• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

…अशा शिवसैनिकांचा मला अभिमानच आहे!

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 15, 2023
in गर्जा महाराष्ट्र
0
…अशा शिवसैनिकांचा मला अभिमानच आहे!

अयोध्यातील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त झाली. या घटनेने सारा देश हादरला. देशाच्या अनेक भागात हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या. परदेशातही हिंदू-मुस्लीम समाजात संघर्ष पहावयास मिळाला. डिसेंबरमध्ये अयोध्येकडे कारसेवकांचा ओघ सार्‍या देशातून आला होता. भाजप, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना यांचे कार्यकर्ते आघाडीवर होते.
या ज्वलंत हिंदुत्त्वाच्या प्रश्नावर शिवसेना स्वस्थ बसणे शक्य नव्हते. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ४ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांना कारसेवेत सहभागी होण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यातील शिवसैनिकही त्यात सहभागी झाले. शिवसेना नेते मनोहर जोशी काही नेत्यांसह विमानाने कारसेवा करण्यासाठी निघाले. परंतु त्यांचे विमान थेट कलकत्त्यास नेले गेले. तरी ते अयोध्येला पोहोचले. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली होती. सर्वत्र हिंदूंच्या विजयाचा जयघोष सुरू होता. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद देशात सर्वत्र उमटले. देशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. मुंबईत तणाव निर्माण झाला. तर काही ठिकाणी जाळपोळ, लूटमार झाली. लोकसभेत या घटनांचे प्रतिसाद उमटले. काही राष्ट्रीय पक्षांनी व खासदारांनी, भाजपा, बजरंग दल, संघ, विश्व हिंदू परिषद व शिवसेना यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. केंद्र सरकारने भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांना अटक केली. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार सतीश प्रधान, शिवसेना दिल्लीचे प्रमुख जय भगवान गोयल यांना अटक करण्यात आली. शिवसेना खासदार मोरेश्वर सावे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या सर्व अटकांच्या विरोधात ९ डिसेंबर १९९२ रोजी शिवसेना-भाजपातर्पेâ ‘भारत बंद’ पुकारण्यात आला.
बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांच्यावर दूरचित्रवाणीच्या पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा सुंदरसिंह म्हणाले, ‘ही बाबरी मशीद शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केली.’ ही बातमी देशात वार्‍यासारखी पसरली. मुंबईतील पत्रकारांनी शिवसेनाप्रमुखांना यासंबंधी विचारले तेव्हा बाळासाहेब ताडकन म्हणाले, ‘जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल तर अशा शिवसैनिकांचा मला अभिमानच आहे.’ बाळासाहेबांच्या या निर्भीड उत्तराने देशात एक वेगळा संदेश गेला. हिंदूंचे रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते आणि बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंचे एकमेव रक्षणकर्ते आहेत, हिंदुहृदयसम्राट आहेत. भाजप नेत्यांनी सोयिस्करपणे या प्रकरणातून पळ काढला. परंतु शिवसेनाप्रमुख आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले.
बाबरी मशीद आंदोलनात शिवसेना कुठे होती, अशी विचारणा भाजपा नेते करतात तेव्हा त्यांच्या स्मृतीची कीव येते. एवढेच नव्हे तर भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती यांनी एकदा सांगितले की, बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला जात असताना त्यांना अडवण्यासाठी गेलेल्यांना कारसेवक मराठीत बोलत होते हे कळले. ते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. याचाच अर्थ असा की ते शिवसैनिक होते. परंतु आज ३० वर्षानंतर श्रेयवादासाठी हा प्रश्न उकरून भाजपकडून हिंदूंची दिशाभूल केली जात आहे. ‘खोटे बोल पण रेटून बोल’ याशिवाय भाजपाला येते काय? पण जनता सुज्ञ आहे. बाबरी मशीद प्रकरणात सत्याची नोंद आहे.
बाबरी मशीद पडल्यानंतर १९९३ सालच्या सुरूवातीलाच मुंबईकरांना भीषण दंगलीला सामोरे जावे लागले. भाजपाने अयोध्येमध्ये राम मंदिराचे पुर्ननिर्माण करण्यासाठी महाआरती सुरू केली. शिवसेनेने मुंबईतील राम, मारुती मंदिरासमोर महाआरत्या सुरू केल्या. याच दरम्यान माहिम, भेंडीबाजार, नागपाडा परिसरात दंगल झाली. त्याचे लोण मुंबईच्या इतर भागात पसरले. मुंबईत एकूण ३५ ठिकाणी जाळपोळ, लुटमार असे प्रकार झाले. जोगेश्वरी येथील दोन घरातील कुटुंबावर पेटते बोळे टाकून जाळण्यात आले. तीन-चार दिवस चाललेल्या या भीषण दंगलीत ५००हून अधिक लोक ठार झाले आणि हजारो जण जखमी झाले. या दंगलीचे खापर शिवसेनेवर फोडून विरोधकांनी शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी केली. शिवसेनेवर जर बंदी घातली तर त्याचे परिणाम भयंकर होतील असा इशारा भाजपा, मराठा महासंघाने दिला. तर रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेवर बंदी आणू नये असा विचार मांडला. काँग्रेसचे शंकरराव चव्हाण यांना मात्र शिवसेनेवर बंदी हवी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी फेटाळली आणि विरोधकांचे मनसुबे उधळले गेले.
दरम्यान, दै. ‘सामना’वर विविध आरोप ठेवून दंगल भडकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या ओरापावर प्रहार करताना बाळासाहेब म्हणाले की, देशप्रेम वाढीस लावणे हा जर गुन्हा ठरत असेल तर तो मी जिवाच्या अंतापर्यंत करीन. या दंगलीबद्दल एकूण ३२जणांना टाडाखाली अटक करण्यात आली. शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांना रासुकाखाली स्थानबद्ध करण्यात आले. त्यांच्यासह इतरांवर बेकायदा शस्त्रास्त्र बाळगण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. ठाण्यात आनंद दिघे यांना देखील अटक करण्यात आली होती. दोघांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबई-ठाण्यात शिवसेना-भाजपाने बंद पुकारला. शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवत सुटका केली.
मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच १२ मार्च १९९३ रोजी मुंबई बॉम्बस्फोटांनी हादरली. अवघ्या तीन-साडेतीन तासांत मुंबईतील शेअर बाजार, एअर इंडिया, शिवसेना भवन परिसर, प्लाझा सिनेमा, सेंच्युरी बाजार, वरळी पासपोर्ट कार्यालय, ओबेरॉय हॉटेलजवळ, सेंटॉर हॉटेल, सी-रॉक हॉटेल अशा एकूण १३ ठिकाणी प्रचंड बॉम्बस्फोट झाले. मुंबईत सर्वत्र हाहाकार माजला. जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईकर भयभीत झाले. प्रसंग बाका होता. मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगत होते. अशावेळी जिवाची बाजी लावून शिवसैनिक मुंबईकरांचे रक्षण करण्यासाठी सरसावले होते. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख मुंबईकरांच्या मदतीला धावून आले. जवळजवळ ५०० मृत आणि हजारोजण जखमी झालेले होते. जखमींना रक्त देण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रक्तदान केले. मुंबईतील बॉम्बस्फोटामागे पाकिस्तान आहे, असा निष्कर्ष सरकारने काढला. काही लोकांची धरपकड झाली आणि खटलाही सुरू झाला. शिवसेनेमुळे मुंबईतील हिंदूंच्या जिवाचे आणि मालमत्तेचे रक्षण झाले. शिवसेनेमुळे मुंबईकर वाचले. मुंबईकरांचा शिवसेनेवर विश्वास होताच. तो वृद्धिंगत झाला.
अयोध्येतील वादग्रस्त वास्तू ६ डिसेंबर १९९२ला तोडल्यानंतर आणि जानेवारी १९९३ झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांची नेमणूक केली. १९९२-९३ बॉम्बस्फोट प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र व राज्य सरकारच्या कायदा व सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले. बाबरी मशीद प्रकरणी पंतप्रधानांवर ठपका ठेवला गेला. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला गेला. यावेळी शिवसेनेचे खासदार मोहन रावले हे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या वेळी गैरहजर राहिले म्हणून त्यांच्याकडून शिवसेनाप्रमुखांनी खासदारकीचा राजीनामा घेतला. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. खा. रावलेंनी गैरहजेरी प्रकरणी योग्य खुलासा केल्यानंतर आणि माँसाहेबांच्या मध्यस्थीमुळे काही वर्षांनंतर सेनाप्रमुखांनी त्यांना माफ केले.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर

शिवसेना पदाधिकार्‍यांचे अधिवेशन मराठवाड्यात १९९३च्या अखेरीस झाले. त्यावेळी बोलताना शिवसेना नेते मनोहर जोशी म्हणाले, नामांतराचा पुरस्कार करणार्‍यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवू नये. शिवसेनेचा नामांतरास विरोध आहे. बौद्ध समाज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध नाही. परंतु मराठवाड्याचा इतिहास जपलाच पाहिजे. शासनाने हा विषय पुन्हा उकरून काढू नये, अन्यथा येथे जातीय तणाव निर्माण होईल. शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यातील जनतेला पाठिंबा देण्यासाठी १८ डिसेंबरला मराठवाडा बंदची घोषणा केली, तर रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे गटाने १७ डिसेंबरपर्यंत नामांतर न झाल्यास ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा दिला. हळूहळू मराठवाडा तापू लागला. नामांतर विरोधी समितीने शिवसेनेच्या मराठवाडा बंदला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि शिवसेनाप्रमुखांनी पुन्हा एकदा घोषणा केली की ‘नामांतर विरोधकांवर गोळीबार झाल्यास महाराष्ट्र बंद करू.’ पैठणच्या संतपीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, अशी सूचना बाळासाहेबांनी केली आणि त्या सूचनेस ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांनी संभाजीनगर येथे पाठिंबा दिला.
शिवसेनेने जाहीर केल्याप्रमाणे १८ डिसेंबर, १९९३ रोजी संपूर्ण मराठवाडा बंद झाला. या बंदला फार मोठा प्रतिसाद मिळाला. रस्ते बंद झाले, गाड्या बंद झाल्या, सारे काही बंद. दलित-सवर्ण यांच्यात कोठेही संघर्ष झाला नाही. या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार आणि बाळासाहेबांची भेट झाली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मराठवाड्याचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांनी पुन्हा एकदा जाहीर केले की त्यांची नामांतरविरोधाची भूमिका कायम आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनीसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली, परंतु बाळासाहेबांनी त्यांना स्पष्टच सांगितले की कोणत्याही परिस्थितीत नामांतर होऊ देणार नाही. बहुजन समाजवादी पक्षाचे नेते काशीराम मुंबईत आले असता त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि ते म्हणाले, महाराष्ट्रात नामांतर पुरेसं नाही, सत्ताच हवी. नामांतरवादी आणि नामांतरविरोधी यांच्यातील वाद सुरूच राहिला. पण नंतर शिवसेनाप्रमुखांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हा वाद संपुष्टात आणला आणि मराठवाड्यातील जनजीवन पूर्वपदावर आले.

Previous Post

व्यंगचित्रांतून बोचर्‍या गोष्टी मार्मिक पद्धतीने पोहोचतात

Next Post

कोल्हापूर दंगलीचे मास्टरमाइंड कोण?

Next Post
कोल्हापूर दंगलीचे मास्टरमाइंड कोण?

कोल्हापूर दंगलीचे मास्टरमाइंड कोण?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.