अशी आहे ग्रहस्थिती
राहू-हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ (वक्री) वृषभेत, केतू तुळेत, रवि-बुध-शुक्र धनु राशीत, शनि-प्लूटो मकरेत, नेपच्युन कुंभेत, गुरू मीन राशीत, चंद्र कन्येत, त्यानंतर तूळ, वृश्चिक आणि सप्ताहाच्या अखेरीस धनु राशीत. दिनविशेष – १९ डिसेंबर रोजी सफला एकादशी, २३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या, २४ डिसेंबर रोजी पौष प्रारंभ.
मेष – आगामी आठवडा चांगला जाईल. सरकारी आणि राजकीय क्षेत्रात एखाद्या मोठ्या ठिकाणी वर्णी लागण्याची शक्यता आहे. दशम भावातील शनि महाराज शष्ठ योगात. चिकाटी, ध्येय, दूरदृष्टी यांच्या जोरावर कामात चांगले यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी महत्वाची जबाबदारी मिळेल. अधिकारप्राप्ती देणारा काळ आहे. शेती, व्यवसाय, कायदा, छापखाना या ठिकाणी काम करणार्यांसाठी उत्तम काळ आहे. धार्मिक कार्यात लक्ष द्याल. अन्नदान, आर्थिक मदत यात रमाल. विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ आहे. कलाकारांना चांगला लाभ मिळेल.
वृषभ – मानसिक अस्थिरता राहील. मंगळाची महादशा सुरू असणार्यांनी आग, लोखंडी वस्तू यांच्यापासून सांभाळून राहावे. गुप्तपणे काम करताना आर्थिक नुकसान टाळण्याची दक्षता घ्या. वक्री मंगळाची अष्टम भावावर दृष्टी असल्याने येणारे पैसे अडकून राहतील. निर्णय लांबणीवर पडतील. विविध विषयांवर लेखन, अभ्यास करणार्यांसाठी लाभदायक काळ आहे. लेखक, पत्रकारांना नवे विषय सापडतील. सामाजिक काम होईल. गुरूकडून अपेक्षित लाभ मिळतील.
मिथुन – परिस्थिती सुधारेल. उद्योग व्यवसाय, नोकरीत चांगले बदल घडतील. थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. चांगली फळे मिळतील. घरात उत्साहवर्धक वातावरण राहील. विरोधकांवर अंकुश ठेवाल. वक्री मंगळाची षष्ठम भावावर दृष्टी असल्याने प्रकृती सांभाळा. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. गुरूच्या दृष्टीचा चांगला फायदा होईल.
कर्क – रवि-बुध-शुक्र मंगळाच्या दृष्टीत राहतील. त्यामुळे घरात कटकटीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मानसिक अस्थिरता राहील. कामात मन लागणार नाही. पण, फार चिंता करू नका. ध्यानधारणेत मन रमवा, म्हणजे फार त्रास होणार नाही. गुरू बल चांगले राहिल्याने या चक्रातून सहजपणे बाहेर याल. संततीच्या बाबतीत मिळणारे यश निसटून जाईल. मिळेल त्यात समाधानी राहा. दाम्पत्यजीवनात चांगले अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन करा. गाडीचे काम निघू शकते.
सिंह – यशदायक आठवडा आहे. नियोजनानुसार कामे होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. शेअर बाजार, सट्टा यातून चांगली कमाई होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. संततीला यश मिळेल, घरात आनंदाचे वातावरण राहील. मंगळाच्या वक्री भ्रमणामुळे पोलीस, लष्करी कर्मचार्यांना उत्तम दिवस आहेत. नोकरीत उच्चपदावर पोहोचण्याची संधी मिळेल. करमणूक क्षेत्रात चांगले नाव मिळू शकते. लाभ मिळेल.
कन्या – १७ ते १९ डिसेंबर हा कालावधी व्यावसायिक, संचालक यांना उत्तम जाईल. सरकार दरबारी मानसन्मान मिळेल. शनि-मंगळ-चंद्र नवपंचम योगामुळे कामाच्या ठिकाणी धावपळ होईल. यशाचा मार्ग सापडेल. लाभाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धनस्थानातील केतू आर्थिक चढउतार दाखवेल. देणी वाढण्याची शक्यता आहे. लोखंड, पोलाद व्यवसायात चांगले लाभ मिळतील.
तूळ – अष्टम भावातील वक्री मंगळामुळे एखादे दुखणे मागे लागू शकते. निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो. सावध राहा. पत्रकार, संपादकांसाठी चांगला काळ राहील. नोकरीच्या ठिकाणी काही बदल घडू शकतात. गायक, खेळाडू यांना घवघवीत यश मिळेल. बहीण, भावाकडून चांगले सहकार्य मिळेल. विवाहाचे योग जुळून येतील. लेखक, कवी यांच्यासाठी चांगला काळ आहे.
वृश्चिक – प्रापंचिक विषय वगळता इतरत्र मनासारखे बदल घडताना दिसतील. उत्साह वाढेल. रवीच्या धनभावातील राश्यांतरामुळे उद्योग, शेती, खाद्यान्न व्यवसाय, मनोरंजन या क्षेत्रात चांगला लाभ होईल. कुटुंबासाठी भरपूर पैसे खर्च होतील. संततीच्या उत्कर्षाचा काळ राहील. शिक्षणक्षेत्रात चांगले यश मिळेल. १७ ते १९ डिसेंबर हा काळ अनपेक्षित लाभ मिळवून देईल. सरकारी कर्मचार्यांसाठी उत्तम काळ आहे.
धनु – हातात घ्याल ते तडीस न्याल. कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक सुख मिळेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. षष्ठम भावातील मंगळामुळे विरोधकांवर विजय मिळवाल. सहकार क्षेत्रात उत्तम काळ राहील. नोकरीच्या, कामाच्या ठिकाणी धावपळ टाळा. वक्री मंगळामुळे डोकेदुखी वाढेल. संततीच्या बाबत अनुकूल स्थिती नाही. गुंतवणूक करण्याआधी थोडे थांबा आणि मग पाऊल टाका.
मकर – अधिकारप्राप्तीचा योग आहे. खेळाडूंसाठी उत्तम काळ राहील. चांगले यश मिळेल. विवाहेच्छुकांचे शुभकार्य मार्गी लागेल. व्यवसायात अधिक भांडवल टाकून तो वाढवण्याचा प्रयत्न करा, भविष्यात त्यातून चांगला लाभ मिळेल. शेअर बाजारात जोखीम न घेता केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. संततीसाठी धावपळ कराल. प्रवासाचे योग आहेत, पण त्यात सावधगिरी बाळगा.
कुंभ – लाभदायक आठवडा आहे. सल्लागार, तेली, मार्केटिंग एजंट यांना चांगला लाभ मिळेल. धन स्थानातील गुरूमुळे मिष्टान्न भोजनाचा लाभ मिळेल. पण खाण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा डॉक्टरांकडे जावे लागेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. खिशात पैसे राहतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. पत्नीकडून एखादी भेट मिळेल. वैवाहिक जीवनात उत्साह आणि आनंद द्विगुणित होईल.
मीन – संधीचे सोने करून घ्या. संततीला यशप्राप्ती होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. नव्या ओळखी चांगला फायदा करून देतील. नवीन घर घेण्याचे स्वप्न मार्गी लागेल. कुणाला कर्ज देऊ नका. उधार उसनवारी टाळा. खर्च करताना भान ठेवा. १७ ते १९ डिसेंबरचा काळ संततीसाठी विशेष लाभदायक आहे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.