दारा सिंग यांच्यामुळे त्या काळात अनेक तरुण कुस्तीकडे वळले. मला हे चित्रपटांचे सकारात्मक परिणाम वाटतात. म्हणूनच दारा सिंग हे मला अभिनय करणारे नट नाही तर प्रत्यक्ष जीवनातले खरेखुरे नायक वाटतात.
– – –
लहानपणापासून मी अनेकांकडून ऐकले आहे की, ‘सिनेमामुळे मुलं बिघडतात.’ त्यापूर्वी असे म्हटले जाई की नाटक वा तमाशामुळे मुलं बिघडतात. त्याही पूर्वी असे म्हटले जाई की नवीन शिक्षणामुळे मुलं बिघडतात… मला पडलेला प्रश्न असा आहे की नाटक, तमाशा, सिनेमा वगैरे वगैरे कला १८व्या शतकापासूनच्या आहेत. मग त्यापूर्वी माणसं, मुलं बिघडतच नव्हती का? भारतीय परंपरेनुसार सध्या आपण कलियुगात आहोत. म्हणजे वाईट युगात. आणि असे म्हणतात की कलियुग अर्जुनाचा नातू परीक्षित याच्यापासून सुरू झाले. म्हणजे आम्ही थेट महाभारताच्या पर्वापर्यंत पोहोचतो. तेव्हा असे काय होते की माणसे वाईट होती?
चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात अधिकांश चित्रपट पौराणिक व धार्मिक विषयांवरील होते, म्हणून त्या काळात सर्व समाज खूप तत्ववादी आणि शुद्ध आचरणाचा होता हे म्हणणे हास्यास्पद आहे. असो. मुद्दा हा की चित्रपट बघून माणसांवर वाईट संस्कार होतात का? मला तसे वाटत नाही. तसे असते चित्रपटगृहात रोज हजारोंनी जाणार्या प्रेक्षकातील सर्वचजण वाईट संगतीला लागले असते. चित्रपटातील वास्तव आपल्या सभोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब असते. ते मनोरंजक व रोचक पद्धतीने मांडले जाते, कारण चित्रपट हा एक व्यवसाय देखील आहे.
१९५० ते ७० या कालखंडाला चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग म्हटले जाते. या कालखंडात चित्रपटाच्या जादूच्या पेटार्याने सगळ्यांनाच सामावून घेतले. राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंदपासून राजेंद्र कुमार, प्रदीपकुमार, भारत भूषण, बलराज साहनी, मोतीलाल, अशोक कुमार, प्राण, धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना वगैरेपर्यंत किती विविध अभिनेत्यांना प्रेक्षकांनी स्वीकारले. कुठेच दुजाभाव केला नाही. या सर्वांचे धुमशान चालू असताना एका वेगळ्या चेहर्यालाही या मायावी नगरीची ओढ लागली होती. खरं तर हा खराखुरा नायक होता. ६ फूट २ इंच उंच, १२७ किलो वजन आणि ५३ इंचाची भरदार छाती. कोरीव चेहरा अन् डोक्यावरचे किंचित कुरळे केस. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी हा शड्डू ठोकून आखाड्यात उतरला आणि मग एक प्रदीर्घ युग सुरू झाले.
अमृतसर जिल्ह्यातील धरमूचक या गावातल्या हरनामसिंग या गुरूच्या पठ्ठ्याने १९४८मध्ये थेट सिंगापूर गाठले. कशाला? तर कुस्तीतले आव्हान स्वीकारायला. अतिशय सुंदर देहयष्टी लाभलेला हा तरुण म्हणजे या लेखाचा नायक दारा सिंग. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच खरे तर दाराचा डंका जगभर वाजलेला. आमच्या पिढीत तर कुणी फार दांडगाई करू लागला की त्याला म्हणत, ‘स्वत:ला काय दारा सिंग समजतोस का?’ पुढील दोन पिढ्या हा डायलॉग सुरू होता. १९५२पर्यंत जगभर आव्हाने देत व घेत दाराने नामांकित कुस्तीपटूंना धूळ चारली. मलेशियन चॅम्पियन तरलोक सिंग याला कौलालंपूरमध्ये हरवून मलेशियायी कुस्ती चॅम्पियन जिंकली. १९५४ साली भारतात येऊन ते येथे चॅम्पियन झाले. ऑस्ट्रेलियाचा विश्व चॅम्पियन किंगकाँग याला राजस्थानमध्ये धूळ चारली. २०० किलो वजनाच्या किंगकाँगला या बहाद्दराने रिंगबाहेर उचलून फेकले होते. कलकत्ता येथे झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत कॅनडाचा चॅम्पियन जार्ज गार्डियांका आणि न्यूझीलंडच्या जोन डिसिल्व्हाला याने आसमान दाखवले. जगात जिथे जिथे म्हणून फ्री स्टाईल कुस्त्या होत, त्या प्रत्येक देशाचा दौरा दाराने केला आणि जिंकत राहिला. सरते शेवटी अमेरिकेचा जगज्जेता फ्री स्टाईलपटू लाऊ थेज याला २९ मे १९६८ रोजी त्याच्याच देशात धूळ चारून दारा जगज्जेता बनला. दाराने कुस्तीच्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत ५०० लढती लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या. १९८३मध्ये आपली शेवटची लढत जिंकून तेव्हाचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते ‘अपराजेय पहिलवान’ हा पुरस्कार घेऊन सन्मानाने दारा सिंग निवृत्त झाला. तर असा खरोखरचा नायक १९५२मध्ये रुपेरी पडद्याकडे वळला.
