बावला प्रकरणावरचं ‘द टेम्प्ट्रेस’ हे प्रबोधनकारांनी लिहिलेलं इंग्रजी पुस्तक देशभर गाजलं. थेट ब्रिटिश संसदेच्या सदस्यांपर्यंतचही ते पोचवण्यात आलं. पण या पुस्तकाने प्रबोधनकारांना मोठा धक्का दिला. ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ या इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक बी. जी. हॉर्निमन यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला.
– – –
बावला खून प्रकरणावर प्रबोधनमधल्या लेखांच्या छोट्या पुस्तिका प्रबोधनकारांनी छापल्या. त्यात मराठीतली महामायेचा थैमान आणि इंग्रजीतली ‘द टेम्प्ट्रेस’ सर्वाधिक गाजल्या. हा विषय देशपातळीवरचा आहे आणि इंग्रजी सरकारनेही दखल घ्यावी यासाठी प्रबोधनकार या प्रकरणावर मराठीबरोबरच इंग्रजीतूनही प्रबोधनमध्ये लिहीत होते. ‘द टेम्प्ट्रेस’ हे स्वतंत्र पुस्तक होतं. खरं तर ६२ पानांची छोट्या आकाराची पुस्तिकाच. पण तिचा प्रभाव फार मोठा ठरला. विषय देशभर चर्चेचा होता आणि तोवर प्रामुख्याने होळकरांच्या विरुद्धच लिखाण प्रसिद्ध होत होतं. त्याला ‘द टेम्प्ट्रेस’ने धक्का दिला.
या पुस्तिकेची पहिली आवृत्तीच पाच हजार प्रतींची होती. विशेषत: रेल्वे स्टेशनांवर पुस्तकविक्रीचं जाळं असणार्या व्हीलर कंपनीने या पुस्तकाचं देशभर वितरण केलं. एका आठवड्यातच दुसरी आवृत्ती काढण्याची वेळ आली. पुन्हा पाच हजार प्रतींची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. हे पुस्तक फक्त देशातच नाही, तर जगातही पोचलं. प्रबोधनकारांनी त्याची एक प्रत नानासाहेब समर्थ यांना लंडन येथे पाठवली. पुस्तक पोचताच नानासाहेबांनी दीडशे प्रती पाठवण्याची तार केली. प्रबोधनकारांनी त्या लगेच बोटीने पाठवल्या. नानासाहेबांनी या पुस्तिकेची एकेक प्रत हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या सभासदांच्या पीजनबॉक्सध्ये टाकण्याची व्यवस्था केली. ब्रिटिश संसदेच्या सर्व खासदारांना बावला खून प्रकरणातली होळकरांची बाजूही कळावी, यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला होता.
टेम्प्ट्रेस या शब्दाचा केम्ब्रिज डिक्शनरीत ‘a woman who tries to sexually attract’सह असा अर्थ दिला आहे. म्हणजेच बावला खून प्रकरणात प्रबोधनकार मुमताज बेगमला दोषी मानत होते. पुस्तकाच्या पहिल्या पानावर पुस्तकाचा परिचय म्हणून दिलेलं वाक्यही हेच सांगतं, A disclosure of solid facts concerning the Bawla Mumtaz tragedy wrought by her Foul Heart behind her Fair Face. पुस्तकात एकूण सहा प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात खुनाच्या प्रसंगाचं आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींचं वर्णन आहे. दुसर्या प्रकरणात बावला आणि मुमताज यांचा नव्याने परिचय करून दिला आहे. पुढच्या दोन प्रकरणांत कोणतेही पुरावे नसताना तुकोजीराव होळकर यांना या खटल्यात अडकवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा युक्तिवाद केला आहे. पाचव्या प्रकरणात इंग्रजी आणि ब्राह्मणी पत्रकारांच्या भूमिकेची चिरफाड केली आहे. शेवटचं प्रकरण ब्रिटिशांनी संस्थानिकांशी आणि विशेषत: तुकोजीरावांशी कसं वागायला हवं, याविषयी मत मांडतं.
