मी माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी पहिल्यांदा एका मित्राला घेऊन गेलो, तर तिचं वायफाय त्याच्या मोबाइलला लगेच कनेक्ट झालं… तंत्रज्ञान किती पुढारलं आहे ना!
– विनय पोंक्षे, पुणे
तुमचं ज्ञान तंत्रज्ञानाच्या पुढे जात नाही हे तुमच्या गर्लफ्रेंडने ओळखलं असणार. म्हणून तिने तिचा पासवर्ड तुमच्या मित्राला दिला असणार. (तंत्रज्ञानाबरोबरच तुमची गर्लफ्रेंडही पुढारलेली आहे, हे तुम्ही मान्य करत नाही हा तुमचा विनय आहे का पोंक्षेसाहेब?)
बायकोचे पाय दाबणे ही सेवा आहे की प्रेम?
– अशोक परशुराम परब, सावरकर नगर, ठाणे
बायको कोणाची यावर तुमच्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. बायको स्वतःचीच असेल, तर तिचे पाय दाबणे हे प्रेम आहे. पण बायको दुसर्याची असेल, तर तिचे पाय दाबणे ही नुसतीच सेवा नाही तर मातृसेवा आहे (अर्थात परस्त्री मातेसमान असते हे आपण जाणत असाल आणि मानत असाल… तर!)
आमच्याकडील एक म्हातारं अंथरुणावर पडून आहे. ते म्हणतंय, सलमान खान आणि राहुल गांधी यांच्या डोक्यावर अक्षता पडल्याचे पाहिल्यावरच मी राम म्हणेन… आता काय करायचं?
– संजय क्षीरसागर, प्रभातनगर, पिंपळे गुरव
सलमान आणि राहुल त्यांच्या लग्नाचे बघून घेतील. तुम्ही उगाच “XXराम” बनवून म्हातार्याला ‘हे राम’ म्हणायला लावू नका. (फुल्लीच्या जागी तुम्ही योग्य ते नाव लिहा. उगाच मी ते नाव लिहायचो आणि काही लोक माझ्या नावावरच फुल्ली मारायचे.)
जगातल्या सर्व बाधा दूर होतील असा एखादा अचूक मंत्र सांगाल का?
– राजेश मोरे, कल्याण
‘नमो नमो’ एवढाच मंत्र जपा. जगातल्या माहित नाही, पण देशातल्या सगळ्या बाधा (तुमच्या बाबतीतल्या) नक्कीच दूर होतील. पण या मंत्राच्या विरोधात मंत्र जपलात, तर जगभरातल्या बाधा तुमच्या बाबतीत निर्माण होतील (असं ‘इंडिया’वाले म्हणतात, मी नाही).
सॅटेलाईट फोन काय असतो? तो खूप महाग असतो काय?
– प्रभाकर शेळके, पेल्हार
माझ्याकडे सॅटेलाइट फोन नाही. कारण सॅटेलाइट फोन लोनवर मिळत नाही. यावरून काय ते ओळखा. (अंथरूण बघून फोन वापरा.)
दुसर्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडतो, ही म्हण समाजातला एक मोठा वर्ग विसरला आहे का?
– प्रवीण बोरकर, प्रभादेवी
स्वत: स्वत:साठी खड्डा खणून, स्वत:च त्यात पडा. त्याशिवाय या विसरलेल्या वर्गाला आठवणार नाही. (मी स्वत: हे केलं असतं, पण मी विसरलेल्या वर्गात मोडतो ना.)
बायकांना विशिष्ट वेळी आंबट खाण्याची हौस येते आणि आंबटशौकीन म्हणून पुरुषांचं नाव बदनाम केलं जातं… याला काय अर्थ आहे?
– यशवंत सोनवाळे, बीड
पुरुषांच्या आंबटशौकीनपणामुळेच बायकांवर आंबट खाण्याची वेळ येते. आपल्याला आंबट ‘आवडत’ नसेल तर चेक करून घ्या (आय मीन टू से, ऑनलाइन चेक करा… याला काय अर्थ आहे ते.)
संतोषराव, आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘यदाकदाचित’चा प्रयोग कधी लावणार?
– संजय क्षीरसागर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव.
स्वतःची भावना दुखावून घेणारे एलियन्स चंद्रावर नाहीत ना, याची खात्री पटल्यावर!
चंद्रयान-३चे यशस्वी लँडिंग झाल्यावर तुम्ही मनातल्या मनात कोणतं गाणं गुणगुणलात?
– चित्रा पडवळ, धानोरी
चंदनाची चोळी माझं अंग अंग जाळी… (खरं सांगू? मी कुठलं गाणं गुणगुणत होतो काही आठवत नाही. कारण माझ्या मनातली गोष्ट मी माझ्या मनातही ठेवत नाही. आणि माझ्या मनातली गोष्ट दुसर्यांना सांगायला मी कोणी मंत्री नाही. आणि खरं कारण हे आहे की माझ्या मनातली गोष्ट कुठल्या शाळेतली मुलं काय, माझी मुलंही ऐकत नाहीत.)
जी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना दिल्लीतील दारिद्र्य दिसू नये म्हणून सरकारने हिरवे कापड लावून गरीब वस्त्या झाकल्या आहेत. गरिबी हटवण्यापेक्षा ती झाकण्याची ही आयडिया म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे, हे तुम्हाला पटतं ना?
– विनोद बोले, नागपूर
क्रोमा करताना हिरव्या कापडावरच शूटिंग करावा लागतं. नंतर तो हिरवा रंग काढून तिथे स्मार्ट सिटीचं चित्र उभं करता येऊ शकतं. म्हणजे हिरवा रंग हटवल्याचं समाधान आणि स्मार्ट सिटीचं स्वप्न, असं तर असं, पण प्रत्यक्षात आणल्याचं समाधान. अशा डबल समाधानाचा हा मास्टरस्ट्रोक तुम्हाला कळत नाही त्याला कोणी काय करावं? (कधीतरी काहीतरी पॉझिटिव्हली घ्या. विरोधाला विरोध करणं बरं नव्हं पाव्हणं!)