मी दारा सिंगला अभिनेता म्हणत नाही, ते यासाठीच. कारण तो खरोखरचा नायक होता. त्याचं व्यक्तिमत्वच असं होतं की सिनेमात खास त्याच्यासाठी भूमिका लिहिल्या गेल्या. १९५२मध्ये आर. सी. तलवार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘संगदिल’ या चित्रपटाद्वारे दारा सिंग रुपेरी पडद्यावर अवतरला. या चित्रपटात दिलीपकुमार व मधुबाला मुख्य भूमिकेत होते. नंतर १९५५मध्ये आलेल्या ‘पहली झलक’ या चित्रपटात ते पहलवान दारा सिंग म्हणूनच अवतरले. १९६२मध्ये आलेल्या ‘किंगकाँग’ने मात्र ते प्रसिद्धीस आले. बाबूभाई मिस्त्री, ज्यांना भारतीय स्पेशल इफेक्टचे पितामह म्हटले जाते, ते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. दारा सिंग जरी जगज्जेते पहिलवान असले तरी स्वभावाने मात्र एकदम शांत. कधीच कुणाला त्रास देत नसत. मनमिळावू स्वभावाचे. त्यात दिवसरात्र कितीही काम करून घ्या, ते थकत नसत. त्यामुळे अनेक व्यावसायिक निर्मात्यांना दारा सिंग त्यांच्या सिनेमात हवे असत. पण एक अडचण असायची ती मुख्य अभिनेत्रीची. दारा सिंगबरोबर काम करण्यास बहुतेक नट्या उत्सुक नसत. त्याने अगदी हलके जरी थप्पड लगावली तर काय होईल ही चिंता. त्यामुळे ए ग्रेडच्या अभिनेत्री तर तयारच होत नसत.
कुमकुमबरोबरचा किस्सा तर त्या काळी बराच गाजला. एका चित्रपटात दारा सिंगला तिच्या गालावर चापट मारायची होती. दिग्दर्शकाने हळू मारा अशी सूचना दिलीही होती. मात्र प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी दाराच्या हाताचा जोर थोडा अधिक झाला असावा. लोखंडी हातच तो… कुमकुम कोसळली. बर्याच वेळाने शुद्धीवर आली. दारा सिंगबरोबर हेलेन, मुमताज, कुमकुम, निशी वगैरेसारख्याच अभिनेत्रींनी काम केले.
वडील सुरतसिंग रंधावा आणि आई बलवंत कौर यांनी दाराचे खूपच कमी वयात आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न लावून दिले होते. त्यात आईने प्रेमापोटी बदाम, दूध, तूप खूप खाऊ घातले. परिणामी १७व्या वर्षीच दारा एका मुलाचा पिता झाला. प्रद्युम्न हे त्याचे नाव. त्यांचा लहान भाऊ सरदारा सिंग हादेखील कुस्तीगीर झाला. दोघांनी मिळून आपल्या गावाला भरपूर इनाम जिंकून दिले. पुढे दाराचा लहान भाऊदेखील चित्रपटात रंधावा या नावाने काम करू लागला. दारा सिंग देशभर खरा ओळखला गेला तो हनुमानाच्या भूमिकेमुळे. प्रेक्षकांनी या हनुमानावर भरपूर प्रेम केले. दारा सिंगचा हनुमान, जीवनचा नारद मुनी, शाहू मोडकांचा विष्णू आणि कृष्ण, त्रिलोक कपूरचा महादेव, इफ्तेखार आणि जगदीश राज यांचा पोलीस इन्स्पेक्टर हे सर्व चित्रपटसृष्टीतले खास मानदंड होते. प्रेक्षकांना दाराचा अभिनय बघण्यात विशेष रस नव्हताच कधी. ज्यांनी दारा सिंगची प्रत्यक्ष कुस्ती कधीच बघितली नव्हती, त्यांच्यासाठी दाराचे चित्रपट हा एक खजिनाच होता. त्यांचा हनुमान बघताना लहानमोठे सर्वच प्रचंड खूष होत असत. थिएटरमध्ये प्रचंड आरडाओरड. एकेकाला सहज दोन्ही हाताने उचलून जेव्हा दारा फेकत, तेव्हा प्रचंड शिट्या वाजत. त्या काळातील ते एक आयकॉन होते. पडद्यावरील त्याचे शक्तिप्रदर्शन बघताना प्रेक्षकांचे तोंड तो प्रसंग संपेपर्यंत आ वासलेलेच राही. दारा सिंगने त्याचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला होता यात वादच नाही. जवळपास शंभर एक चित्रपटात दाराने भूमिका केल्या. अभिनेता धर्मेंद्र त्यांचा खास मित्र.