पुस्तकाच्या सुरवातीला प्रबोधनकारांनी छोटी प्रस्तावना लिहून मनोगत मांडलंय. ही प्रबोधनकारांची फक्त या पुस्तकाची नाही, तर एकंदर बावला खून प्रकरणाविषयीची भूमिका होती. या छोट्या मनोगताचा मराठी अनुवाद असा, बावला मुमताज शोकांतिकेवर हे छोटं पुस्तक जनतेला सादर करताना या प्रकरणातल्या निखळ सत्यावर बोट ठेवण्याचा प्रामाणिक आणि एकमेव हेतू आहे. काळ उलटत जाईल तसे इतिहासाच्या या तुकड्याचे तपशील हवेत विरून जातील, श्रीमंत महाराज तुकोजीराव होळकर यांची धवल कीर्तीही विसरली जाईल किंवा कदाचित त्याच्या अस्तित्वावरच प्रश्न विचारले जातील. असं असलं तरीही या जगावेगळ्या प्रकरणाची नोंद योग्य दृष्टिकोनातून करणं आणि त्याचा खरा अर्थ लोकांसमोर आणणं, हे एका इतिहासकाराचं विश्वासार्ह कर्तव्य आहे. हे काम प्रस्तुत लेखकाला फारसं रुचणारं नव्हतं, तरी या संपूर्ण प्रकरणावर काही पाताळयंत्री लोकांनी खोटारडेपणाचा कळस चढवल्यामुळे हे काम करणं त्याच्यासाठी अपरिहार्य कर्तव्य असल्याची जाणीव झाली. या छोट्या पुस्तिकेमुळे या शोकांतिकेशी संबंधित काही कळीच्या मुद्द्यांवर नीट प्रकाश पडला, तर स्वेच्छेने केलेले कष्ट फळास आले, याचं समाधान लेखकाला मिळेल.
त्या काळात ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ या इंग्रजी वृत्तपत्राचा देशभर दबदबा होता. काँग्रेसचे नेते फिरोजशहा मेहता यांनी ते १९१० साली सुरू केलं होतं. पण १९१३ साली बी. जी. हॉर्निमन या ब्रिटिश संपादकाने त्याची धुरा सांभाळताच त्याला स्वत:ची ओळख मिळाली. वसाहतविरोधी भूमिकेमुळे हॉर्निमन यांनी कायम भारतीय स्वातंत्र्याची बाजू ठामपणे मांडली. पत्रकारांची पहिली संघटना बांधून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश राजवटीशी भांडत राहिले. जालियनवाला बाग प्रकरणात ‘बॉम्बे क्रॉनिकल’ने केलेलं वार्तांकन गाजलं. त्यासाठी हॉर्निमन यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यांना काही काळ जबरदस्तीने इंग्लंडमध्येही पाठवण्यात आलं. १९२६ साली पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी बावला खून प्रकरण लावून धरलं. इतर अनेक वर्तमानपत्रांप्रमाणे त्यांनीही या खुनाच्या षडयंत्रात तुकोजीराव होळकरांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हल्लेखोरांना शिक्षा होऊनही खरा गुन्हेगार अजूनही मोकाट असल्याचा सूर त्यांनी मांडला.
प्रबोधनकारांनी ‘द टेम्प्ट्रेस`मध्ये इतर वर्तमानपत्रांप्रमाणेच `द बॉम्बे क्रॉनिकल`ने केलेले दावेही खोडून काढले आहेत. या वर्तमानपत्राचा उल्लेख जिथे जिथे येतो, तिथे त्याला मुस्लिमधार्जिणं म्हणून हिणवलं आहे. धारवाडच्या एका प्रकरणात बॉम्बे क्रॉनिकलच्या विरोधात ब्रिटिश सरकारने भूमिका घेतली होती, तशीच त्यांनी या प्रकरणातही घ्यावी, अशी मागणीही या पुस्तकात आहे. प्रबोधनकार ‘बॉम्बे क्रॉनिकल’वर आधीही टीका करत होते. पण ती मराठीत होती. इंग्रजीत केलेली ही टीका मात्र हॉर्निमन यांना बोचली. त्यांनी प्रबोधनकारांच्या विरोधात गिरगाव कोर्टात अब्रुनुकसानीची केस केली. प्रबोधनकार लिहितात, `त्या इंग्रेजी पुस्तकात हॉर्निमनविषयी एक संदर्भ आला होता. बॉम्बे क्रॉनिकलच्या काही आक्षेपांना उत्तर देण्यासाठी तो द्यावा लागला. झाले. हॉर्निमनची अब्रू त्या संदर्भाने रसातळाला गेली आणि त्याने माझ्यावर बेअब्रूची फिर्याद गिरगाव कोर्टात ठोकली.
