– उल्हास पवार
मार्मिकचा ६५वा वर्धापनदिन १३ ऑगस्ट रोजी झाला, त्याबद्दल या व्यंगचित्र साप्ताहिकाला अभिवादन.
‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रे, प्रबोधन, मनोरंजन आणि बरंच काही ठासून भरलेलं असतं, ती परंपराच आहे. मार्मिकचे संस्थापक, संपादक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे प्रसिद्ध विचारवंत, पत्रकार, व्यंगचित्रकार आणि एका संघटनेचे महान नेते होते, जनसमूहाला वक्तृत्त्वशैलीची भुरळ घालण्याचं आणि आपल्याबरोबर ओढून नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. ‘मार्मिक’ला आणखी एक परंपरा आहे ती प्रबोधनकार ठाकरे यांची. प्रबोधनकार म्हणजे अत्यंत जुन्या सामाजिक चळवळींमधला एक अग्रगण्य नेता. राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, गणपतराव जाधव, तात्यासाहेब जवळकर ही फार मोठी यादी आहे, त्या प्रभावळीतील एक मातब्बर नेता म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. ते माननीय बाळासाहेबांचे वडील आणि सर्व अर्थांनी गुरू. ती परंपरा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी चालवली.
बाळासाहेब हे व्यंगचित्रकार. फ्री प्रेस जर्नलमध्ये आर. के. लक्ष्मण यांच्यासारख्या जगविख्यात व्यंगचित्रकाराच्या बरोबरीने काम करण्याची संधी माननीय बाळासाहेबांना मिळाली. शंकर्स वीकली या जगमान्य व्यंगचित्र साप्ताहिकामध्येही त्यांची व्यंगचित्रे सन्मानाने प्रकाशित झाली. इतकी विद्वत्ता, इतकी उंची, इतकं कर्तृत्व असलेल्या माननीय बाळासाहेबांकडून मार्मिक या ऐतिहासिक व्यंगचित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली नसती, तरच नवल होते.
मला आठवतं, माझ्या शालेय जीवनामध्ये किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, माणूस, रसरंग, अमृत अशी नियतकालिकं खूप प्रसिद्ध होती. तो नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता. अशी अनेक नावं सांगता येतील. पण, ती नियतकालिकं अनेक वर्षं यशस्वीपणे चालल्यानंतरही हळूहळू काळाच्या ओघात थांबत गेली, काही बंद पडली. तसं का झालं त्याच्या दुर्दैवी कारणांची काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण त्याच प्रकारच्या सगळ्या संकटांवर, त्या विपरीत परिस्थितीवर मात करून मार्मिक मात्र अजूनही तितकाच लोकप्रिय आहे, हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. विविध विषयांवरचे नामवंतांचे लेख असोत, राजकीय विश्लेषण असो, त्या सगळ्यातून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रभरातील व्यंगचित्रकारांच्या व्यंगरेषांमधून, अर्करेषांमधून मार्मिक आजही लोकांचं प्रबोधन करतो आहे. हे साधणं, ही लोकप्रियता टिकवणं हे अतिशय अवघड आहे. आजच्या कठीण काळात मार्मिकच्या कर्त्यांनी हे पूर्वसुरींचे अभिमानसंचित टिकवले आहे, त्याबद्दल त्यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच पडतील.
जुन्या मार्मिकमधील, गेल्या ६५ वर्षांतील व्यंगचित्रे अजूनही माझ्या आठवणीत राहिली आहेत, इतकी ती मार्मिक होती. त्या त्या वेळच्या राजकीय घटना असतील, सामाजिक प्रसंग असतील, साहित्यिक घडामोडी असतील, काही नामवंत व्यक्ती असतील, त्यांच्यातले काही दोष किंवा काही गुण किंवा गुणवैशिष्ट्ये असतील, कुठे वादविवाद झालेले असतील- या सर्वांच्यावर अतिशय मार्मिक, चपखल, ठसठशीत व्यंगचित्राच्या माध्यमातून आणि त्यावरच्या दोन-तीन वाक्यांच्या माध्यमातून बाळासाहेब फार मोठे सार सांगायचे. आता लक्षात येते की कदाचित पाच दहा पानं लिहून सुद्धा जे समजणे अवघड आहे, ते इतक्या कमी जागेत आणि अवधीत वाचकाला समजावून देण्याचे अद्भुत कौशल्य बाळासाहेबांच्या कुंचल्यात आणि लेखणीत होते.
