• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अनारोग्य मंत्रीजी, महाराष्ट्रद्वेषावर लस घ्या लवकर!

मंत्री साहेब, वेळेत सुधारा आणि थोडं लक्ष तरी साथ आटोक्यात आणण्यावर द्या...

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 15, 2021
in भाष्य
0
अनारोग्य मंत्रीजी, महाराष्ट्रद्वेषावर लस घ्या लवकर!

– पत्रकार्टा

अनादरणीय अनर्थवर्धन साहेब यांस,
नाही काय आहे, कधीकधी आपल्या भावना सुरुवातीलाच खुल्लमखुल्ला सांगितलेल्या बर्‍या. त्यात सत्तेचा माज चढलेल्या मग्रूरांना उपरोध वगैरे काही कळत नाही. त्यामुळे जगाला वेढून राहिलेल्या भीषण साथीच्या काळात क्षुद्र राजकारणाची पोळी भाजून घेणारा माणूस कसला आलाय डोंबलाचा आदरणीय? ११ कोटी मराठी माणसाचा अपमान केल्यावर तुम्ही आम्हाला किमान अनादरणीय तर आहातच. मोठे साहेब असते, तर अजून बरेच शब्द छापले असते त्यांनी..! आणि देशावरचं हे गंभीर संकट थिल्लरपणे हाताळणारा माणूस ‘अनर्थ’ वाढवणारा नाहीतर अजून कोण म्हणणार? तेव्हा पत्राची सुरुवात जाणूनबुजूनच केल्ये, हे लक्षात ठेवा..
पण ‘अनारोग्य’ मंत्रीजी, आम्ही असे काही निव्वळ तुमच्या महाराष्ट्र द्वेषाने रागावले नाहीये. त्यापूर्वीही तुमचं कर्तृत्व मोठं कुख्यात आहे. कधी तुम्ही शाळेत लैंगिक शिक्षण नको म्हणता, कधी प्रदूषणामुळे रोगराई होतच नाही सांगता आणि पुन्हा त्या भोंदू रामदेवच्या भंपक औषधांना तुमचा आशीर्वाद असतोच. काय हो, तुम्ही खरंच डॉक्टर आहात का? नाही म्हणजे एव्हढा बेजबाबदार मंत्री तर या सरकारात असू शकतो, पण किमान डॉक्टर म्हणून तरी तुम्ही थोडे हुशारीने बोलाल अशी आशा होती.
महाराष्ट्राच्या कोरोना हातळणीबद्दल जे तारे तोडलेत, त्याने ती आशाही संपली. काय हो, त्या दिवशी तुम्ही डॉक्टर म्हणून बोलत होतात, मंत्री म्हणून बरळत होतात का निवडणुकीचा प्रचार सुरू होता? तुम्हाला आकडेवारीचा सोस आहे नं फार? मग आपण देश म्हणून लस देण्यात किती कमी पडतोय, याची आकडेवारी पाहिलीत? प्रत्येकी लाख लोकांमागे आपण साडेसहा हजार लशीसुद्धा दिलेल्या नाही, जेव्हा अगदी ब्राझीलमध्ये हा आकडा दहा हजाराहून जास्त आहे आणि चिलीमध्ये तर एकूनसाठ हजाराहून.. मुद्दाम ‘विकसनशील’ देशांचे आकडे दिलेत. पण तुमचं नेतृत्त्व जगभर लस निर्यात करून नोबेलची बेगमी करण्यात मश्गुल आहे..!


