धंद्यात छोट्या प्रॉफिटपेक्षा नेहमी लाँग रनचा विचार करायचा‘ हे तत्त्व पाळूनच मी माझा व्यवसाय वाढवला. आज भारतातील काश्मीर व्यतिरिक्त सर्व राज्यांमध्ये माझा माल जातो. पंजाब दिल्ली मुंबई अहमदाबाद येथे माझ्या मालाला अधिक मागणी आहे. आज मी मोठं ऑफिस किंवा फॅक्टरी सहज टाकू शकतो, पण मी बाहेरून काम करून घेऊन, माझा वेळ रिसर्च आणि डेव्हलपमेंटला देतो. जितका पसारा तुम्ही वाढवाल तितका खर्च वाढत जातो. ते न केल्यानं माझा खर्च नियंत्रित राहून मी कंपन्यांना कमी किमतीत माझा माल पुरवू शकतोय.
– – –
२०१७ च्या जुलै महिन्यात, नोकरी की धंदा हा प्रश्न माझ्या आयुष्यात आला. आणि मी धंद्याची निवड केली. त्याचं झालं असं की ‘एक जुलै २०१७ रोजी भारतात जीएसटी (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) लागू झाला. त्यामुळे तीन महिने माझा धंदा अगदी बंद पडला होता. सरकारी पातळीवर कोणत्या मालावर किती टक्के जीएसटी आकारण्यात येईल हे ठरत नव्हतं. आधीच्या कररचनेत मी बनवत असलेल्या स्टील प्लेट्सवर पाच टक्के रक्कम आकारली जायची, आणि परराज्यातील कंपन्यांनी ‘सी‘ फॉर्म भरून पाठविल्यावर दोन टक्के माफ होऊन ती रक्कम तीन टक्के व्हायची. नवीन जीएसटी कररचनेत, पाच टक्के की अठरा टक्के कर आकारण्यात येईल याबद्दल ग्राहक आणि उद्योजकांना कोणतीही स्पष्टता नव्हती. त्यामुळे तीन महिने माझ्या हातात एकही ऑर्डर आली नाही. वयाच्या अठराव्या वर्षापासून सतत काम करत आलो असल्यामुळे तीन महिने बसून राहणं जिवावर आलं होतं. आमच्या घराण्यात याआधी कुणी धंदा केला नव्हता. मी देखील नोकरी करूनच हळूहळू व्यवसायात जम बसवला होता. पण अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे व्यवसाय सुरू राहील की नाही अशी रोज शंका मनात घोळत होती. धंदा ठप्प झाला म्हणून खर्च थांबत नाही, त्यामुळे आर्थिक घडी राखण्यासाठी नोकरी शोधायला सुरुवात केली. माझ्या अनुभवाच्या जोरावर बंगलोरच्या अॅलेक्झर कंपनीत प्लॅनिंग विभागात जॉबही मिळाला, इतकी वर्षं स्वतःचा उद्योग वाढवला, पण आता पुन्हा नोकरीची वेळ आली. याची मानसिक तयारी करत असतानाच काय आश्चर्य की, जॉइन होण्याच्या दोन दिवस आधी मला एक मोठ्ठी ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर पूर्ण केली, तर मागील तीन महिन्यांचा लॉस भरून निघण्याची चिन्हं दिसत होती. हातातील नोकरी सोडायची रिस्क मी घेतली. त्यानंतर मात्र पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. अगदी लॉकडाऊनमध्ये देखील उत्तम प्रकारे व्यवसाय करू शकलो,‘ समर्थ टूल्स या कंपनीचे मालक, नितीन वायंगणकर त्यांच्या व्यवसाय प्रवासातील टर्निंग पॉईंटबद्दल सांगत होते.
