पुरोगामी महाराष्ट्रातलं, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातलं राजकारण बदलतंय, वेगळं वळण घेतंय. मराठी माणसांची अस्मिता जागवणारी शिवसेना पुन्हा जुन्या वळणावर आलीय. ब्राह्मणी हिंदुत्व झटकून तिनं प्रबोधनकारी हिंदुत्व स्वीकारलंय. आजवर मित्रत्वाच्या नात्यात झालेली फरफट अनुभवल्यानंतर आता नवे साथीदार, सवंगडी घेऊन शिवरायांच्या महाराष्ट्रधर्माचा विचार घेऊन, संविधानाची चौकट मजबूत करण्यासाठी तिने प्रयत्न चालवले आहेत. शिवसेनेत नव्यानं दाखल झालेल्या सुषमा अंधारे, शरद कोळी यांनी ‘महाप्रबोधन यात्रे’च्या निमित्तानं झंझावात उभा केलाय. मुंबई, ठाण्यानंतर उत्तर महाराष्ट्र ढवळून काढलंय.
राज्यातलं राजकीय वातावरण बदलतंय, हे अंधेरीतल्या पोटनिवडणुकीतून दिसून आलंय. ‘तिसर्या आघाडीला राज्यात स्थान नाही आणि रिपब्लिकन पक्षाला केव्हाही विकत घेता येतं असं भाजप मानते,’ अशी नेमकी चिकित्सा वंचित बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी नवमतदारांचा जो कल सांगितला, तोही खरा ठरलाय. हा नवमतदार धार्मिक बाबीकडं झुकलाय, हे त्यांचं म्हणणं निवडणुकांतून सिद्ध झालंय. पण माणसानं धार्मिक नसावं असं काही डॉ. आंबेडकर कधी म्हणालेले नाहीत. बाबासाहेबांनी हिंदुधर्मातलं जे त्याज्य होतं ते ते धिक्कारलं. ‘हिंदुधर्म खरा मानवधर्म व्हावा’ हाच त्यांचा प्रयत्न होता. भगवान बुद्धांचाही तोच प्रयत्न होता. तेव्हा धर्म ह्या संस्थेचं मानवी जीवनातलं स्थान आणि महत्त्वही बाबासाहेबांनी मान्य केलेलं होतं. त्याचं स्वरूप कसं असावं, काय असावं याबद्दल त्यांचे हिंदूंमधल्या ब्राह्मण्यवादी काही मंडळांशी मतभेद होते. पण याचा अर्थ बाबासाहेब धर्मविरोधी होते असा होऊ शकत नाही. हिंदुधर्मातल्या अनेक रूढी, परंपरा, कल्पनांच्या विरोधात अनेक हिंदू नेत्यांनी संघर्ष केला आहे. ब्राह्मण्यवादानं रूढी, परंपरांच्या माजवलेल्या अवडंबराला त्यांचा कडाडून विरोध होता. काहींनी हिंदुधर्माला बदलण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठी आपले पंथही स्थापन केलेत. बाबासाहेबांनी मात्र आपला पंथ स्थापन केला नाही. भगवान बुद्धांनी मांडलेला धर्मविचार त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांच्या अनुयायांनीही कुठल्याच धर्माचा अनादर करणं योग्य होणार नाही. दलितांनी आपलं वेगळं अस्तित्व ठेवण्यानं पूर्वीपासूनच एकाकी पडलेल्या दलितांना पूर्वीप्रमाणेच समाजापासून दूरच राहावं लागतंय. दादासाहेब रुपवते नेहमी आपला उल्लेख ‘आम्ही गावकुसाबाहेरचे’ असा करत. हे कुसाबाहेरचं जिणं समाजानं लादलेलं होतं. ते त्यावेळी अपरिहार्य समजलं जातं होतं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही; तरीदेखील वेगळं अस्तित्व जोपासण्याचा उद्योग दलित नेते कशासाठी करताहेत? त्यांनी समाजधारेत घुसण्याची, आपलं अस्तित्व सर्वांना जाणवेल अशा तर्हेनं समाजजीवनात हक्कानं वावरण्याची जरुरी आहे. त्याचबरोबर काही गोष्टींचा गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे विचार करण्याचीही जरुरी आहे. धर्मनिरपेक्ष शक्तीचे हात बळकट करण्याचं ढोंग करणारे काँग्रेस-भाजपसारखे पक्ष आणि त्यांचे नेते किती धर्मनिरपेक्ष आहेत याचा शोध घेण्याऐवजी त्यांच्या कळपात शिरण्याची घाई दलित नेते का करतात? महाराष्ट्रधर्माची हाक देणारे नेते कर्मकांडात बुडालेल्या, रुढी परंपरेत गुरफटलेल्या माणसामाणसात भेद मानणार्या धर्माच्या बुरसटल्या कल्पना कुणावर लादू बघत आहेत असं का समजतात? प्रबोधनी हिंदुत्वाचा उच्चार हा महाराष्ट्रधर्मासाठी, राष्ट्रधर्मासाठी आहे. जो जो महाराष्ट्रनिष्ठ तो तो मराठी! अन जो जो राष्ट्रनिष्ठ तो तो हिंदू एवढी उदारता, व्यापकता स्वीकारणार्यांना केवळ राजकीय स्वार्थासाठी कांगावा करून बदनाम कशासाठी केलं जातं? पूर्वी काँग्रेसनं आणि आता भाजपनं समाजात भेद पाडून सत्ता उपभोगण्याची ब्रिटिशांची नीती वापरून अल्पसंख्याकांना आणि दलितांनाही स्वार्थासाठी वापरलं. हे आता अल्पसंख्याकांना आणि दलितांनाही कळून चुकलंय.
उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यात तर न्यायपालिकेतही जातीच्या आधारावर विभाजन झालेलं आहे. आता सर्वच राजकीय पक्ष जातीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. कारण, दलित म्हणजे मानव नव्हे, तर ‘व्होट बँक’च आहेत, असं त्यांना वाटतं. या प्रवृत्तीचा निषेध केला की अस्पृश्यता प्रतिबंधक कायद्याकडं बोट दाखविलं जातं. जणू सामाजिक दुष्प्रवृत्ती कायद्यानं नष्ट होणार आहेत! सामाजिक पातळीवर समानता प्रस्थापित करण्याचा आणि आर्थिक क्षेत्रात असमानता दूर करण्याचा आपण कटाक्ष ठेवला नाही तर आपली लोकशाही पद्धत नष्ट होईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. सामाजिक पातळीबद्दल ते म्हणाले होते की, ‘आपल्या समाजात असमानतेचं वेगवेगळे टप्पे आहेत. याचा अर्थ काहींच्या दृष्टीनं पातळी उंचावते, तर काहींच्या दृष्टीनं ती खाली जाते!’ स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झालीत, तरी ग्रामीण विभागात सामाजिक विषमतेचं वर्चस्व तसंच आहे. शहरी क्षेत्रात जातीयतेची बंधनं जरा सैल झाली असतील, पण नष्ट झालेली नाहीत. एका सरकारी अहवालातच हे मान्य करण्यात आलंय की अनुसूचित जातीत आणि विशेषतः त्यांच्यातल्या अशिक्षितांच्या मनात, समाजानं आपणास मान्यता द्यावी, अशी तीव्र आकांक्षा असते. आर्थिक पातळीबद्दल आंबेडकरांनी दिलेला इशारा अचूक ठरला आहे.
गेल्या सत्तर वर्षांत देशाचा जो आर्थिक विकास झाला तो एवढ्या विषम पद्धतीनं की, प्रादेशिक, धार्मिक आणि लोका-लोकांदरम्यान असमानता वाढलीच आहे. आता उदारीकरणाबद्दल एवढं आकर्षण आहे. समानतेवर आधारलेला समाज प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाबद्दलच्या चर्चेचा आवाजच बंद झालाय. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातलं अंतर कमी करण्याचा कार्यक्रम नेहरूंनी आखला होता; तसा सध्याच्या सरकारजवळ कोणताही कार्यक्रम नाही. केवळ औपचारिकता म्हणून देखील कुणी त्याबद्दल बोलतही नाही. सत्ताधार्यांच्या लेखी केवळ संपत्तीला महत्त्व आलंय; ती कशी मिळविली हे कुणी लक्षात घेत नाही. राज्यघटनेच्या उद्देशिकेत ज्या समाजवादी शासनाचा आवर्जून उल्लेख करण्यात आलाय, त्याबद्दल कुणी गंभीरतेनं विचार करतोय का?
पददलित वर्ग आता, दुसरं कोणी आपणावर राज्य करावं, या प्रघाताला विटला आहे, असं डॉ. आंबेडकर म्हणाले होते; ते योग्यच होतं. आता या वर्गांना सत्ताधारी बनवायचं आहे. पददलित वर्गातल्या या आत्मसाक्षी वृत्तीचं रूपांतर वर्गसंघर्षात किंवा वर्गयुद्धात होता कामा नये. कारण, त्यामुळं देशाचे तुकडे पडतील आणि ती नक्कीच घोर आपत्ती ठरेल. अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे, घरातच अनेक तट पडले तर ते फार काळ टिकू शकत नाही. या सार्या समस्यांवर चर्चा व्हायला हवी. आंबेडकरांबद्दल द्वेषभाव निर्माण करण्यानं उच्चवर्णीय दलितांच्यात दुरावा निर्माण करीत आहेत. आपणाला बंधमुक्त करण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बाबासाहेब प्राणपणानं लढले, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. हा सूर्य उद्या संहारक झाल्यास, सगळंच कसं उद्ध्वस्त होईल! विषमतेचा अंत होऊन परिवर्तनाची नवी पहाट होईल, ही पहाट आपलं शतकानुशतकाचं दैन्य, दुःख, गरिबी संपवेल, असं देशातल्या बहुसंख्य जनतेला वाटणं हे लोकशाहीनं दिलेलं विचारस्वातंत्र्याचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जपलं, वाढविलं पाहिजे. त्यातच राष्ट्राला एकसंध ठेवणारी, बलशाली करणारी शक्ती आहे.
