मध्यंतरी ओमने अचानक विचारले, का रे बाबा? आपण तो गोड खाऊ बरेच दिवसांत नाही खाल्ला? कोणता रे, विचारल्यावर स्वारी वर्णन करू लागली, ते बघ लहान चौकोनी आकाराचे असतात, दिवाळीत तर नक्कीच बनवतो आपण. ते रे जे तू चहात टाकून खातोस!! मग एकदम लक्षात आले की ह्याला शंकरपाळ्यांची आठवण आलीये!! दुकानात मिळेल नं रे बाबा ते? प्रश्न सुरूच होते. अरे बाळा, मी म्हणालो, दुकानात तर काय हवं ते मिळतं आजकाल, पण घरच्या पदार्थांची का सर येते त्याला? वेळ मिळाला की बनवुयात की म्हटलं आपणच!!
शंकरपाळे बनवायला व खायला काही कारण लागतंच असं नाहीये खरंतर!! लहानपणी मला आठवतंय, गुलाबजामचा पाक किंवा कधीचा आणलेला मैदा संपवायचा म्हणून किंवा थोडं काहीतरी डब्यात खाऊ असो म्हणून वर्षभरात अनेकदा बनवायची आई शंकरपाळे. ती सुट्टीच्या दिवशी सकाळीच स्वयंपाकाबरोबर येता जाता गोळा भिजवून ठेवायची आणि दुपारी चहानंतर आमचा शंकरपाळे बनवण्याचा कार्यक्रम चालायचा. कडक गोळ्याची पोळी लाटणं जमायंच नाही तेव्हा पण लहान, मध्यम किंवा मोठे आकार कापणं व शंकरपाळे तळणं हे आम्ही आवडीनं करायचो. नुसता कच्चा गोळाच किती मटकावायचो, बापरे!! पोट दुखेल रे कच्चं पीठ खाऊन, अशी आईची काळजीयुक्त बोलणी बसली तरी त्या गोडसर गोळ्याचा मोह काही सुटायचा नाही.
फार काही सामुग्री नाही लागत बरं. साखर किंवा गूळ, कणिक किंवा मैदा, थोडासा बारीक रवा, भिजवायला पाणी व मोहनासाठी व तळायला तेल किंवा तूप. पद्धती म्हणाल तर अनेक आहेत शंकरपाळे बनविण्याच्या. सारख्या प्रमाणात साखर, तूप व पाणी एकत्र उकळून, साखर विरघळली आणि वाफ आली की झालं. ते मिश्रण गार झाल्यावर त्यात मावेल तेवढा मैदा किंवा बारीक चाळणीने चाळलेली कणीक, चवीला मीठ, हे भिजवले की झाले. दुसरी पद्धत म्हणजे वाटीभर मैद्याला (किंवा चाळलेल्या कणकेला) प्रत्येकी दोन चहाचे चमचे बारीक रवा व गरम तुपाचे मोहन व साधारण पाव वाटी पिठी साखर, चिमूटभर मीठ मिसळून पाण्यात गोळा घट्ट भिजवायचा आणि निदान तासभर तरी मुरू द्यायचा. निम्मा रवा व मैदा वापरूनही अशाच पद्धतीने केले जातात शंकरपाळे. पण रवा जास्त असेल तर गोळा मुरल्यावरही चांगला कुटून घ्यावा लागतो. एकदा का साहित्याचे प्रमाण व कडक गोळा भिजवायचे तंत्र जमले की पुढचे टप्पे सोपे असतात. जाडसर पोळी तेल किंवा पीठ काही न लावता लाटून त्याचे आवडत्या आकाराचे शंकरपाळे कापायचे व तेलात किंवा तुपात मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे.
पूर्वी साखरेऐवजी गुळाचा वापर जास्त व्हायचा. तसेच चिमटीभर मिठाने गोडाची चव मोडते व सुधारते हे गोळा भिजवताना विसरायचे नाही!! एकदा का तळून गार झालेले शंकरपाळे डब्यात भरले की भरपूर टिकतात. अर्थात त्यासाठी शिल्लक राहायला हवेत!!
इतर मिष्टान्नांसारखा फार खटाटोप नसलेले व पाकाबिकाच्या चिकट व किचकट कृतीपासून अंतर ठेऊन असलेले तरी चवीतला गोडवा खास मिरवणारे हे शंकरपाळेपण मार्गदर्शक भासतात मला!! वरवर बघता कोरडा पण अंतरंगी गोडवा साठवलेला हा खाऊ अनासक्तीचा संदेश सहज देऊन जातो नाही का? अर्थात नुसता कोरडेपणा नाही पण चवीतला गोडवा जास्त भावतो, नाही का?
अनासक्तीच्या नावाखाली विनाकारण चेहेरे लांब करून व मनात रूक्षपणा साठवून बरेचदा कित्येकजण जगण्यातली मजा गमावतात. अध्यात्माच्या ह्या अत्यावश्यक टप्प्याला काही अंशी नीट समजून न घेतल्याने होते असे, मनाला अलिप्त ठेवणे हा स्थायीभाव व्हायला हवा, कमळाच्या पानाप्रमाणे पाण्यात असले तरी कोरडे राहण्याची कला साधायला हवी, त्यासाठी शुष्क होण्याची खरतर गरज नसतेच. किंबहुना मी म्हणेन की तो अहंकाराला खतपाणी देणारा वरपांगीचा देखावा असतो. मनातला गोडवा कायम ठेवत परमेश्वराच्या चरणी आयुष्याची दोरी बांधून त्या परीघात फिरले की आनंदाला उधाण येते हे नक्की. स्वामी भुतेशानंदजी महाराजांपासून स्वामी भौमानंदजी महाराजांपर्यंत अनेकांच्या आठवणी या अनुषंगाने मनात फेर धरताहेत. अतिशय उच्चकोटीला पोहोचलेल्या ह्या संन्याशांचे रोजचे वागणे एवढे निरागस व आनंददायी ठरते ते ह्या अलिप्त पण गोडवाभरल्या अंत:करणामुळेच. आजवर मी मठातल्या कोणत्याही स्वामीजी किंवा माताजींनाही वृथा चिंता करताना किंवा गरजेशिवाय तत्वजड चर्चा करताना ऐकले नाहीये. जास्तीत जास्त संदेश हा खरं तर आपापल्या कृतीतून देतात ही मंडळी. अलिप्तपणे स्वत:च्या घरादाराला मागे सारून शिवभावे जीवसेवा साधताना मनातल्या गोडव्यानेच अनेक भक्तांच्या मनांवर फुंकर घालत असतात नाही का, हे लोक? आपणही काही अंशी ही वृत्ती बाणू शकलो तर मुक्तीचा मार्ग यथायोग्य उघडेलच, पण तिथवरचा प्रवासही अंतरंगीच्या गोडव्याने स्वत:बरोबरच आजुबाजूच्यांसाठीही सुखकर ठरेल, आनंददायी ठरेल. अगदी शंकरपाळ्यांसारखाच!!