ते बनवत असलेल्या स्टील प्लेटचा वापर नक्की कशासाठी होतो, हा धंदा प्रॉडक्ट मॅनुफॅक्चरिंगचा आहे की अॅक्सेसरी पुरवण्याचा याबद्दल ते म्हणाले, केक, पिझ्झा, औषधे, खेळणी, कपडे… अशा अनेक वस्तूंची पॅकिंग करताना पुठ्ठ्यांचे बॉक्स लागतात. हे बॉक्स बनवण्यासाठी क्राफ्ट पेपर लागतो. क्राफ्ट पेपरला बॉक्सचा आकार देण्यासाठी त्याला विशिष्ट ठिकाणी घडी आणि कट मारावा लागतो, जेणेकरून, घडी घालून त्या कागदाचे गरजेनुसार बॉक्समध्ये रूपांतर करता येईल. त्यासाठी क्राफ्ट पेपर मशीनमधे टाकून वरून अत्यंत वेगाने आणि उच्च दाबाने कटर खाली आणून त्यावर कट्स आणि फोल्डस मारले जातात. या परफेक्ट कटिंग आणि प्रेसिंगसाठी ज्यावर बॉक्सचा सरळ कागद ठेवला जातो तो पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत असणे अपेक्षित असते. तो पृष्ठभाग थोडा जरी उंचसखल झाला तरी त्या जागी आलेला बॉक्स नीट तयार होऊच शकणार नाही. एक मिलिमीटरचे शंभर भाग केले आणि त्यातले एक ते दोन भाग मोजण्यात चूक झाली, तरी बॉक्सची घडी बिघडू शकते, इतकं बारीक काम करावं लागतं. सुरुवातीला भारतातील बॉक्स उत्पादक कंपन्या जर्मनीहून गुळगुळीत प्लेट आयात करत असत. पण भारतातील काही इंजिनिअरींग कंपन्यांनी जर्मन कंपनीच्या तोडीची प्लेट भारतातच बनवून द्यायला सुरुवात केली. या प्लेटनिर्मितीचं काम माझं समर्थ टूल्स करतं.
ही प्लेट स्टेनलेस स्टीलच्या एका सब टाईपची बनवली जाते. त्यासाठी आधी मेटलचे केमिकल अॅनालिसिस करून मग प्लेटचे मटेरियल निश्चित केले जाते. एका प्रकारच्या बॉक्ससाठी एक प्लेट असते. एका प्लेटवर साधारण पाच लाखापर्यंत बॉक्सेस तयार होऊ शकतात. सेकंदाला किमान १५ वेळेला पंच प्लेटवर प्रेस होतो, त्याच वेळेला कागदही पुढे सरकतो, यासाठी प्लेट मटेरियल स्मूथ असण्याबरोबरच स्ट्रेंथ असलेलेही हवे. वरचा पंच, बॉक्स लोगोनुसार बदलावा लागतो पण माझी प्लेट मात्र एकदा खर्च करून दीर्घ काळासाठी वापरता येते, कारण दाब झेलू शकेल, फार काळ टिकेल आणि कंपनीला परवडेल असे स्टेनलेस स्टील वापरून ही प्लेट बनवली जाते. बॉक्सच्या आकारानुसार घाऊक प्रमाणात मी ही प्लेट बनवतो.
आज मी या उद्योगात रमलो असलो तरी, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काही उद्योजकाची नव्हे. माझे वडील बीईएसटीमध्ये कामाला होते. आई, मोठा भाऊ, बहीण आणि मी असा आमचा परिवार. आम्ही प्रभादेवीला चाळीत राहायचो. चाळीत काही गुंड राहत होते, त्यांच्यात आपापसात नेहमीच भांडणे, मारामार्या होत असत. या सर्व वातावरणाचा परिणाम आमच्यावर होऊ नये आणि चांगले संस्कार व्हावेत यासाठी आईने बाबांच्या मागे लागून वडाळ्याच्या बीईएसटी क्वार्टर्समधे रूम घ्यायला लावली. तिथे सगळे सण, सार्वजनिक उत्सव, स्पर्धा, यात बालपण छान सरलं. एम. डी. कॉलेजमधून १९९३ साली मी बारावी पास केली. आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असा निर्णय घेतला, पण इतक्यात एका अनपेक्षित प्रसंगाने करीअरच्या गाडीला ब्रेक लागला.
