सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
झुरळांची दखल कशाला घ्यायची?
प्रश्न : सोमी ताई, आपण सोशल मीडियावर काही लिहिले, मग ते लेखन असो किंवा कोणाला दिलेली प्रतिक्रिया असो, त्यावर सतत हिणकस टिपणी करणारे, पाचकळ विनोद करणारे कोण ना कोण असतेच. या लोकांचे करायचे काय?
उत्तर : सखे, तुला कधी गाडी चालवताना रस्त्यावर झुरळ दिसले आहे का? जवळपास कधीच दिसले नसेल. याचा अर्थ रस्त्यावर झुरळे नसतात असा होतो का? रस्त्यावर, गटारीशेजारी झुरळे ही असतातच असतात. पण आपल्या डोळ्यांनी आणि मेंदूने त्यांना इतके अदखलपात्र समजलेले असते की अशा क्षुल्लक किड्यांची ते दखल देखील घेत नाहीत. हे हिणकस टिपणी करणारे, पाचकळ प्रतिक्रिया देणारे म्हणजे सोशल मीडियावरची झुरळेच आहेत. या क्षुल्लक, अदखलपात्र जीवांची दखल न घेण्याची सवय तुझ्या डोळ्यांना आणि मेंदूला लाव.
– दखलपात्र सोमी
त्या आईबापांना धडा शिकवणार!
प्रश्न : सोमी ताई, रोज उठून आपल्या लेकरांची जाहिरात करणारे, त्यांच्या नावावर काहीही खपवणारे माय बाय पाहून राग येत नाही का?
उत्तर : स्वतःच्या पोरा-बाळांच्या बाललीलांचा दिवसभर सचित्र, चलचित्र आणि शब्दचित्र ह्याद्वारे रतीब घालणार्या आणि त्यात इतरांना टॅग करून त्यांचा मानसिक छळ करणार्या आईबापांचा सूड उगवायचे मी आता शेवटी ठरवलेले आहे. हा सूड दोन प्रकारे उगवण्यात येणार आहे –
१) ताबडतोब
२) भविष्यकालीन
१) ताबडतोब :- ना तारीख, ना सुनवाई, सिधा इन्साफ! वो भी ताबडतोब!
माझ्या आई-वडिलांच्या नावाने एक फेसबुक खाते बनवायला घेतले आहे. ह्या खात्यावरून फक्त आणि फक्त माझे कौतुक सोहळेच आयोजित केले जातील आणि त्यात ह्या सगळ्या छळवादी आईबापांना पोस्ट आणि कमेंट अशा सर्वच ठिकाणी टॅग केले जाईल.
नमुन्यादाखल काही कौतुक सोहळे :-
अ) माझा जन्म झाल्या झाल्या माझ्या दर्शनाला पर्जन्यराज कसा आला आणि महाराष्ट्रातील दुष्काळ कसा हटला.
ब) लहानपणी मला खांद्यावर, मांडीवर खेळवणार्या वृद्धांचे सांधेदुखी, गुडघेदुखी, टेनिस एल्बो हे रोग आपोआप कसे बरे झाले.
क) लहानपणापासूनच मला पडणार्या चौकस प्रश्नांनी आणि माझ्या बुद्धिमत्तेच्या तेजाने शंकराचार्य देखील कसे प्रभावित झाले.
ड) बालवाडीतच माझ्या शिक्षकांनी, ‘खरेतर ह्यांच्या चरणाशी बसून शिकण्याची आमची लायकी, पण आज ह्यांचे शिक्षक म्हणवले जातोय, हे अहो भाग्य!’ असे भरल्या डोळ्यांनी कसे बोलून दाखवले होते.
इ) एकदा सहज अंघोळ करताना मी लावलेला ‘साऽऽ’ ऐकून घराबाहेरून चाललेल्या लतादीदी अक्षरश: धावत्या गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पळत कशा आल्या होत्या.
