प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. झिडे गुरुजी यांच्याविषयी आम्ही खूप ऐकून होतो. पण प्रत्यक्षात त्यांची भेट होण्याचा योग आला नव्हता. ते इतके विद्वान आहेत की जगातल्या कोणत्याही गहन समस्येवर ते उपाय सुचवू शकतात एवढेच माहीत होते. नुसतेच उच्चविद्याविभुषित नव्हे, तर जगातल्या मोठमोठ्या नामांकित विद्यापीठाच्या मानाच्या पदव्या त्यांनी पटकावल्या आहेत हेसुद्धा कानावर आले होते. तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची सडसडीत आणि चपळ देहयष्टी नव्वदीच्या आसपास असले तरी व्यायाम, योगासने, ब्रह्मचर्य पालन या सर्वांपेक्षा त्यांचा जिभेच्या दांडपट्ट्याचा थक्क करणारा खेळ अनेकांना तोंडात बोटे घालायला लावतो असे म्हटले जाते. गेल्या आठवड्यात त्यांच्या जिभेच्या दांडपट्ट्याचा सांगलीला शतक महोत्सवी प्रयोग पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आणि आम्ही भयमुक्त झालो. त्यांच्या पांढर्याशुभ्र झुबकेदार मिशांविषयी अनेकांना आजही आकर्षण आहे. गडकिल्ले अनवाणी चालत पालथे घालण्याची आणि कोणत्याही गौप्यरोगावर उपाय सांगण्याची त्यांची कला अद्भुत आहे. कोणते फळ खाल्ल्याने मुलगा किंवा मुलगी होते हे सांगतात. अथवा मुलगाच हवा असेल तर ते जोडप्यांना कानमंत्रही देतात. मात्र त्यावेळी त्यांच्या झुबकेदार मिशा कानात किंवा नाकात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. असो. त्या शतक महोत्सवी प्रयोगात त्यांच्या जिभेच्या दांडपट्ट्याचे फटके कोरोनासकट इतक्या जणांना बसले की डॉ. झिडे गुरुजी यांना भारतरत्न किताब देऊन नोबेल पारितोषिकासाठी त्यांची शिफारस मोदी साहेबांनी त्यांचे मित्र आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प तात्या यांच्याकडे करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. म्हणूनच त्या दिवशी त्यांच्या प्रयोगानंतर त्यांची मुलाखत घेण्याचा धाडसी प्रयत्न आम्ही केला.
झिडे गुरुजी, परवाच्या प्रयोगात आपण कोरोनाविषयी आणि कोरोनाग्रस्तांविषयी जी अचाट विधाने केली त्याचे सोप्या भाषेत सुटसुटीत स्पष्टीकरण देऊ शकाल का?
– आमचे सगळेच मोकळे ढाकळे असते. अगदी कपड्यांपासून संघ बदलला पण आम्ही बदललो नाही. हाफ पँटीची कसली लाज बाळगायची? लोक म्हणायचे, संघ दक्ष, पोरींकडे लक्ष. पण मी कधी इकडे तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. आजन्म ब्रह्मचारी राहिलो.
आपण कोरोनाविषयी बोलू.
– कोरोना वगैरे असे काही नसतेच. म्हणजे नव्हतेच. म्हणजे नाहीच.
मग त्या रोगाने आज भारतासकट जगात लाखो माणसे मेली आणि मरताहेत ती उचाचच?
– कोरोनाने माणसे मरतात हेच मुळी चुकीचे आहे. माणसे मरतात कारण ती जगण्याच्या लायकीची नसतात म्हणून. मी पुन्हा सांगतो, कोरोना हा रोग नाही. तुम्हाला असे सांगून समजणार नाही. मराठमोळ्या भाषेत सांगतो. हा झांडू, पांडू, गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. तो मानसिक आजार आहे. यामुळे काही होत नाही. कोरोना म्हणजे अंधारात काळे मांजर शोधण्याचा प्रकार आहे. ही जनता बावळट, नेभळट असल्याने कोरोना कोरोना असा आक्रोश चाललाय. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्यावे, सरकारने त्यात लक्ष घालू नये.
लॉकडाऊनची गरज नाही. मास्क हा जगाच्या पाठीवरील नालायक सिद्धांत आहे.
मोहनराव भागवतांना आणि अनेक संघवाल्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक क्षेत्रांतील चांगले लोक दगावले आहेत.
– माणसाचे जगणे मरणे हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते. त्यात सरकारने हस्तक्षेप करणे चुकीचे आहे.
मग यावर जगात जे मृत्यूचे तांडव सुरू आहे, सारा हाहाकार माजला आहे, त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही!
– वाटण्याचा प्रश्नच येत नाही.
मग तुम्ही यावर उपाय सांगा.
– अहो, जो रोगच अस्तित्वात नाही त्यावर उपाय काय सांगणार! तुम्ही पाहिलाय का कोरोना?
कसा पाहणार! तो सूक्ष्म असतो.
– तो नसतोच मुळी. हे कोरोनाचं भूत तुम्ही मूर्ख लोकांनी वेताळासारखं स्वत:च्या मानगुटीवर बसवून घेतलंय. लसी काय घेताय, मास्क काय घालताय, लॉकडाऊन काय करताय. त्यापेक्षा माझा ‘बुद्धीभ्रष्ट’ हा स्वानुभवावर आधारलेला, मला सुटलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा आगामी लेखसंग्रह अवश्य वाचा. मग तुम्हाला पडलेले प्रश्नही सुटतील आणि उत्तरेही.