गणेशोत्सवात ‘गणा धाव रे, मला पाव रे’, नवरात्रात ‘तारा विना श्याम, एक मन लागे’ तर शिमग्यात काय?
– विलास खंदारे
तुका शिवीगाळ, तरी तू माका पाव रे.
चांदणं असूनसुद्धा रात्र काळी काळी केव्हा वाटते?
– अभय होंबळकर, येडूर, ता. चिकोडी, जि. बेळगाव
सोबत कुणी नसेल तेव्हा.
‘गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि होणार नाही’ अशा चित्रपटासंबंधीच्या प्रश्नाच्या उत्तरात ‘असा एकही चित्रपट नाही’ असे आपण म्हटले आहे. आचार्य अत्रे यांचाच राष्ट्रपती पारितोषिक विजेता ‘श्यामची आई’ विसरलात का?
– अनिल रा. तोरणे (तळेगाव दाभाडे)
१० हजार वर्षांत असे अनेक सिनेमे झाले, पण असा होणार नाही असा नाहीयेय तो.
गणेशोत्सवाचं सध्याचं स्वरूप पाहून लोकमान्य टिळकांना काय वाटत असेल?
– राजन वाघोलीकर, अकोला
त्यांना नक्की वाटत असेल की याचसाठी केला होता अट्टाहास.
या गणेशोत्सवात तुम्ही किती घरगुती आणि किती सार्वजनिक मंडळांना भेट दिली?
– चैत्रा वाईरकर, वाशिम
मी नाही जात असा.
पुण्यातील विसर्जनाची मिरवणूक दुसर्या, तिसर्या दिवसापर्यंत चालत असेल, तर मग विसर्जनाच्या मुहूर्तांना अर्थ काय?
– माया सोनावणे, चिंचवड
या धर्माचा बाजार मांडून राजकारण चालू आहे हे कधी लक्षात येईल आपल्या? धर्म म्हणजे आमच्या देशात आम्ही काहीही करू.. आम्हाला कोण रोखणार असा अर्थ नाही… त्यातली जबाबदारी ओळखा आता तरी… आणि पुण्यासारख्या विद्यानगरीत आणि सुसंस्कृत शहरात असा उन्माद काय दर्शवतो याचा विचार करा आणि कृती करा.
मराठी नाटकाच्या मध्यंतरातले प्रेक्षकांचे लाडके पदार्थ म्हणजे वडा पाव आणि सामोसा. तुम्हाला यातला कोणता पदार्थ आवडतो आणि तो सगळ्यात बेस्ट कोणत्या नाट्यगृहात मिळतो?
– चिंतामणी रानडे, गिरगाव
एक तर मला हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. पण तरीही वडापाव मला आवडतो. शिवाजी मंदिरचा वडा बेस्ट आहे.
तुमचा नाटक-सिनेमाचा व्यवसाय बेभरवशाचा आणि अत्यंत अनियमित. पण, तुम्ही एकदम फिट दिसता? काय करता त्यासाठी? आम्हालाही टिप द्या फिटनेसची.
– शौनक पाटील, तासगाव
असं काही नाहीयेय… सगळेच धंदे आता अनियमित झालेत… पण यावेळी खूप खाणे टाळतो… शक्यतो जेवायच्या वेळा चुकवत नाही… आणि कितीही काम असलं तरीही ते पाळता येऊ शकतं…
इकडून चंद्रावर दुर्बीण लावून पाहिलं की खड्डे दिसतात म्हणे; पण चंद्रावरून दुर्बीण लावून आमच्या डोंबिवलीकडे, शीळ फाट्याकडे पाहिले, तरी तेवढेच खड्डे दिसतील… मग इथे राहिलेलं बरं की तिकडे शिफ्ट होऊ?
– संतोष गायकवाड, डोंबिवली
तिकडे बरी परिस्थिती असेल बहुतेक… किमान त्यांचे नैसर्गिक तरी आहेत.
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं का म्हणतात?
– तारकनाथ सावंत, सांताक्रूझ
कारण आपल्याकडे तपासामध्ये त्रुटी ठेवणारी व्यवस्था आहे. आणि तारीख पे तारीख असते म्हणून.
बायकोची चूक असते, तेव्हाही ती बरोबर असते आणि नवरा बरोबर असतो, तेव्हाही तो चूकच असतो… असं का?
– रॉबी डिकास्टा, नालासोपारा
संसाराच्या सगळ्या दोर्या तिच्या हातात आहेत म्हणून.
गणपती ही बुद्धीची देवता आहे, असं म्हणतात… मग ती डॉल्बी, ढोल पथकं यांचा कान फोडणारा दणदणाट करू नका, अशी बुद्धी भक्तांना का देत नसेल?
– विश्वास मणेरीकर, नाना पेठ, पुणे
पण गणपतीला हे आवडत नाही हे तुम्हाला कुणी सांगितलं… तुम्हाला त्रास होतोय, गणपतीला नाही.
तुमचं स्टेट बँक अकाऊंट बंद करण्यात आलं आहे, असा मेसेज कोणी भामटा मोबाइलवर पाठवतो, तेव्हा ज्याचं अकाऊंट त्या बँकेत नसतं, असा माणूसही मेसेजखाली दिलेली लिंक क्लिक करून आपल्या अकाऊंटवर दरोडा का पाडून घेतो?
– श्रीकांत पटोले, नागपूर
भीती आणि अज्ञान.