गेल्या पाच वर्षांत लोकप्रभा, चित्रलेखा या बंद पडलेल्या साप्ताहिकांमुळे ‘मार्मिक’ साप्ताहिकाची जबाबदारी अधिकच वाढली आहे. कारण मराठी माणूस, महाराष्ट्र आणि शिवसेना यांच्या विचारांना वाहिलेले हे साप्ताहिक आहे.
– – –
‘मार्मिक’च्या आधी गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात सुरू झालेले ‘हिंदुपंच’ हे साप्ताहिक व्यंगचित्रात्मक होते. परंतु त्यातील चित्रे यथार्थ अशा व्यंगाचे विशेष दर्शन घडविणारी नसत. उपहास, टिंगल-टवाळीदर्शक असत. हिंदुपंचाची व्यंगात्मक चित्रांची व लेखनाची प्रथा महाराष्ट्रात सर्वत्र झाली. अनेक लहानमोठ्या पत्रांतून त्याचे अनुकरण झाले. अच्युतराव कोल्हटकर, अनंतराव गद्रे आदी संपादकही अशी चित्रे आपल्या वृत्तपत्रातून देत. पण ही चित्रे ढोबळ स्वरूपाची असत. थोडक्या रेषांत चित्र उभे करून व्यंगाचे मार्मिक दर्शन घडविण्याचे कसब तेव्हा साधलेले नव्हते. त्यामुळे ते प्रयत्न अपुरे होते. याला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न ‘फ्री प्रेस’चे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी ‘मार्मिक’ला १३ ऑगस्ट १९६० साली जन्म देऊन केला.
आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ व ‘मराठा’मध्ये बाळासाहेब आणि श्रीकांतजींची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. फ्री प्रेस, नवयुग, मराठा आदी वृत्तपत्रांतील व्यंगचित्रांमुळे बाळासाहेबांचे उत्तम व्यंगचित्रकार म्हणून नाव झालेच होते. ‘शंकर्स विकली’ या शंकर यांच्या इंग्रजी व्यंगचित्र साप्ताहिकाप्रमाणे मराठीत व्यंगचित्र साप्ताहिक असावे असा ठाकरे बंधूंच्या डोक्यात विचार आला. व्यंगचित्रे काढण्याचा अनुभव होताच, त्याचबरोबर साप्ताहिक चालविण्याचा आत्मविश्वास आला होता. पैशाची जुळवाजुळव सुरू झाली. परंतु जेव्हा एका बँकेने आर्थिक सहाय्य केले नाही, तेव्हा वितरक बुवा दांगट यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. असे सगळे अडथळे पार पाडून १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’चा पहिला अंक निघाला आणि १४ ऑगस्ट रोजी तो महाराष्ट्रातील वाचकांच्या हाती पडला.
राजकीय व्यंग शोधणे, त्याला लोक मानसात पक्का आकार देणे आणि त्या अनुरोधाने एक प्रकारचे राजकीय टीकालेखन करणे, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्या मानाने राजकीय लिखाण सोपे असते. कारण तिथे विस्ताराला वाव असतो. गरजेनुसार आपली टीका सौम्य अथवा प्रखर करता येते. राजकीय व्यंगचित्रात सूक्ष्म निरीक्षणाने त्या व्यक्तीवर फक्त एखाद्या व्यंगातून टीका करणे म्हणून कठीण आहे. परंतु बाळासाहेबांनी ही कामगिरी लिलया पेलली आणि एक मराठी व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ‘मार्मिक’ला अल्पावधीतच नावारुपास आणले. केवळ व्यंगचित्राला वाहिलेले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करण्याचे धाडस आत्मविश्वासाने बाळासाहेबांनी केले. ठाकरे बंधूंचा आत्मविश्वास अनाठायी ठरला नाही. ‘मार्मिक’ला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘मार्मिक’च्या ज्वलंत अग्रलेखांमुळे, इतर लेखांमुळे आणि व्यंगचित्रांमुळे मराठी मन चाळवले गेले आणि चाळवले गेल्यानंतर चवताळले गेले आणि मग एक क्रांती झाली. त्यातून १९ जून १९६६ रोजी शिवसेना जन्मास आली. त्याचे श्रेय ‘मार्मिक’ला जाते. ‘मार्मिक’मधून ‘शिवसेना’, नंतर ‘सामना’ आणि १९९५ साली शिवसेनेचे शिवशाही सरकार असे कालठसे उमटले.
