मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं नीच कारस्थान पुन्हा एकदा आकाराला येतं आहे. मुंबई महाराष्ट्राची नव्हतीच, असा दावाही त्यासाठी पढीक पंडितांकरवी केला जातो आहे… हा खेळ महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या निर्मितीच्या वेळीही खेळला गेला होता. तेव्हा मुंबई महाराष्ट्राचीच आहे, हे सप्रमाण सिद्ध करणारे टिपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजीतून ‘महाराष्ट्र आणि मुंबई’ हे टिपण लिहिले होते. त्या टिपणाचा अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केला आहे. प्रत्येक मराठी माणसाने बाबासाहेबांचे हे युक्तिवाद समजून घेतले पाहिजेत, म्हणून ही लेखमाला… आज भाग पहिला.
– – –
मुंबई शहर महाराष्ट्रात सामील करावे की नाही यावर भाषावार प्रांतरचना आयोगाच्या निर्मितीनंतर आणखी बारा वर्षे जावी लागली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे (आणि आणखी अनेक नावे- ज्यात निपाणी बेळगाव, भालकी, बिदर…) या मागणीभोवती एक झंझावाती आंदोलन उभे राहिले होते.
अमोने महागुजरात जोईये म्हणत गुजराती लोकांनीही असेच एक आंदोलन उभे केले होते. द्विभाषक बॉम्बे प्रेसिडन्सीचे विभाजन मराठी भाषकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषकांचा गुजरात असे व्हावे असे दोन्ही लोकांना मान्य होते. पण मुंबई हा गुजरातच्या भूभागाचा भाग नसूनही गुजराती व्यापारी आणि त्यांच्या सोबतच्या हितसंबंधीयांनी गुजरातला मुंबई हवी अशीही मागणी रेटली होती. मोरारजी देसाई आणि असे अनेक गुजराती राजकारणी, व्यापारी तसेच प्रशासकीय अधिकारी या मागणीला साथ देत होते. पंडित नेहरू मुंबई स्वतंत्र असावी अशा मताचे असल्यामुळे हे शहर महाराष्ट्राला देण्यात चालढकल करत होते. यशवंतराव चव्हाणांसारखे नेतेसुद्धा पक्षश्रेष्ठींपुढे दबून ही मागणी लावून धरत नव्हते. पण आचार्य अत्र्यांची लेखणी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाचा जोर, या आंदोलनाला मिळालेला लोकाधार यामुळे आणि अखेर १०६ हुतात्म्यांची आहुती पडल्यानंतर १ मे १९६० रोजी मुंबई हे बंदराचे शहर, आर्थिक राजधानीचे शहर अखेर महाराष्ट्राचा भाग बनून महाराष्ट्र या मराठी भाषक राज्याची निर्मिती झाली. मुंबईची मागणी करणार्या गुजराती श्रेष्ठींचा पराभव होऊन त्याच दिवशी मुंबईशिवाय गुजरात राज्याचीही निर्मिती झाली, हा ढोबळ इतिहास अनेकांना, विशेषतः आता साठीपार ज्येष्ठ असलेल्या लोकांना माहीत असतो. तरुणांना त्याचा तसा थेट स्पर्श झाला नसल्यामुळे त्यांना हे बव्हंशी माहीत नसते. बारकावे तर अनेकांना माहीत नसतात.
