त्या बसचा ड्रायव्हर बस फार सावकाश चालवायचा. मध्येच एखाद्या टपरीवर बस थांबवून चहा प्यायचा, गुटखा खायचा. प्रवाशांच्या वेळेची पर्वाच नव्हती त्याला. या बसला बसमधले लोक भलतेच वैतागले होते. आधीच बस उशिरा निघाली होती, त्यात रात्र झाली होती. वैतागलेले प्रवासी आपापसात चर्चा करत होते.
‘बस अशी चालवतात का? लोक उकाड्यानं मरतील अशानं, बस कशी सुसाट पळाली पाहिजे, प्रवाश्यांना गार वार्यानचं सुख मिळालं पाहिजे. बस अशी मधेच थांबवतात का?… बसमधल्या पुढंच्या बाकांवर बसलेल्या कोंडाळ्यातला एकजण इतर लोकांशी बोलत होता. खरं तर ऐकवत होता. तो भलताच जोशात होता.
‘हा ड्रायव्हर भलताच अस्वच्छ आहे. हे लोक असेच असतात. हे खालच्या दर्जाचे लोक देश घाण करतात. देशाची प्रतिमा मलीन करतात. आपल्या या महान राष्ट्रातले पूर्वीचे लोक पुष्पक विमान चालवायचे, तेव्हा असं व्हायचं नाही. या ड्रायव्हरला हाकलून द्या. यांच्यासारख्यांना खरं तर देशातूनच हाकललं पाहिजे… त्याचे साथीदार ‘बरोबर आहे, असला ड्रायव्हर नकोच…’ असं म्हणत माना हलवत होते, शेजारच्या लोकांना पटवून देत होते.
‘याच्यापेक्षा मी बस चांगली चालवतो, याला काही येत नाही आणि या भिकार प्रवासाला एवढं तिकीट? हा अन्याय आहे. यानं तिकीटात गफला केलाय. त्यामुळेच आपली मुलं खाजगी बसनं जायला लागलीत… मला बस चालवता येते. मी तुम्हाला स्वस्तात पोहचवतो. खरं तर मीच चांगला ड्रायव्हर आहे… मीच जगातला सर्वात ड्रायव्हर आहे,’ तो पटवून देत होता आणि सोबतचे त्याचे झिलकरी साथीदार त्याची री ओढत होते.
त्याचं बोलणं लोक मन लावून ऐकू लागले. त्याचे दोस्त सगळ्यांना सांगू लागले, ‘आमच्या या मित्राला बस चालवू द्या. बस अगदी लगेच मुक्कामी पोहोचवेल. तुमची मुक्कामावरची कामं पटापट होतील. आमचा हा मित्र आपल्या या बसला महान करेल, तिचं नाव जगभर होईल. प्रत्येकाला तिकीटाचे पैसे परत मिळतील, शिवाय बस एसी होईल. या अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन आता बस करूयात…’
बसमधले लोक भुरळले. भुरळलेले लोक त्याच्याकडे आदरानं पाहू लागले, माना हलवू लागले. बसमधल्या लोकांना त्यांचा तारणहार सापडला होता.
बसच्या ड्रायव्हरबद्दल राग उफाळून आला. लोकांना ड्रायव्हर शत्रू देशाचा एजंट वाटू लागला. आरडाओरडा वाढला, शिवीगाळ झाली आणि चालती बस थांबवून ड्रायव्हरला लोकांनी हाकलून दिलं, झिलकर्यांनी चाक ‘लोकांच्या वतीनं’ या तारणहाराच्या हाती दिलं.
यानं इग्निशनची चावी फिरवली. खाडकन् गिअर टाकला, एक्सिलेटर दाबला आणि एक गचका बसून बस निघाली. झिलकर्यांनी नव्या ड्रायव्हरचा जयजयकार केला. बस जोरात निघाली. खड्डा, स्पीडब्रेकर, रोड डिवायडर कशालाच न जुमानता बस सुसाट पळू लागली… लोक आनंदी झाले, झिलकरी नव्या ड्रायव्हरचं कौतुक करू लागले. बस सर्विस सुरू झाल्यापासून गेल्या कित्येक वर्षात असा ड्रायव्हर बसला मिळाला नाहीय, ही बस आता सर्वात वेगवान प्रवास करणार, जगातली सर्वोत्कृष्ट बस ठरणार, असा ड्रायव्हर होणे नाही, असे मोठमोठ्यांदा ऐकवू लागले. झिलकरी इतक्या मोठ्यांदा ओरडत होते की बसमधे दुसरं काही ऐकूच येत नव्हतं.
बसचं चाक नव्यानंच हाती घेतलेला हा नवा ड्रायव्हर भलताच फॉर्मात आला होता. झिलकर्यांचा आवाज हा सगळ्या बसमधल्या सगळ्यांचाच आवाज आहे असं फक्त त्यालाच नव्हे तर सगळ्यांना वाटत होतं. त्या कोलाहलात रस्ता सोडून बस एका माळरानात घुसली. एका प्रवाशानं सगळ्यांना जागं करायचा प्रयत्न केला, पण हा ड्रायव्हर थोर आहे, हुशार आहे, जगातला सर्वात श्रेष्ठ ड्रायव्हर आहे. ‘आपण निवडलेल्या’ या थोर महान हुशार ड्रायव्हरनं शॉर्टकट घेतलाय, आता प्रवासाची आणखी प्रगती होणार असं इतरांनीच त्या जागल्याला दटावून ऐकवलं, तेव्हा झिलकरी मंडळ लोकांच्या या बोलण्याला हवा देत होतं.
बस एका भल्या मोठ्या दगडाला धडकून पुढं गेली, जागल्यानं पुन्हा एकदा तोंड उघडायचा प्रयत्न केला तर झिलकर्यांनी त्याला गद्दार ठरवलं, प्रगतीच्या प्रवासातला अडसर ठरवलं. जागल्याला तुकडे तुकडे गँगचा मेंबर ठरवलं, अर्बन नक्षलाइट ठरवलं आणि आणखी मोठ्यानं नव्या ड्रायव्हरचा जयजयकार केला. बस वेगात पुढं जात होती. वाटेतले दगडधोंडे, पुढचे खाचखळगे, शेतांची हद्द… नव्या ड्रायव्हरला कशाचीच पर्वा नव्हती. बसमधून ऐकू येणारी त्याची स्तुती, त्याचा जयजयजयकार यापुढं ड्रायव्हरला काही जाणवत नव्हतं आणि रात्रीच्या अंधारात प्रवाशांनाही काही दिसत नव्हतं. खरं तर या ड्रायव्हरनं बस सुरू केल्यापासून त्यांना काहीच दिसलं नव्हतं. पण जयजयकारानं या ‘थोर महान हुशार’ ड्रायव्हरची छाती फुगत होती आणि बस खिळखिळी होत होती.
तो एक्सलेटर दाबत होता, एक्सलेटरवर जणू उभाच राहिला होता. बस जोरात जात होती. वेगात जाणारी बस पाहून लोक खुश झाले होते. ‘वेगवान बस-प्रगत बस’, ‘थोर ड्रायव्हर-थोर बस’ अशी सुभाषितं झिलकरी ऐकवत होते आणि लोक टाळ्या पिटत होते, जागल्यांना तीच सुभाषितं पुन्हा ऐकवत होते. सुसाट वेगात बसनं वाटेतली शेतं ओलांडली. झाडंझुडपं मागं टाकली. पुढे हजार फूट खोल कडा होता. पण बसचा वेग कमी झाला नाही. अंधारात बस कड्याकडे वेगानं जात होती…
…प्रगतीच्या सुसाट बसचं पुष्पक विमान झालं होतं…
…बसमधल्या प्रवाशांना स्वर्गदर्शनाचा लाभ मिळाला, तेव्हा ते झिलकर्यांनी शिकवलेली ‘ड्रायव्हर स्तुती स्तोत्र’ एकमेकांना ऐकवत होते आणि बस काळोखाकडे झेपावत होती…