दोन वेळा दुपारी दसरा मेळावा झाला होता. त्यावेळेसही शिवसैनिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. कोरोनामुळे २०२० आणि २०२१ साली शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकला नाही. परंतु आता कोरोनाचे संकट सरले असल्यामुळे यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा हा दणक्यात होणार आणि तोही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली होणार.
– – –
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे गटाला आस्मान ठेंगणं वाटू लागल्यामुळे आधी शिवसेना, धनुष्यबाण आणि आता ते शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा आमचाच होणार असा दावा ठोकत आहेत. शिवसेना विरोधात बांग देण्यासाठी मनसेही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याच्या विचारात आहे. पण शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा १९६६पासून शिवसेनेने सुरू केली. १९६६ सालापासून शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. ‘वाजत-गाजत, गुलाल उधळत’ महाराष्ट्राच्या काना-कोपर्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर लोटतो. गेली ५६ वर्षे ‘एक पक्ष, एक निशाण, एक मैदान’ म्हणजे शिवतीर्थावरील दसरा मेळावा होय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी उन्हा-तान्हाची, पावसाची पर्वा न करता विठ्ठलाच्या वारीत जसे वारकरी सहभाग घेतात; त्याच प्रेमभावाने आपल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक येतात. आधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि निधनानंतर २०१३ सालापासून उद्धवजींच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच प्रचंड गर्दीत आणि त्याच पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. शिवसेनेच्या पुढील कार्यक्रमाची दिशा, वाटचाल ठरवणारा हा शिवसेनेचा दसरा मेळावा असल्यामुळे राजकीय वर्तुळात एक अनन्यसाधारण महत्त्व या मेळाव्याला प्राप्त झाले आहे. बाळासाहेबांबरोबर कधी कधी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आहे. वक्तादशसहस्रेषू प्रा. शिवाजीराव भोसले, विचारवंत दत्ता बाळ, बॅ. रामराव आदिक, नवाकाळकार निळूभाऊ खाडिलकर, शाहीर साबळे, दादा कोंडके, रमेश देव, पंडित हृदयनाथ मंगेशकर, संपादक विद्याधर गोखले, पत्रकार नारायण आठवले, संपादक भारतकुमार राऊत आदि साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंतांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहून शिवसैनिकांना संबोधले आहे.
२३ ऑक्टोबर १९६६ रोजी ‘मार्मिक’मध्ये पहिल्या पानावर मजकूर छापून आला. रविवार ३० ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० वाजता शिवाजी पार्कवर शिवसेनेचा भव्य मेळावा आहे, तोच दसरा मेळावा होय. मजकूर असा होता, ‘स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने या मेळाव्यास जातीने उपस्थित राहिलेच पाहिजे. पिचक्या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये. ‘जय महाराष्ट्र’!’ आणि व्यंगचित्र होते की अपेक्षाभंग, अन्याय, उपर्यांचा धुमाकूळ, पीछेहाट या सर्वांमध्ये बुडणार्या मराठी माणसाला शिवसेना मदतीचा हात देत आहे. या एका बातमीमुळे आणि व्यंगचित्रातील आशयामुळे ३० तारखेच्या मेळाव्याला शिवाजी पार्कवर चार लाख मराठी जनता गोळा झाली होती.
प्रबोधनकार ठाकरे यांनी व्यासपीठावरील शिवप्रभूंच्या पुतळ्याला वंदन केले. भाषणात प्रबोधनकारांनी ‘ठाकरी’ भाषेत विरोधकांचा समाचार घेतला. ‘‘अरे सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात! मर्दांचं ते काम नव्हे! महाराष्ट्र हा काय लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघाची अवलाद आहे. या वाघाला कुणी डिवचलं तर त्याचा काय परिणाम होईल याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यकाळात पाहायचे असतील तर ते पाहायला मिळतील.’’ तर रामराव आदिक म्हणाले, ‘‘ठाकरे यांनी जे महान काम केलेलं आहे ते तुम्हाला-आम्हाला पटलेलं आहे. पण सरकारला पटवून देण्याची आज गरज आहे. म्हणून आम्हाला ‘शिवसेने’ची स्थापना करावी लागली.’’ प्रा. स. अ. रानडे यांनी ‘‘मराठी माणसांनो व्यापारात मागे राहू नका’’ असे सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ‘‘असं हे दृश्य आहे की जो कोणी येथे आला नसेल तो दुर्दैवीच म्हटला पाहिजे. मला वाटतं महाराज जर येथे असते तर त्यांचं घोडंसुद्धा उधळलं असतं! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ दसर्याच्या दिवशी होणार होता. पण तो लांबला. कारण महाराजांना असं वाटलं असेल की काय उपयोग आहे येऊन या शिवाजी पार्कवर? जेथे माझा मराठी माणूस भेकड, नेभळट, नामर्द झालेला आहे, तिथे पार्कमध्ये भय्ये हिंडताहेत चुरमुरेवाले, खाणारेदेखील उपरेच. म्हणून महाराजांनी ठरवलं असेल की प्रथम हा ‘शिवसेने’चा मेळावा पाहतो, मराठी माणूस जिवंत आहे की नाही ते बघतो आणि तो जिवंत असेल तर मग येतो!