बाळासाहेबांची व्यंगचित्रकला राष्ट्रीय नव्हे, आंतरराष्ट्रीय दर्जाची होती. एकेकाळी अर्ध्या जगावर राज्य करणार्या ब्रिटिश साम्राज्याला युद्धकाळात नेतृत्त्व देणारा खमका पंतप्रधान विन्स्टन चर्चिल. त्याच्यावर दुसर्या महायुद्धाच्या काळात अगणित व्यंगचित्रे काढली गेली. त्याच्यावरच्या जगभरातल्या निवडक व्यंगचित्रांचा संग्रह जेव्हा प्रसिद्ध झाला, तेव्हा त्यात भारतातल्या एकाच व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रांचा समावेश होता… ते होते बाळासाहेब ठाकरे.
माझं भाग्य थोर की मला शिवसेनाप्रमुखांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्या अनेक आठवणी मनात जपता आल्या. आदरणीय शरद पवार यांना मैद्याच्या पोत्याच्या रूपात दाखवणारं एक व्यंगचित्र बाळासाहेबांनी रेखाटलं होतं, ते अतिशय गाजलं होतं. बाळासाहेब अनेक राजकीय सभांमध्येही त्यांच्या ‘शरदबाबूं’चा तसा खट्याळ उल्लेख करायचे. मी या दोन मोठ्या नेत्यांच्या अशा भेटीचा साक्षीदार आहे की शरद पवारांनी त्या चित्राला, त्यातल्या त्यांच्या रेखाटनाला दिलखुलास दाद दिली होती. ही अशी दिलदार मैत्री कुठे आणि कुठे कुणाल कामराच्या विनोदाने, विडंबनाने भावना दुखावून घेणारे आजचे राजकारणी!
एकदा तर मी विधिमंडळातील माझ्या भाषणात बाळासाहेबांच्या एका अतिशय मार्मिक चित्राचा उल्लेख केला होता. ते चित्र होतं आमरण उपोषणाचं. नेहमी अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर एक मंडप असतो आणि त्यावर प्राणांतिक उपोषण किंवा आमरण उपोषण अशी पाटी दिसते. कुणीतरी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असते, हे आपण गेल्या अनेक वर्ष पाहतोय; अगदी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही असे मंडप त्या काळात असत. रामलीला मैदानावर २०१४मध्ये अण्णा हजारे आणि इतर मंडळीही असंच उपोषण करायला बसली होती की! तर विषय होता माननीय बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचा. जिल्हाधिकार्यांचे कार्यालय, त्याच्यासमोर एक छोटासा मांडव, त्या ठिकाणी एक माणूस बसलेला पथारी टाकून. त्या मंडपासमोरून एक अकराएक वर्षांचा मुलगा आणि त्याचे वडील चालले आहेत, असे ते चित्र होते. मुलगा वडिलांना विचारतो, हे काय आहे? वडील सांगतात, प्राणांतिक आमरण उपोषण. मुलगा म्हणतो, पण मग इथे मांडव का आहे? वडील सांगतात, अरे बाळा, प्राणांतिक उपोषण म्हणजे काहीही खायचं नाही, अगदी ऊनसुद्धा खायचं नाही! आजही कुठेही, कोणीही उपोषणाला बसला असेल तर मला आपोआप माननीय बाळासाहेबांच्या त्या व्यंगचित्राची आठवण होते, इतकं ते व्यंगचित्र माझ्या मनावर ठसलं आहे. अशी तुम्हालाही किती तरी व्यंगचित्रं आठवत असतील.