मला आठवते १९६९चे वर्ष होते. माझ्या शहरात म्हणजे नांदेडला शिवाजी महाराजाच्या पुतळ्याशेजारीच ‘अप्सरा’ नावाची एक बर्यापैकी मोठी लॉज होती, म्हणजे आजही असावी. या लॉजच्या मागे माझा वर्गमित्र कालूराम यादव राहात असे. त्याच्या घराला खेटूनच प्रभात टॉकीज नावाचे चित्रपटगृह होते (आता हे आहे की नाही माहित नाही). तर एक दिवस मी या मित्राच्या घरी जायला निघालो. शिवाजी पुतळ्याजवळ आलो, तर तेथे लोकांची प्रचंड गर्दी. खरं तर निवडणुका वगैरे नव्हत्या आणि मोर्चाही दिसत नव्हता. मीही गर्दीत जाऊन उभा राहिलो. शेजारच्याला विचारले की ही गर्दी कशाची? तो म्हणाला, समोरच्या लॉजमध्ये प्राण आणि दारा सिंग उतरले आहेत. त्यांची झलक दिसावी म्हणून ही गर्दी होती. माझे तर दोन्हीही आवडीचे. मग मीही तिथेच थांबलो. बर्याच वेळानंतर प्राण यांनी गॅलरीत येऊन सर्वांना हात केला. माझ्या आयुष्यात मी पहिल्यादांच चित्रपटातील अभिनेत्याला त्या दिवशी बघितले. जीव अगदी आनंदून गेला. नंतर समजले की दोन दिवस एका चित्रपटाचे शूटिंग नांदेडला होणार आहे आणि त्यासाठी हे दोघे आले आहेत. मग दोन दिवस माझ्यासाठी आनंदाला पारावार नव्हता.
दुसर्या दिवशी एका गल्लीत चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. प्राण तर ओळखायलाच आले नाहीत. एका शीख साधूच्या मेकअपमध्ये ते होते. कॅमेर्याच्या मागे दारा सिंग. मला आताही त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे स्पष्ट आठवते… ‘नानक दुखिया सब संसार’… महेंद्र कपूर गायक होते. नांदेडच्या विविध भागात याचे चित्रीकरण झाले. स्वत: दारा सिंग या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक होते. आयुष्यात बघितलेले पहिले चित्रपट शूटिंग… पुढे जवळपास वर्षभरानंतर हा चित्रपट नांदेडला प्रदर्शित झाला. ‘नानक दुखिया सब संसार’ हा पंजाबी चित्रपट बघायला तोबा गर्दी झाली. अनेकांना वाटले आपण नक्की कुठे ना कुठे तरी दिसणार. पण संकलन नावाची कात्री तेव्हा कोणालाच माहित नसल्यामुळे अनेकांचा हिरेमोड झाला.
दारा सिंग यांनी कुस्तीची कारकीर्द बहरत असताना आपल्या आवडीच्या सुरजित कौर या एम.ए. पास मुलीशी लग्न केले. दुसर्या पत्नीपासून त्यांना तीन मुली व दोन मुले झाली. यातील विंदू दारा सिंग हाही चित्रपटसृष्टीत आहे. छोट्या पडद्यावरही दारा सिंग दिसायचे. १९७८मध्ये त्यांनी पंजाबमधील मोहाली येथे दारा स्टुडिओची स्थापना केली. १९९८मध्ये ते भारतीय जनता पार्टीत गेले. २००३ ते २००६ या काळात राज्यसभेत पोहचणारे ते पहिले क्रीडापटू होते. हिंदीतला ‘जब वुई मेट’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट.
त्यांच्यामुळे त्या काळात अनेक तरुण कुस्तीकडे वळले. आपले शरीर दारासारखे असावे म्हणून व्यायामाकडेही अनेक तरुणांचा कल झुकला. मला हे चित्रपटांचे सकारात्मक परिणाम वाटतात. चित्रपटामुळे चांगले संस्कारही होऊ शकतात. या दृष्टीने मला दारा सिंग हे महत्वाचे वाटतात. अभिनय करणारे नट नाही तर प्रत्यक्ष जीवनातले खरेखुरे नायक म्हणून दारा सिंगने काही काळ का होईना चित्रपट माध्यमाद्वारे आमच्या पिढीवर राज्य केले. ७ जुलै २०१२ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. पाच दिवस त्यांनी इथेही लढत दिली. मात्र ५०० लढती जिंकणाऱ्या दाराला ही शेवटची लढत मात्र हरावी लागली.