छोट्यामोठ्या अपंगत्वामुळे चारचौघांत वावरणे, बोलणे तसे ओशाळवाणे वाटते. तरीही आग्रहाखातर आरके बोलायला उठले. दोनचार शब्द बोलले असतील नसतील तोच आवेगाने त्यांना भरून आले आणि ते रडत मुसमुसू लागले. काही काळ सभागृह निस्तब्ध झाले. बसल्यावर ते पत्नीस म्हणाले, ‘मी सांगत होतो, मला आणू नकोस!’ माइक त्यांच्या हातात राहिल्याने हे शब्द सगळ्यांनी ऐकले. थोडं सावरल्यावर त्यांनी पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द अखेर फुटलाच नाही. त्यांच्या ‘कॉमन मॅन’सारखे ते अबोल झाले.
—-
कृष्णमूर्ती अय्यर लक्ष्मण हे नाव सांगितलं, तर गोंधळायला होईल. प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं हे नाव. टाइम्स ग्रूप आणि आर.के. या एका नाण्याच्या दोन बाजू. आरके अत्यंत तल्लख, बुद्धिमान होते. टाइम्स ऑफ इंडियातील त्यांची चित्रे जगभर गाजली. ते मितभाषी एकलकोंडे आणि स्पष्टवक्ते होते. त्यांच्या छोट्या ऑफिसमध्ये आल्या-गेल्यांसाठी खुर्ची नसे. खिडकीतून फक्त कावळे दिसत आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्टची इमारत. नंतर कावळ्यांवरच्या रेखाटनांचे प्रदर्शनही त्यांनी केलं.
त्यांनी गमतीने एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते, मध्यंतरी मला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलावले होते. भाषणात मुलांना मी म्हणालो, नशीबवान आहात. आज मी इथे चीफ गेस्ट म्हणून आलोय, मात्र स्टुडंट म्हणून मला येथे प्रवेश मिळाला नव्हता. त्या डीन साहेबांचे आता मी आभार मानतो. प्रवेश न मिळाल्याने मी व्यंगचित्रकार होऊ शकलो!
त्यांच्या ‘यू सेड इट’ या बॉक्स कार्टूनने पन्नास वर्षं वाचकांच्या मनावर अधिराज्य केलं. नेहरू, इंदिराजी, जावेद अख्तर यांच्यापासून सर्व राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील, अगदी सिनेमाक्षेत्रातील मंडळींचाही दिवस बॉक्स कार्टून पाहिल्यानंतर सुरू होई. त्यातील ‘कॉमन मॅन’ कधीच बोलला नाही. फक्त चाललेल्या घडामोडींचे मुकाट अवलोकन करीत राही आणि न बोलताही खूप काहीतरी सांगून जाई.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आणि थोर व्यंगचित्रकार श्री. बाळासाहेब ठाकरे आमच्यासारख्या नवोदितांना म्हणत, ‘अभ्यास म्हणून तुम्ही आरकेंचं ‘यू सेड इट’ रोज पाहायला हवं, त्यातलं डिटेलिंग, कॉम्पोझिशन, कॅचलाइन केवळ अप्रतिम असते!’ बाळासाहेब व ते समकालीन मित्र. दोघांनीही डेव्हिड लो या महान व्यंगचित्रकाराला गुरू मानले होते. आरकेंच्या शैलीवर तर त्यांचा प्रभाव कायम राहिला.
आमची भेट इंदूरला झाली. श्री ब्रह्म संचालित ‘साऊथ सेंट्रल झोन’ या नागपूरस्थित संस्थेने तेथे भारतातील नामवंत व्यंगचित्रकारांचे संमेलन घेतले होते. मी व चंद्रपूरचे उमदे, स्मार्ट व्यंगचित्रकार मनोहर सप्रे हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी होतो. समारोप आरकेंच्या हस्ते होता. ते पत्नी कमलाजींसोबत आले होते. सगळे गप्पा मारीत बसले असताना त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. एक दिवस आरके ऑफिसमधून आले. पाहतात तो काय, पाचपंचवीस ब्लॅक कॅट कमांडोज त्यांच्या बंगल्याच्या गेटजवळ रस्ता अडवून उभे. आजूबाजूला खूप गर्दी. नेमके काय झाले याचा अंदाज नसल्याने लोक आतुरतेने उभे होते. आरके गेटजवळ गेले पण कमांडोजनी त्यांना हुसकावत म्हटले, आत जाता येणार नाही. आत केंद्रीय मंत्री अर्जुन सिंह हे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्याशी महत्वाचे बोलत आहेत. आरके म्हणाले, अहो, मीच आर. के. लक्ष्मण. मी तर बाहेर आहे, मग ते माझ्याशीच कसे बोलतील?
सॉरी! आत कुणालाच पाठवायची परवानगी नाही. भलेही आपण आर.के. असाल! कमांडो अधिकार्यांनी ठामपणे बजावले. आरके हतबुद्ध झाले. तेवढ्यात घरातले कुणीतरी गेटजवळचा आवाज ऐकून बाहेर आले आणि मग अखेरीस आरकेंना स्वत:च्या घरात जाऊ देण्यात आले. आत गेल्यावर त्यांनी हा किस्सा सांगितला आणि अर्जुन सिंग व कुटुंबीय भरपूर हसले. अर्जुन सिंग गेल्यावर गर्दी पांगली. जराशाने आरकेंचा मुलगा कामासाठी बाहेर पडला. शेजारच्या इमारतीतील दोन वॉचमन बोलत होते, ‘अरे वहाँ गुंडा हर्षद मेहता आया था. उसका दोस्त यहां रहता है ये अपने को पताच नहीं?’ पोरगा सर्दच झाला.
