नाताळ जवळ येतोय. वसईच्या लोकांना थंडी आणि नाताळची चाहूल लागली की पाहुण्यांचे वेध लागतात. मध्यपूर्वेत आणि युरोप अमेरिकेत जॉब करत असलेले वसईकर, परदेशातील झगमगाट सोडून घरच्यांना भेटायला विमानं पकडायला गर्दी करतात. वसईच्या घराघरातून विंडालू, भुजिंग, केक, मँझेपॅनचे वास दरवळू लागतात.
वसईच्या प्रेमळ माणसासारखा वसईच्या मातीलाही आगतस्वागताचा गंध आहे. पाहुणचाराची प्रथा संपूर्ण कोकणात आवर्जून जपली जाते, वसईचंही अगदी तसंच आहे. वसई हे मुंबईचं फुप्फुस समजलं जातं. मुंबईतील कुठलाही चाकरमानी आपल्या कोकणातील गावाशी साधर्म्य सांगणार्या वसईला येऊन एक-दोन दिवसाची पिकनिक करून जातो. वसईतील हिरवागार निसर्ग, मनमोहक समुद्रकिनारा, फुलं आणि केळी नि भाजीपाल्याने भरलेल्या बागा, उत्तरेकडे वसईला वळसा घालणारी वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला कवेत घेणारी भाईंदरची खाडी यातील पश्चिमेचा समुद्रकिनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असा परिसर आहे. तो पर्यटकांना न आवडला तरच नवल.
वसई-नालासोपारा-विरार या रेल्वे स्टेशनांच्या लगत झालेल्या काँक्रीटच्या जंगलातून आत येणार्या रस्त्यावर सुमारे तीन चार किलोमीटरचं अंतर कापलं की तुम्ही अतिशय आल्हाददायक वातावरणात शिरता. हिरवाईत लपलेले टुमदार बंगले नि घरं दिसू लागतात. घराघरावरची झालेली रोषणाई नि उंच उंच टांगलेले ख्रिसमस स्टार पाहताना या परिसरात वेगळीच अनुभूती मिळते.
पोर्तुगीजांच्या अमलात, सामवेदी, पाचकळशी या जातींतून धर्मपरिवर्तन केलेला कुपारी नि ख्रिश्चन वाडवळ समाजासोबत इथं कोळी, ईस्ट इंडियन प्रामुख्याने आढळतात. जवळपास चौदा चर्चमध्ये मध्यरात्रीचा मिस्साविधी साजरा केला जातो. प्रत्येक धर्मग्राम पातळीवर चर्च आवारात नि गावागावात विविध प्रकारचे खेळ, स्पर्धा, फनफेअर्स, सहभोजने यांचे आयोजन केले जाते. ख्रिस्ती लोकांत मद्यपान कधीच वर्ज्य नसते. होममेड केक नि वाईन ही घराघरात उपलब्ध असतेच. मात्र पूर्वीसारखे बाकी खूप गोडधोड पदार्थ बनवण्याची पद्धत आता कमी झाली आहे. तरी नाताळातील ओल्या नारळाच्या नि माव्याच्या करंज्या मात्र स्थान टिकवून आहेत.
