अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, मंगळ-केतू वृश्चिकेत, रवी-बुध धनूमध्ये, शुक्र-शनी-प्लूटो मकरेत, गुरू-नेपच्यून कुंभेत, चंद्र वृषभेत त्यानंतर मिथुनमध्ये सप्ताहाच्या शेवटी कन्येत, हर्षल मेषेत.
दिनविशेष – २२ डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय रात्री ८ वाजून ४२ मिनिटे), २५ डिसेंबर रोजी नाताळ.
मेष – थोडी काळजी घ्यायला लावणारा काळ आहे, त्यामुळे सावध राहा. मंगळाचे अष्टमात केतूबरोबर अंगारक योग असल्यामुळे पैशाची देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. कमरेच्या खालील भागात दुखणे उद्भवू शकते. विद्यार्थीवर्गासाठी चांगला काळ आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागेल. व्यावसायिक मंडळींच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. कामाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम दिसतील, त्यामुळे आनंदी राहाल. नोकरीत बदली मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्की यश मिळेल. महिलांना कुटुंबप्रमुखांकडून सहकार्य मिळेल. २१ आणि २२ तारखेला कौटुंबिक कार्यक्रमातून आनंदप्राप्ती मिळेल.
वृषभ – हा आठवडा खूपच आनंदात जाणार आहे. शुक्राची शनीबरोबर भाग्यस्थानातील युती होत असल्यामुळे शुभ घटनांचा अनुभव येईल. वृषभ लग्न असणार्या मंडळींना मात्र, कामाचा विलंब सहन करावा लागणार आहे. सप्तमातील केतू-मंगळ कामातला उत्साह वाढवणारे असून काम अधिक जोमाने पूर्ण होईल. होत आलेले काम काही कारणामुळे पुढे ढकलले जाईल, त्यामुळे चिडचिड वाढू शकेल. त्याचा घरात काही परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घ्या. महिलांसोबतचा आर्थिक व्यवहार काही कारणामुळे तो फिस्कटू शकतो. थोडे धीराने घ्या, म्हणजे नय्या पार होईल.
मिथुन – रवी-बुधादित्ययोगामुळे पतप्रतिष्ठा वाढणार असल्याने चेहर्यावर आनंद दिसेल. घरात आपला सल्ला लाखमोलाचा ठरणार आहे. भाग्यात गुरूचे पाठबळ राहणार आहे, त्यामुळे सुखद क्षणांचा अनुभव येईल. मंगळ-केतू अंगारक योगामुळे शारीरिक थकवा जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी त्रास संभवतो. दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. अष्टमातल्या शनी-शुक्रामुळे चोखंदळपणावर निर्बंध येतील.
कर्क – या आठवड्यात कामात मन रमणार नाही, आराम करण्याची इच्छा होईल. चंद्र ग्रहणयोगात, मंगळ-केतू अंगारक योगात त्यामुळे आठवड्याची सुरवात आळसावलेली राहील. त्यानंतरचे तीन-चार दिवस मात्र सुख-समाधानात जातील. नुकताच राश्यांतर करून आलेला शुक्र, प्लूटो-शनीसोबत सप्तमात असल्यामुळे वैवाहिक समस्या जाणवतील. या आठवड्यात अनपेक्षित गोष्टींमुळे चांगले लाभ होतील. नवीन संधी चालून येतील. त्यात घवघवीत यश मिळेल. चर्चांमधून घर व कामाचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंह – राशीस्वामी रवी, पंचमात बुधादित्ययोग त्यामुळे संपादक, पत्रकार, समाजमाध्यमात काम करणारी मंडळी, राजकारणी, लेखक यांना या आठवड्यात अनेक शुभघटनांचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूप चांगला आहे. कौटुंबिक हेवेदावे निर्माण होऊ शकतात. मामाकडून चांगले सहकार्य मिळेल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. वस्तू जपा, अन्यथा गहाळ होण्याची शक्यता आहे. शेअर, सट्टा यामधून चांगल्या कमाईचे योग आहेत. वैद्यकीय व्यवसायातील मंडळींसाठी फायदा मिळवून देणारा काळ आहे.
