डायटला चालणारे पदार्थ परदेशीच असायला हवेत आणि ते महागडेच असायला हवेत असं अजिबातच नाहीये. आपला अस्सल देशी, मराठमोळा, लाडका आणि आवडता पदार्थही डाएट फ्रेंडली आहे… तो आहे भाजणी. डायटला चालणार्या उत्तम पदार्थांमधे भाजणी येते. भाजणी हा महाराष्ट्रातील जुना, पारंपरिक पदार्थ आहे. भाजणीचं वैशिष्ट्य म्हणजे तिची पौष्टिकता. उत्तम कार्बोहायड्रेड आणि मिलेट्स आणि प्रोटिन्स यांचं मिश्रण या पदार्थात केलेलं आहे. पारंपरिक पदार्थांत असलेलं पौष्टिकतेचं ज्ञान आणि पौष्टिक पदार्थही चविष्ट असले तरच आनंदानं पोटात जातात याचं भान म्हणजे हे भाजणीचं थालीपीठ. हे भाजणीचं थालीपीठ जिने कुणी शोधून काढलं असेल त्या अनाम मराठी स्त्रीला शतशः प्रणाम.
एका राज्याचं, संस्कृतीचं प्रतीक म्हणून एकच पदार्थ निवडायला तर मी भाजणीचं थालीपीठ निवडेन महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून. महाराष्ट्रासारखंच अठरापगड संस्कृतीचं मिश्रण असलेलं, अनेक धान्यांचं, चविष्ट, कुरकुरीत, खमंग, झणझणीत अशा चवीचं भाजणीचं थालीपीठ असतं.
कितीही परदेशी पदार्थांचे हल्ले झाले तरी मराठी माणसाचा जीव मराठी पदार्थांनी सुखावतो. थालीपीठावर चीज वगैरे घालून थालीपीठ पिझ्झा म्हणून त्याचा अपमान करू नये असं मला वाटतं. गरमागरम भाजणीचं थालीपीठ सोबतीला हिरव्या मिरचीचा ठेचा, लोणचं, दही, ताक, दाण्याची किंवा खोबर्याची चटणी असेल तर भाजणीचं थालीपीठ खाणं म्हणजे मेजवानीच ठरतं.
महाराष्ट्रात भाजणी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रमाणात केली जाते. कोकणात या भाजणीत तांदूळ जास्त असतात आणि देशावर ज्वारी जास्त असते तसंच मराठवाड्याकडे बाजरी जास्त असते. भाजणीमधे सोळा, सतरा धान्येही असण्याची शक्यता असते. भाजणीत वरी, नाचणी, सोयाबीन, मका अशीही धान्यं वापरली जातात.
भाजणी नावाप्रमाणेच सगळी धान्ये भाजून घेऊन केली जाते. मंद आचेवर खमंग भाजणे हे या चवीचं इंगित आहे. इथं पेशन्स लागतो. आजकाल तयार भाजणीही अनेक ब्रँडसची किंवा घरगुतीही सहज विकत मिळते. भाजणे या प्रक्रियेत धान्य कोरडे होते, ओलावा गेल्यानं भाजणी भरपूर टिकते, पचायला हलकी आणि चविष्ट होते.
महाराष्ट्राचं भाजणीवर इतकं प्रेम की उपासाची भाजणीही कुणीतरी शोधून काढली. भाजणीची पारंपरिक रेसिपी प्रत्येक घरात वेगळी असू शकते. भाजणीची पारंपरिक रेसिपी माझ्या घरात केली जाते ती अशी :
भाजणी
साहित्य :
अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो गहू, अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, पाव किलो उडीद डाळ, पाव किलो हरभरा डाळ, १२५ ग्रॅम धणे, दोन टेबलस्पून जिरे.
कृती :
सगळी धान्ये मंद आचेवर वेगवेगळी कोरडी भाजून गार झाल्यावर एकत्र करून भाजणी दळून आणावी.
बाजरी जास्त जुनी झाल्यास काही दिवसांनी कडवट चव होते, त्यामुळे बाजरी घातलेली भाजणी लवकर संपवावी.
तांदूळ, गहू यांना बोरीक पावडर लावलेली असते, त्यामुळे ते धुवून सुकवून मगच भाजावेत.
याच भाजणीत कडधान्येही घालता येतील. त्याने भाजणीची पौष्टिकता वाढेल.
कडधान्याची भाजणी ही प्रोटिन रिच भाजणी असते.
कडधान्याची भाजणी
१. प्रत्येकी एक वाटी अख्खे सालासकटचे मूग, उडीद, मसूर, मटकी, हरभरे वेगवेगळे मंद गॅसवर भाजून घ्यावेत.
२. एक वाटी ज्वारी, अर्धी वाटी तांदूळ वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्यावेत.
३. दोन टेबलस्पून धणे
४. एक टीस्पून जिरं
५. अर्धा टीस्पून मेथी- न भाजता घ्यावी.