पण असे अजून बरेच आकडे आहेत, जे तुम्ही पाहिलेच नाही मंत्रीमहोदय.. उदा. गुजरातच्या जवळजवळ दुप्पट संख्या असून महाराष्ट्राला गुजरातहून जेमतेम पंधरा वीस टक्के ज्यादा लशी मिळालेल्या आहेत. किंवा इतक्या प्रचंड लोकसंख्येला एव्हढ्या लशी असून महाराष्ट्रात लस वाया जायचं प्रमाण कित्येक इतर राज्यातून कमीच आहे. बाकी अगदी महाराष्ट्रातलेसुद्धा केंद्रीय मंत्री मोठ्या चलाखीने देशाची वाया जाण्याची सरासरी सांगतात. महाराष्ट्राची त्याच्या निम्म्याहून कमी आहे, हे तुम्ही त्यांना सांगितलंच नाही का?
आता थोडं टेस्टिंगचंही गणित पाहू. तुमच्या पक्षाचं भविष्य असलेल्या योगीजींच्या उत्तर प्रदेशात दर दहा लाखांमागे १५३ चाचण्या झालेल्या आहेत. साथ विसरून घाईघाईने सरकार पाडलं त्या मध्य प्रदेशात आकडा आहे ७७. आसाम आणि बंगालात तर तुमच्या महामहिमांना प्रचार करता यावा, म्हणून चाचण्याच स्थगित केलेल्या आहेत. आणि महाराष्ट्राचाआकडा आहे, १६५, तोसुद्धा केंद्राने वेळोवेळी धड मदत न करून. पण महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झालेल्या तुमच्या पिवळ्या नजरेला हेही दिसणार नाही!
महाराष्ट्राच्या हाताळणीवर आणि नेतृत्वावर बोललात, म्हणून आठवण करून देतो. आमच्या मुख्यमंत्र्यांनी दुपारी चार वाजता नाही सांगितलं, की आज मध्यरात्रीपासून सगळं बंद म्हणून. आधी दोन दिवसांचा इशारा दिला. मग घोषणा केल्यापासूनही एक दिवस दिला. मधल्या काळात उद्योजक, अधिकारी, व्यापारी संघटना या सर्वांशी चर्चा केल्या. पण असं असून आज तुमच्या राज्यातल्या नेत्यांना दिसतंय, ते गलिच्छ राजकारण. कोणीही काही म्हटलं, तरी आम्ही लॉकडाऊन तोडू, असं म्हणणार्‍यांना फूस देतायत तुमचे नेते. त्यांच्या (हरलेल्या) नेतृत्त्वावरही बोला कधीतरी…
पण काय हो, वर्षभरापूर्वी अचानक जेव्हा देशभरात लॉकडाऊन लागू केला, तेव्हा तुमचे पंतप्रधान तुमच्याशी तरी बोलले होते का हो? नाही म्हणजे नोटा रद्द करण्याआधी ते कोणाशीच बोलले नव्हते हे आता सगळ्यांना माहित्ये म्हणून विचारतोय. अर्थात, तुम्हाला त्याची लाज नाहीच आहे म्हणा. तुमच्या केंद्र सरकारातले सगळे मंत्री म्हणजे नुसते प्रचाराचे मोहरे आहेत आणि त्यांचे बोलवते धनी पीएमओमध्ये बसतात, हे आम्हाला ठाऊक आहे.
तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताय. देशाचे आरोग्यमंत्री म्हणून तुमचं काम काय आहे? राहुल गांधींनी तर सर्वात आधी इशारा दिला होता धोक्याचा. पण तुम्ही आरोग्यमंत्री असून ‘उगीच भीती निर्माण करू नका’, असा बेजबाबदार आणि बेफिकीर सल्ला दिलेला होतात, याची तुम्हाला आठवण करून देतो. महनीय पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन करून लाखो लोकांचे हाल केले, त्याच्या जेमतेम पंधरा दिवस आधी, ‘हे काही खूप मोठं आरोग्य संकट नाही’, असली मुक्ताफळं तुम्ही उधळत होतात. जेमतेम आठवडाभर आधी जेव्हा खासदार संसदेत मास्क घालून आले, तेव्हा तुमच्या पक्षाचे उपराष्ट्रपती तो काढून टाकायला लावत होते. आज या साथीने एव्हढा धुडगूस घालूनही तुमचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री सांगतात, की कुंभमेळ्याला जगभरातून या म्हणून. त्यामुळे म्हणे कोरोनाच्या भीतीवर मात करता येईल. तुम्हाला मान्य आहे ते? तो भंपक रामदेव खुशाल आयएमए ते जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाखाली वाटेल ते दावे करतो, तर तुम्ही चक्क त्याची कोरोनील विकायला पत्रकार परिषदेत हजर! पाच राज्यात लाखोंच्या सभा घेत तुमचे नेते फिरतायत, तर तुम्हाला कोरोनाची भीती वाटत नाही. वृंदावनात तर लोकं बिनधास्त होळी खेळतायत ऐन साथीत, पण तुम्हाला त्या नेतृत्त्वाला काही सुनावता येत नाही. इकडे पुण्यात तुमचे नेते म्हणे की थेट केंद्रातून पुण्याला लस आल्ये. तिकडे गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सांगतायत की ते स्वतःच लस पुरवतील. आणि हे सगळं नजरेआड करून तुम्ही तेव्हढे मराठी माणसाला दोष देताय, हेच का तुमचं देशाच्या आरोग्य क्षेत्रातलं नेतृत्त्व?
या सगळ्याचं कारण एकच आहे अनर्थ वर्धन साहेब.. तुम्हाला आणि तुमच्या सरकारला या साथीशी आणि कोरोनाशी काहीही देणंघेणं नाही. त्यात लोकं आजाराने मेली काय, हजारो किलोमीटर चालून तडफडली काय किंवा उपासमारीने खपली काय, तुम्हाला काहीही फरक पडत नाही. तुमचं ध्येय एकच, सत्ता! आधाश्यासारखी अजून अजून सत्ता.. साथ सुरू होताना तुम्ही मध्य प्रदेश सरकार पाडण्याचा खेळ खेळलात. ती जोरात असताना राजस्थान सरकार पाडण्याचा आटापिटा केलात. आजही पश्चिम बंगालात सत्ता आणणं आणि आसामात राखणं, यासाठी तुमचं सगळं मंत्रिमंडळ राबतंय. आणि महाराष्ट्रातली सत्ता तर तुमच्या डोळ्यात खुपतेच आहे. त्यामुळे ऐन साथीत सुशांतसिंगच्या आत्महत्येपासून प्रत्येक गोष्टीचं भांडवल करून सरकार पाडायचं, एवढं एकच लक्ष्य तुम्हाला दिसतंय. मग द्या रेटून खोटी आकडेवारी, करा बेताल टीका..!!
मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाऊ नये म्हणतात. पण इथे शेकडो मृत्यूमधून सत्तेचं लोणी काढायचा तुमचा घाणेरडा प्रयत्न सुरू असेल, तर या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, मंत्री साहेब. वेळेत सुधारा आणि थोडं लक्ष तरी साथ आटोक्यात आणण्यावर द्या. मग आपण पक्षभेद विसरून एकत्र येऊ शकतो आणि राज्यच काय, पण निरोगी देशही घडवू शकतो..!!
जय महाराष्ट्र..

Previous Post

भिका-यांचे भरले संमेलन!

Next Post

सत्ता

Next Post
सत्ता

सत्ता

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.