्णायक कसोटीत पुजाराने नाबाद १४५ धावांची खेळी साकारत भारताला विजय मिळवून दिला. २०१६मध्ये पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक नोंदवले. पण त्यासाठी ५२५ चेंडूंचा सामना केला. त्यामुळे जागतिक कसोटी क्रमवारीत त्याने दुसर्या क्रमांकापर्यंत मुसंडी मारली. २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांत त्याने शतक साकारले. कारकीर्दीतील ५०व्या कसोटीवर ठसा उमटवताना १३३ धावा उभारल्या. तसेच चार हजार धावांचा टप्पाही ओलांडला.
२०१८च्या इंग्लंड दौर्यात धावांसाठी झगडणार्या पुजाराला पहिल्या कसोटीत वगळण्यात आले. पण दुसर्या कसोटीपासून त्याचा पुन्हा समावेश केला गेला. कारण इंग्लिश वातावरण खेळण्याचे तंत्र पुजाराला उत्तमपणे अवगत होते. ही मालिका भारताने १-४ अशी गमावली. परंतु पुजाराने ३९.७१च्या सरासरीने २७८ धावा केल्या. २०१८-१९चा ऑस्ट्रेलिया दौरा भारतासाठी ऐतिहासिक ठरला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने प्रथमच २-१ अशा फरकाने कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली. या यशात पुजाराचा सिंहाचा वाटा होता. त्याने ७४.४२च्या सरासरीने ५२१ धावा करताना मालिकावीर किताबसुद्धा पटकावला. अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत दिवसभरात शतक, पाच हजार धावांचा टप्पा असे अनेक पराक्रम त्याने गाजवले. २०२०-२१च्या ऑस्ट्रेलिया दौर्यातही भारताने ऐतिहासिक कसोटी यशाची पुनरावृत्ती केली. यात पुजाराने चार सामन्यांत ३३.८७च्या सरासरीने २७१ धावा केल्या. परंतु २९.२०च्या स्ट्राइक रेटने केलेल्या त्याच्या धिम्या फलंदाजीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. चौथ्या कसोटी पुजाराने अर्धशतक झळकावण्यासाठी १९६ चेंडूंचा सामना केला आणि एक नावडता विक्रम त्याच्या नावावर झाला. पुजाराला शतकही दुरापस्त झाले.
२०२१-२२मध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दौर्यात पुन्हा तो धावांसाठी झगडू लागला. परिणामी भारतीय संघातील स्थान त्याने गमावले. पण तो खचला नाही. इंग्लंडला गेला. ससेक्ससाठी कौंटी क्रिकेटमध्ये पाच सामन्यांत ७२० धावा केल्या. यात दोन द्विशतकांसह एकूण चार शतके झळकावली. याशिवाय रणजी क्रिकेटमध्येही मुंबईविरुद्धच्या सामन्यात ९१ धावा केल्या. परिणामी भारतीय संघाची दारे त्याच्यासाठी पुन्हा उघडली गेली. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांमधील एक प्रलंबित आणि निर्णायक पाचवा कसोटी सामना बर्मिंगहॅमला जुलै २०२२मध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात पुजाराने ६६ धावा करीत पुनरागमन केले. मग डिसेंबर २०२२मध्ये पुजाराने शतकाचा दुष्काळ १,४४३ दिवसांनी संपवताना नाबाद १०२ धावांची खेळी साकारली.
पुजारा आता पस्तिशीचा झाला आहे. म्हणजेच कारकीर्दीचा सूर्यास्त. निवृत्तीची रात्र आता काही अंतरावर आहे. सध्याच्या वेगवान क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचीही व्याख्या बदलली आहे. गेल्याच वर्षी इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध एकाच दिवशी ४ बाद ५०६ धावा केल्या होत्या. या गतिमानतेत पुजाराचा धिमेपणा त्याच्यासाठी आता अडचणीचा ठरू लागला आहे. स्थिरावलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, ऋषभ पंत, केएस भारत यांच्यासारखे अनेक फलंदाजीचे पर्याय आता कसोटी संघात उपलब्ध आहेत. या स्थितीत कारकीर्दीमधील कसोटी शतक साकारणार पुजारा आणखी किती काळ टिकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.