हजारो गुंतवणूकदारांना ३००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालणार्या मुंबईतील टोरेस कंपनीच्या तीन आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून काही फरारी आरोपींविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
७ एप्रिल २०२३ रोजी नोंदणी झालेल्या ‘प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी टोरेस ज्वेलर्स ही कंपनी संलग्न असून या कंपनीने ग्राहकांना सोने, चांदी आणि हिर्याचे दागिने देण्याबरोबर हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. यासाठी कंपनीने चार प्रकारच्या योजना राबविल्या होत्या. त्यानुसार पहिली दर आठवड्याला दोन टक्के व्याज परताव्यासह सोन्यात गुंतवणूक, तीन टक्के व्याज परताव्यासह चांदीमध्ये गुंतवणूक, चार टक्के व्याज परताव्यासह मेझेनाईट स्टोनमध्ये गुंतवणूक आणि फक्त मेझेनाईट खड्यांमध्ये गुंतवणूक केल्यास पाच ते सहा टक्के व्याजदर परतावा, असं सांगण्यात आलं. सहा लाखांवर सहा टक्के आणि सहा लाखांपेक्षा जास्त रकमेवर ११ टक्के व्याज दिले जात होते. कंपनीने मेझेनाईट व इतर नकली खडे लोकांना स्वस्तात विकले. त्याचबरोबर गुंतवणकीवर अत्यंत आकर्षक व्याज देऊन लोकांना भुलविले.
दर आठवड्याला ११ टक्के व्याजाच्या ऑफरला भुलून लोकांनी भरपूर गुंतवणूक केली. आधी सोने आणि हिर्यांचे दागिने विकून कंपनीने बरेच पैसे जमवले. सुरुवातीला दर आठवड्याला लोकांना व्याजही दिले गेले. नंतर ६ जानेवारीला कंपनीच्या सर्व शाखा बंद करण्यात आल्या आणि गुंतवणूकदारांमध्ये हाहाकार माजला. मुंबईसह इतर भागातल्या ‘टोरेस’च्या सर्वच शोरूमसमोर गुंतवणूकदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. चर्चा सुरू झाली. गुंतवणुकीवर दर आठवड्याला ११ टक्के व्याज परतावा देण्याचं आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केल्यानंतर अचानक कंपनीचे सर्व शोरूम बंद झाले होते. गुंतवणूकदारांना यातून समजायचा तो अर्थ समजला आणि एकच गोंधळ उडाला. पोलीस तक्रार झाली. पोलिसांनी तातडीनं पावलं उचलून कंपनीच्या तीन वरिष्ठ पदाधिकार्यांना अटकही केली. पण या सगळ्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार असणारे कंपनीचे दोन संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाले.
कंपनीने मुंबई, ठाणे, कल्याण आणि आसपासच्या भागातल्या जवळपास सव्वा लाख ग्राहकांना गंडा घातला असून घोटाळ्याचा आकडा किमान एक हजार कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई पोलिसांनी आता हे प्रकरण आर्थिक गुन्हेगारी शाखेकडे सोपविले असून पुढील तपास सुरू आहे. ७ जानेवारीला शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीची महाप्रबंधक तानिया सासातोवा उर्फ तजागल करासानोन्वा सासातोवा (५२), संचालक सर्वेश अशोक सुर्वे (३०) आणि स्टोअर प्रभारी व्हॅलेंटिना गणेश कुमार (४४) यांना अटक केली. तानिया उझबेकिस्तानची नागरिक आहे, तर व्हॅलेंटिना रशियन असून तिने एका भारतीय नागरिकाशी लग्न केले आहे. आरोपी सर्वेश सुर्वे हा आधी आधार कार्ड बनविण्याचे केंद्र चालवत होता. नंतर तो कंपनीचा संचालक झाला. तीनही आरोपींची रवानगी १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
टोरेसचे ‘संस्थापक’ आणि यूक्रेनचे नागरिक जॉन कार्डर आणि विक्टोरिया कोवलेंको सध्या पळून गेल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. शिवाय कंपनीची तीन बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
राज्यभर पसरलेले जाळे
टोरेस ज्वेलर्सने मुंबईत दादर, गिरगावसह राज्याच्या इतर भागातही आपले जाळे पसरविले होते. मिरा रोडच्या रामदेव पार्क भागात ‘अनंत एक्झोरिया’ इमारतीत टोरेस ज्वेलर्सने शोरुम उघडले होते. मिरा रोड येथील कपिल उस्मानी यांना ५०,००० रुपये गुंतवल्यास दर आठवड्याला ५,००० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे २,४८,००० रुपये गुंतविले. त्यांना सुरुवातीला पांच आठवड्यात ७४,६०० रुपये देण्यात आले. नंतर इतरांनी ४५,००० ते २० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. आता मीरा भायंदरमध्ये २८जणांचे ६८.११ लाख रुपये बुडाले आहेत.