हे सगळं दळून आणावं.
माफक तेल म्हणजे नॉनस्टिक तवा असेल तर अगदी एक टीस्पून तेल घालून लावलेलं, भरपूर कांदा, कोथिंबीर घातलेलं, थोडे तीळ लावलेलं पातळसर थालीपीठ हा अतिशय उत्कृष्ट डायटचा पदार्थ असू शकतो, यावर विश्वास बसणं अवघड आहे पण ते खरं आहे.
भाजणीत हेल्दी कार्ब्ज, मिलेटस आणि उपयुक्त प्रोटिन्स एकत्र असतात.
कांदा आणि इतर कुठल्याही भाज्या थालीपीठात ढकलता येतात. सोबतच्या भरपूर कोथिंबिरीनं थालीपीठातलं फायबर कंटेट वाढतो. तिळाने पौष्टिकता वाढते. सोबत घरी काढलेल्या लोण्याचा गोळा/दही घेण्याने हेल्दी फॅट्स मिळतात. भाजणीचे पदार्थ पाहू.
पालक कोबी कटलेट्स
कटलेट्स हा प्रकार माझा फार आवडता आहे. उरलेली कुठलीही भाजी ढकलून कटलेट्स करता येतात. ते चविष्ट होतात. एरव्ही बटाटा आणि ब्रेड घालून कटलेट्स केली जातात. पण यातलं काहीही वापरायचं नव्हतं, म्हणून मग बेसन आणि थालीपीठाची भाजणी वापरून कटलेट्स केली. बेसनानं कटलेट्स जरा खुटखुटीत होतात. चवीला छानच होतात आणि भाज्याही खाल्ल्या जातात.
साहित्य :
१. पालकाची मूठभर पानं.
२. एक वाटीभर चिरलेला कोबी.
३. दोन मिरच्या, आलं पेरभर, चार लसणीच्या पाकळ्या, एक टेबलस्पून जिरं, मीठ चवीनुसार.
४. थालीपीठ भाजणी दोन वाट्या, एक टेबलस्पून बेसन. एक टेबलस्पून रवा. तेल एक टीस्पून.
कृती :
१. पालक, कोबी, मिरच्या, आलं, लसणीच्या पाकळ्या, जिरं, मीठ हे सगळंच मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं.
२. त्यात मावेल इतकी थालीपीठ भाजणी आणि एक टेबलस्पून बेसन घालून कटलेट्स करायची.
३. रव्यात किंचित घोळवून नॉनस्टिक तव्यावर शॅलो फ्राय करायची. अगदी एक टीस्पून तेल पुरतं.
मोकळ भाजणी
साहित्य :
१. एक वाटी भाजणी
२. एक वाटी पाणी
३. एक टेबलस्पून तेल
४. तिखट मीठ चवीनुसार, कढीपत्ता, कोथिंबीर, भाजके शेंगदाणे. दही.
कृती :
१. कढईत तेल तापत ठेवावं.
२. बाऊलमधे भाजणीत तिखट, मीठ घालून पाणी घालून फेटून घ्यावं.
३. तेलात कढीपत्ता घालून फोडणी करावी. भाजणीचं मिश्रण त्यावर घालून फेटून घ्यावं.
४. नीट वाफ काढावी.
भाजके शेंगदाणे, कोथिंबीर घालून सजवून मोकळ भाजणी खावी. सोबत दही घ्यावं.
भाजणीचे मुठीये
साहित्य :
१. एक वाटी किसलेला दुधी भोपळा.
२. एक वाटी भाजणी, एक टेबलस्पून बेसन, एक टेबलस्पून रवा.
३. एक टेबलस्पून हिरवी मिरची, आल्याचा ठेचा. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून. हिंग, हळद, जिरं. मीठ चवीनुसार.
४.तेल एक टेबलस्पून, एक टेबलस्पून तीळ.
कृती :
१. दुधी भोपळा किसला की शक्य तो त्याच पाण्यात भाजणी, बेसन, रवा घालून भिजवून घ्या. वरून जास्त पाणी घालू नये. कारण दुधी भोपळ्याला अंगचं पाणी सुटतं. पीठ पातळ झालं तर उंडे होणार नाहीत.
२. त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ चवीनुसार घाला. त्यात हिंग, हळद, जिरं घालून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
३. मिश्रणाचे दंडगोलकार उंडे वळून ते इडलीपात्रात पाणी घालून वाफवून घ्या.
४. गार झाल्यावर या उंड्यांचे सुरीने तुकडे करून घ्या.
नॉनस्टिक कढईत एक टेबलस्पून तेलाची फोडणी करून घ्या. फोडणीत कढीपत्ता, तीळ घालून हे दुधी भोपळ्याचे मुठीये परतून घ्या.
भाजीपोळी खायचा कंटाळा आल्यावर हे मुठीये आणि सोबत हिरवी चटणी आणि दही, ताक घेतलं तर हे संपूर्ण जेवण होतं.