वीकेंडला घरापासून लांब जाऊन कॅनव्हासवर निसर्गाचे अनोखे रूप चित्रांच्या माध्यमाने टिपायचे, असं अनेक चित्रकार करतात.. पण घरापासून दूर याचा अर्थ असतो घरी परत येता येईल इतकंच अंतर.. गणेश शिंदे या कलावंताने मात्र ही कल्पना बदलून टाकली आहे..
—-
वीकेंड आला की दुचाकी काढायची, घरापासून लांब कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जायचे, एका बोर्डवर कॅनवास लावायचा आणि निसर्गाशी संवाद साधत, त्याचे अनोखे रूप न्याहाळत, त्यात दिसणार्या रंगछटा, वातावरणातले बदल अचूकपणे हेरत ते लँडस्केप चित्रांच्या माध्यमातून कॅनव्हासवर टिपायचे, असं अनेक चित्रकार करतात.. पण घरापासून दूर याचा अर्थ असतो घरी परत येता येईल इतकंच अंतर.. गणेश शिंदे या कलावंताने मात्र ही कल्पना बदलून टाकली आहे.. गेली दहा वर्षं तो चित्रं काढण्यासाठी भटकतो आहे आणि ट्रॅव्हल अँड आर्ट अशी अनोखी कल्पना रुजवतो आहे.
पुण्यात त्याला ओळखतात ते त्याच्या बाइकवरून.. कारण त्याची मोटरसायकलही अनेकदा त्याचा कॅनव्हास बनते. या मोटरसायकलीवर त्याने ठिकठिकाणच्या भ्रमंतीत चित्रित केलेली दृश्यं दिसतात.
हा मजकूर प्रसिद्ध होत असताना गणेश पुण्यात किंवा महाराष्ट्रातही नाही.. तो मोटरसायकलवरून पोहोचला आहे शेकडो किलोमीटर अंतरावरच्या हिमालयात. एक जुलै ते ३० ऑगस्ट या दोन महिन्यांच्या काळात लेह, लडाख, कारगिलपासून ते हिमाचल प्रदेशापर्यंत पसरलेल्या हिमालयातल्या अनेक भागांना भेटी देऊन निसर्गाचं लाइव्ह चित्र किमान १०० कॅनव्हासवर रेखाटायचं ध्येय त्याने ठेवले आहे. कर्नाटकातल्या हंपी या प्रसिद्ध गावात त्याने १००च्या वर निसर्ग चित्रं रेखाटली आणि हंपीचं सौंदर्य आपल्या मोटरसायकलीवरही उतरवलं. त्यामुळे ते अख्खं गाव त्याला ओळखू लागलं आहे. आजही तो दुचाकी घेऊन बाहेर पडला की ही हंपीचित्रे आसपासच्यांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनतात. ती पाहणार्याच्या पसंतीलाही उतरतात क्षणात. अनेकजण गाडी थांबवून ही चित्रे न्याहाळतात, त्यासोबत सेल्फी काढतात. राजस्थान, केरळ, गोवा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही त्याने या ट्रॅव्हल अँड आर्ट पद्धतीच्या चित्रांच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी निसर्गाचा चांगला मित्र बनायचे आहे आणि चित्रकार म्हणून जगायचे आहे, असे गणेश सांगतो.
कशी सुचली कल्पना?
गणेश सांगतो, पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर नोकरी सुरू झाली. मला सुरुवातीपासून लँडस्केप चित्रं काढायला आवडायचं. नोकरीमुळे ते बंदच झालं. वीकेंडच्या दिवशी बाईकवरून शहरापासून जवळच्या अंतरावर फिरायला जायचो. मात्र, त्यात नुसतेच पेट्रोल जळायचे, चहा-पाण्यावर पैसे खर्च व्हायचे आणि थोडाफार फिरायला गेल्याचा आनंद मिळायचा. बस बाकी काहीच नाही. २०१३चे वर्ष असेल- मोटारसायकल घेण्याची हौस त्या वर्षी पूर्ण झाली, आणि त्याच दिवशी हंपीला बाईकवर जायचे ठरवले. फक्त जाऊन यायचे नाही तर तिथे चार पाच दिवस थांबायचे, निसर्गाच्या सान्निध्यात रमायचे आणि चित्र काढायची, असे नियोजन केले. हंपीला गेलो, तिथे चित्रं काढली, आपण प्रवासाबरोबरच काहीतरी वेगळं केल्याचे समाधान मिळाले, मन प्रसन्न झाले, खूप बरे वाटले. तिथूनच ट्रॅव्हल अँड आर्ट या थीमचा उदय झाला. त्यानंतर आतापर्यंत देशातल्या अनेक भागात भ्रमंती झाली, चित्रे काढली, निसर्गाबरोबर राहण्याची, जगण्याची सवयच जडून गेली. आता मागे वळून पाहायचे नाही, जास्तीत जास्त वेळ याचसाठी द्यायचा हे मी ठरवून टाकलंय.