गप्पागप्पात त्यांनी अनेक असे किस्से सांगितले. आरके इंदोरला येणार म्हणून एका जैन संस्थेने त्यांचे भाषण ठेवले होते. सहा वाजता भाषण व सातला व्हेज जेवण असे संयोजकांनी त्यांना सांगितले. आरके म्हणाले, मी नॉनव्हेज जेवण जेवतो आणि सोबत थोडी बिअर!
ते म्हणाले, सॉरी सर, या दोन्ही गोष्टी आम्हाला निषिद्ध आहेत!
संस्थेने दिलेले दहा हजारांचे पाकिट आरकेंनी शांतपणे परत केले.
इंदौरला आम्ही एका छान हॉटेलात उतरलो होतो. लागूनच पाचसहा रूम्स होत्या. मी बाहेरून आलो. पाहतो तर माझ्या प्रशस्त रूममध्ये सगळी मंडळी बसलेली. आरके, श्री ब्रह्म, त्यांचे सहकारी, सप्रे आदी सगळे. अपेयपान चालू होते. आत आल्यावर मी सरावाने दार बंद करू लागलो, तर आरकेंनी जागेवरूनच मला दटावलं, ‘डोन्ट क्लोज दि डोअर, कीप इट ओपन. वुई आर नॉट किड्स.’
कर्तृत्वाने खूप मोठ्या असलेल्या कलावंतांचे स्वतःचेही जगतानाचे काही एथिक्स असतात. त्यावर भाष्य करण्याचा अधिकार इतरांना नसतो. उभी हयात मुंबईत राहूनही ते मराठी वा हिंदीत चुकूनही बोलत नसत. त्यावर मी छेडले आणि विचारले की, तुमचा ‘यू सेड इट’ हा स्तंभ जनसामान्यांतला असतो… तुम्ही जनसामान्यांत कसे मिसळता? ज्यांना प्रादेशिक भाषाच बोलता येते, त्यांच्याशी बोलताना तुम्हाला अडचण येत नाही का? यावर ते म्हणाले, तशी कधी गरजच पडत नाही. बाजारहाट मुलगा वा कमलाच पहाते. डिटेलिंग इन द कार्टून इज पार्ट ऑफ माय ऑब्झर्वेशन! रोजचं बॉक्स कार्टून काढायला मला जवळपास पूर्ण दिवस लागतो.
आरके आजारी असताना बाळासाहेब त्यांना भेटायला पुण्याला गेले. ओह यू, असं म्हणत थरथरत्या हातांनी त्यांनी बाळासाहेबांचा हात घट्ट पकडला. भरल्या डोळ्यांनी स्फुंदत पुटपुटले, ‘सी व्हॉट हॅपन्ड..’ (हा बाळासाहेबांबरोबरच्या एका भेटीतला त्यांनी सांगितलेला प्रसंग).
नाशिकला सकाळच्या नाशिक आवृत्तीचे प्रकाशन होते. प्रमुख पाहुणे आरके होते. ते म्हणाले, मी देव मानत नाही. पण, कदाचित तो असेलच तर त्याचा माझ्यावर विश्वास असावा. कारण त्याने मला मोठी कला-मान-सन्मान, स्थैर्यही दिले.
२००४ सालचा मार्च महिना. माझे नेहरू आर्ट गॅलरीत पेंटिंगचे प्रदर्शन भरले होते. दुपारी मोकळीक होती म्हणून मी आणि जावई दुर्गेश बाहेर पडलो. मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आरकेंचा सत्कार शरद पवारांनी आयोजिला होता. हिन्दू या प्रतिष्ठित दैनिकाचे संपादक एन. राम हे प्रमुख पाहुणे होते. रिटायर झाल्यावर आरके पुण्यात स्थित होते, पण दुर्दैवाने ते
पॅरालिसिसने आजारी पडले होते. सार्वजनिक ठिकाणी जाणे ते टाळत. पण पवारांच्या स्नेहाखातर त्यांनी सत्कार स्वीकारला होता. कार्यक्रमास अत्यंत प्रतिष्ठित मंडळी हजर होती. सुप्रिया सुळे या अस्खलित इंग्रजीत सूत्रसंचालन करीत होत्या. एन. राम यांच्यासह अनेकजण लक्ष्मण यांच्यावर भरभरून बोलले. सत्कारसोहळा झाला, लक्ष्मण यांना दोन लाखांची थैली भेट देण्यात आली. पवारांनी आग्रह केला, लक्ष्मण यांनी यानिमित्त दोन शब्द बोलावेत. पण लक्ष्मण ऐकेनात. छोट्यामोठ्या अपंगत्वामुळे चारचौघांत वावरणे, बोलणे तसे ओशाळवाणे वाटते. तरीही आग्रहाखातर आरके बोलायला उठले. दोनचार शब्द बोलले असतील नसतील तोच आवेगाने त्यांना भरून आले आणि ते रडत मुसमुसू लागले. काही काळ सभागृह निस्तब्ध झाले. बसल्यावर ते पत्नीस म्हणाले, ‘मी सांगत होतो, मला आणू नकोस!’
माइक त्यांच्या हातात राहिल्याने हे शब्द सगळ्यांनी ऐकले. थोडं सावरल्यावर त्यांनी पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द अखेर फुटलाच नाही. त्यांच्या ‘कॉमन मॅन’सारखे ते अबोल झाले. त्या दिवशी त्यांना खूप बोलायचं असेल, आठवणी सांगायच्या असतील. कृतज्ञता व्यक्त करायची असेल, पण…
शेवटपर्यंत सभागृह नि:शब्दच राहिलं. कॉमन मॅनसारखंच!