असाच एकदा मी चाललो असताना माहीम वांद्र्याच्या खाडीच्या नजीक असलेल्या रस्त्यावरच्या खांबावर पोस्टर चिकटवलेली पाहिली. या खांबावर सिनेमाची पोस्टर्ससुद्धा चिकटवली जातात नि इतरही वस्तूंची जाहिरातबाजी केली जाते. जेव्हा माझी नजर या खांबावर गेली तेव्हा मला ‘सत्यकाम’ ही अक्षरं दिसली. या पोस्टर्सवर दुसरं काही चित्रही नव्हतं. नुसतं ‘सत्यकाम’. विचार केला, असेल शिवणकाम – विणकाम – भरतकाम यातला हा प्रकार. नंतर जेव्हा या जाहिरातीची मोठी पोस्टर्स लागलेली पाहिली तेव्हा कुठं समजलं की हा चित्रपट आहे. बरं ते राहू द्या. चित्रपटाला हे नाव कससंच वाटतं. स्टारकास्ट म्हणावी तर धर्मेंद्र, अशोक कुमार, शर्मिला टागोर, संजीवकुमार यांच्यासारखी मोठी. म्हटलं, छे नावावरून हा चित्रपट चालेल की नाही शंका वाटते. फक्त एकच. जे काही चाललंय त्यापेक्षा वेगळं असेल तर गोष्ट वेगळी. आणि जेव्हा मी हे चित्र पाहिलं तेव्हा माझी खात्री पटली की चित्र खरोखरीच चांगलं आहे. ऋषिकेश मुकर्जी या बुद्धिमान दिग्दर्शकाने‘आशीर्वाद’नंतर रसिकांना पुनः एक झकास चित्र दिलंय.
चित्राची कल्पना उभारलीय एक सत्यानं वागणारा, बोलणारा शिकवणारा नि आचरणात आणणार्या एका तरुणाची. त्याचं नाव सत्यप्रिय असतं. ग्रुज्युएट- इंजिनियरला ‘कॉल’ येतो एका पेपर मिलचा. पेपर मिल कसली ती? सारे लोक फाक्या मारीत बसलेले. सत्यप्रियला कामगिरी मिळते एका संस्थानात. तिथं त्याला एक अस्पृश्य वेश्येची मुलगी दिसते. सत्यप्रियच्या स्वभावामुळे ती त्याच्यावर प्रेम करते, पण आपल्यासाठी तो काहीच करू शकत नाही असं दिसल्यावर ती परत जाते आणि संस्थानिकांच्या वासनेला बळी पडते. त्यानंतर सत्य तिच्याशी लग्न करतो. तिला झालेल्या मुलाचा बाप बनतो. पण पुढे सत्याने – प्रामाणिकपणाने वागल्याने त्यांचे कोणाशीच जमत नाही. दुनियेतला खोटेपणा दांभिकपणा पाहून तो स्वतःला त्रास करून घेतो नि एक दिवस कॅन्सरने मरतो. त्याच्या घराण्यातले एकुलते एक आजोबा येतात नि त्याच्या मुलाला अग्निसंस्कार करू देत नाही. पण मुलाच्या तोंडून ‘सत्य’ ऐकल्यावर त्यांना पटतं की घराण्याची परंपरा रक्त चालवू शकत नाही संस्कार चालवत असतात. ते सुनेला नि नातवाला घेऊन जातात. ही गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची नि नंतरच्या काळातली. मध्यंतरापर्यंत वाटतं ‘आता हिंदुस्थान स्वतंत्र होणार आहे’ वगैरे गोष्टी कशाला पाहिजे होत्या? पण नंतर त्याचा उलगडा एका वाक्यात होतो? सत्यचे कॉलेज मित्र चर्चा करीत असतात. आता आपण स्वतंत्र झाल्यावर लाचलुचपत, काळाबाजार, खोटेपणा सारा नाहीसा होईल नाही? पण नंतर सत्यला या गोष्टी कमी नाहीच पण वाढलेल्या दिसतात. चित्रात मिनिस्टरपासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत सार्यांच्या दांभिकपणावर सणसणीत कोरडे ओढलेत. सत्यची कॅरेक्टर रंगविण्यासाठी मध्यंतरपर्यंतचा टाईम घेतलाय, म्हणून प्रेक्षकांच्या डोळ्यात ‘वेगळं काय आहे’ असा प्रश्न येईल, पण पुढे प्रश्नाची उत्तरं मिळतील. यात प्रेमाचा त्रिकोण नाही. व्हिलन नाही. यातला हिरो वाटेल तेव्हा नायिकेच्या कमरेला अजगरासारखा विळखा घालणारा नाही. जिथे बलात्कार करणार असं वाटतं तिथं होत नाही. ऋषिकेश मुकर्जी यांनी दिग्दर्शनांत जी चमक दाखवलीय ती इतरत्र दिसणं कठीण. काही कॅरेक्टर्ससाठी सामान्य इसमांचीच निवड केलीय. मिलच्या ऑफिसातल्या लोकांचं वर्णन पाहून सचिवालयातली आठवण येते. एक मात्र खटकलं, पटकथा लेखकाने प्रत्येक गोष्टीचा इतका तपशील थोडक्यात दिला. मग काही राहून का गेल्या? नायिका संस्थानात केव्हा आली? इतके दिवस ती तशी कशी राहिली? बलात्कार काय केव्हाही होऊ शकला असता? दुसरं, नेहमी ‘पहिल्या फटक्यात’ नायिकेला मूल होतं हे आता पेटंट होऊन बसलंय. हे दोष राह्यला नको होते. धर्मेंद्र-शर्मिला टागोर, अशोक कुमार यांनी कामं चांगली केली असली तरी संजीव कुमार सगळ्यांवर प्रभाव पाडून जातो. बंगालचा विनोदी नट रोबेंदू घोष यांच्यात हिंदी इनोदी नटांसारखा आचरटपणा नाही. जरा शिका लेकांनो! जयवंत पाठारे यांची फोटोग्राफी यशवंत आहे! वो वा, क्या बात है! त्याचप्रमाणे दास घायमाडेनी कात्री झकास फिरवलीय. चित्रात गाण्याला महत्त्व नाही. गाणी फक्त ३च. इंटरव्हलपूर्वी. त्यामुळे इतर चित्रात दिसणारा टा- ट्टा… ला- लला या गोष्टींचा धांगडधिंगा यात नाही. पार्श्वसंगीत हॉरीबल! थोडक्यात, नेहमीचा फाजिलपणा जावा असं तुम्हाला वाटत असेल तर हे चित्र पहा म्हणजे निदान इतरांना आपण काय काढतोय याची कल्पना येईल!
– शुद्ध निषाद