कर्मवीर भाऊराव पाटलांनी कारखान्यात लोखंडी नांगरांच्या उत्पादनात स्वतःला झोकून दिलं होतं. नांगर विकले गेले की कारखान्याच्या फायद्यातून मागास मुलांसाठी बोर्डिंग उभं करता येईल, हे स्वप्न ते बघत होते. पण धनजीशेठच्या व्यापारी बुद्धीला ते पटणारं नव्हतं.
– – –
सातार्यात निवडणुकीचा इतका मोठा गोंधळ सुरू असताना कर्मवीर भाऊराव पाटील मात्र त्यापासून लांबच राहिले. प्रबोधनकार निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. धनजीशेठ कूपरच्या प्रचारात सक्रिय नसले, तरी काय घडतं हे पाहण्यासाठी त्यांच्यासोबत फिरत होते. ब्राह्मणेतर पक्षाच्या तिन्ही उमेदवारांशी चर्चा करत होते. आजूबाजूच्या गावांचे मातब्बर पुढारी त्यांना भेटण्यासाठी छापखान्यावर येत असत. प्रबोधनमधून ते निवडणुकीविषयी लिहीत तर होतेच.
पण सातारा जिल्ह्यावर प्रभाव असूनही कर्मवीर अण्णांनी मात्र निवडणुकीच्या गदारोळापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवलं होतं. त्यांनी कुठेही भाषणं दिली नाहीत की मतदारांना भेटून कोणाला मतदान करायचं हे सांगितलंही नाही. मुळात त्यांना निवडणुकांच्या काळात जन्मणार्या आप्पलपोट्या कार्यकर्त्यांचा तिटकारा होता. त्याऐवजी त्यांनी कूपर इंजिनियरिंग वर्क्सच्या कारखान्याच्या कारभारावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. किर्लोस्कर कंपनीतला अनुभव असल्यामुळे त्यांना लोखंडी नांगराच्या उत्पादनाची माहितीही होती. त्यांनीच किर्लोस्कर कंपनीतून आणलेल्या कारागीरांच्या जिवावर कूपरच्या कारखान्यात नांगर बनत होते. त्यामुळे कर्मवीर अण्णा दिवसरात्र मेहनत करून स्वतःच्या निगराणीखाली नांगरांचं उत्पादन करून घेत होते. किर्लोस्कर कंपनीचे सेल्समन म्हणून काळ गाजवलेला असल्यामुळे या नांगरांच्या विक्रीसाठीही त्यांनाच प्रयत्न करायचे होते. त्यामुळे ते या नांगरांच्या विक्रीसाठी एजंट गोळा करण्यासाठीही धावपळ करत होते.
फक्त मागास विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग बांधण्याचं स्वप्न प्रत्यक्षात यावं, यासाठी कर्मवीर अण्णा इतके कष्ट उपसत होते. कारखान्यात तयार होणारे नांगर चांगल्या दर्जाचे असतील, तर त्यांची चांगली विक्री होईल. त्यातून कारखान्याला भरघोस नफा होईल आणि कूपरशेठशी ठरल्याप्रमाणे त्या नफ्यातून १० टक्के रक्कम बोर्डिंग बांधायला मिळेल, अशी योजना त्यांनी आखली होती. त्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांनी प्रबोधनकारांच्या हाताशी असलेल्या छापखान्यातून कुर्हाड नावाचं एक नियतकालिक काढण्याची घोषणाही केली होती. तशा जाहिराती `प्रबोधन`मध्ये छापलेल्या आहेत.
कर्मवीर आणि त्यांच्या कामगारांनी केलेल्या कामाच्या जोरावर कूपरच्या कारखान्यात नांगर बनून तयार झाले. गावोगावचे एजंट मोठ्या उत्साहाने नवे नांगर विकण्यासाठी कारखान्यात येऊन पोचले. पण हे नांगर किती रूपयांना विकायचे, यावर एकमत होत नव्हतं. किर्लोस्करांचे लोखंडी नांगर हे तेव्हा १०० ते १२५ रूपयांना विकत होते. पण सगळी आकडेमोड केल्यानंतर एका नांगराच्या उत्पादनाचा खर्च फक्त साडेबारा रूपये असल्याचं समोर आलं. तरीही हा नांगर किर्लोस्करांच्याच किंमतीत विकण्याची तयारी धनजीशेठने केली होती. पण त्याने निवडणुकीच्या काळात आपण शेतकर्यांना स्वस्तात नांगर विकण्यासाठी कारखाना सुरू केल्याचा प्रचार केला होता. स्वतःला शेतकर्यांचा वैâवारी भासवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं काय करायचं, असा प्रश्न कर्मवीर अण्णा विचारत होते.