वसईत सामवेदी, वाडवळ, आगरी, भंडारी यांच्या वाड्यावस्त्यांसोबतच, खूप काळापासून स्थिरावलेला गुजराती भाषिक समाज, भंगार खरेदीपासून मासे विक्रीपर्यंत गुंतलेले बांगला भाषिक, शेती बागायतीसाठी वाडा-जव्हार-मोखाडा तालुक्यातून आलेला अन् वाड्यांच्या अवतीभवती वसलेला आदिवासी समाज, कधी काळी अशा विविध लोकांतच मिसळून गेलेला बहुतांशी तेली म्हणून ओळखला जाणारा मुस्लिम समाज, छोट्यामोठ्या व्यापारउदीमात गुंतलेले उत्तर प्रदेशी, बापजाद्यापासून दुकानं थाटून बसलले मारवाडी, हे सारे गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. स्थानिक समाज बहुतांशी शेतकरी नि बागायतदार… हिरव्या वाड्या रोज शिंपल्या जातात. त्यामुळे अगदी उन्हाळ्यातही ग्लोबल वॉर्मिंगची झळ इथं बसत नाही. समुद्रालगत दोन चार किलोमीटरचा पट्टा भरपूर गोडे पाणी उपलब्ध असलेला आहे. अलीकडे अतिरेकी उपशामुळे त्यात क्षारांचे प्रमाण वाढलेले आढळते. पावसाळ्यात तुडुंब भरणार्या विहिरी प्रत्येक आळीत नि वाड्यात आढळतात. अगदी मे महिन्याच्या अखेरीसही पोरांसोराना पोहण्याइतकं पाणी त्यात असतंच.
वसईतील कावड घेऊन येणारा लाल टोपी जाकीट नि धोतर घालून येणारा दूधवाला नि मुंबईतील सर्व देवादिकांच्या, सत्यनारायणाच्या पूजेसाठी, लग्नसमारंभासाठी, विशेषतः गणपती व दिवाळी दसर्यासाठी लागणारा कागडा, मोगरा, नेवाळी, जास्वंद, चाफा, झेंडू, तुळस, सोनटक्का, गुलछडीचा व झिपरीचा पाला, केळी…सारं काही वसईतून तासाभरात मुंबईत दाखल होत असे. वसईतील सफेद वेलची, बसराई, बनकेळी, राजेळी, भूरकेळी यांच्या आठवणी जुन्या जाणत्या मुंबईकरांच्या जिभांवर आजही जपलेल्या असतील. कधी काळी इथल्या नागवेलीच्या खायच्या पानांनी पाकिस्तानच्या मैफलीत स्थान मिळविले होते. या पानासोबत सुकेळीचं नाव घेतल्याशिवाय वसईच्या व्यापार संस्कृतीची कहाणी पूर्ण होत नाही. एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिले तर, वसई ही जणू भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृतीचा एक नमुना आहे. वसईत राजकीय स्थित्यंतरे कितीही झाली असली तरी सर्वधर्मस्नेहभाव एखाददुसरा अपवाद वगळता कायम जपला गेला आहे.
नरवीर चिमाजी अप्पाच्या पराक्रमाची गाथा सांगणारा वसईचा किल्ला व पाचू बंदर नावाचं पाणजूचं टोक हे समुद्रमार्ग हे ‘गेटवे ऑफ बॅसीन’ म्हणता येईल. समस्त मुंबईकरांना रेल्वेमार्गाने केवळ एक दीड तासाच्या अंतरावर असल्याने साहजिकच वीकेंडला मोकळा श्वास घेण्यासाठी, प्रवाशांचे लोंढे या दिशेने येत असतात. वसई ते विरार स्टेशनच्या सुमारे आठ दहा किलोमीटरवरचा खळाळता समुद्र त्यांना कायम भुरळ पाडीत आला आहे. मुंबईच्या महागड्या हॉटेलांच्या बिलांच्या नुसत्या जीएसटीएवढ्या रकमेत, दिवसभरासाठी स्विमिंग पूल अन् भरपेट मांसाहारी जेवण उपलब्ध करून देणारी लहान लहान फार्म हाऊसेसमधली १०००/१५०० रुपयांची पिकनिक सर्वसामान्यांना परवडणारी असते. मुंबईतून निघालेले पर्यटक बहुतांश रेल्वेने विरार स्टेशनवर उतरतात… शेअरिंग रिक्षा व अना&ळ्याला जाणार्या एसटी बसेस व मनपाच्या मिनी बसेस, हौशी पोरांच्या बाइक्स नि चारचाकी वाहनांनी तुडुंब वाहणारा रस्ता दिसला की तो आठवड्याचा किंवा सार्वजनिक सुट्टीचा वार आहे हे समजून चालायचे.