बाळासाहेबांनी स्व. इंदिरा गांधींची अतिशय जिवंत व्यंगचित्रं अनेकदा काढली. इंदिराजींचं टोकदार नाक ही त्यांची ओळखच बनली आहे बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात. महात्मा गांधीही त्यांनी काढले. पु. ल. देशपांडे यांचं टिपिकल नाक बाळासाहेबांनी किती सुरेख रेखाटलं होतं, माणूस लगेच डोळ्यासमोर जिवंत व्हायचा. त्यांचा एका नेत्याचा पुतळाही मला आठवतो. हा गावाकडचा एक नेता. तेव्हाची पुढार्याची कल्पना म्हणजे पोट वाढलेलं, ढेरपोट आणि जाडजूड माणूस. तसाच हाही पुढारी. त्याच्या वजनाने चौथरा वाकडा होऊन पुतळा कललेला आहे. बाळासाहेबांनी खाली लिहिलं होतं, अरे, जिवंतपणी तोल सांभाळता आला नाही, आता गेल्यावरही तोल सांभाळता येत नाही?
एकेकाळी पुतळ्यांचा (आणि नेत्यांचा) तोल असा भलत्याच कारणांनी जायचा, पण आज महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत चौथर्याचं काम नीट न केल्यामुळे काय वेळ आली ते आपण मालवणच्या त्या विजयदुर्ग किल्ल्यात पाहिलं. सरकारच्या वतीने पुतळा बसवताना पुतळ्याचा चौथरा भक्कम केला गेला नाही. पुतळा कोणताही असू द्या, चौथरा भक्कम नसेल तर काय होतं त्याचं चित्र बाळासाहेबांच्या कुंचल्यातून कसं उमटलं असतं, अशी कल्पना मनात आली. बाळासाहेबांनी हे चित्र काढलं असतं तर या कामामधल्या भ्रष्टाचारावर त्यांच्या कुंचल्याचा असूड चालला असता आणि तरीही ते आणखीन वेगळं आणि हृदयाला अत्यंत भिडणारं चित्र बनलं असतं. अशी चित्रं आणि त्याखाली दोन-तीन वाक्यं यांतून फार मोठे भाष्य करणे ही माननीय बाळासाहेबांची परंपरा मार्मिकने आजही चालवली आहे, याचा आनंद होतो.
सामाजिक विषमता किंवा लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न किंवा जातीधर्मामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न असेल किंवा गुंडा प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचं प्रयत्न आता शासनाच्या माध्यमातून होत असेल, तर या सगळ्यावर आजही भाष्य करण्याचं सामर्थ्य हे मार्मिक साप्ताहिकातून पाहायला मिळतं. म्हणून अशा नियतकालिकांमधून- मग ते साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, मासिक असेल- मिळणारी वैचारिक मेजवानी मला फारच महत्त्वाची वाटते, समाजाला पोषक वाटते. कधीकाळी माणूस साप्ताहिकातून सामाजिक विषयांवर मेजवानी मिळत होती, ते दुर्दैवाने बंद झालं; रसरंग साप्ताहिकातून चित्रपटसृष्टी आणि मनोरंजनविश्वाची खबरबात मिळत होती, ते आता बंद झालं. या पार्श्वभूमीवर सगळ्या संकटांचा सामना करून, अडचणींवर मात करून, प्रसंगी आर्थिक तोटा सहन करून मार्मिक आजही अत्यंत तेजस्वीपणे आपला ६५ वा वर्धापन दिन आणि पुढची वाटचाल दिमाखाने साजरी करतोय ही माझ्यासारख्या समाजामध्ये, राजकारणामध्ये, साहित्यामध्ये एक रसिक म्हणून आणि समाजकारण आणि राजकारणातला दुवा साधणारा एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मोठी गोष्ट आहे. माझ्यासारख्या असंख्य लोकांचे प्रबोधन करणारा, त्यांना मार्गदर्शन करणारा आणि स्फूर्ती देणारा असा हा मार्मिक माझ्या मनामध्ये अढळपदावर वसलेला आहे. मार्मिक असाच चालत राहावा, समाजाला त्याने क्रांतीचा, परिवर्तनाचा, प्रबोधनाचा मार्ग दाखवून उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत राहावे, याच माझ्या सदिच्छा.
(लेखक उल्हासदादा पवार हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रसिक राजकारणी आहेत.)