सध्या मुंबई स्वतंत्र शहर करावे, प्रशासकीयदृष्ट्या ते सोयीचे होईल वगैरे १९४८मध्ये झालेलेच युक्तिवाद कधी चोरटेपणाने तर कधी भर मैदानात धमकावणीच्या सुरांखालील अंतःप्रवाहातून पुढे येत आहेत. काही माजी आयएएस अधिकारीही यासंदर्भात दिशाभूल करणारे लेख लिहीत आहेत. याच मस्तीतून महाराष्ट्राच्या प्रादेशिक पक्षाला संपवण्याची उद्धट भाषा सुरू आहे. शिवसेनेसारख्या मराठी भाषकांच्या हितरक्षणासाठी निर्माण झालेल्या जुन्या लढाऊ प्रादेशिक पक्षाचे, पैशाने किंवा सत्तेने विकत घेतले गेलेले लोक कळत-नकळत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे काढू पाहाणार्यांच्या कारस्थानांकडे डोळेझाक करत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर, भाषावार प्रांतरचना आयोगाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलेल्या टिपणातील मुंबईसंबंधी काही महत्त्वाची निरीक्षणे आपण मनात कोरून ठेवली पाहिजेत. हे मूळ इंग्रजी टिपण फार महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्याचा अनुवाद मी मराठीतून केला आहे. ते एक विस्तृत टिपण आहे. पण सध्याचा दबलेला संघर्ष हातघाईवर येण्याआधीच आपण निदान महत्त्वाच्या युक्तिवादांबाबत सज्ज असावे म्हणून हे लिहीत आहे.
या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषेच्या पायावर एकेक राज्य होणे कसे महत्त्वाचे आहे हे अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडले आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई या प्रकरणात तर त्यांनी आपल्या न्यायबुद्धीची आणि कायद्याच्या ज्ञानाची कमाल दाखवली आहे. मुंबई शहर महाराष्ट्रात सामील केले जाऊ नये या कारस्थानासाठी गुजराती व्यापारी, वकील आणि काही प्राध्यापक मंडळींनी १९४७मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग एक बैठक घेतली होती. खरेतर स्वातंत्र्य चळवळीत काहीही सहभाग न घेता, ब्रिटिशांनी दिलेल्या सवलतींवर मोठे झालेले- त्यांना कदापि विरोध न करणारे हे सारे लोक होते, पण स्वातंत्र्य मिळताच ते ताबडतोब दुभत्या गायींवर कब्जा करायला पुढे सरसावले होते हे स्पष्टच आहे. महाराष्ट्रातील ही दुभती गाय होती मुंबई. आज अशाच एका स्वातंत्र्यासाठी न झिजलेल्या पक्षाचे लोक मुंबई नावाच्या दुभत्या शहराकडे वाकड्या नजरेने पाहू लागले आहेत.
१९४८च्या साहित्य संमेलनातही भाषिक प्रांतवार रचना होणार म्हटल्यावर साहित्यिकांनीही मराठी भाषकांचे महाराष्ट्र हे राज्य असावे, अशी रास्त मागणी केली होती. पण टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राच्या तेव्हाच्या संपादकांना मराठी भाषकांच्या मागणीपेक्षा गुजराती व्यापार्यांची मागणी प्रसिद्धीलायक, अग्रलेख लिहिण्यासारखी वाटली याची नोंदही बाबासाहेबांनी आपल्या टिपणात घेतली आहे. बाबासाहेब म्हणतात, ‘मुंबईमध्ये इंडियन मर्चन्ट्स चेम्बरच्या इमारतीमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीला साठपेक्षा जास्त लोक नव्हते. एक भारतीय ख्रिस्ती वगळता या बैठकीस आलेले सगळे गुजरातीभाषक व्यापारी आणि उद्योजक होते. ही एक लहानशा गटाची बैठक असली तरीही त्यात चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांना भारतातील सर्व महत्त्वाच्या दैनिकांत जोरदार प्रसिद्धी मिळाली. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाला तर या बैठकीचे महत्त्व इतके काही वाटले की त्यांनी त्यावर थेट अग्रलेख लिहिला. या बैठकीत सर्वांनी लावलेला महाराष्ट्रातील मराठी भाषकांवरील विखारी टीकेचा सूर त्यांनीही ओढला होता आणि मुंबईच्या भविष्याबाबत त्यांनी जे काही ठराव संमत केले त्यांना पाठिंबा जाहीर केला.’
या बैठकीत चर्चिलेल्या मुद्द्यांचा समाचार बाबासाहेबांनी अतिशय कठोर सत्यदर्शीपणे घेतला आहे. मुंबई शहर वेगळा प्रांत म्हणून निर्मिले जावे अशी मागणी करताना या बैठकीत कारस्थानी अकलेची परिसीमा झाल्याचे आजही लक्षात येते. या समितीच्या ठरावाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी पुढील मुद्दे मांडले होते. ते असे-
१- मुंबई ही महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हती.
