मध्यंतरी माझ्या या लेखमालेवरून आणि एकूणच पाककलेच्या आवडीवरून काही स्नेह्यांशी चर्चा सुरू होती. साधारण चहा, मॅगी, पोहे, खिचडी वगैरे ठीक आहे म्हणे, पण तू तर एखाद्या सुगरणीसारखा सर्वच पदार्थ विनासायास बनवतोस. कधी हे सगळे घटक पदार्थ किंवा मेहनत वाया जाईल अशी काळजी नाही का रे वाटत?
बोलता बोलता गाडी पाकाच्या मुद्द्यावर आली. तो पाक बनवणं तर नक्कीच कठीण, पण तोही टाळत नाहीस म्हणे!!
मला झरझर माझे आधीचे दिवस आठवले. इतर सर्वसाधारण पदार्थ बनवणं मुळातच असलेल्या पाककलेच्या आवडीमुळे फारसं कधी कठीण वाटलंच नाही. एखादा पदार्थ बनविणे हे काम असतं हे मनाला कधी जाणवलंच नाही. पाकाची मात्र मनात भीती होती. लाडू करायचे म्हटले की मी बेसनाचे पिठीसाखर मिसळलेले लाडू करायचो. मात्र खुमखुमी होतीच साखरेचा पाक करून बघण्याची. माझ्या आईच्या हातचे रवा नारळाचे लाडू जसे सर्वांनाच खूप आवडतात, तशाच माझ्या सासूबाईंच्या हातच्या रवा बेसनाच्या वड्यापण!! दोन्ही पदार्थ मला दरवेळी खाताना वाटायचे की आपल्याला जमावेत, पण पाकाची भीती होतीच. अखेरीस मनाचा हिय्या करून साधारण एकाच सुमारास दोघींकडून शांतपणे दोन्ही पदार्थ शिकलो, पाकाचं तंत्र समजून घेतलं. लाडूचा पाक तुलनेत सोपा असतो, वड्यांचा पाक जमणे मात्र थोडे कसोटीचे ठरते. अजूनही हातखंडा आहे असं म्हणण्याचं धाडस नाही करत, पण सुरुवातीला जसं सगळं वाया जायचं तसं आता नाही होत हे निश्चित.
फार कमी घटक पदार्थांत बनतात या वड्या. सारख्या प्रमाणात बारीक रवा आणि जाडसर बेसन, तूप आणि रवा-बेसनाच्या पाऊणपट साखर हे मूळ पदार्थ. बाकी वेलदोड्याची पूड, केशर, सुक्या खोबर्याचा कीस किंवा सुकामेवा वगैरे ऐच्छिक. सर्वात आधी वाटीभर बेसन साधारण अर्धी वाटी साजुक तुपात मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यायचे, आपण लाडवांसाठी भाजतो तसेच. मग ते बाजूला काढून त्याच कढईत एक वाटी बारीक रवा चमचाभर तुपावर छान भाजायचा. दोन्ही पदार्थ एकत्र भाजले तर रवा कच्चा राहण्याची व बेसन करपण्याची शक्यता असते. भाजलेले रवा व बेसन नंतर एकत्र करून घ्यावे. दीड वाटी साखर, ती बुडेल एवढ्या पाण्यात घालून एकतारी पाक करावा, म्हणजे साखर व पाणी गॅसवर उकळू द्यावे, साधारण पाच-सात मिनिटांनी पाक बनतो, ज्यावेळी किंचित थंड झालेल्या पाकाच्या थेंबाची दोन बोटांत धरल्यावर एक तार बनते तो एकतारी पाक. पूर्ण पाकापैकी साधारण अर्धा पाक रवा-बेसनाच्या मिश्रणात मिसळावा. राहिलेला अर्धा पाक पुन्हा आचेवर ठेऊन तो गोळीबंद होऊ द्यावा. हा पाक एकदम घट्ट असतो आणि पाण्यात ह्याचा थेंब टाकला तर गोळी बनते. तयार गोळीबंद पाक आधी एकतारी पाक आणि रवा-बेसनाच्या मिश्रणात पटापट मिसळायचा आणि तूप लावलेल्या थाळ्यात वड्या थापायच्या. इथे अनुभव कामी येतो, गोळीबंद पाक थोडाही कच्चा राहिला तर वडी मऊ पडते आणि जास्त झाला तर सगळा भगरा होतो. वेलदोड्याची पूड तसेच सुकामेवा वड्या थापण्यापूर्वी मिश्रणात मिसळू शकतो आपण. वडी थापताना काहीजण त्यावर सुक्या खोबर्याचा कीस पसरतात.
एकदा का गोळीबंद पाकाचं तंत्र जमलं की या वड्यांसारखी मजा नाही. कढईला एक कण चिकटत नाही तसेच छान खुटखुटीत वडी पडते. पाकामुळे चमक आलेल्या या वड्या काही मिनिटांतच जमून येतात आणि एकमेकींपासून मोकळ्या होतात अलिप्त होतात जणू!! छान करकरीत आकाराच्या वड्या एकावर एक ठेवल्या तरी ना मोडत ना चिकटत एकमेकींना! मात्र तोंडात टाकली की अहाहा… विरघळते आणि लगेच तो गोडवा पसरवते जिभेवर!!
माणूस म्हणून कुटूंबाचे, समाजाचा आपण अविभाज्य अंग असलो तरी मनात ही अनासक्ती निर्माण होणं आणि टिकणं हे कृपेचंच लक्षण आहे. भौतिक सुखसाधनांप्रती, आप्तेष्टांप्रती वाटणारी आसक्ती प्रगतीच्या वाटेवर अडसर ठरते. अर्थात संसारात राहून हे सगळं टाळणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही. चिखलातून जन्मलेल्या कमळासारखं मनाला उर्ध्वगामी ठेवलं की त्या पाण्यातच राहून कमळाची पान कशी सदैव कोरडी राहतात. अर्थात आध्यात्म मनाच्या कोरडेपणाला कधीच पुष्टी देत नाही. परमेशाचा अंश म्हणून इतरांप्रती वाटणारा स्नेह, आपुलकी नक्कीच मनाचा गोडवा वाढवतात. नौबतखान्यात राहून सदासर्वकाळ आल्यागेलेल्यांची सरबराई करणार्या माताजी श्री सारदादेवींची आठवण झाल्याशिवाय राहावत नाही इथे! सर्वांना सांभाळून घेतानाच प्रत्येकालाच अकृत्रिम स्नेह देतांना मनात सदैव इष्टाचा जप करणार्या माताजी विशेष ठरतात. साधेपणातून साधनेचा चोखाळलेला हा मार्ग नकळत जवळचा वाटतो. कोणतेही अवडंबर न माजवता केवळ मनाच्या अलिप्ततेनी साधलेली ही वरवर पाहता सोपी, पण उच्च कोटीची साधनाच माताजींच दैवी रूप अधोरेखित करते. एकाच रक्तामासापासून बनलेले असलो तरी मायेच्या बाहुपाशात न गुंतता अलिप्तपण साधतांना मनातला गोडवा मात्र टिकला पाहिजे, मग आयुष्याचं, या जन्माचं सार्थक होईल… त्या लाडक्या रवा-बेसनाच्या वड्यांसारखंच!!