‘मार्मिक’च्या पहिल्या अंकातील संपादकीयाचा मथळा होता, ‘‘आम्ही ‘तेच’ शोधीत आहोत.’’ त्यात म्हटले होते की, ‘‘हे साप्ताहिक आम्ही काढले, त्यामागला उद्देश काय? असे एक (काल्पनिक) वाचक विचारतात. खरेच, काय बरे उद्देश? लोकशिक्षणार्थ म्हणावे तसे हे काय १९वे शतक आहे थोडेच! हे अगदी जुन्या वळणाचे ओबडधोबड उत्तर आणि ते द्यायचे तर आमच्या डोक्यावर भले मोठे जात्याएवढे पागोटे आहे कुठे? बरे जनता जनार्दनाच्या सेवेकरिता? किंचित जुने आणि वरवर प्रेमळ उत्तर असले, तरी त्यालाही गांजा-भांगेसारखा किंचित ऊग्र दर्प आहेच आहे. तशात हेच उत्तर देऊन वेळ मारायची, तर अंगावर खादीच्या जाडजूड घोंगड्याचे रकटे वागविणार्यांनी ते दिल्यास शोभण्यासारखे आहे. ज्ञान आणि मनोरंजनासाठी? आहे हे एक अपटुडेट फॅशनचे उत्तर. पोटासाठी हे प्रामाणिक उत्तर. उगीच हे खरे उत्तर आणि आमचे उत्तर? अहो ‘तेच’ तर आम्ही शोधीत आहोत. वाचकांनी हातभार लावावा असे मार्मिकपणे आवाहन केले.’’
‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर त्यावेळी चालू असलेल्या केंद्रीय सरकारी नोकरांच्या संपाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री ‘मोरारजींची दहीहंडी’ हे व्यंगचित्र होते. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या पहिल्या अंकापासूनच विनायक कृष्ण जोशी यांची ‘व्यंगचित्री नियतकालिकांची महाराष्ट्रीय परंपरा’ ही लेखमाला सुरू झाली व ती पुढे सहाव्या सातव्या अंकापर्यंत सुरू होती. ‘मार्मिक’च्या सुरुवातीच्या काळात लेखक नानासाहेब देशपांडे तसेच नामवंत पत्रकार व लेखक द. पां. खांबेटे यांच्या सिद्धहस्त लेखणीचे सहकार्य लाभले. १९६५पर्यंत द. पां. खांबेटे हे सहाय्यक संपादक होते. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे आणि द. पां. खांबेटे यांचे व्यंग विनोदी लेखन आणि प्रबोधनकारांचे आसूड ओढणारे लिखाण हे ‘मार्मिक’चे बलस्थान होते. बाळासाहेब, द. पां. आणि प्रबोधनकार यांच्यामुळे ‘मार्मिक’ची लोकप्रियता लवकरच चांगलीच वाढली होती. शिवसेनेच्या स्थापनेनंतर तर ‘मार्मिक’चा खप दोन लाखांपर्यंत पोहचला होता.
