दुपारची वामकुक्षी घेत पडलो होतो. कोरोनावासात फारसा कामधंदा नसल्याने ही वामकुक्षी जबरदस्तीची झाली आहे. जरा कुठे आरामखुर्चीवर पहुडलो नि डोळे मिटले की मस्त डुलकी लागते. आजही तेच घडत असताना दरवाज्याची बेल वाजली.
‘‘कोण असेल बरे?’’ पुटपुटत काहीशा वैतागाने उठलो नि अनिच्छेने दरवाजा उघडला. साधारण चांगल्या कपड्यातील एक मध्यमवयीन पुरुष उभा होता. चेहरा किंचित ओळखीचा वाटत होता.
‘‘सायेब, मला ओळखलं नसेल! कसं ओळखणार? अहो, मी गण्या भिकारी. तुमच्या गणनाक्यावरचा! तुम्ही गणनाक्याच्या सिग्नलवर तुमची दुचाकी गाडी थांबली की मला मोठ्या दयेने नेहमी भिक्षा देता…’’
अरे हो, डोक्यात प्रकाश पडला. हा, तर त्या नाक्यावर भिक्षांदेही करणारा गणू. एकदा गाडी सिग्नलजवळ खूप थांबली होती, तेव्हा सहज त्याचे नाव विचारले होते. पण, त्याचा नाक्यावरचा अवतार वेगळाच असतो. बोकडासारखे वाढलेले केस आणि अस्ताव्यस्त दाढी, हातापायाला इथेतिथे चिंध्या बांधलेला, हातात काही, फाटके कपडे, मळलले शरीर; अन् हा इथे घरी कसा टपकला आहे?
मी टेबलावरचं वॉलेट उचलून काही सुटी नाणी आहेत का, चाचपू लागलो. तोच तो म्हणाला, ‘‘सायेब, मी आज भिक्षा मागायला नाही आलो.’
‘‘मग?’’
‘‘मी तुमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आलोय.’’
‘‘कसला प्रस्ताव?’’
‘‘अहो, सर्व जातीधर्माचे, व्यवसायाचे लोक आपापली संमेलने भरवतात तेव्हा भिकारी समाजाची एकजूट करून संमेलन व अखिल भारतीय भिकारी परिषद स्थापून आमचं एक संमेलन आयोजित केलं आहे आणि अध्यक्ष म्हणून तुमची निवड केली आहे.’’ तो एक दमात म्हणाला. ‘‘आमच्या विनंतीला तुम्ही मान द्याल, याची मला खात्री आहे.’’
गणूने मला गृहीतच धरलेले होते. शिवाय माझ्यासारख्या मराठी लेखकाला संमेलनाचे अध्यक्षपद! मी मनातून काहीसा सुखावलो. मी त्याला आत घेतले, प्यायला पाणी दिले. त्याच्याकडून जुजबी माहिती गोळा केली आणि संमेलनाला हजर राहीन, असे आश्वासन दिले.
संमेलनाचा दिवस उजाडला. बिचाऱ्याना खर्च नको म्हणून मी स्वत:हून त्या नियोजित ठिकाणी पोहोचलो. काय त्यांची ती धावपळ सुरू होती? एरवी रस्त्याने वाटते दिसणारे लुळेपांगळे भिकारी स्टेजवरून टणाटण उड्या मारताना दिसत होते. फाटक्या नि मळक्या कपड्याच्या जागी नीटनेटका वेष होता. अध्यक्षाचा मानमरतब राखून त्यांना अनुभव नव्हता, त्यामुळे मीही तिकडे (जाणूनबुजून) दुर्लक्ष केले. सभेला औपचारिक प्रारंभ झाला. माझी ओळख करून देण्यासाठी गणू स्टेजवर आला नी माईक ताब्यात घेऊन बोलू लागला.
‘‘माझ्या प्रिय मित्रांनो, (अध्यक्ष असूनही त्याने माझीदेखील मित्रात गणना केली होती.) आल्या संमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत मदन दानशुरे यांची आपणास ओळख करून देणे मी माझे कर्तव्य समजतो. ते खूप म्हणजे खूपच मोठ्या उदार मनाचे आहेत. त्यांचा एकही दिवस जात नाही की ते समोर आलेल्या भिकाऱ्याला निराश करत नसतात. मी त्यांचा दररोज सुखद अनुभव घेत असतो. ‘‘कुठे राहतात हो हे?’’ अशी श्रोत्यातून कुजबूज ऐकू आली.) ते मराठीतले एक मोठे विनोदी साहित्यिक आहेत. असं ते स्वत:च मला सांगत होते. ते पेप्रात लेख लिहितात. म्हणे ते पुस्तकदेखील लिहितात. असं अभिमानाने सांगत होते. व त्यांच्या घरी आमंत्रण करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांच्या बिछान्याखालचे पुस्तकांचे पडून असलेले गठ्ठे पाहून माझीही खात्री पटली. तेव्हा आम्हा भिख्सू समाजाच्या व्यथा आणि वेदना समाजापुढे आणण्याचे गार्हाुणे मी त्यांच्या पुढे मांडत आहे.