२- मुंबई ही मराठा साम्राज्याचा भाग कधीच नव्हती.
३- मुंबई शहरात मराठी भाषक बहुसंख्याक नाहीत.
४- गुजराती भाषक हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत.
५- मुंबई हे महाराष्ट्राबाहेरील खूप मोठ्या क्षेत्रफळासाठी व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे मुंबईवर महाराष्ट्र दावा करू शकत नाही. संपूर्ण भारताचा मुंबईवर हक्क आहे.
६- गुजराती भाषक लोकांनी मुंबईचा व्यापार आणि उद्योग उभा केला आहे. मराठी भाषक हे कारकून किंवा हमाल म्हणून काम करीत होते. व्यापार आणि उद्योगाच्या मालकांना कामकरी वर्गाच्या- जे बव्हंशी मराठी आहेत त्यांच्या सत्तेखाली ठेवणे चूक असेल.
७- महाराष्ट्राला मुंबई हवी आहे कारण त्यांना मुंबईतून मिळणारे अतिरिक्त उत्पन्नांवर जगायचे आहे.
८- बहुभाषक राज्य अधिक चांगले असेल. शिवाय त्यामुळे लहान माणसाच्या स्वातंत्र्यावर मुळीच गदा येत नाही.
९- प्रांताची फेररचना करताना ती राष्ट्रीय विचाराने नव्हे, तर विवेक विचाराने व्हायला हवी.
मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे सत्य तपासावे तसेच भौगोलिक निकषांवरही तपासावे. कुणी कुणावर आक्रमण केले आणि कोण जिंकले, कोण हरले यावरून लोक कोण आहेत यात फारसा बदल होत नाही. म्हणूनच आक्रमणांच्या इतिहासाचा मुद्दा गैरलागू ठरतो. बाबासाहेब म्हणतात, ‘महाराष्ट्रीयांनी गुजरातवर जय मिळवून अनेक वर्षे त्यांच्यावर राज्य केले. गुजरात्यांवर काय परिणाम झाला? काहीही नाही. गुजराती गुजराती राहिले आणि महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय राहिले.’ भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रातच आहे हे एक ठोस वास्तव आहे. बाबासाहेब लिहितात, ‘दमण ते कारवारपर्यंतची अखंड किनारपट्टी जर महाराष्ट्राचा भाग असेल तर मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही हे कसे काय सांगितले जाऊ शकते? हे तर निसर्गाचे अटळ, अपरिवर्तनीय सत्य आहे. भौगोलिक सत्य हेच आहे की मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. ज्यांना निसर्गाच्या सत्याला आव्हान द्यायचे असेल त्यांना खुशाल देऊ द्या. निष्पक्ष, विचारी मनासाठी मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे अगदी पुराव्याने सिद्ध सत्य आहे. मराठ्यांना मुंबईला आपल्या साम्राज्यात सामावून घेण्याची गरज वाटली नाही यामुळे भौगोलिक सत्य बदलत नाही. मराठ्यांना मुंबई अंमलाखाली आणायची गरज वाटली नाही याचे कारण इतकेच आहे की मराठा सत्ता ही जमिनीवर अंमल करत होती. त्यांना सागरी बंदर जिंकणे, विकसित करणे, त्यावर ऊर्जेचा, द्रव्याचा व्यय करणे याची त्यांच्या काळात गरज वाटत नव्हती.’
