वाढत्या कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन टमाट्याच्या चाळीच्या कमिटीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये चाळीत सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तू आणि भाज्यांचा ओघ सुरू झाला होता. आमदार, नगरसेवक पक्षोपक्षीचे कार्यकर्ते मिळेल तिथून मिळेल ती मदत आणत होते. गंपूतात्यांनी तर पाचशे मास्कचा बॉक्स आपल्या कंपनीच्या मालकांकडून आणला आणि चाळीतील प्रत्येक खोलीतील प्रत्येकाला दोन-दोन मास्कचं वाटप केलं. चाळीतील अत्तराचे शौकीन आणि बरेचसे रंगेल असलेल्या वासूकाकांनी मस्जीद बंदरला जाऊन स्वत:च्या खर्चाने वेगवेगळ्या सुगंधी स्वादाच्या सॅनिटायझरच्या सहा इंची तीनशे बाटल्या आणल्या आणि सर्व प्रथम सर्व वयोगटातील स्त्री वर्गाला घरोघरी जाऊन वाटल्या. गुलाब, मोगरा, चमेली, केवडा, चाफा यासारख्या स्वादाची फवारणी हळुवारपणे ते प्रत्येकीच्या मनगटावर करत होते आणि मग दोन्ही हात एकमेकांवर कसे चोळायचे, त्यांना आपसात कसं दरवाळायला लावायचं आणि घरातलं वातावरण कसं प्रसन्न ठेवायचं, घरातसुद्धा हवेत सुगंधी सॅनिटायझरचे फवारे कसे स्प्रेडायचे याचं प्रात्यक्षिकही ते करून दाखवायचे. फुकटात मिळाल्याने चाळीतील समस्त स्त्री वर्ग अगदी खूष होता.
बाळूमामांचा नन्या हे चाळीतील एक उपद्व्यापी कार्ट होतं. कुणाचं तरी ऐकून काहीही कंड्या पिकवायचा. त्याने एका बातमीचं पिल्लू सोडून दिलं की कोरोनाला जिवंत अथवा मृत अवस्थेत पकडून देणाऱ्या व्यक्तीला आपल्या विभागातील घेलाशेठनी १० लाखाचं बक्षीस लावलं असून त्या व्यक्तीचा सुवर्णपदकांचा हार देऊन भव्य सत्कार नामदार स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. तेव्हापासून टमाट्याच्या चाळीत कमिटीतर्फे रहिवाशांना मार्गदर्शन म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे ‘कोरोना’चं स्वरूप या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या प्रश्रोत्तररूपी व्याख्यानमालेत चाळकऱ्यानी असे काही प्रश्न डॉक्टरमंडळींना विचारले की कोरोना पत्करला पण तुमचे प्रश्न नकोत, असं सांगून डॉक्टरांनी पोबारा केला. काही मंडळींनी तर डॉक्टरांनाच ज्ञानामृत पाजलं. कोरोना हा एक प्रकारचा मच्छर असून संपूर्ण चाळीला जर एकच मच्छरदाणी घातली तर त्याचा शिरकाव चाळीत होणार नाही. अशा मुंबईतील प्रत्येक चाळीला भव्य मच्छरदाण्या घातल्या तसेच बाहेर फिरणाऱ्यात नागरिकांना डोक्यापासून पायापर्यंत मच्छरदाणीचे ड्रेस शिवून दिले तर त्यांच्या अंगात कोरोनो शिरूच शकणार नाही. त्यामुळे सरकारला त्यावर खर्च करायला सांगावा. म्हणजे पुढची लाटच येणार नाही. महाराष्ट्र सरकारने हे केंद्र सरकारला पटवायला हवे आणि केंद्र सरकारने ते चीनसकट साऱ्या जगाला पटवायला हवे. एवढा सोपा उपाय टमाट्याच्या चाळीजवळ असताना लस योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च करू नयेत हे बाबल्या मोरजकरांचे म्हणणे खानावळवाल्या भाटकरबाईंना पटलं. पण पांडूतात्यांनी विरोध केला. त्याशिवाय चाळीतल्या शिकलेल्या तरूणवर्गाने तर त्यांची खिल्लीच उडवली. प्रत्येकाने निमूटपणे इस्पितळात किंवा जिथे सोय केली असेल तिथे जाऊन कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असं त्यांनी सुचवलं. शिवाय साठीच्या वरील स्त्री-पुरुषांनी तातडीने ही लस घ्यावी आणि त्यानंतर ‘कोरोना’ला जिवंत की मृत पकडावा याचा शोध घ्यावा, असं सुनावलं.