मित्रहो, आपल्यापैकी बरेच जण मोबाईल फोन वापरतात, पण मी नम्रपणे अध्यक्ष महोदयाच्या ध्यानी आणू इच्छितो की ती आमची व्यावसायिक गरज आहे. कुठल्या ठिकाणी गर्दी आहे, कमाईची संधी आहे हे आम्हाला त्या त्या वेळेनुसार जाणून घ्यावे लागते. त्यानुसार त्वरित स्थलांतर करावे लागते.
आता, मी अध्यक्ष महोदयांना दोन मार्गदर्शनपर, शब्द बोलण्याची विनंती करतो. मी उभा राहिलो नि ‘‘मित्र हो!’’ अशी सुरुवात करणार तोच श्रोतृवर्गात हास्यकल्लोळ उडाला. मी जरा कुठे तोंड उघडले की हास्याचा फवारा उडे, टाळ्यांचा कडकडाट होई. गणूने माझ्या विनोदी स्वभावाचा भाषणात जो वारंवार उल्लेख केला होता त्याचा हा (दु)ष्परिणाम होता. मी दातओठ खात खात तयार करून आणलेले दहा पानांचे भाषण कसेबसे आटोपते घेतले. अखेरीस खालील ठराव मंजूर होऊन त्या अपूर्व संमेलनाचे सूप वाजले.
१. भिकारी हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत व त्याची हेटाळणी करणार्यां चा हे संमेलन निषेध करते.
२. भिक्षा हा एक प्रकारचा दानधर्म होय. तेव्हा, लोकांचे पुण्य वाढविण्यासाठी हातभार लावणार्यार आमच्या व्यवसायाकडे सहानुभूतीने पाहावे, असा समस्त भिक्षू समाज आवाहन करत आहे.
३. फुटपाथवरील विशिष्ट जागांचे भिक्षा मागण्यासाठी आरक्षण करण्याची हे संमेलन शासनाला आवेदन देत आहे.
४. आम्ही अहोरात्र मेहनतीने पैसा कमावून विकत घेतलेल्या शहरातील निरनिराळ्या ठिकाणच्या सदनिकांसाठी विशेष सवलती सरकारने द्याव्यात अशी मागणी हे संमेलन करत आहे.
५. भल्या भल्या कलावंताना लाजवील असा चपखल अभिनय करून आम्ही भिक्षा मिळवतो, तेव्हा शासनाच्या कलावंत मानधन योजनेखाली अर्ज करण्यास आम्हाला देखील पात्र ठरवावे असे आर्जव हे संमेलन शासनाकडे करीत आहे.
६. आम्हा भिकाऱ्यांना खूप वेळ एकाच जागी बसून लठ्ठपणा येतो, पण त्याचा अर्थ आमचं स्वास्थ्य सुशेगात आहे, असा समज करून घेऊ नये अशी विनंती समस्त दानशूर नागरिकांना करीत आहोत.
७. शहरातल्या बारजवळ भिकाऱ्यांना बसण्यासाठी खास जागा असावी, असं हे संमेलन जाहीररीत्या करत आहे. समस्त बेवडेमंडळी जेव्हा बारमधून बाहेर पडताना स्वहस्ते, स्वईच्छेने आमच्या कटोऱ्यात पैसे टाकतात, त्यांचे मनापासून आम्ही आभार मानत आहोत.
८. सर्वात छोटे नाणे हे दहा रुपयांचे असावे, शिवाय २० आणि ५० रुपयांची नाणी चलनात आणावी असा आग्रह आमची संघटना रिझर्व्ह बँकेला करत आहे.
९. सरकारने आम्हा भिकारी समाजासाठी एक वेगळी वैद्यकीय योजना सुरू करावी ही आमची मागणी आहे.
ते संमेलन संपते न संपते त्या ठिकाणी स्वरूप पालटले. उपस्थित भिकारी बांधवांनी झटपट वेषभूषा बदलल्या आणि भिक्षा मागणीच्या पावित्र्यात माझ्याभोवती जमा होऊ लागले. त्यांची ती शीघ्र मेकअपची कला अचंब्यात टाकणारी होती. मी ती आणीबाणीची वेळ ओळखली आणि तिथून सूंऽऽबाल्या केला…
(लेखक महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विकास आणि कलावंत मानधन समितीचे सदस्य आहेत.)