एके दिवशी वडिलांच्या छातीत अचानक दुखू लागलं, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथल्या डॉक्टर त्रिपाठींनी सांगितलं ‘वडिलांच्या हृदयात चार ब्लॉकेजेस असून, ताबडतोप बायपास करणं आवश्यक आहे.’ उपचाराचा खर्चच साडे पाच ते सहा लाख रुपये इतका येणार होता. १९९३ साली ही रक्कम खूप मोठी होती, ताबडतोब एवढी मोठी रक्कम आणायची कुठून? शेवटी निर्णय घेतला. वडिलांना रिटायर व्हायला एक वर्ष बाकी होतं, त्यानंतर मिळणारी सर्व पुंजी, आगाऊ काढून घेतली. काही धर्मादाय संस्थांकडून मदत घेतली. उपचारानंतर बाबा बरे होऊन घरी आले आणि आम्ही भरून पावलो. आर्थिक धक्का आणि बाबांचं आरोग्य दोन्ही लक्षात घेता, माझ्या शिक्षणाचा भार त्यांच्यावर टाकावासा वाटतं नव्हता. नोकरी करण्याचं ठरवलं. ओळखीने लगेच नोकरीही मिळाली.
रोज कामावर जाताना मी आजूबाजूला नोकरी करून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना पाहत होतो, आपणही शिक्षण आणि काम एकत्र करून आयुष्याला एक चान्स द्यायला हवा, असं वाटलं. एका परिचिताने सांगितलं की साबू सिद्दिकी कॉलेजमध्ये पार्ट टाइम इंजिनिअरिंग करता येतं. मेकॅनिकल ट्रेडला अॅडमिशन घेतलं. कॉलेज संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत असायचं. पुढच्या वर्षी बाबा रिटायर झाले. निवृत्तीनंतर मिळणारे पैसे, आजारपणात आधीच खर्च झाले होते. त्यामुळे त्यांच्यासमोर पण अर्थार्जनासाठी पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहिला होता. तो बाबांनीच सोडवला. बाबा बीईएसटीमध्ये काही काळ वाहन चालवायचे, त्यामुळे त्यांना गाडीची इत्थंभूत माहिती होती. त्यांनी सेकंड हॅण्ड टॅक्सी विकत घ्यायचं ठरवलं. टॅक्सीसाठी ड्रायव्हर ठेवला.
तेव्हा प्रदूषण रोखण्यासाठी सरकार सर्व टॅक्सींना सीएनजी किट लावण्याचे आवाहन करत होते. १९९५ साली सीएनजी किट नुकतेच बाजारात आले होते. मी बाबांच्या मागे लागून, टॅक्सी युनियनमधून लोन काढून हे किट आमच्या टॅक्सीला फिट करून घेतलं. हे करणार्या मुंबईतील पहिल्या दहा गाड्यांमध्ये आमच्या टॅक्सीचा नंबर होता. या योजनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सरकारने हे किट बसविलेल्या पहिल्या पन्नास टॅक्सींना अनुदान देऊन कर्जमाफी दिली. लवकर निर्णय घेतल्याचा फायदा असा झाला.