कर्मवीर अण्णांचं गणित अगदी रास्त होतं की नांगरांच्या निर्मितीखर्चाच्या तिप्पट किमतीने नांगर विकायला हवा. धनजीशेठचं म्हणणं होतं की एकाचे हजार होत नसतील, तर कारखाना काढण्यात काहीच अर्थ नाही. दोघांचा कारखान्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळातून वेगळा होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होणारच होता. धनजीशेठ आणि त्यांचे कारखान्यातले भागीदार एका बाजूला, तर कर्मवीर अण्णा एकटे एका बाजूला अशा चर्चा आणि भांडणं जवळपास आठवडाभर चालली. कूपरच्या नागरांच्या किमती बाहेर येत नाहीत, तोवर किर्लोस्करही आपल्या किंमती घोषित करायला तयार नव्हते. त्यांनी कूपर कारखान्याच्या दरपत्रकाची वाट बघत नवीन दरपत्रक रोखून ठेवलं होतं. त्यामुळे धनजीशेठनाही त्यांचं दरपत्रक काढण्याची हिंमत होत नव्हती. हा सगळा झगडा गावोगावांहून कारखान्यांवर आलेले एजंट बघत होतेच.
शेवटी हा वाद मिटला. सगळ्या कारखान्याची मदार कर्मवीर अण्णांवर असल्यामुळे त्यांनी सांगितलेला दर नक्की झाला. नांगरांची किंमत फक्त ३६ रूपये इतकी ठरली. तशी जाहीर पत्रकंही निघाली. किर्लोस्करांनाही त्यांच्या नांगरांची किंमत सव्वाशेवरून ३६ रूपयांवर आणावी लागली. यातून शेतकर्यांचं भलं झालं. पण धनजीशेठच्या नफेखोरीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं. आपण कितीही ठरवलं तरी कर्मवीर आपलाच आग्रह लावून धरतात हे त्यांना कळलं. अफाट पैसे मिळवण्याच्या मार्गातला भाऊराव पाटील हा अडथळा आहे, हे धनजीशेठला पक्कं लक्षात आलं. कर्मवीर आले म्हणजे सोबत प्रबोधनकारही आलेच. कारण प्रबोधनकार लिहितात तसं, मी आणि भाऊराव सदासर्वकाळ एकत्र आणि माझा विचार घेतल्याशिवाय तो पुढे कसलेही पाऊल टाकीत नसल्यामुळे, पाटील-ठाकरे जोडी म्हणजे आपणहून गळ्यात बांधलेली धोंड, असं कूपरला वाटणं सहाजिक होतं.
प्रबोधनकारांनी या सगळ्या प्रसंगाचं वर्णन कूपर पाटलाचा पहिला खटका असं केलं आहे. त्याचाच अर्थ असा होता की त्यानंतर हे खटके वाढतच गेले. त्याचं कारण अर्थातच कर्मवीरांचं बोर्डिंग होतं. कारखान्यातल्या नांगरांची विक्री जोरात सुरू झाली. तेव्हा कर्मवीरांनी बोर्डिंग उभारण्याचा आग्रह धरायला सुरवात केली. तो कर्मवीरांसारख्या हट्टी माणसाचा आग्रह होता. त्यामुळे त्याला नाही म्हणणं धनजीशेठनाही शक्य नव्हतं. बांधा रे या मोकळ्या जागेवर भाऊरावाचं बोर्डिंग, असा आदेश शेवटी त्यांनी काढला. त्यानुसार कारखान्यातली माणसं इमारत बांधायला तयार झाली. प्रबोधनकारांनी या इमारतींचं वर्णन केलंय, कारखान्यातली कोणतीही तथाकथित इमारत म्हणजे भराभर खांब पुरायचे आणि वर पत्रे चढवायचे. जमीन थोडीशी कुदळून चोपली का बिल्डिंग तयार. तशीच छपरासकट बोर्डिंगचीही बिल्डिंग तयार झाली. पण भिंती म्हणून पत्रे लावलेले नव्हते. बांबूंचं कूड लावलं होतं. त्यामुळे या इमारतीचं उद्घाटन होण्याच्या आधीच भटक्या गुराढोरांनी त्याची वाताहत केली. ढुशा देऊन खांब वाकडे केले. त्यामुळे छपराचे पत्रेही जमिनीवर कोसळले.