१९४१ सालची मुंबईची जनगणना पाहता, मराठी भाषकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ५१ टक्के आहे असे स्पष्ट झाले होते. तेव्हाच्या साधनांनुसार केलेली जनगणना अगदी अचूकच असेल असे नाहीच- पण गुजराती व्यापार्यांचे प्रामुख्याने प्रतिनिधित्व करणार्या या बैठकीत प्रा. वकील आणि प्रा. घीवाला यांनी ही संख्या ४१ टक्के, ३९ टक्के इतकी कमी असल्याचे असत्यकथन केले. बाबासाहेबांचा त्यावरचा शेरा त्यांच्या कोरडे ओढणार्या मिष्किलीचे उदाहरण आहे. ते म्हणतात, ‘प्रा. वकील यांनी दिलेली कारणे पाहता त्यांचे निष्कर्ष हे अंदाजपंचे आहेत किंवा आपल्या मताला पोषक ठरण्याच्या इच्छेने दिलेले आहेत असेच दिसते. पण समजा त्यांनी दिलेली आकडेवारी योग्यच आहे असे गृहीत धरले, तरीही काय फरक पडतो? त्यामुळे मुंबई महाराष्ट्राची नाही हा दावा योग्य ठरतो? ब्रिटिश लोक भारतावर राज्य करू लागले तेव्हापासून भारत हा एक देश म्हणूनच गणला गेला आणि भारतातल्या भारतात कुणीही कुठेही जाऊ शकतो असा हक्क सर्वांनाच दिला गेला. जर भारतभरातील कुणीही लोक मुंबईत येऊ शकले असतील, येथेच वस्ती करून राहू शकले असतील तर त्यासाठी महाराष्ट्राने का शिक्षा भोगावी? यात त्यांचा काहीच दोष नाही. सध्याच्या लोकसंख्येची परिस्थिती ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी आधार म्हणून वापरली जाऊ शकत नाही.’
गुजरातीधार्जिण्या समितीच्या चौथ्या मुद्द्यावर म्हणजे ‘गुजराती भाषक हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत,’ या मुद्द्यावरचे विवरण आपण सर्वांनीच कायम महत्त्वाचा ऐतिहासिक मुद्दा म्हणून लक्षात घेतले पाहिजे आणि फालतू आक्रमक युक्तिवाद करणार्या स्वतंत्र-मुंबईवादी ट्रोलमंडळींनाही सडकून उत्तर दिले पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, ‘आपण आता हा प्रश्न समग्रपणे विचारात घेऊ. गुजराती हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत का? नसतील तर ते मुंबईत कसे आले? त्यांच्या संपत्तीचा मूळ स्रोत काय आहे? कोणीही गुजराती माणूस आपण मूळ मुंबईचे असल्याचा दावा करणार नाही. ते जर मूळनिवासी नसतील तर ते मुंबईत आले कसे? पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रजांप्रमाणेच तेही संघर्ष करत येथे आले आणि त्यांनी जोखीम पत्करली? इतिहासाने दिलेली उत्तरे फार स्पष्ट आहेत. गुजराती लोक मुंबईत स्वेच्छेने आले नाहीत. त्यांना इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्यांनी धंदेवाईक अडत्ये, दलाल म्हणून येथे बोलावून घेतले. इस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या वखारी सुरत येथे सुरू झाल्या असल्या कारणाने त्यांना या सुरती बनियांना व्यापारात दलालीसाठी वापरण्याची सवय झाली होती. यामुळेच त्यांनी गुजरात्यांना मुंबईत आणले हे कारण आहे. दुसरे असे की इतर व्यापार्यांसोबत समान पातळीवर राहून स्पर्धा करून व्यापार करण्याच्या हेतूने, स्वतंत्रपणे गुजराती मुंबईत आले नाहीत. इस्ट इंडिया कंपनीसोबत बोलणी करून काही व्यापार-सवलती, विशेष अधिकार पदरात पाडून घेऊनच ते येथे आले.’
गुजराती लोक इथे उदात्त हेतूने मातृभूमीचा त्याग करून वगैरे आलेले नव्हते, पोटार्थी म्हणूनही नव्हे तर दलाली कमावणारे लाभार्थी म्हणूनच आले होते याबाबतचे पुरावे, दस्तावेज, ब्रिटिशांची पत्रे हे सारे बाबासाहेबांनी या टिपणात पुढे दिले आहेत आणि बिनतोड युक्तिवाद केले आहेत. ते युक्तिवाद आजही अबाधित आहेत. पुढल्या भागात ते पाहू या.