लोकांचे प्रेम आणि बरंच काही…
मी आतापर्यंत ज्या ज्या गावात गेलो तिथल्या लोकांनी माझ्या कलेवर अगदी भरभरून प्रेम केले, तिथे चित्र काढत असताना अनेकजण दोन दोन तास उभे राहून त्या निसर्गचित्राच्या निर्मितीचा आविष्कार डोळे भरून पाहायचे, त्यामुळे त्यांच्याशी एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. अनेकजण तर चित्र पूर्ण झाल्यानंतर हे तुम्ही विकणार आहात का, त्याची काय किंमत आहे, अशी विचारणा माझ्याकडे करत असतात. मात्र, मी ही चित्रे काढतोय, ती विक्रीसाठी नाही तर आपल्यातला कलाकार जिवंत ठेवण्यासाठी असं त्यांना सांगायचो.
असाही एक अनुभव…
वर्ष असेल २०१९. मी चित्र काढण्यासाठी बाईकवर हिमाचल प्रदेशात जाण्याचे निश्चित केले. पावसाळी वातावरण होते, तशा परिस्थितीत मी मुक्काम करण्यासाठी हॉटेल शोधत होतो. मला एके ठिकाणी ५०० रुपये भाडे असणारी रूम मिळाली होती. माझे, तिथे बोलणे सुरू असताना एक माणूस मला न्याहाळत होता. अरे भय्या, सुनो तो जरा, ये बाईक तुम्हारी है क्या, त्याने मला प्रश्न केला. त्यावर मी हो म्हणालो. आप आर्टिस्ट हो क्या, यहाँ पेन्टिंग करने के लिये आए हो क्या, या त्याच्या प्रश्नावर मी जी हाँ असे उत्तर दिले आणि त्यानंतर क्षणातच, तुम होटल में नहीं मेरे घर में रहोगे, असे फर्मान सोडत तो माणूस मला चक्क त्याच्या घरी घेऊन गेला. दरीच्या लगत असणार्या भागात त्याचे घर होते, तिथून निसर्गाचे रूप खूपच लोभस दिसत होते. तो सारा नजारा पाहून मी धन्य झालो होतो, १० दिवसांच्या मुक्कामात मी तिथे ३०पेक्षा अधिक पेन्टिंग तयार केली, मात्र मन तृप्त झाले नाही, असे गणेश सांगतो.
हिमाचलमधल्या चहेल भागात सकाळी चित्र काढत बसलो होतो, तेव्हा लष्कराचे तीन अधिकारी तिथे आले होते, चित्र पाहण्यात ते इतके रमून गेले की त्यांना वेळेचे भानही राहिले नाही. त्या अधिकार्यांनी मला चाल गावाची सफर घडवून आणली, तो अनुभव आजही तितकाच ताजा आहे, असे गणेश सांगतो.
एकदा राजस्थानवरून परतत असताना एका चेक पॉईंटवर पोलिसांनी थांबवले, तुम्हारे गाडी का कलर क्या है, या प्रश्नावर मी त्याला सांगितले, साहब, ये मैने गाडी पे पेन्टिंग बनवाया है. या उत्तरावर, क्या बात कर रहे हो, तुम तो बडे कलाकार हो, असे म्हणत त्यांनी या कलेचं भरभरून कौतुक केले.
हिमालय आणि १०० पेन्टिंगचा ध्यास..
अनेक दिवसांपासून मला हिमालयात जाऊन १०० पेन्टिंग तयार करण्याच्या ध्यासाने झपाटले होते. ती माझी इच्छा या वर्षी पूर्ण झाली. हिमालय खूप मोठा आहे, तो आपल्या कॅनव्हासवर मावणार नाही, पण देखणा निसर्ग कसा असतो, त्यामध्ये दिसणार्या रंगछटा कशा असतात, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वातावरणात होणारे बदल, तिथल्या बर्फाळ वातावरणाची मजा हे सगळे कॅनव्हासवर उतरवणे माझ्या मनाला खूप आनंद देणारे ठरणार आहे. त्यामुळे दोन महिन्यात १०० पेन्टिंग पूर्ण करण्याच्या निर्धाराने निघालो आहे, असे गणेशने सांगितले.
आर्ट हेच खरे सेव्हिंग..
ट्रॅव्हल अँड आर्ट ही संकल्पना पूर्णत्वाला नेत असताना गणेश पैशाचं गणित कसं जमवतो, असा प्रश्न कुणालाही पडतो. तो इतके कॅनव्हास रेखाटतो, पण ते विकत नाही. त्याने अद्याप प्रदर्शनही भरवलेलं नाही. तो पोटापाण्यासाठी एका कंपनीत आर्टिस्ट म्हणून काम करतो, डिझायनिंगची कामं करतो आणि बचत झाली, पैसे साठले की दोन महिन्यांसाठी नव्या प्रदेशात फिरती चित्रकारी करायला, मुशाफिरी करायला निघतो. हे पैशाचे गणित कायम जमत गेले, याबद्दल तो स्वत:ला सुदैवी मानतो. तो म्हणतो, माझ्याकडे असणारी कला आणि कलाकार म्हणून जगण्याची पॅशन हेच माझे खरे सेव्हिंग असून ते मला कायम जिवंत ठेवायचे आहे.
– सुधीर साबळे
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)