कर्मवीर अण्णा मुळातच रागीट होते. आपल्या स्वप्नांची अशी थट्टा होत असताना बघून ते प्रचंड रागावले. धनजीशेठला त्यांनी धारेवर धरलं. दोघांमध्ये मोठं भांडण झालं. प्रबोधनकार सांगतात, पुढे असे अनेक प्रसंग घडत गेले आणि एकमेकांविषयी दोघांचीही मनं कलुषित झाली. धनजीशेठने तोंडी कबूल केलं होतं, ते कर्मवीरांना दिलं नाहीच, पण प्रबोधनकारांनाही दिलं नाही. त्यांना ना धड राहण्याची व्यवस्था होती, ना अपेक्षित सोयीसुविधा. पण प्रबोधनकारांनी मुंबईला परत जाण्याचे सगळे दोर कापून टाकले होते. प्रबोधनसाठी हक्काचा कारखाना ही एकच गोष्ट त्यांना सर्वाधित समाधान देणारी होती. पण ते अथक प्रयत्नांनी त्या आडगावी छापखान्यासाठी कामं मिळवत. त्याच्या कल्पक जाहिराती `प्रबोधन`मध्ये वाचायला मिळतात. नांगरांच्या कारखान्याच्या एकूण पसार्यात छापखान्याचा जीव छोटा असल्यामुळे छापखान्याला फारशी आर्थिक अडचण नसावी, असा अंदाज बांधता येतं.
प्रबोधनकारांनी आपला संसारही दादरहून आणून इथेच थाटला होता. कद्रेकर आणि दत्तोपंत देशमुख हे त्यांचे सहकारी कारखान्याच्या कामात खांद्याला खांदा लावून सोबत होतेच. रामचंद्र वामन उर्फ बापूसाहेब चित्रेही अंकाच्या तयारीसाठी महिन्यातून दोनदा आवर्जून पुण्याहून सातार्याला येत. ते प्रबोधनचे निष्ठावान सहकारी होते. प्रुफरिडिंग तर करायचेच पण काही मजकूर स्वतःही लिहायचे. त्यांच्याबरोबर प्रा. दिनकरराव समर्थही अनेकदा येत. या सगळ्यांचा मिळून एक ठाकरे कंपूच बनला होता. शिवाय किन्हई या जवळच्या गावाहून पंत पराडकर नेहमी येत. ते प्रबोधनकारांचे जुने मित्र होते. वक्तृत्वशास्त्र या प्रबोधनकारांच्या ग्रंथासाठी दत्तोपंत पोतदारांना सोबत घेऊन चित्रशाळेच्या वासूकाका जोशींकडे जाऊन शिफारस करणारे तेच. त्या काळात ते किन्हई गावात अगरबत्त्यांचा कारखाना चालवत होते. केकार्थकेका नावाची त्यांची दीर्घकविताही प्रबोधनकारांनी ‘प्रबोधन’मध्ये छापली होती. त्यांच्याबरोबरच `सुवर्णराज वंगेश्वर’ या औषधाच्या जाहिरातीमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे डॉ. पाटणकरही येत. दोघेही कारखान्यात घडणार्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून असत आणि प्रबोधनकारांना योग्य तो सल्ला देत.
प्रबोधनकारांचं एकंदर इथे बरं चाललेलं असलं तरी ते धनजीशेठ कूपरला अडचणीचे ठरत होते. त्यांना साम दाम दंड भेद काहीही करून आपल्या बाजूला वळवून घेण्याचा चंगच धनजीशेठनी बांधला होता. पण आपल्या या कारस्थानांना पुरून उरतील, अशी ही दोन जगावेगळी माणसं आहेत, हे त्यांना कळलं नव्हतं. त्यामुळे आपल्या व्यवहाराच्या चौकटीत त्यांना बसवण्याचा धनजीशेठचा प्रत्येक प्रयत्न फसत गेला आणि पुढे सगळ्यांनाच अनेक धक्के सहन करावे लागले.