दादरच्या प्रदीपकुमार वैश्य (३१) यांनी २१ जूनला ६.७० लाख गुंतवल्यानंतर त्यांना दोन आठवड्यात ८०,४६६ रुपये मिळाले. विश्वास बसल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ४.५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
‘टोरेस’चे मुंबई महानगर हद्दीत एकूण सहा आलिशान शोरूम होते. यात दादर, गिरगाव, कांदिवली, मिरा रोड, कल्याण आणि सानपाड्यातील शोरूमचा समावेश आहे. ‘टोरेस’चे मुख्यालय गिरगावमध्ये आहे. ‘टोरेस’ने सुरुवातीला वेगवेगळ्या शहरात सेमिनार्स घेतले. त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना भल्यामोठ्या परताव्यांचं आमिष दाखवून आकर्षित केलं. या सेमिनार्समध्ये कंपनीचे अधिकारी दावा करायचे की त्यांना स्वस्तात सोनं मिळत असल्यामुळे त्यातून ३०० टक्के नफा होत आहे. या ३०० टक्क्यांतूनच आपण हा अविश्वसनीय व्याजदर परतावा देत आहोत. यामुळे गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्वास बसायचा. त्यातून मोठमोठ्या रकमांची गुंतवणूक ‘टोरेस’मध्ये झाली’, अशी माहिती गुंतवणूकदार उस्मान शेख यांनी दिली.
सुरुवातीला लोकांनी पैशांमध्ये थोडीफार गुंतवणूक केली. पण त्यांना वेळेत दर आठवड्याला व्याज परतावा मिळायला लागल्यानंतर त्यांनी स्वत: मोठ्या रकमेची गुंतवणूक केलीच, पण त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही गुंतवणूक करायला भाग पाडलं. काही गुंतवणूकदार तर स्वत: कंपनीकडे आणखी गुंतवणूकदार आणण्यासाठी एजंटसारखं काम करू लागले. कोल्हापूरमधील एका महिलेने स्वत: १०,००० रुपये गुंतविल्यानंतर इतर ८६जणांना गुंतवणूक करायला लावली.
या घोटाळ्यातील आरोपींनी १ जानेवारी २०२५ रोजीच सर्व शोरूम बंद करुन पळून जायच ठरविलं होतं. त्या नियोजनानुसार त्यांनी दादर पश्चिममधली शाखा वगळता इतर सर्व शाखा बंद केल्या. ते दादर शाखाही सोमवारी बंद करण्याच्या तयारीत ते होते, पण त्यांचा प्लॅन फसला.
कथित दरोडा
कंपनीच्या अधिकार्यांनी सानपाड्यातील शोरुमवर दरोडा पडल्याचा बनाव करुन काही गुंतवणूकदारांना एक मेसेज आणि परताव्यासाठी एक फॉर्मदेखील पाठवला. या प्रकारात आरोपींना पळून जाण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळाला.