भाजपच्या राष्ट्रीय सचिव, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, मंत्री धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी, माजी मंत्री पंकजाताई मुंडे आक्रमक आणि बिनधास्त बोलण्याबद्दल आपल्या पित्याप्रमाणेच प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांनी दोन महिन्यांच्या राजकीय सुटीनंतर पक्षाला घरचा अहेर बेधडकपणे दिला. त्यांनी व्यक्त केलेले विचार ऐकून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या चक्रावूनच गेला. मला म्हणाला, टोक्या अरे असं कसं त्या आपल्याच पक्षातील मंत्र्यांविरुद्ध बोलू शकतात. मी म्हणालो, त्यात खोटं काहीही नाही. समोर जे चित्र दिसतं त्याचंच हुबेहूब वर्णन त्या करतात. वाटल्यास तू आजच त्यांना भेटून त्यांची मुलाखत घे. एवढं सांगितल्यावर जागेवर राहील तो पोक्या कसला! तो ताबडतोब जाऊन त्यांना भेटला. ती मुलाखत माझ्यासमोर आहे.
– नमस्कार पंकजाताई. दोन महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर तुम्ही पुन्हा राजकीय आखाड्यात प्रकट झालात याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही भारी बोललात बुवा पत्रकारांशी. असं बोलायला हिंमत लागते.
– अहो, स्वभावच आहे तो माझा. ताकाला जाऊन भांडं लपवण्याची सवय नाही माझी. मी तात्पुरत्या राजकीय विजनवासात असताना गेल्या दोन महिन्यांत आमच्या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात जो अभूतपूर्व गोंधळ घातलाय तो पाहून खरोखरच डोकं फिरायची वेळ आलीय, असं मी म्हटलं ते उगाच नाही. काय चाललंय ते मलाच काय, त्या नेत्यांना, मंत्र्यांना आणि जनतेला तरी कळतंय काय?
– तुम्ही म्हणाला होता की राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री भयंकर टेन्शनमध्ये दिसतायत. ते इतके गोंधळलेले वाटतात की त्यांच्याकडून काही आश्वासक घडेल, असं वाटत नाही.
– सगळा अनर्थच आहे. काहीजण त्या तिघांना ‘एक फुल, दोन हाफ’ म्हणतात ते ऐकून मात्र खूप हसायला आलं. परिस्थितीच तशी आहे. ते हायजॅक करून आणलेले शिंदे आपल्याच तंद्रीत असतात. नुसती आश्वासनं देत असतात. दोन उपमुख्यमंत्री आपल्यावर लपून छपून कुरघोडी तर करणार नाहीत ना याच विचारात ते गढलेले असतात. त्यातून निर्माण झालेल्या न्यूनगंडातूनच ‘दिल्लीत मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा प्रकारच्या जाहिराती त्यांच्याच आशीर्वादाने दिल्या जातात. स्वत:च्या खुर्चीबद्दल त्यांना वाटणारी असुरक्षिततेची भावना इतकी टोकाची आहे की ते सदैव भांबावलेले वाटतात.
– डेप्युटी सीएम फडणवीसांबद्दल काय?
– एवढा अनुभवी माणूस, पण गृहमंत्री असून कशावर कसला वचक नाही त्यांचा. तावातावाने काय बोलतात आणि प्रत्यक्षात काय करतात याचा काही ताळमेळच नाही. आता ते मराठा आरक्षणाचं आंदोलनच बघा. थोडं संयमानं, सामंजस्यानं घेतलं असतं तर आंदोलन इतकं चिघळलंच नसतं. पोलीस आंदोलकांवर इतका अमानुष लाठीमार करतात इतकी परिस्थिती मुळात तुम्ही ओढवूनच का घेता? आग लागण्यापूर्वीच तुम्ही का नाही काळजी घेत? यांनी गृहखात्याचा कारभार हातात घेतल्यापासून सार्या महाराष्ट्रात गुन्हेगारी, खून, अत्याचार यांच्या प्रमाणात इतकी वाढ झालीय की सामान्य माणसाला स्वत:च्या सुरक्षेबद्दल काळजी वाटायला लागलीय. पण हे अजून ढिम्म. यांचं नियंत्रणच नाही त्या गृहखात्यावर. उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का काढला नाही मराठा आरक्षणाचा वटहुकूम असं कुठल्या तोंडाने तुम्ही विचारता. असले वटहुकूम काढण्याचा अधिकार फक्त पंतप्रधानांना असतो आणि तेही संसदेला विश्वासात घेऊन हेही त्यांना ठाऊक नसावं? कुरघोड्यांच्या राजकारणात यांना वेळ कुठे आहे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला. त्यांच्या डोक्यात अजून ते ‘मी पुन्हा येईन’ हे त्यांचं घोषवाक्य भुंग्याप्रमाणे भुणभुणतंय. ते अजितदादा आल्यापासून तर त्यांच्या बेबंद वागण्याला आणखीच चाप बसलाय. त्यामुळे अस्वस्थ असताना जनतेच्या समस्यांकडे लक्ष तरी कधी देणार?
– आता अजितदादांचा विषय निघालाच आहे म्हणून विचारतो, हे मुळातच दादागिरी करणारे दादा भाजपाला परवडले तरी कसे?
– त्याचं काय असतं पोक्याजी, विरोधी पक्षनेताच सरकारात आणून त्याला उपमुख्यमंत्री करणं म्हणजे विरोधी पक्षांच्या फुग्यातली हवाच काढून घेण्यासारखं आहे. पण या उतावळ्या आणि अतिमहत्त्वाकांक्षी नेत्याला सरकारात घेतल्यावर त्याचे किती अनिष्ट परिणाम पक्षाच्या इमेजवर होतील हे तरी पाहायला हवं होतं. त्या माणसाचा कारस्थानी स्वभाव त्याच्या चेहरेपट्टीतच दिसतो. पण निवडणुकीपर्यंत त्याचा वापर करून घ्यायचा, त्याला आपल्या पक्षाच्या, विचारसरणीच्या दाव्याला बांधायचा आणि काम झालं की फेकून द्यायचा हे आमच्या पक्षाचं जुनंच धोरण आहे. पण हे डेप्युटी सीएम निवडणुकीतच पक्षाला किती महाग पडतील हे निवडणुकीत पक्षश्रेष्ठींना कळेल. काका-पुतण्यात भांडणं लावायची, घरफोडीप्रमाणे पक्षफोडी करायची आणि बाहेरचा गाळ घेऊन पक्षाच्या त्यांच्या दृष्टीने मजबूत भिंती उभारायच्या ही त्यांची दिवास्वप्नं. आता अजितदादा जवळजवळ सगळा राष्ट्रवादी पक्षच घेऊन सरकारात आल्यावर विरोधी पक्ष कमकुवतच होणार हा त्यांचा सरळ सरळ हिशोब आहे.
– एकीकडे तोंडाने लोकशाही राज्यपद्धती म्हणायचं आणि दुसरीकडे विरोधकांचा समूळ नायनाट करायचा ही हुकूमशाही नाही?
– हे बघा, देशात यापूर्वी अनेक पंतप्रधान होऊन गेले, पण विरोधी पक्ष, विरोधी विचार यांना काडीचीही किंमत न देता मी म्हणतो तेच बरोबर अशी अहंकाराची भाषा कोणी वापरली नव्हती की जनतेची न्याय मागणारी आंदोलनं यापूर्वी कोणत्याही राजवटीने अमानुष पद्धतीने चिरडली नव्हती, असं लोक म्हणतात. एक देश एक माटी, एक देश एक इलेक्शन असे करत एक देश एक पार्टी, एक देश एक नेता असंही उद्या घडू शकेल. त्यांना दोष देऊन कसं चालेल? आता निवडणुका झाल्या की जनताच योग्य-अयोग्यतेचा निवाडा करील. तेव्हा पश्चात्तापाची वेळही निघून गेलेली असेल. गेल्या दोन महिन्यांत मी खूप फिरले. तेव्हा मला जनतेतील असंतोष जाणवला. तो मी कर्तव्य म्हणून वरिष्ठांच्या कानावर घालेन.
– महाराष्ट्राचं काय?
– सध्या या राज्याचे तीन प्रमुख एकत्र बसत असले तरी त्यांच्या तीन दिशा राज्याची दशा बिघडवू शकतात. मी तर म्हणेन, ‘शिंदे, दादा आणि फडणवीसू, सामोरे बसले, मला हे टेन्सगुरू दिसले…’