ई) शाळेच्या स्नेहसंमेलनातील नाटकात माझा अभिनय बघून अमिताभ बच्चन कसा भारावला होता, आणि त्याने ‘अय साला… अच्छा हो गया के तू इतने देर से पैदा हुआ अंय!!’ असे उद्गार कसे काढले. विनोद खन्ना माझा हा अभिनय पाहून सरळ ओशो आश्रमात कसा दाखल झाला.
क) खेळ, चित्रकला, व्यायाम इ. सर्व प्रकार शाळेच्या शर्टात करणे कसे अवघड असते हे मी शाळेच्या कमिटीला पटवून दिल्यावर, टी-शर्टचा मार्ग कसा शोधला गेला.
ख) सकाळी मी अथर्वशीर्ष म्हणायला माझ्या धीरगंभीर आवाजात सुरुवात केली, की आजूबाजूच्या मशीदीतले भोंगे देखील बंद करून ‘ते लोक’ कसे मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहायचे.
ग) माझ्याकडून ‘ओरिगामी’ शिकण्यासाठी अवचट किती धडपडले.
घ) माझ्या बालकवितांचा ढाचा पुढे जाऊन अनेकांच्या चरितार्थाचे साधन अर्थात, ‘चारोळी’ म्हणून कसा प्रसिद्ध झाला.
च) मी घरासाठी बनवलेले आराखडे पुढे शहर नियोजन समितीच्या कसे उपयोगाला आले.
छ) वर्गातल्या सेक्रेटरीविरुद्ध मी मैदानभर काढलेल्या सायकलफेरीवरून अडवाणींना रथयात्रेची प्रेरणा कशी मिळाली.
ज) मिसाइल मॅन कलामांनी माझी घेतलेली भेट आणि मी त्यांना नटराजची पेन्सिल दाखवून मिसाइलच्या निर्मितीचा दाखवलेला मार्ग. इ. इ.
२) भविष्यकालीन :- हा उपाय अत्यंत खडतर आणि धीराची परीक्षा बघणारा असेल. सर्व छळवादी आई-बापांची एक एक्सेलशीट बनवली आहे. ते ज्या ज्या बाललीला भिंतीवरती रंगवत जातील, त्या त्या मी कॉपी
पेस्ट करून ठेवायला सुरुवात केली आहे. अजून काही वर्षांनी ह्यांची पोरं जेव्हा सोशल मीडियावर पदार्पण करतील, तेव्हा ह्याच पोस्ट वापरून मी त्यांचा सूड उगवणार आहे.
एखाद्याच्या पोरीने, ‘क्ष् हॉटेल अमके तमके’ अशा शीर्षकासह खाद्यपदार्थांचे फोटो टाकले, की लगेच मी खाली त्याच्या आई-बापाची ‘आज सोनूची कढी पातळ.. राजकन्या जुलाबाने हैराण’ ही जुनी पोस्ट सचित्र प्रतिक्रिया म्हणून टाकून देणार.
एखाद्याच्या पोराने स्वत:चा सेल्फी टाकला, की लगेच खाली त्याच्या आईबापाने काही वर्षापूर्वी टाकलेला त्याचा लहानपणीचा साडीतला फोटो प्रतिक्रियेत हजर!
मग ही पोरंच आईबापाचा जो सूड उगवतील तो माझ्या मनाला किती किती कोमल गुदगुल्या करेल बरे.
– डूख धरलेली सोमी
संसार म्हणजे श्रद्धा और सबुरी!
प्रश्न : सोमी, आजकाल माझी आणि माझ्या नवर्याची सतत भांडणे होतात. सोशल मीडियावर देखील कधी कधाr टोमणे मारले जातात. सगळ्याचा नुसता वैताग आला आहे.
उत्तर : प्रिय सखे, प्रेम हे प्रेम असते. प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यातला खरेपणा लक्षात घेणे महत्त्वाचे असते.