शिवसेनेच्या जन्मानंतर बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेत गेल्यामुळे मार्मिकमध्ये ते कमी लिखाण करीत होते. तरी अग्रलेख त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिला जायचा. जवळ-जवळ १९८६-८७ पर्यंत बाळासाहेब स्वत: जातीने अग्रलेख लिहायचे. लेखक-पत्रकार व शिवसेना नेते प्रमोद नवलकर हे सह-संपादकपदी आल्यानंतर काही अग्रलेखांवर त्यांच्या लेखनाची छाप होती. भाऊ तोरसेकर, बाळ धारप, ह. मो. मराठे, पंढरीनाथ सावंत आणि विद्यमान कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी ‘मार्मिक’चे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ‘मराठा’ या वृत्तपत्राने फार मोठी कामगिरी बजावली. तशीच किंवा त्याहूनही मोलाची कामगिरी ‘मार्मिक’ने महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत केली आहे. ६० ते ८०च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या ‘मार्मिक’च्या अग्रलेखांवर नजर टाकली तर हे निश्चितपणे जाणवते. मराठी राज्यात मराठी माणसाची ससेहोलपट (मे १९६६), शिवसेना अग्नीदिव्यात पावनच होणार (मार्च १९६९), स्वाभिमानी मराठी माणसाने बी. पी. सी. सी. उखडली पाहिजे (ऑक्टोबर १९६९), महाराष्ट्राने राष्ट्रहित जपले हा काय गुन्हा केला? (फेब्रुवारी १९७०), या सवलतबाजीने मुंबईतील लोंढे वाढतील (फेब्रुवारी १९७०), मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले (मे १९७१), महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी द्वेष वाढीस लागला (मे १९७२), जो तो येतो महाराष्ट्राला अक्कल शिकवतो (मे १९७७), शिवाजी महाराजांना जन्म देणारा महाराष्ट्र राजकारणात नपुसंक ठरतो (सप्टेंबर १९७७), मुंबई महाराष्ट्राची; नाही कुणाच्या बापाची (मे १९८२), सारे हलाहल पचवून शिवसेना खडी आहे (जून १९८३), मराठ्यांनो जागे व्हा (ऑगस्ट १९८३), चला उचला मुंबई वाचवण्यासाठी बेलभंडार (डिसेंबर १९८३), असे अनेक अग्रलेख लिहून बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनात अस्मितेचे अंगार चेतवले आणि अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढण्याचे बळ दिले. ‘मार्मिक’ने महाराष्ट्रात मराठी माणसासाठी हक्काने लढणारी शिवसेना संघटनेने फक्त चळवळ उभारली नाही; तर एक क्रांती केली हे कुणालाही नाकारता येणार नाही.
१३ ऑगस्ट १९६० रोजी प्रकाशित झालेले व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’, गेली ६४ वर्षे दर गुरुवारी मराठी वाचकांच्या भेटीस येत आहे. हा मराठी वृत्तपत्रक्षेत्रातील एक चमत्कारच म्हणावा लागेल. कारण ‘मार्मिक’चे समकालीन साप्ताहिकं आणि त्यानंतर निघालेली मराठी साप्ताहिकं काळाच्या उदरात कधी गडप झाली ते कळलेच नाही. दैनिकांची सुरू झालेली साप्ताहिक व द्विसाप्ताहिक पुरवणी, दिवसेंदिवस मराठी वाचकांचा घटत असलेला प्रतिसाद, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वाढते प्रस्थ, विविध सामाजिक माध्यमांचे उठलेले पेव, प्रकाशन संस्थांवर आलेली आर्थिक संकटे आदी कारणामुळे बरीचशी मराठी साप्ताहिकांची प्रकाशने बंद पडली; हे दुर्दैव आहे. पण ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक असल्यामुळे, एका विचारधारेशी नाळ जुळल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘ठाकरे’ नावाचा ब्रॅन्ड असल्यामुळे, ‘मार्मिक’ आजही तेवढ्याच दिमाखाने प्रकाशित होतो आणि वाचकांचाही तसाच प्रतिसाद लाभतो. मराठी तरुण वाचकांना याची अचूक टिपणे आणि युवकांची स्पंदने याचे प्रतिबिंब ‘मार्मिक’मध्ये पहावयास मिळते. नवता आणि परंपरा याची योग्य रीतीने सांगड घालून गेली ६४ वर्षे ‘मार्मिक’ प्रसिद्ध होत आहे.
गेल्या वीस वर्षांत अनेक मराठी साप्ताहिके बंद पडली. गेल्या पाच वर्षांत लोकप्रभा आणि चित्रलेखा या बंद पडलेल्या साप्ताहिकांमुळे ‘मार्मिक’ साप्ताहिकाची जबाबदारी अधिकच वाढली आहे. कारण मराठी माणूस, महाराष्ट्र आणि शिवसेना यांच्या विचारांना वाहिलेले हे साप्ताहिक आहे. केंद्रातील महाराष्ट्रद्वेषी सरकार महाराष्ट्रावर सतत अन्याय करीत आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी ‘मार्मिक’ हे जागल्याची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्र धर्मरक्षक म्हणून ‘मार्मिक’चे हे कार्य यापुढे सुरूच राहण्यासाठी ‘मार्मिक’ला मन:पूर्वक शुभेच्छा.