हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्राणीसृष्टीवर विशेष लोभ… माणसांपेक्षा हे प्राणी त्यांना अधिक भरवशाचे वाटत असावेत आणि सच्चेही वाटत असावेत. कुत्र्यांचा त्यांना विशेष लळा. वास्तव आयुष्यातही आणि व्यंगचित्रांमध्येही. माणसं असोत की प्राणी असोत, त्यांची अॅनाटॉमी व्यंगचित्रकाराला किंवा चित्रकाराला परफेक्ट कळली पाहिजे, असं ते नेहमी सांगत. या दोन्हींवर त्यांची किती हुकुमत होती, ते दाखवून देणारी ही व्यंगचित्रं आहेत. इथे त्यांनी काही माणसांचं रूपांतर कुत्र्यांमध्ये केलेलं आहे. माणसांचे चेहरे आणि कुत्र्यांचं शरीर… माणसाच्या शरीरानुसार कुत्र्याच्या शरीराची ढब, उभे राहण्याचा आविर्भाव आणि भुंकण्याची शैली… शिवाय सगळे वेगवेगळ्या दिशांनी टिपलेले आहेत… साठेबाजांविरोधात नुसताच आरडाओरडा करणार्या नेत्यांच्या चित्रात धान्याच्या पोत्यांबरोबर बसलेले ते साठेबाजही कसे पाहताक्षणी सजीव वाटायला लागतात… दुसरीकडे अमेरिकेची मदत मिळताच भारतावर भुंकू लागलेले श्रीलंकेचे तत्कालीन नेते दिसतायत… आता आपल्या उपखंडात अमेरिकेची जागा चीनने घेतलेली आहे… बाकी भुंकाभुंक मागील पानावरून पुढे सुरू आहेच…