एका गावात एक वृद्ध जोडपे राहायचे. लेकरं बाळं नव्हती, कोणाचा पाश नव्हता, मागे कुठली इच्छा आकांक्षा उरलेली न्हवती. देवाचे चिंतन करत दोघे म्हातारपणीचे आयुष्य जगत होते. एक दिवशी म्हातारा अचानक भयंकर आजारी पडला आणि अंथरुणाला खिळला. वैद्याचे उपचार चालू होते पण त्याला दाद काही मिळत नव्हती, बघता बघता म्हातारा प्रचंड खंगला आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळला. आता म्हातार्याची दिवसाची सर्व कामे अंथरुणात होऊ लागली. इतकी वर्ष घराचे रहाटगाडगे ओढलेल्या बायकोला आता आपले देखील सर्व करावे लागते ही खंत म्हातार्याला डाचायला लागली. बघता बघता सहा महिने गेले, पण म्हातार्याच्या तब्येतीत काही फरक पडेना. म्हातारी मनाशी म्हणाली, ’देवा असा धडधाकट गडी अचानक अंथरुणाला खिळला आणि बघता बघता परावलंबी झाला. कधी त्याने स्वतःचे कपडे देखील मला धुवायला लावले नाहीत आणि आज त्याची ही अशी अवस्था झाली आहे. त्याची ही अवस्था, त्याचा मानसिक त्रास मला बघवत नाही आहे, देवा मला माफ कर पण गेले तीन महिने वैद्य जे औषध देत आहेत, त्यात मी थोडे थोडे विष घालते आहे, जे असेल ते पाप मला लागो, पण माझ्या नवर्याची ह्या त्रासातून सुटका होवो.
तिकडे म्हातारा देवापाशी धावा करत म्हणतो, ’परमेश्वरा, माझ्या बायकोने मला, ह्या घराला कधी काही पडू दिले नाही. कधी काही मागितले नाही का कसला कधी हट्ट धरला नाही. जे दोन पैसे हातात ठेवले त्यात तिने घर चालवून दाखवले. कधी दुखण्याची पर्वा केली नाही, कधी कामाची तक्रार केली नाही. पोटाला लेकरू नाही म्हणून कधी खंतावली नाही. आज ह्या वयात तिला घरात देखील राबावे लागते आहे आणि माझे दुखणे देखील निस्तरावे लागत आहे. मला तिचे हाल आता बघवत नाहीत देवा. जे काय पाप लागायचे ते लागो, पण गेली तीन महिने ती जे औषध वैद्याकडून आणून देत आहे, ते मी तिच्या नकळत फेकून देतो आहे. मी लवकर गेलो तर तिचा त्रास लवकर कमी होईल. समजले काही?
– समजूतदार सोमी
सल्ला नव्हे हल्ला!
प्रश्न : मला लोकांना सल्ले द्यायला फार आवडतात. मी काय करू?
उत्तर : मिस्टर क्ष, आपण स्त्री आहात का पुरुष आहात ही कल्पना नाही त्यामुळे दोन्ही पर्याय देत आहे.
स्त्री असल्यास खालील सल्ले सुरू करावेत-
१) साडी नेसून कुकर कसा लावावा.
२) साडी नेसून रांगोळी कशी घालावी.
३) साडी नेसून प्युरिफायर कसा सुरू करावा.
४) साडी नेसून मुलांचा अभ्यास कसा घ्यावा.
५) साडी नेसून पाणीपुरी कशी खावी.
पुरुष असल्यास खालील सल्ले सुरू करावेत-
१) पँटवर धोतर कसे नेसावे.
२) धोतर नेसून झाडांना पाणी कसे घालावे.
३) अर्ध्या पँटवर फुल पँट कशी घालावी.
४) गाडी स्टँडला कशी लावावी.
५) फोन फ्लाईट मोडवर कसा टाकावा.
आजकाल असे सल्ले देणारे फार कोणी उरलेले नाही आणि लोक त्यांना फार मिस करत आहेत.
– सल्ला देऊन गार करणारी सोमी