किर्वे काकांनी तर दंडातील बेटकुळी काढून दाखवत आपण सर्वात प्रथम जिथे ती लस टोचून घेतली ती दंडावरील जागा ‘कोरोना’चं रंगीत चित्र काढून रंगवल्याचं उपस्थितांना दाखवलं. निदान तिथे चित्रं काढून घेण्यासाठी तरी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्या, असं आवाहन चुरमुरेबाईंनी लाजत लाजत केलं.
– अहो, हाफ शर्ट घातला तरी ते चित्र बघणार कोण?
– त्यासाठी मी तिथे छानपैकी नक्षीदार गोलकट करून घेणार आहे. आता जीन्स पँटला उंदरांनी कुरतडल्यासारखी भोकं पाडून घ्यायची फॅशन आलीय ना, तशीच ती शर्टांवरसुद्धा कोरोना पिक्चर होल म्हणून येईल. ज्यांनी लस घेतली त्यांना आपल्या टमाट्याच्या चाळीतर्फे कायमस्वरूपी कोरोनाचं गोंदणचित्र आणि दंडावर नक्षीदार भोकाचा शर्ट भेट म्हणून देऊ. म्हणजे निदान नव्या शर्टासाठी तरी चाळकरी निश्चित लस घेतील…
चाळ कमिटीचे सेक्रेटरी हे पचकल्यावर चाळीतील रसिकराज वासूकाका कसे गप्प राहतील. स्त्रीवर्गालाही या योजनेत सामील करून घ्या, असं मी चाळीच्या शंभर टक्के लसीकरणासाठी आवाहन करतो, असं सांगून त्यांनी पळ काढला. तोपर्यंत या चर्चेत भाग घेण्यासाठी चाळीतील भरपूर स्त्रीवर्ग गोळा झाला होता. त्यांच्यावतीने सुगंधाबाईंनी तोफ डागली.
– असली थेरं तुम्ही करा. आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला शर्ट नको, ब्लाउज नको की चित्रही नको. पण आम्ही राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून चाळीतील सर्व प्रौढ बायका, तरुण युवती उद्या मिरवणुकीने जवळच्या लस केंद्रावर लस घेण्यासाठी जाणार आहोत. तेही सुरक्षित अंतर राखून…
यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आणि महिला मंडळ निघून गेलं. मग चाळीत नेहमीच कुचाळक्या करण्यासाठी प्रसिद्ध असलेले काही टोळभैरव त्या जागी एकत्र जमले. त्यातील एक-दोघांना तर पहिल्या लॉकडाऊन काळात दुकाने उघडी ठेवण्यासाठी दुकानदारांकडून हप्ते वसुली करण्याच्या आरोपाखाली सहा महिन्यांची कैदेची सजाही झाली होती. त्यातील एकाने तर भलताच मुद्दा उपस्थित केला. तो म्हणाला, लस दंडावरच का देतात? मी तर इंजेक्शन नेहमीच कमरेवर किंवा मांडीवर घेतो. बारक्यालाही त्याच्या मुद्यात तथ्य वाटलं. तो म्हणाला, मी पण. त्यावर सोन्याने आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, आपल्यातल्या बऱ्याचजणांना मास्क घालण्याच्या नियमाचे पालन न केल्याबद्दल पोलिसांनी पार्श्वभागावर लाठ्यांचा प्रसाद दिला होता. त्यामुळे त्या भागावर पुन्हा अन्याय नको, म्हणून दंडावरच लस देण्याचा नियम केला असावा…. तशी इतरांची ट्यूब पेटली व मोठ्या संकटातून निभावल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली.
तेवढ्यात मालवणी हरमळकर तिथे आले. ते म्हणाले, माज्या मालवणी मित्रान तुमका येक सल्लो दिल्यान हा…
तो म्हणता-
घरात बसून ढेर्यो वाढल्यो तरी
आमका चलात
पन कर्फ्यूत भायर पडान् पोलीसांनी तुमची ढुंगणा सुजवल्यानी, तर आमका वायट वाटतलां
घरातच बसा…
सल्लो आमचो, कुल्लो तुमचो,
पटला तर घेवा, नायतर सुजवन घेवा!
बघा बाबानू कायता…
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)