तोपर्यंत कोर्टकज्ज्यांपासून लांब राहण्यात प्रबोधनकारांना यश मिळालं होतं. पण आता केस केल्यामुळे बाजू मांडावी लागणारच होती. एकतर त्यासाठी पुण्याहून सारखं सारखं मुंबईला यावं लागणार होतं. सगळ्यात मोठी अडचण होती ती पैशांची. प्रबोधनकार होळकरांची बाजू मांडत होते, त्यात त्यांचा स्वार्थ नव्हता. ती केवळ त्यांनी वैचारिक भूमिका होती. पण अनेक पत्रकारांना वाटत होतं की त्यांना होळकर महाराजांकडून मलिदा मिळत असणारच. प्रत्यक्षात मात्र प्रबोधनकारांकडे केस लढवायलाही पैसे नव्हते. ते प्रबोधनकार असं मांडतात, मुद्द्याला मुद्दा देण्याचे भांडण संपले म्हणजे वैयक्तिक बदनामीचे शस्त्र बाहेर काढायचे, हा पुणेरी खाक्या सर्वश्रुत आहे आणि त्याचे सांप्रदायिकही सध्या हयात आहेत. ज्याअर्थी होळकरांची बाजू घेऊन हा आमच्याशी इतक्या तिरमिरीने किंवा तेरीमेरीने होड घ्यायला सरसावला आहे, त्याअर्थी, त्याअन्वये, त्याला होळकरांचा भरमसाट मलिदा मिळाला असला पाहिजे खास. त्याशिवाय का कोण या संस्थानिकांच्या पाठिंब्याला उभा राहणार? हा आक्षेप केवळ ब्राह्मणांनीच फैलावला, असे नव्हे, तर बरीच बामणेतर मंडळीही त्या सुरात आपला बदसूर मिळवीत होती. कारण स्पष्ट आहे. बामणेतरी आकांडतांडवाचा घोशा नारोशंकरी गडगडाटाने कोठवर चालला होता? शाहू महाराजांच्या गंगाजळीतले थेंब जोवर चळवळ्यांच्या हातांवर ठिबकत होते तोवर. तो बंद होताच आंदोलनाचा जोर ओसरला. असल्या थेंबचाटूंनी माझ्या मलिद्याच्या बर्भ्यातच्या बामणी चपात्या लाटणीला चारदोन थेंब तेल पुरविल्यास, नवल ते कशाचे? असल्या गावकुटाळकीला मी थोडाच भीक घालतो?
कोर्टात जाण्यासाठी ते अनंतराव गडकरींना भेटले. ते क्रिमिनल प्रकरणांचे प्रख्यात वकील होते. त्यांनी सांगितलं, या केससाठी बॅरिस्टरच करावा लागेल. आता सल्लागार वकीलच असं सांगतो, म्हटल्यावर प्रबोधनकारांचा नाईलाज झाला. बॅरिस्टरची एका दिवसाची फी शंभर रुपये होती. पण बॅरिस्टराला द्यायला पैसेच नव्हते. या अडचणीच्या काळात प्रबोधनवर प्रेम करणारी दादरकर मंडळी धावून आली. खटल्याची माहिती दादरकरांना कळली. प्रबोधनकार खटल्यासाठी दादरला आल्याचं कळताच अनेकजण येऊन भेटू लागले. उद्या खटला आहे, पण ठाकरेंकडे पैसेच नाही, हे कळताच प्रबोधनचे चाहते असणार्या देवधर नावाच्या गृहस्थांनी रात्री ११ वाजता स्वत: येऊन शंभर रुपये दिले. म्हणाले, घाबरण्याचं कारण नाही. हा देवधर तुमच्या पाठीशी उभा आहे. हे घ्या शंभर रुपये. आणखी लागतील तर मला सांगा. खटला लढवा.
असे अनेक मित्र प्रबोधनकारांना भेटू लागले. मदत देऊ लागले. त्यामुळे ते खटला कसाबसा चालवू शकले. याकाळातल्या आर्थिक चणचणीचं वर्णन प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्य या पुस्तकात असं केलं आहे, टेम्प्ट्रेस खटल्याच्या सबबीवर पांढर्याफेक नीतिमंतांच्या सोनेमोल नातीचे पिवळेधमक चनली नाणे कायदेबाजीच्या टाकसाळीत घडत होते.