मराठी माणसाचं राजकारण हे महाराष्ट्रधर्माचं राजकारण! आणि प्रबोधनी हिंदुत्वाचे राजकारण हे राष्ट्रधर्माचं राजकारण असतानाही काँग्रेस-भाजपनं राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेचं मराठी माणसाचं राजकारण, हिंदुत्वाचं राजकारण हे अल्पसंख्यांकविरोधी, दलितविरोधी राजकारण आहे, असा कांगावा केला. आपणच अल्पसंख्याकांची आणि दलितांची कवचकुंडलं आहेत, असंही मायावी जाल आता भाजपनं पसरवलं आहे. या गृहितकावर काँग्रेसनं वर्षानुवर्षे निर्विवाद सत्ता उपभोगली. आता भाजप ती उपभोगतेय. या मायाजालात न सापडण्याची काळजी घेणार्या अल्पसंख्याकांना आणि दलितांना अन्य मार्गांनी संपवलंय, त्यांच्यातल्या काहींना चक्क समाजद्रोह करायला लावलाय.
राज्यातल्या धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येऊन, आवाज उठवून आपली भूमिका समर्थ करण्याचं, त्याद्वारा सत्ता कब्जात आणण्याचं प्रयत्न करायला हवाय. दलितांचं ऐक्य भंगावं यासाठी भाजप कुटिल कारस्थानं करतेय. हे लक्षात घेऊन दलितांनी आता आपला पवित्रा बदलायला हवाय. शिवसेनेचं महाराष्ट्रधर्माचं राजकारण हे समस्त राष्ट्रवाद्यांचं राजकारण आहे. त्यामध्ये सहभागी होणार्या दलितांना आणि अल्पसंख्याकांना आपली ताकद, आपली सामाजिक-राजकीय विचार प्रणाली कायम ठेवून महत्त्वाची कामगिरी बजावता येणं शक्य आहे. मराठी माणसाचं, महाराष्ट्रधर्माचं राजकारण अहिंदू धर्मनिष्ठांना आपल्या धार्मिक निष्ठा शाबूत ठेवूनही करता येऊ शकतं. फक्त करण्याची हिम्मत दाखवण्याची जरुरी आहे. मानवी समता नाकारून, समाजातल्या एखाद्या घटकाला सक्तीची गुलामी भोगायला लावून हे महाराष्ट्र आणि राष्ट्र समर्थ होऊ शकत नाही, ह्या समाजाचं ऐक्य राहू शकत नाही, हे प्रत्येक महाराष्ट्रधर्माचा पाईक असलेला कार्यकर्ता जाणतो. या महाराष्ट्राचे आणखी तुकडे होऊ नयेत, इथल्या कुणालाच ओलीस धरण्याचा प्रकार केला जाऊ नये आणि महाराष्ट्राच्या सीमेपलीकडंच्या कुठल्या शक्तींकडून इथल्या लोकांना हस्तक म्हणून नाचवलं जाऊ नये हाच शिवसेनेचा, महाराष्ट्रधर्माच्या राजकारणाचा कणा आहे आणि तो स्वतःला ह्या महाराष्ट्राचा नागरिक म्हणवणार्या प्रत्येकालाच मान्य व्हायला हवा. ज्या बाबासाहेबांनी अनेक प्रकारची प्रलोभनं असतानाही ती निर्धारानं नाकारून विचारपूर्वक या भूमीत जन्मलेला धर्मच स्वीकारला, त्या बाबासाहेबांच्या अनुयायांना तर हा प्रबोधनी हिंदुत्वाचा महाराष्ट्रधर्म निश्चितच आपला वाटायला हवा. उद्धव ठाकरेंचे आजोबा शिवसेनाप्रमुखांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू मित्र, सल्लागार होते. भिऊन चर्चा करू नये, पण चर्चा करायला भिऊ नये हा विचार स्मरून प्रकाश आंबेडकरांनी आणि त्यांच्याबरोबर असणार्या अन्य दलित नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी विचारविनिमय करावा आणि राजकारणात नवं वारं खेळवावं. हिम्मत करील त्याची किंमत होईल…!
मो. ९४२२३१०६०९