मायबाप सरकारने दिलेल्या सवलतीमुळे, उन्हातान्हात राबण्यापेक्षा मिळालेल्या सोप्या रोजंदारीमुळे, आता वाड्या नि शेती कसायला मजूर मिळेनासे झाले आहेत. स्थानिक वाडिवाल्यांची मुले शिकून देशविदेशात नोकरीला लागली आहेत. रिकाम्या राहणार्या वाड्यात फार्महाऊस बांधायचं नि पर्यटकांना भाड्याने द्यायची सुरुवात ८०/८२ सालात झाली.. हळूहळू तोच व्यवसाय म्हणून नावारूपाला आला. त्या लहानशा फार्महाऊसलाच लोक जेव्हा रिसॉर्ट म्हणू लागले. तेव्हा राजपुत्राला दूध पिताना पाहून, दुधाचा हट्ट धरणारा गरीब मुलगा आठवला. कधीच दूध न प्यायलेल्या गरीब मुलाला आईने पिठात पाणी घालून नाईलाजाने करून दिलेल्या दुधाची आठवण झाली… मुळातच रिसॉर्ट हा प्रकार ठाऊक नसल्याने या लहान सहान फार्म हाऊसचे नामकरण रिसॉर्ट असे झाले. पाहता पाहता हीच रिसॉर्ट संस्कृती फोफावली. वीकेंडचे उत्पन्न आता मालकांना अपुरे वाटू लागले.अतिरिक्त पैशाच्या हावरटपणामुळे रिकाम्या राहिलेल्या फार्म हाऊसचा उपयोग अधूनमधून अनैतिक कामालाही होऊ लागला. वसईतील संस्कृतीला हळूहळू बट्टा लागू लागला. मग मात्र स्थानिक जनता खडबडून जागी झाली. पोलीस यंत्रणेचा अंकुश वाढला. पर्यटकांच्या व परिसराच्या सुरक्षिततेसाठी चक्क किनार्यावर सागरी पोलीस स्टेशन उभे राहिले. गस्ती वाढल्या. त्यातून संस्कृतींची जपणूक नि वैभव, शासनाचे उत्पन्न नि शासकांची कमाई सारं काही हातात हात घालून वाढलं.
वास्तविक सिडकोच्या आराखड्यात तरंगते पाँन्ट्रन्स, हॉटेल्स सागरी खेळ हे नियोजन असूनही तो भाग संपूर्ण दुर्लक्षित राहिला आहे. अधूनमधून किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात येते, पण ती वेळ का येते याचं उत्तर मात्र कधी इकडचे नेते वा समाजसेवक गांभीर्याने शोधत नाहीत, हे दुर्दैव आहे. खरेतर वसईतील किल्ला, अर्नाळ्याचा जंजिरा, केबल रोपवे असलेले जिवदानी मातेचे मंदिर, अतिशय देखणी चर्चेस, जैन मंदिरे पाहण्याची संधी पर्यटकांसाठी अनुपम आहे. मासे, मटण, ताज्या भाज्याची रेलचेल असलेल्या वसईच्या खाद्यसंस्कृतीचा वारसाही खास अनुभवण्यासारखा आहे. आता वसईतील ख्रिस्मसच्या आनंदात भर घालणारा एक नवीन तारा पर्यटनाच्या क्षितिजावर उगवला आहे. सुखसोयीयुक्त बोटीतून समुद्रमार्गे बॅकवॉटरच्या परिसरात जाऊन, पाचसहा तासांच्या समुद्रसफरीचा आनंद लुटत, गप्पा टप्पा मारत, नाचत गात, समुद्रातील ताज्या मासळीच्या भोजनावर मनसोक्त ताव मारावा नि संध्याकाळी किनार्यावरची ताजी मासळी घेऊन घरी परतावे, असा एक अनोखा दिवस साजरा करायची सोय झाली आहे. मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर अतिशय वाजवी दरात उपलब्ध असल्याने वसईचं पर्यटनाला आता एक नवीन क्षितिज गवसले आहे.