कोरोनाच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांचं संयमी नेतृत्व सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. असा कुटुंबप्रमुख जो मुंबईला दुभती गाय नाही तर आपला परिवार मानतो, तोच सामान्य मुंबईकारांना हवा आहे. उद्धवजींचं ह्या नेतृत्वाचं गारुड हे सामान्य मराठीजनांवर होतंच, पण करोनाकाळात ह्या बहुभाषिक शहराची सेवा केल्यामुळे इतर भाषिकही सेनेचे मुरीद झाले आहेत. सदा वणवण करणारे बंडखोर आणि जुमलासम्राटांना ह्याच नवनिष्ठवानांची भीती भेडसावत आहे. आणि म्हणूनच कधी धर्माचं भय दाखवून तर कधी बडबोले भैय्यांकडून खोटे आरोप करवून ही निष्ठेची धार बोथट करायचे प्रयत्न चालू आहेत. पण उध्दवजींच्याच भाषेत ज्या अमंगलमूर्तींनी सणाचं राजकारण केलं त्यांचं मतदार दिवाळं वाजवल्याशिवाय राहणार नाहीत.
– – –
उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि जर हे पाणी ईडी, केंद्रीय यंत्रणा, खोके देऊन विकत घेतेलेले लोकप्रतिनिधी आणि विरोधकांचं अटक सत्र असे नानाविध दगड टाकून सत्तेतील डोमकावळ्यांनी वर आणलेलं असेल तर मग बोलायची सोय नाही… असाच खळखळाट नुकताच ऐकू आला… मुंबई महानगरपालिकेत १५० जागा जिंकू, अशी हास्यास्पद वल्गना एका डेप्युटी जुमलासम्राटाने काही दिवसापूर्वी केली… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अशी राणा भीमदेवी थाटाची गर्जना करण्याची ही पहिली वेळ नाही. असंच काही तरी ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी सुद्धा बरळले होते. पण, बंगालच्या जनतेने दिल्लीतून झालेलं हे आक्रमण मुळापासून उपटून फेकून दिलं आणि बंगालच्या वाघिणीची पाठराखण केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भरघोस मतांनी पुन्हा निवडून दिले… महाराष्ट्रातही मराठीजन या दांडगटांच्या अरेरावीला मतपेटीतून उत्तर देतील आणि शिवसेनेच्या वाघाचीच पाठराखण करतील, याची खात्री आहे.
ही वेळ नक्कीच वेगळी आहे. वेगळी अनेक कारणांकरिता आहे. शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आणि १२ खासदार ईडीच्या भयापोटी आणि सत्तेच्या, पैशाच्या लालसेपोटी भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. याचा सोयीस्कर अर्थ भाजपावाल्यांनी काढला आहे. काही लोक भिऊन आपल्याकडे आले म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेच्या महासमरासाठी जणू ‘खरी’ शिवसेनाच आपल्या ताटाखाली आली, असा भ्रम या इव्हेंटबाज पक्षाला आणि त्यांच्या मुखंडांना झाला आहे. ही ती जमात आहे जी आऊटडोअर पब्लिसिटीला जनसमर्थन मानते. ज्या पक्षप्रमुखाने इभ्रत, इज्जत, ऐपत आणि मानाचे पद दिले अशा शिवसेना पक्षप्रमुखांच्या, उद्धव ठाकरेंच्या फोटोशिवाय गुवाहाटीच्या पळपुट्यांनी लावलेले ‘ड्युप्लिकेट शिवसेने’चे बॅनर गणेशोत्सवात या महानगरानेच नाही तर महाराष्ट्रभरात झळकलेले मराठीजनांनी पाहिले आहेत. जिथे सर्वोच्च न्यायालयाने खुद्द निवडणूक आयोगाला जैसे थे स्थिती ठेवायला सांगितली आहे, तिथे ह्या बंडखोरांच्या मनात भविष्यात सदा वणवण करत फिरण्याची धास्ती दाटलेली आहे. त्यामुळे, खोक्यांमधला दौलतजादा करून जनतेच्या नव्हे, कमळीच्या आशीर्वादाने आपल्या मनातल्या काल्पनिक शिवसेनेच्या गाजराची पुंगी ते वाजवत आहेत. चार दिन की चांदनी म्हणूनच हे फलक आणि फ्लेक्स सगळीकडे लावले गेले आहेत.
हे डिवचणे कमी होते म्हणून की काय कमळाबाईंच्या पक्षाने ‘आता’ हिंदू मोकळेपणाने आपले सण साजरे करु शकतील, अशा आशयाचे फलक देखील बेस्ट बसेसवर लावले आणि त्या बस विद्रूप केल्या. जणू काही शिवसेनेतील इमानदार आमदार, एनसीपी आणि काँग्रेसचे नेते हे कमळाबाईंनी जिथून हाफचड्डी आणली, त्या इटलीतच पैदा झाले होते आणि समस्त हिंदू ईश्वरसत्तेची धुरा साक्षात परमेश्वराने ह्या भामट्यांनाच बहाल केली आहे.
शिवसेनेतील तोतयांचे बंड घडवले गेले, तेव्हाच हे स्पष्ट झाले आहे की ह्या १५० जागा जिंकण्याच्या वल्गनेमागे शिवेसेनेची दोन शकलं पाडून मुंबईवर अधिराज्य प्रस्थापित करणं एवढाच मानस आहे. शहाशाहीने लोकशाहीमध्ये असा मानस ठेवायला काहीच हरकत नाही. पण, त्याआधी जमिनीवरची स्थिती आणि ह्या मुंबई मुलखाच्या इतिहासाची जरा उजळणी केली तर बरं. ती करवून घेण्यासाठीच नारदाचा हा लेखप्रपंच.
मुंबईकरांच्या गटर, वॉटर आणि मीटरच्या समस्या सोडवणार्या बीएमसीवर इतकी वर्षे शिवसेनेचा कब्जा का राहिला आहे, हे वल्गनाबाजांनी समजून घेतलं पाहिजे. ते काही रॉकेट सायन्स नाही. सेनेच्या यशामागे आणि युतीतील भाजपाच्या यशामागे सर्वात महत्त्वाचा दुवा कोणता आहे? तो आहे सेनेचा कडवा, कट्टर, सर्वसामान्य शिवसैनिक. निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. कमळीबाईसारखं निवडणुका जिंकल्यावर लोकसेवेत रुजू होण्याऐवजी पुढच्या निवडणूक प्रचाराचा नट्टा-पट्टा वेणीफेणी करणारा शिवसैनिक नाही. निवडणूक असो वा नसो, लोकोपयोगी कामांचा रतीब हा शिवसेनेच्या शाखेमधून कायम वाहत असतो. ह्यात शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख हे भाग असतात, पण ते निमित्तमात्र. अशा परिस्थितीत कार्यकुशलतेमुळे किंवा पक्षनिष्ठेमुळे एखादा शिवसैनिक पुढे जाऊन लोकप्रतिनिधी झाला तरी सामान्य शिवसैनिक हा त्यांचा प्राणवायु असतो. आणि म्हणूनच खोके घेऊन आणि धोके देऊन निष्ठा विकत घेता येत नाही. गेल्या दोन दशकांमध्ये शिवसेनेने या चिरकुटांपेक्षा सर्वार्थाने बडे बंडवाले पाहिले, पचवले. पक्ष फोडू पाहणार्या अनेक बंडाळ्या झेलूनसुद्धा पक्ष मजबूत उभा आहे, तो शिवसेनेच्या त्या आधारस्तंभांमुळे… शिवसैनिकांमध्ये.
शिवसेनेत घडलेल्या उलथापालथींवर, गद्दारीवर, विश्वासघातावर उद्धवजींच्या आवाहनामुळे शिवसैनिकांनी अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांनी ही भळभळती जखम काळजात जपली आहे. हे वाघ आणि शिवसेनेने जातधर्मप्रांत न पाहता संकटसमयी केलेल्या कार्याची माहिती असलेला सर्वसामान्य मुंबईकर हे ही मुंबाआई डेप्युटी जुमलासम्राटाला आंदण देणार नाही. कोरोनाच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांचं संयमी नेतृत्व सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. असा कुटुंबप्रमुख जो मुंबईला दुभती गाय नाही तर आपला परिवार मानतो, तोच सामान्य मुंबईकारांना हवा आहे. उद्धवजींचं ह्या नेतृत्वाचं गारुड हे सामान्य मराठीजनांवर होतंच, पण करोनाकाळात ह्या बहुभाषिक शहराची सेवा केल्यामुळे इतर भाषिकही सेनेचे मुरीद झाले आहेत. सदा वणवण करणारे बंडखोर आणि जुमलासम्राटांना ह्याच नवनिष्ठावानांची भीती भेडसावत आहे. आणि म्हणूनच कधी धर्माचं भय दाखवून तर कधी बडबोले भैय्यांकडून खोटे आरोप करवून ही निष्ठेची धार बोथट करायचे प्रयत्न चालू आहेत. पण उध्दवजींच्याच भाषेत ज्या अमंगलमूर्तींनी सणाचं राजकारण केलं त्यांचं मतदार दिवाळं वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. पण लोकमान्य महाविकास आघाडी सरकाराच्या जागेवर कमळीने अवघड जागी ऑपरेशन करून आणलेलं हे तोतयांचं सरकार ना कोणाला रुचलं आहे ना कोणाला पचलं आहे.
उसनं अवसान घेऊन मुंबईत या गर्जना म्हणणारे भाजपानेते अंतर्गत सुंदोपसुंदीने त्रस्त आहेत. पण पक्षातील अंतर्गत खदखदीचं अवघड जागेचं दुखणं कोणाला सांगावं असं झालं आहे. काही दिवसांपूर्वीच संसदीय बोर्डाच्या नेमणुका झाल्या. काँग्रेसला पक्षअंतर्गत लोकशाहीची शिकवण देणार्यांनी आपल्या पक्षात संसदीय बोर्ड कसे निवडले गेले, याची काहीच वाच्यता केली नाही. २०२४मध्ये आजच्या पंतप्रधानांना आव्हान देऊ शकतील अशा सगळ्या नेत्यांचे पंख कापण्याचा उद्योग या संसदीय बोर्डात करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, योगी आदित्यनाथ, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासारखे अनेक धुरीण ह्या कटाला बळी पडले आहेत. ज्या महाराष्ट्रात जबरदस्तीने सत्ता आणून आता मुंबई जिंकण्याची स्वप्नं हे पाहात आहेत, त्या महाराष्ट्राचा एकही नेता पक्षाच्या संसदीय बोर्डात नाही. ह्याची नोंद इथला मतदार घेतल्यावाचून राहणार नाही. शिंदे सरकार म्हणते की आम्ही आल्यामुळे मुंबई मेट्रो तीनला गती मिळेल आणि आम्ही ती वेळेत पूर्ण करुन देऊ. राज्य सरकार कांजुरमार्गला कारशेड बांधेल म्हणून हा प्रकल्प लटकवणारे हे लोक आहेत. न्यायलयात कायम राज्य सरकारच्या विरोधात प्रतिवाद करुन अडीच वर्ष हा प्रकल्प यांनीच लटकवला होता. आंतराष्ट्रीय व्यापार केंद्र देशाच्या आर्थिक राजधानीमधुन गुजरातला हलवणारे आणि मुंबईसाठी बिनकामाची आणि अवाढव्य खर्चाची बुलेट ट्रेन मुंबईकरांच्या माथी मारणारेही हेच लोक आहेत.
हे विसरून मुंबईकर केवळ बॅनरबाजीने हुरळून जाईल का? संत तुकाराम महाराजांच्या शब्दांत का रे भुललासी वरलीया रंगा, असे त्यांच्या बाबतीत म्हणायची वेळ येईल का? दीडशे जागा जिंकणं तर लांबच राहिलं, शिवसैनिकांच्या मदतीशिवाय मागचं यश जरी हे टिकवू शकले तरी ती फार मोठ कामगिरी ठरेल.
पूर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर असलेला कोस्टल रोड असो, मुंबईत करोनावरची उपाययोजना असो, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेले उपाय असो; शिवसेनेने केलेले काम हे लोकांसमोर आहे. ह्यासमोर छातीठोक दावे आणि शब्दांचा धुरळा तो काय कामाचा.
आणखी एक महत्वाचा मुद्दा. आधी नमूद केल्याप्रमाणे शिवसेनेला बहुभाषिक समर्थन मिळत आहे हे पाहून मराठीचे नवशिलेदार बनून मराठीजनांना आशिष आणि आशीर्वचन द्यायला अनेक येत आहेत. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये हे पोस्टरचा भडिमार करतील, सणासुदींवर गडगंज खर्च सुद्धा होईल. पण ज्यांना आपल्या निवडणूक समितीत मराठीजन खुपतात ते मराठीचे पाठीराखे कसे होतील हा विचार सगळ्यांनी करण्याजोगा आहे. दिवस निवडणुकीचे आहेत आणि म्हणून वाघाचं कातडं पांघरुन अनेक अस्वलं फिरताना दिसतील. मराठीजनांना त्यांच हीत चांगलं कळतं पण नारदाचं काम हे कळी लावणं नाही तर अघटीत होऊ नये ह्यासाठी सतर्क करणं हे देखील आहे.
कोर्टाने, निवडणूक आयोगाने कोणीच शिक्कामोर्तब करण्याआगोदर सेना-भाजपायुती परस्पर घोषित करण्यात आलेली आहे. हे म्हणजे बोलणी नाही झाली आणि साखरपुड्याची तारीख सांगण्यासारखं आहे. हा माज, ही अगतिकता, ही लगीनघाई, ही आकसाची कारवाई सगळी मुंबई जिंकण्यासाठी आहे. पण मुंबईचा किंग कोण हे इथली जनता चांगलीच जाणते. ठाकरे परिवार आणि सेना हे समीकरण काही खोके आणि असंख्य धोके बदलू शकत नाही. आणि म्हणून हवेत दीडशेचा आकडा टाकायला हे काय प्लेवीनच्या लॉटरीचं खेळणं नाही. ही मुंबई आहे आणि ही जसं सगळ्यांना सामावते तसंच तिच्या मुळावर आलेल्यांना खाशाबा जाधव स्टाईलमध्ये धोबीपछाड देणंही जाणते. ह्या मुंबईने यशवंतराव चव्हाण ह्यांचा हातचा मंगलकलश महाराष्ट्रधर्म पुढे न्यायला स्विकारला आहे. हा दीडशे जागांचा करपट ढेकर पचवणं ती चांगली जाणते.