शालेय उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरू झाला की बहुतांश कुटुंबांची पावले देश-विदेशातील थंड हवामानाच्या, निसर्गरम्य स्थळांकडे वळतात. काही सह्याद्रीच्या डोंगरदर्यांत, काही उत्तर भारतातील हिमालयीन वळणांवर. मात्र, आपल्या घराच्या अगदी जवळ म्हणजेच ठाणे, ऐरोली आणि भांडुप खाडीत हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले परदेशी पाहुणे (गुलाबी फ्लेमिंगो) रोज हजारोंच्या संख्येने गर्दी करत असताना, त्यांचं स्वागत करण्यास स्थानिक लोक मात्र तितकेसे उत्सुक दिसत नाहीत.
या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ दृश्याकडे केवळ पक्षीप्रेमी किंवा वन्यजीव छायाचित्रकारच लक्ष देताना दिसतात. एकंदरीतच ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील स्थानिक नागरिक, शाळा, पर्यटक आणि प्रशासन या निसर्गदत्त ठेव्याच्या संवर्धनाच्या आणि अनुभवाच्या संदर्भात उदासीन राहात असल्याचे चित्र आहे.
फ्लेमिंगोंचे आगमन
हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या प्रारंभी दरवर्षी हजारो फ्लेमिंगो पक्षी भारतात स्थलांतर करतात. यातील मोठा गट ठाणे खाडी, ऐरोली खाडी, भांडुप आणि वाशीच्या पाणथळ जागांमध्ये दरवर्षी दाखल होतो. गुलाबी, थोडेसे पांढर्या छटेचे हे पक्षी– ज्यांचे शेकडो थवे खाडीकिनार्यावर झुडुपांमध्ये किंवा पाण्यात उभे असताना दिसतात. त्यांचे हे दृश्य केवळ देखणे नसून, जैवविविधतेचे अमूल्य उदाहरण आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर वेगाने धावत आकाशात झेप घेणार्या फ्लेमिंगोंचं सामूहिक उड्डाण वा त्यांच्या थव्यांचं प्रतिबिंब खाडीच्या निळसर पाण्यात पडणं, हे पाहणं म्हणजे एक आनंददायी अनुभव. अनेक ठिकाणी लोक हे दृश्य पाहण्यासाठी हजारो रुपये मोजून पर्यटनस्थळांवर जातात, परंतु मुंबईच्या अगदी शेजारीच असलेलं हे निसर्गवैभव मात्र दुर्लक्षित राहात आहे.
जैवविविधतेचं माहेरघर
फ्लेमिंगोप्रमाणेच, या खाडीत दरवर्षी ब्लॅक ड्रोंगो, ब्राह्मणी स्टार्लिंग, पांढरा फँटल, ग्रीन व्हार्बलर, ग्रे हेरॉन, ब्राह्मणी घार, किंगफिशर यासारख्या साठहून अधिक प्रजातींचे स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी येतात. याशिवाय, सागरी वनस्पती, मासे, कासव आणि इतर जलचर प्राण्यांचाही येथे वावर असतो. खारफुटीच्या झाडांनी घनदाट झालेल्या परिसरात जैवविविधतेची एक संपूर्ण परिसंस्था तयार झालेली आहे. या परिसंस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणजे, ती नैसर्गिकरित्या समुद्रकाठच्या शहरांना त्सुनामी किंवा महापुरासारख्या आपत्तींपासून संरक्षण देण्याचं काम करते. पण दुर्दैवाने, शहराचा विस्तार, बांधकामांची वाढ, प्रदूषण आणि उदासीनता यामुळे हे निसर्गसंपन्न ठिकाण उपेक्षित बनत आहे.
फ्लेमिंगो सँक्च्युअरी
ऐरोली खाडी परिसरात जर्मन सरकारच्या सहकार्याने उभी करण्यात आलेली फ्लेमिंगो सँक्च्युअरी ही जागतिक दर्जाची सुविधा आहे. येथे बोट सफारीद्वारे पर्यटकांना ७–१० किलोमीटर अंतरावर खाडीतून पक्षीनिरीक्षणाचा अनुभव घेता येतो. छोटेखानी माहिती दालनात फ्लेमिंगो, व्हेल, शार्क मासा, किंगफिशर आदी प्राण्यांची माहिती, त्यांच्या आवाजासह ऐकता येते. विद्यार्थ्यांसाठी, निसर्गप्रेमींना व पक्षी निरीक्षकांसाठी हे एक खजिनाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना स्वतः येथे भेट देऊन पक्षीनिरीक्षण केलं होतं, फोटो काढले होते.
स्थानीय उदासीनता
एकीकडे सरकार पुरेशा सुविधा देत नाही, शाळा आणि शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना सहलीसाठी येथे नेत नाहीत, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. सोशल मीडियावर जंगल सफारी, वॉटरफॉल ट्रेक्स, किंवा परदेशी पक्ष्यांचे रील्स पाहणारी तरुण पिढी आपल्या घराजवळ असलेल्या या खजिन्याकडे पाठ फिरवत आहे. दररोज केवळ १–४ वेळाच बोट सफारी होते, ती देखील पर्यटकांअभावी कधी रद्द होते. रविवारी काहीशी वर्दळ असली तरी ती अत्यल्प. फ्लेमिंगो पाहण्यासाठी होणार्या पर्यटनाला ‘सस्टेनेबल इको-टुरिझम’ म्हणून विकसित करता येऊ शकते. पण त्यासाठी स्थानिक स्तरावर प्रबोधन, योजना, आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. फ्लेमिंगोंना दरवर्षी हे ठिकाण आकर्षित करतं, पण आपल्या लोकांना मात्र त्यांचं सौंदर्य, पर्यावरणातलं महत्त्व, आणि पर्यटनमूल्य दिसत नाही. ही स्थिती बदलायला हवी. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यावरणप्रेमी, शिक्षक, पालक आणि युवकांनी पुढाकार घेतला, तर ठाणे-ऐरोलीची खाडी ही केवळ मुंबईची नाही, तर भारताच्या पर्यावरण-संवेदनशील पर्यटनस्थळांपैकी एक ठरेल, यामध्ये शंका नाही.
अप्रतिम अनुभव
‘मी माझ्या मुलीसोबत येथे आलो होतो. फ्लेमिंगो आणि इतर पक्षी पाहणं हा एक अप्रतिम अनुभव होता. शहराच्या इतक्या जवळ निसर्गाचा असा कोपरा आहे, हे अनेकांना माहीतही नाही. सोनेरी कोल्हाही पाहायला मिळाला, ही तर बोनस भेटच! शासनाने येथे आणखी चांगल्या सोयी-सुविधा द्यायला हव्यात.’ – भरत मोरे (पर्यटक ठाणे)
– डॉ. प्रशांत सिनकर