कन्या – या आठवड्यात गृहसौख्याचा लाभ होणार आहे. बुधाचे चतुर्थातील भ्रमण, रवी-बुधादित्ययोग यामुळे हा काळ घरासाठी खर्च होणार आहे. व्यापारी वर्गासाठी अत्यंत शुभकाळ आहे. बुधाच्या धनूमध्ये होणार्या राश्यांतरामुळे हुरूप वाढणार असून नवीन क्षेत्रात भरारी घेऊन त्यात भरपूर यश मिळवणार आहात. नव्या व्यवसायाची ऑफर आली तर त्याचा विचार नक्की करा. महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कानाचे आजार डोके वर काढतील. पोलीस दल, लष्कर यात काम करणार्या मंडळींना पराक्रम सिद्ध करायला लावणारा आठवडा राहील.
तूळ – आठवड्याची सुरुवात थोडी तणावग्रस्त राहील. कौटुंबिक सेवाभाव, मनोरंजन यासाठी हा आठवडा खर्च होणार आहे. द्वितीयातील मंगळाचे केतूबरोबरची युती त्यामुळे खाण्यापिण्यावरील पथ्य पाळावी लागणार आहेत. वाहन चालवताना घाई करू नका, चुकून अपघाताला निमंत्रण मिळेल. संततीच्या बाबतीत कटू अनुभव येईल. पंचमात असणारे गुरूची कृपादृष्टी त्यामुळे अघटित घटना टळतील. विद्यार्थीवर्गाची बौद्धिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षणक्षेत्रात घवघवीत यश पदरात पडेल.
वृश्चिक – कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. राशीस्वामी मंगळाचे स्वराशीत होणारे आगमन त्यामुळे आनंद द्विगुणित होणार आहे. व्यवसाय करत असताना नियमांचे काटेकोरपणे पालन करा. वाक्चातुर्य दाखवले तर काम सहजशक्य होणार आहे. २१ आणि २२ तारखेला अनपेक्षित शुभघटना घडतील. शेतकरीवर्गास चांगला फायदा मिळण्याचा काळ आहे. सुखस्थानात होत असणारे गुरूचे भ्रमण आशावादी बनवेल. घरामध्ये एखादे शुभकार्य पार पडेल.
धनु – शिक्षणक्षेत्रात काम करणार्या प्राध्यापक मंडळींसाठी परिवर्तनाचा काळ राहणार आहे. गुरुच्या तृतीयेतील भ्रमणामुळे घरासाठी वेळ खर्च कराल. लेखक, साहित्यक्षेत्रात काम करणार्या मंडळींकडून एखाद्या विषयावर लिखाण होईल. पुस्तक प्रकाशन्ाासाठी अनुकूल काळ राहणार आहे. भावंडांसाठी मदत कराल. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे. धार्मिक कार्याच्या निमित्ताने प्रवास होतील.
मकर – मानसिक स्थिती चक्रावणारी स्थिती या आठवड्यात निर्माण होईल, त्यामुळे गोंधळून जाऊ नका. थोडे धीराने घ्या. साडेसातीचा काळ, लग्नी शनी, वक्री शुक्र आणि प्लूटो यामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोणताही निर्णय घेताना घाई अजिबात नको. अन्यथा नसते शुक्लकाष्ठ मागे लागेल. भागीदारीचा व्यवसाय असेल तर तिथे मतभेद होण्याची शक्यता आहे. मंगळाचे लाभात भ्रमण होत असल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. देशांतर्गत, परदेशप्रवासाचे योग आहेत. कुटुंबातील वाटणीमध्ये लाभ होतील.
कुंभ – राशीस्वामी शनि व्यय भावात, सोबत वक्री शुक्र त्यामुळे अनावश्यक खर्च करावा लागेल. परदेशात वास्तव्याचा विचार सफल होईल. सुखस्थानातला राहू आणि दशमातील मंगळ-केतू यामुळे घर आणि कामकाजाच्या ठिकाणी कुरबुरी होतील. घरात शुभकार्य घडेल. विद्यार्थीवर्गास लाभदायक काळ राहणार आहे. भागीदारी व्यवसायात चांगला लाभ होईल. पत्नीकडून सहकार्य मिळेल.
मीन – राशी गुरूची सुधारलेली स्थिती त्यामुळे भक्तीमार्गात ओढले जाल. तुमच्या मनातल्या गोष्टींची पूर्तता या आठवड्यात झालेली दिसेल. कामासाठी खूप वेळ खर्च होईल. एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल. पण, ऐनवेळी निर्णय बदलाल. बाहेरचे खाणेपिणे टाळा, आजारपणाला निमंत्रण मिळू शकते. नवी गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे. शेअरबाजारात उलाढाल करत असाल, तर चांगले रिटर्न मिळण्याचे योग आहेत.