नोकरी आणि कॉलेजच्यामधे जो वेळ मिळायचा त्यात मी टॅक्सी चालवायला शिकलो. मग डिलाईल रोडला टॅक्सीत गॅस भरायला मी रात्री जाऊ लागलो. गॅस भरून येताना गाडी मुद्दाम रस्त्याच्या कडेने हळू चालवायचो, जेणेकरून कुणीतरी हात दाखवून टॅक्सी थांबवेल आणि मला भाडे मिळेल. एरियातल्या एरियात लहान भाडी मिळायची. तेरा रुपये, पंधरा रुपये ताबडतोब मिळायचे. काही दिवसांनी आणखी उशिरापर्यंत टॅक्सी चालवायला लागलो. आज मागे वळून पाहताना वाटतं की माझ्या व्यावसायिक वृत्तीची बीजं टॅक्सी व्यवसायातच रोवली गेली. घरी बाबांना सांगायचो, गॅस भरायला भरपूर रांग होती, तेवढंच एखादं भाड अधिक सुटायचं. एक दिवस विचार केला. नोकरीत जे पैसे महिनाभर काम करून मिळतात, ते इथे एका आठवड्यात मिळू शकतात. मग बाबांना सांगून मीच टॅक्सी चालवायला लागलो. त्यातून घरी पैसे देऊन आणि माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च भागून हातात पैसे राहू लागले.
टॅक्सीधंद्यात भेटलेली अनेक प्रकारची माणसे, प्रसंग, मला कमी वयात अनुभवसंपन्न करून गेले. सकाळी बरोब्बर आठ वाजता मी टॅक्सी काढायचो. संध्याकाळी घरी येऊन सहा वाजता कॉलेजला निघायचो. साबू सिद्दिकीच्या डिप्लोमामुळे आयुष्यात शिकणं कायम राहिलं, तिथले शिक्षक शिकवायचेही छान. मोरे सर सहज सुंदर पद्धतीनं शिकवत असत, जे सहजपणे डोक्यात शिरायचं. कॉलेज संपल्यावर, कोणाला काही शैक्षणिक, वैयक्तिक अडचणी असतील तर त्या सोडवायला मोरे सर मदत करायचे. ते म्हणायचे, ‘आता जे शिकाल ते तुम्हाला पुढे आयुष्यात उपयोगी पडणार आहे. ही चार वर्ष मेहनत करा, पुढची चाळीस वर्षे तुमची असतील.’ असे शिक्षक लाभल्याने मला शिक्षणात आवड निर्माण झाली. त्यांनी शिकवलेला कोणताही विषय कमीत कमी वेळात समजून घेण्याचा माझा प्रयत्न असायचा. यामुळेच बारावीला ५६ टक्के मिळाले असताना इंजिनिअरींगमधे मात्र कोणताही क्लास न लावता किंवा फार अभ्यास न करताही मला ८६ टक्के मिळाले. शिक्षण पूर्ण झालं.
दीनानाथ कामत यांच्या अँक्यू मॅक्स या चेंबूर येथील कंपनीत क्वालिटी कंट्रोल विभागात मला नोकरी मिळाली. या कंपनीत वुड कटर, प्लास्टिक कटर बनायचे. तयार मालाची गुणवत्ता तपासणे हे माझं काम होतं. काहीतरी नवीन शिकायला मिळतंय म्हणून मी घड्याळाकडे लक्ष न देता, अगदी मन लावून काम करायचो. ही गोष्ट आमचे जनरल मॅनेजर पै साहेबांच्या लक्षात आली. त्यांनी, कंपनीत तयार होणार्या वस्तूंची तांत्रिक माहिती आणि त्यांचा या क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव मला सांगायला सुरुवात केली. या नोकरीत मी साडे तीन हजार रुपये पगारापासून सुरुवात केली होती. चार वर्षात एक एक पायरी चढत मी क्वालिटी कंट्रोल हेड झालो; पण पगार त्या मानाने वाढला नव्हता. म्हणून मग नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. पीएसएन होल्डिंग या कंपनीचा कॉल आला. त्यांना त्यांच्या दमणमधील कारखान्यात क्वालिटी कंट्रोल मॅनेजर हवा होता. पाच हजारावरून एकदम बारा हजार पगार मिळणार होता, म्हणून मी पहिल्यांदाच घरापासून दूर असलेली नोकरी स्वीकारली. समुद्रात सेतू बांधण्यासाठी, पिलर उभा करताना सिमेंट वाहून नेणारे पाईप बनविण्याचे काम ही कंपनी करायची. लोखंडाच्या सळ्या बनविणे, कोटिंग करणे अशी अनेक कामं या कारखान्यात होत असत. या लोखंडाच्या सळ्यांना, पाईपला कुठे बारीक भेग तर पडली नाही ना हे तपासण्याचे काम मी मोठ्या एक्सरे मशीनमध्ये करायचो किंवा हाताखालील कर्मचार्यांकडून करून घ्यायचो.
कंपनीच्या कामगार कॉलनीत घर मिळालं होतं. कंपनीतील काही मुलं व्हॉलीबॉल खेळत असत. मी सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेत शिकलो असल्यामुळे क्रिकेट अंगात भिनलं होतं. तोच फिटनेस व्हॉलीबॉलमधे आजमवायचं ठरवलं. कंपनीच्या टीममधे एक राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होता. त्यामुळे मॅच एकतर्फी होत असे. मी त्याच्या विरुध्द टीममधून प्रॅक्टिस करताना त्याचे स्मॅश अडवायला लागलो. माझी प्रगती पाहून त्याने मला ट्रेंनिग दिलं आणि काही दिवसांनी माझी त्यांच्या टीममधे निवड होऊन मी देशपातळीवर व्यावसायिक कंपन्यांमध्ये खेळल्या जाणार्या व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतभर फिरायला लागलो. कंपनी टीममधे उप कप्तान म्हणून माझी निवड झाली. एक चांगला स्पोर्ट्समन म्हणून मी नावारूपाला येत होतो. एका सराव सामन्यात स्मॅश मारताना मी तोल जाऊन खाली पडलो आणि माझ्या डाव्या गुडघ्याची वाटी सरकली. लगेच मला दमणमधील रुग्णालयात दाखल केले. माझ्यावर जुजबी उपचार केले गेले. तिथून मोठा भाऊ दीपक, भावोजी सूर्यकांत पाटील यांनी गाडी करून मला मुंबईला आणलं.
डॉ. शहा यांनी माझा गुडघा तपासून सांगितलं की पायातील अनेक नसांना मार लागला आहे, रक्त साकाळलं आहे, ऑपरेशन करावे लागेल. पण याचा रिझल्ट काय येईल हे आता सांगणं कठीण आहे. हे ऐकून माझ्या पायातले उरले सुरले त्राण देखील नाहीसे झाले. मी तेव्हा सव्वीस वर्षांचा होतो. ऑपरेशनला खूप घाबरत होतो. मी डॉक्टरांना विनंती केली, तुम्ही दुसरं काही तरी सुचवा. मी जिवाच्या टोकापर्यंत वेदना सहन करायला आणि एक्सरसाइज करायला तयार आहे. त्यांनी मला काही व्यायाम सुचवले, पण त्याआधी सहा महिने मला पूर्ण बेड रेस्ट घ्यायला सांगितली. या सहा महिन्यांत आईने माझी अगदी लहान बाळासारखी काळजी घेतली. मला कंपनीकडून खेळताना दुखापत झाली असल्याने माझा पगार चालू होता, औषधोपचाराचा खर्च देखील कंपनीने केला. सहा महिने आराम केल्यावर गुडघ्यात साकळलेले रक्त इंजेक्शनद्वारे काही सिटिंगमधे काढले. प्रचंड वेदना होत असत. पण एक दिवस आपल्याला आपल्या पायावर चालायचे आहे हा विचार करून त्या सहन केल्या. डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करत कुबड्या घेऊन चालायला सुरुवात केली.
घराजवळची व्यायामशाळा जॉइन केली. लंगडत का होईना पण, हळूहळू कुबड्यांशिवाय चालायला लागलो.
याच दरम्यान आईनं माझ्या लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी चार मुली पाहायचा कार्यक्रम आखला होता. कांदिवलीला पहिली मुलगी पाहायला गेलो, त्यांचं घर रस्त्यापासून थोडं आत असल्यामुळे नेहमीपेक्षा थोडं जास्त चाललो. गुडघ्यावर ताण आला, पण चेहर्यावरचं हसू कायम ठेवतं, वेदना आतल्याआत सहन केल्या. त्या दिवशी पाहिलेली पहिलीच मुलगी मला पसंत पडली आणि सुषमा नाईक या त्या मुलीने देखील तिला दाखवलेल्या पहिल्या मुलाला, म्हणजे मला पसंत केलं. लग्न ठरवून मी पुन्हा कंपनीत रुजू झालो, पण लग्नानंतर दमणला राहून चालणार नव्हतं. मग मुंबईत नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. बायकोच्या पायगुणामुळे मालाडला कमांडर कंपनीत लगेच नोकरी मिळाली. ती नोकरी सुरू असतानाच ईस्टर्न स्टील कंपनीतून कॉल आला. बॉक्ससाठी लागणार्या गुळगुळीत प्लेट्सची निर्मिती ते करायचे. अँक्यू मॅक्स या माझ्या पहिल्या कंपनीचे मालक दिनकर कामत यांच्या भावांची, सुभाष कामत, गणेश कामत यांची ही कंपनी होती. त्यांनी माझे काम पाहिले होते. मी मुंबईला पुन्हा आलो आहे हे कळताच त्यांनी मला त्यांच्या कंपनीत नोकरीची ऑफर दिली. कंपनी चेंबूरला होती. मालाडपेक्षा घरापासून जवळ आणि प्रोडक्शन सुपरवायजर हे आवडीचे काम यामुळे मी ही नोकरी स्वीकारली.
सुभाष कामत स्वतः मशीन बनवायचे. ऑटोमेशन करायचे, हे स्किलफुल काम असतं. दुर्दैवाने त्यांना पुढे कर्करोगाचे निदान झालं. आपल्याकडे फार वेळ नाही हे कळल्यावरही, त्यांनी कामावर परिणाम होऊ दिला नाही. माझं कारखान्यातील काम संध्याकाळी पाच वाजता संपल्यावर ते मला घरी बोलावत असत. चार महिने मी रोज त्यांच्याकडे जात होतो. या चार महिन्यात त्यांनी मला ऑटोमेशन शिकवलं. मीही उत्साहाने भरभर शिकत होतो. कुठे कुठला फॉर्म्युला वापरावा, किती व्हायब्रेशन किती स्ट्रेन अशा टेक्निकल गोष्टी कळत होत्या. पुढे काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. त्यांच्या या शिकवणीचा मला पुढील वाटचालीत खूप उपयोग झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू गणेश कामत यांनी कंपनीची धुरा हाती घेतली.मी ऑटोमेशनचे धडे घेत असल्याचं त्यांना माहित होत. गणेश कामत आणि मी शारदाश्रमचे विद्यार्थी, त्यामुळे एक आपुलकी होतीच. त्यांनी माझ्यावर अधिक जबाबदारी सोपवली, दीड वर्षातच मी प्रॉडक्शन इन्चार्ज झालो. चाचणी म्हणून त्यांनी एक मशीन मला बनवायला दिली. मशीन तयार करून देण्याची एक तारीख द्यावी लागते. दोन आठवडे, तीन आठवडे असं मोघम न सांगता एका निश्चित तारखेला मशीन सुपूर्द करायची असते. अमुक एका तारखेपर्यंत मशीन तयार करून देशील का, असे त्यांनी विचारले. मी हो म्हटले आणि कामाला लागलो. पंधरा लाखांची मशीन मी बारा लाखात तर बनवून दिलीच, पुन्हा ठरलेल्या दिवसाच्या आठवडाभर आधीच मशीन त्यांच्या हाती सोपवली. त्यामुळे खुश होऊन त्यांनी मला आणि माझ्या टीमला बोनस देऊ केला. या कामामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
हा आत्मविश्वास कामात महत्त्वाचा असतो. आपल्या नियोजनानुसार काम होते आहे का, हे पाहून मॅनपॉवर, मटेरियल, गुणवत्ता अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवून एकेक टप्पा गाठावा लागतो, या सर्व जबाबदार्या पेलताना यशापयशाची जबाबदारी देखील आपल्यालाच घ्यावी लागते. एका यशस्वी प्रोजेक्टनंतर मिळणारा आत्मविश्वास आणि अयशस्वी प्रोजेक्टनंतर मिळणारा अनुभव हे दोन्ही मोलाचे असतात.
या चाचणीनंतर मी सात मशीन बनवल्या. सगळ्या उत्तम काम करत होत्या. यापुढे आपणच स्वतः मशीन बनवून बिझनेस करावा का, असा विचार मनात आला. अगदी लगेच नोकरी सोडायची नाही पण आऊटसोर्सिंग करून छोट्या ऑर्डर्स आपण पूर्ण करू शकतो, असं वाटायला लागलं. आपले क्लायंट कोण असतील हा विचार सगळ्यात पहिल्यांदा मनात आला. ज्या कंपनीत काम करत होतो तिचे क्लायंट पळवणे अनैतिक ठरले असते, ते मला करायचे नव्हते. माझा धंदा मला प्रामाणिकपणे करायचा होता. बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणार्या देशभरातील सर्व कंपन्यांची यादी जमवायला सुरुवात केली. या कामात गुगलची खूप मदत झाली. एक तक्ताच बनवला. त्यातील माझ्या धंद्याच्या दृष्टीने योग्य वाटलेल्या कंपन्यांशी मी संपर्क साधायला सुरुवात केली. बर्याच जणांनी कंपनीचा ठावठिकाणा नसलेल्या माझ्यासारख्या नवीन मुलावर विश्वास ठेवायला नकार दिला. पण मी धीर सोडला नाही. अनेक ठिकाणी फोन करत होतो. एक दिवस एका कंपनीने एक लहान ऑर्डर दिली. ती पूर्ण करून दिल्यावर दुसरी, मग तिसरी… असा सिलसिला सुरू झाला. मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी दरात आणि तेही कमी वेळेत काम पूर्ण करून देणं, हे माझं यूएसपी ठरलं.
धंद्यात हळूहळू जम बसत होता. नोकरीपेक्षाही कमी वेळ देऊन पगारापेक्षा अधिक पैसे मी यातून कमावत होतो. तेव्हा विचार केला की नोकरी सोडून आपण स्वतःचाच पूर्णवेळ धंदा का सुरू करू नये? पण हा निर्णय सोपा नव्हता, नोकरीत एक प्रकारच ग्लॅमर असतं, तुम्ही बोललेला शब्द झेलायला चार माणसं उभी असतात. जितक्या वरच्या पदावर जाल तितक्या कंपनीकडून मिळणार्या सोयीसुविधा वाढत जातात. कामावरून सुटल्यावर मिळणारा वेळ तुमचा हक्काचा असतो. पण तुम्ही धंद्यात उतरता तेव्हा कोणत्याही वेळी व्यवसायाशी संबंधित कोणतेही काम करण्याची तयारी असली पाहिजे. धंद्यात उतरायचा विचार पक्का झाला, तेव्हा बोनससकट वर्षभराच्या पगाराएवढे पैसे बायकोकडे सोपवले आणि सांगितलं की यापुढे एक वर्ष मी बिझनेस करणार आहे. तेराव्या महिन्यात अयशस्वी झालो तर पुन्हा नोकरी करीन. तोपर्यंत घरखर्चासाठी हे पैसे तुझ्याकडे असू देत. तिने या निर्णयाला पाठिंबा दिला. कंपनीत राजीनामा दिला आणि माझी धंद्याची गाडी वेगानं सुटली. स्टील प्लेट बनवण्यासाठी फर्नेस भट्टी लागते. प्लेट बनवण्यासाठी लागणारे मटेरियल फरनेसमध्ये वितळवून मग त्यावर कूलिंग, हार्डनिंग, टेम्परिंग अशा प्रक्रिया कराव्या लागतात. या सगळ्यासाठी मोठ्या प्लांटची गरज असते. यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते, पण भांडवल माझ्याकडे नव्हतं. म्हणून मी कामे आऊटसोर्स करायला सुरुवात केली. छोट्या मोठ्या ऑर्डर पूर्ण करत होतो.
एक दिवस अचानक शंभर प्लेट्सची मोठी ऑर्डर मिळाली, पण मटेरियल घेण्यासाठी सुमारे साडेसात लाख रुपये लागणार होते, ते माझ्याकडे नव्हते. हिरको टूल्स कंपनीचे मालक दिपक मकाती हे माझे आधीचे मालक सुभाष कामत यांचे मित्र होते, कामाच्या निमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. ते म्हणाले, ‘तू कशाला चिंता करतोस, गोल देवळाजवळ स्टील मार्वेâटमध्ये प्रशांतकडे जा आणि त्याला माझं नाव सांग, तुझे काम होऊन जाईल.‘ प्रशांत यांनी, दीपकभाऊंच्या क्रेडिटवर मला मटेरियल दिले. माझे काम उत्तमरीत्या करून मी ऑर्डर पूर्ण केली. पेमेंट हातात आल्यावर, वेळेआधीच मालाचे पैसे चुकते केले. मकाती साहेबांना हे कळल्यावर ते म्हणाले, ‘तुझा प्रामाणिकपणा असाच कायम ठेव. कधीही समोरच्या माणसाचे पाच पैशाचेही नुकसान करू नकोस. धंद्यात छाेट्या प्रॉफिटपेक्षा नेहमी लाँग रनचा विचार करायचा‘ हे तत्त्व पाळूनच मी व्यवसाय वाढवला. आज भारतातील काश्मीरव्यतिरिक्त सर्व राज्यांमध्ये माझा माल जातो. पंजाब, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथे माझ्या मालाला अधिक मागणी आहे. आज मी मोठं ऑफिस किंवा फॅक्टरी सहज टाकू शकतो, पण मी बाहेरून काम करून घेतो आणि माझा वेळ रिसर्च आणि डेव्हलपमेंटला देतो. जितका पसारा वाढवाल तितका खर्च वाढत जातो. ते न केल्यानं माझा खर्च नियंत्रित राहून मी कंपन्यांना कमी किमतीत माल पुरवू शकतोय. मी म्हणेन की मराठी मुलांनी धंद्यात यायलाच पाहिजे. आयुष्यातील तीन वर्षे धंदा सेट होण्यासाठी द्या. तुम्ही कुठलाही धंदा उभा करू शकता. तुमचा नॉलेज बेस पक्का हवा आणि अपडेट राहण्याची तयारी हवी.‘
प्रत्येक माणसाला आपली आर्थिक व सामाजिक स्थिती पाहूनच नोकरी की धंदा ही निवड करावी लागते. त्यातही पहिल्या पिढीतील व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. धंद्यात उतरल्यावर सुरुवातीच्या काही वर्षांत सामोरं येणार्या प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच शोधावी लागतात. अनुभव, भांडवल, मार्गदर्शन यासाठी त्यांना आधीच्या पिढीकडे जाता येत नाही. एकवेळ व्यवसायात उतरणं सोपं आहे, पण तो टिकवणं कठीण आहे. बॉक्स निर्मिती क्षेत्राला प्लेट्स पुरवताना, नितीनला मोठमोठ्या कंपन्यांकडून येणार्या आव्हानांचा मुकाबला रोज करावा लागतो, त्याचा सामना करताना ‘आउट ऑफ द बॉक्स‘ शक्कल लढवून ते आव्हान परतवून लावता येऊ शकतं हे नितीन वायंगणकर या मराठी तरुणाने दाखवून दिलं आहे.