जे आमच्यावर आरोप करताहेत त्यांना मला सांगायचं आहे की जर मराठी माणूस हा जातीयवादी, प्रांतीयवादी, संकुचित मनोवृत्तीचा असता तर सदोबाची ही मुंबई कॉस्मोपोलिटन झालीच नसती. कारण आम्ही विशिष्ट दृष्टिकोनांतून पाहिलं की आपण सगळे भारतीय आहोत. ते मद्रासचे मुख्यमंत्री मद्रास येथे म्हणतात की ज्याला उत्तम तामीळ येतं त्यालाच या राज्यात नोकरी मिळेल. आम्हालाही आमच्या राजकर्त्यांना हेच सांगायचंय की ज्याला उत्तम मराठी येतंय त्यालाच या राज्यात नोकरी मिळेल, हाऊसिंग गाळा मिळेल. होय, मी प्रांतीय आहे, जातीय आहे, संकुचित वृत्तीचा आहे. ‘हिंदी’त आलेल्या फतव्याला केराची टोपली दाखवा हे म्हणणार्या कामराजांनी महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवू नये! महाराष्ट्राला लढल्याशिवाय, झगडल्याशिवाय, बलिदान केल्याशिवाय काही मिळत नाही. काही महाभाग असा आरोप करतात की, ‘शिवसेना’ हे नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतीयतेचं कुंपण घालीत आहात. पण महाराजांच्या बाजूला जे कुंपण आहे ते प्रांतीयतेचं नसून आमच्या श्रद्धेचं आहे.’’
त्यावेळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून आपल्या साथीदारांसह हा पहिला मेळावा पाहण्यासाठी ऐकण्यासाठी शरद पवार हजर होते. लोकसत्ताचे माजी संपादक कुमार केतकर हेही होते. त्याशिवाय कला, क्रीडा आणि साहित्य विश्वातील अनेक मंडळींची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती. त्यानंतर बरेच जण आपापल्या क्षेत्रात दिग्गज झाले. मेळाव्यानंतर दादरमध्ये जी गडबड झाली त्याबद्दल काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या पुढार्यांनी शिवसेनेवर टीकेचा भडिमार केला. पण एकंदरीत त्यामुळे शिवसेनेचा मुंबईभर दरारा निर्माण झाला आणि भक्कम पायाही रोवला गेला.
१ नोव्हेंबर १९६६च्या ‘लोकसत्ता’मध्ये आतल्या पानावर शिवसेनेच्या मेळाव्याची बातमी दिली होती. तिचे शीर्षक होते, ‘विस्कळीत मराठी जनतेला संघटित करणारी शिवसेना.’ शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यानंतर लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी यांनी रविवारची अप्रतिम चिंतनिका लिहून, ‘महाराष्ट्रीयांच्या हृदयाचा खरा मार्ग कोणता’ हे छापले. तर २७ नोव्हेंबर १९६६ च्या ‘मार्मिक’मध्ये मेळाव्यासंबंधीचे व्यवस्थित वर्णन करण्यात आले.
गेल्या ५६ वर्षांच्या इतिहासात काही कारणास्तव फक्त चार-पाच वेळा दसरा मेळावा होऊ शकला नाही. २५ ऑक्टोबर १९७४चा शिवसेनेचा दसरा मेळावा एक तास सतत पाऊस पडत राहिल्यामुळे आवरता घ्यावा लागला. १९९० सालचा दसरा मेळावाही पावसामुळे स्थगित करावा लागला. १९९२ साली देखील प्रचंड पावसामुळे मेळावा रद्द करावा लागला होता. २००६ साली देखील पावसामुळे दसरा मेळावा रद्द झाला. ७०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ८०च्या पूर्वार्धात पंजाबात खलिस्तानवाद्यांनी उच्छाद मांडला होता. शीख व हिंदू यांच्यात बेबनाव झाला होता. शीखांचे हिंदूवर हल्ले वाढत होते. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंच्या बाजूने उभे राहिले. त्यावेळी खलिस्तानवाद्यांच्या हिटलिस्टवर इंदिरा गांधी, झैलसिंग यांच्याबरोबर बाळासाहेबांचेही नाव होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा हा संध्याकाळी न होता दुपारी झाला होता. दोन वेळा दुपारी दसरा मेळावा झाला होता. त्यावेळेसही शिवसैनिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. कोरोनामुळे २०२० आणि २०२१ साली शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकला नाही. परंतु आता कोरोनाचे संकट सरले असल्यामुळे यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा हा दणक्यात होणार आणि तोही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली होणार.
२००३ साली महाबळेश्वरच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांची कार्यकारी प्रमुख म्हणून एकमुखाने निवड झाली होती. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर २०१३ साली शिवसेना कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक मुखाने निवड झाली. याला एकनाथ शिंदेंचाही पाठिंबा होता. कुणी कितीही वल्गना केल्या, कितीही दबाव तंत्राचा वापर केला. तरी दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे होणार आणि तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर होणार. कारण तो त्यांचा हक्कच आहे!