□ नागालँडमध्ये लष्कराची चूक झाली, दहशतवादी समजून नागरिकांवर गोळीबार केला. – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
■ मुळातला विषय सशस्त्र सैन्यदलांना अतिप्रचंड अधिकार देणार्या कायद्याचा आहे, तो अस्तित्त्वात आहे, तोवर या ‘चुका’ होतच राहणार.
□ ओबीसी आरक्षणाच्या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
■ हे आरक्षण मिळालं तर त्याचं श्रेय सर्व पक्षांना मिळेल, असा एक सामंजस्य करार झाला तर अडथळे पटापट दूर होतील.
□ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौर्यामुळे पाकिस्तान-चीन टेन्शनमध्ये!
■ या चार देशांतला कोणीही कोणत्याही देशात गेला तरी इतर तिघांना टेन्शन येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्यातच सगळ्यांचं हित आहे.
□ रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले – प्रवीण तोगडिया यांची टीका
■ अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गयी खेत!
□ झोपडीत पंखा असला तरी सरकारी योजनेत घर मिळणार नाही; केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे लाभार्थी मेटाकुटीला
■ स्मार्टफोन आणि फोर जी कनेक्टिव्हिटीची अट घालून पाहा; एकाही लाभार्थ्याला घर द्यावं लागणार नाही आणि पंतप्रधानांची जाहिरातबाजीही होऊन जाईल.
□ बिहारमध्ये जातीय जनगणना होणार, नितीश कुमार यांचा केंद्राला दे धक्का
■ राजकारण धर्माधिष्ठित व्हायला लागलं की त्यात जातींचा उठाव होणारच, देश जातपातमुक्त करण्याचा मार्ग धर्मनिरपेक्षतेतूनच जातो, दुसरी वाट नाही.
□ भारतीय जनता पक्षाचेच लोक आरक्षणाविरोधात कोर्टात कसे जातात?- छगन भुजबळ यांचा सवाल
■ त्यांची आंतरिक व्होटबँक त्यांना सांभाळावी लागणारच ना!
□ नियम पाळा; लॉकडाऊनची गरजच नाही : टास्क फोर्सचे मत
■ ते जमलं असतं तर पहिली लाट पसरली असती का आणि दुसरी लाट आली असती का?
□ उत्तर प्रदेशात शिक्षक भरती घोटाळ्याविरोधातील मेणबत्ती मोर्चावर पोलिसांचा अमानुष लाठीमार
■ म्हणजे काय, उद्या प्रत्येक सरकारी भरती घोटाळामुक्त असण्याची अपेक्षा ठेवू लागतील नागरिक… काही सिस्टम वगैरे आहे की नाही?
□ पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळा माफी मागणार – राहुल गांधी यांचा सवाल
■ ते जेवढ्या चुका करतात तेवढ्यांची माफी मागू लागले तर ‘माफी की बात’ नावाचा वेगळा कार्यक्रम रोज करायला लागेल त्यांना.
□ गुजरातमध्ये सायन्स सेंटरमध्ये पेन्ग्विन आणले जाणार, वीरमाता जिजामाता भोसले उद्यानाकडून सल्ला मागितला जाणार
■ मुंबईत पेन्ग्विन आणल्याबद्दल शिवसेनेवर टीका करणारे भाजपचे नेते आता तिकडच्या पेन्ग्विनला प्रेमाने ढोकळा अने फाफडा अने जलेबी भरवायला धावतील.
□ स्वत:ला बदला, नाहीतर पक्ष बदल करेल, दांडीबहाद्दर भाजप खासदारांची मोदींकडून हजेरी
■ त्यांचाही दोष नाही मोदीजी; तुम्ही काही बोललात की होय होय होय होय करायचं, विरोधक काही बोलले की नाय नाय नाय नाय करायचं, एवढंच त्यांचं काम बनून बसलं आहे… मानेवर केवढा ताण आला असेल त्यांच्या. विश्रांती हवी की नको?
□ लाल टोपी विकासाच्या मार्गात लाल सिग्नलसारखी धोक्याची : मोदी यांची समाजवादी पक्षावर टीका
■ प्रांतानुसार पोषाख करणार्या आणि टोपी बदलणारे मोदी उद्या समाजवादी पक्ष भाजपबरोबर आला तर तिला लाल सलाम करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत!
□ ओमायक्रॉन हा घातक व्हेरियंट नाही : तज्ज्ञांचे मत
■ बेजबाबदार मनुष्यप्राणी हाच सगळ्यात घातक व्हेरियंट आहे, हे सांगायला तज्ज्ञांचीही गरज नाही.
□ दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर घटला – पावणेदोन टक्के नोटाच वापरात
■ कोणत्याही दिवशी आठ वाजता साहेब येऊन रात्री १२ नंतर त्यांची रद्दी झाली असं सांगू शकतात, हे भय आहे त्यामागे.