□ मुंबईची हवा अत्यंत वाईट, तरी सरकार झोपलेलेच – प्रदूषणाच्या मुद्यावरून हायकोर्टाने झापले.
■ तिकडे बीडमध्ये अत्याचार, अनाचारांचा कळस झालाय, पुण्यासारख्या ठिकाणी महिलेची दिवसा ढवळ्या हत्या होते, तरीही जे झोपलेले आहेत, ते प्रदूषणासारख्या चिल्लर कारणांनी जागे होतील? विकास पाहिजे तर प्रदूषण होणारच ना, ही यांच्या बुद्धीची झेप आहे, म्हणून ही काळझोप आहे.
□ वाल्मीक कराडचे पुण्यात पाच फ्लॅट, सात दुकाने – पैठणच्या मोर्चात धस यांचा ‘डायरी बॉम्ब’.
■ कसला बाँब नि कसलं काय? दिवसरात्र कष्ट करून, प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्य माणूस यातली एकही गोष्ट मिळवू शकत नाही. एका छोट्या ‘आका’कडे शेकडो कोटींची संपत्ती गोळा होते, मग बड्या आणि सर्वात बड्या आकांकडे किती हजार कोटी असतील, असाच हिशोब असल्या बातम्यांमधून आजचे बेरोजगार तरुण करतात आणि नेक मार्ग सोडून आका बनण्याच्या, किमान आकाचा साथीदार बनण्याच्या मार्गावर जातात.
□ सुप्रीम कोर्टासारखं बेशिस्त न्यायालय पाहिलं नाही – भावी न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आसुड.
■ सगळ्या देशाने पण पाहिलं नाही. पण खरंतर गवई साहेबांच्या एव्हाना लक्षात यायला हवं की या सगळ्या बेशिस्तीत एक दक्ष शिस्त आहे, ती बरोबर पाळली जाते. आपण कोणासाठी काम करत आहोत, याची स्पष्टता असली की झालं.
□ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची टोलवाटोलवी.
■ जेव्हा लोकांनी सत्ता दिलेली नसते, ती गैरमार्गांनी बळकावलेली असते, तेव्हा कधी ना कधी त्याची फळं भोगावी लागतातच… पराभवापेक्षा विजय महागात पडणार आहे अनेकांना.
□ दोन वर्षांनंतर सरकारला जाग; साडेपाच लाख शेतकर्यांना ५३५ कोटींची भरपाई.
■ लाडकी बहीण वगैरे मतखरेदी योजना राबवून झाल्यानंतर आता थोडं काम पण करून दाखवलं पाहिजे ना! याला चुचकारायचं, मग त्याला चुचकारायचं, हेच करत राहायचं.
□ वाल्मीक कराडची ईडी चौकशी का केली नाही? – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल.
■ चांगला प्रश्न आहे. राष्ट्रवादी पक्ष अविभक्त असताना कराड हरिभक्तपरायण साधुसंत होता का, असा उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे ताई! त्याचं काय करायचं?
□ फडणवीस मुख्यमंत्री होताच अजित पवारांनी मिंध्यांची फाईल लटकवली.
■ मुळात ज्या चित्रपट मालिकेची सुरुवात ‘अशी ही बनवाबनवी’पासून झाली असेल, तिथे पुढे ‘अशी ही लटकवालटकवी’ होणारच ना!
□ परवडणार्या घरांच्या नावाखाली सरकारकडून सर्वसामान्यांची लूट; सिडकोविरोधात लोकांची नाराजी.
■ काय कराल नाराजीचं? परवडत असेल तर घ्या नाही तर फुटा, असंच सरकार सांगणार.
□ डोंबिवली क्रीडा संकुलात मातीचे ढीग, दारूच्या बाटल्यांचा खच.
■ इथे नेमके कोणते क्रीडा प्रकार चालतात, त्याचा शोध घ्यायला हवा.
□ मिंध्यांच्या दुर्लक्षामुळे ठाण्याच्या स्मार्ट सिटीचा कोंडमारा; सीपी टँक डम्पिंगवर कचर्याचे डोंगर.
■ कुठूनही कुठेही जायला जिथे एक शहर ते दुसरं शहर अंतरासाठी लागावा तेवढा वेळ लागतोय, ती स्मार्ट सिटी? आणखी एक विनोद सांगा.
□ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत अनेक चुकीची कामे झाली – गणेश नाईकांनी मिंध्यांना डिवचले.
■ त्यांची नेमणूकच त्या कामासाठी झाली आहे. आता काम संपलं, उपयोग संपला, आता हळुहळू मिंध्यांना संपवून मोकळी होणार महाशक्ती.
□ मी देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात – पंतप्रधान मोदींचा नवा ट्विस्ट.
■ तुम्हाला लोकसभा निवडणूक काळात काहीही भास होत असले वयोमानाप्रमाणे तरी लोकांना हे माहिती होतंच की तुम्ही सर्वसामान्य मानव आहात. पण चुका आणि घोडचुका किती कराव्यात, त्याला काही मर्यादा?
□ कोश्यारींची मविआ सरकारच्या काळातली भूमिका ‘प्रचंड क्लेशदायक’ – हायकोर्टाचे निरीक्षण.
■ तरीही निकाल काय लागला? ते महत्त्वाचं. तो अधिक क्लेशकारक आहे युवर ऑनर!
□ लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी देवाभाऊ दारूविक्री वाढवणार.
■ छान! कुटुंबप्रमुख असावा तर असा!
□ कोर्टाच्या परवानगीशिवाय ‘आरे’मधील एकही झाड तोडू नका – सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला बजावले.
■ सगळं तोडून सफाचट झाल्यावर आता कसले कागदी घोडे नाचवायचे? अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गयी खेत!
□ ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’ – नीतेश राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य.
■ हे सगळे गणंग संवैधानिक शपथ घेऊन ही भाषा वापरतात, तेव्हा कायदा सुव्यवस्था यंत्रणा यांच्याच मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते, त्यामुळे ही बांग देत असतात मधून मधून. त्यांना त्यासाठीच तर नेमलंय आणि बक्षिसीचं बिस्कुटही टाकलंय.
□ ठाण्यात टीएमटीच्या ३० टक्के चालकांना दृष्टिदोष.
■ म्हणजे टीएमटीचा प्रवास किती सुरक्षित मानायचा आता?