प्रबोधनकारांचं काय वाचलंय, असं विचारलं की देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें असं उत्तर देणारे अनेकजण भेटतात. हा दीर्घलेख आणि पुढे त्याचं छोटेखानी पुस्तक ही प्रबोधनकारांच्या विचारांची ओळखच आहे. फक्त प्रबोधनकारांच्याच नाही, तर एकूणच सत्यशोधकी विचारांच्या वाचनाची सुरुवात या लेखाने झाल्याचंहीअनेकजण सांगतात. हे त्या अर्थाने प्रबोधनी विचारांचं प्रवेशद्वारच म्हणायला हवं.
– – –
प्रबोधन मासिकाच्या पाचव्या वर्षाच्या दुसर्या अंकात प्रबोधनकारांनी लिहिलेलं कर्मवीर भाऊराव पाटील यांचं परिचयपर लिहिलेलं चरित्र आणि चौथ्या अंकात त्यावर करावा लागलेला खुलासा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या आपण सविस्तर समजून घेतल्या आहेतच. त्याशिवाय या चार अंकातले हेमगर्भ, निर्विकल्प, भागवती भट्टीतला सनातनी हिंदु या टोपणनावांनी आलेले लेखही लक्ष वेधून घेतात. ही आणि अशी काही टोपणनावं प्रबोधनमधल्या लेखांवर दिसतात. तेव्हा संपादकच अंक एकहाती लिहित असे, त्यामुळे ज्या लेखांवर लेखकाचं नाव नाही, तो लेख संपादकाने लिहिलाय, असं मानण्याचा प्रघात होता. अशा वेळेस टोपणनावांनी आलेल्या लेखांचं पालकत्व कोणाला द्यावं, असा प्रश्न उभा राहतोच.
डॉ. अनंत गुरव हे केशव सीताराम ठाकरे यांच्या `प्रबोधन या नियतकालिकाचा अभ्यास` या अप्रकाशित पीएचडी प्रबंधात लिहितात, प्रबोधन नियतकालिकाची संपादकपदाची जबाबदारी सांभाळताना केशव ठाकरे यांनी अनेक टोपण नावांनी विविध विषयावर लिखाण केले आहे. केशव ठाकरे यांनी वापरलेले टोपणनाव आणि लेखाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. भारतभृत्य– कृष्णचारित्र्यावरील दोन आक्षेप, हुंड्याची हुंडादी, नूर– शेवटी येळकोटकेलाच पाहिजे, ऐदी उदयोगी– विचार तरंग, निर्विकल्प– ब्राह्मणांचा देव परशुराम, कालाय तस्मै नमः, चळवळ जरा गारठलेली दिसते, हेमगर्भ – हेमगर्भाच्या मात्रेचे वळसे, सवाई दादोबा– विनोदाचे पान, हेमगर्भ सहाणपूरकर– हेमगर्भाचे वळसे.` मात्र ही टोपणनावं प्रबोधनकारांचीच असल्याचा कोणताही भक्कम संदर्भ डॉ. गुरव देत नाहीत. ते सांगतात, या लेखांतील टीकेचा रोख, त्यातील उपमा, समस्येवर सुचविलेल्या उपाययोजना, सरकारी नोकरांबद्दलचे मत लक्षात घेता हे केशव ठाकरे यांनी केलेले लिखाण आहे हे समजून येते.
डॉ. गुरव यांनी सांगितल्याप्रमाणे या लेखांत ठाकरे शैली आहेच. पण त्यामुळे हे लेख प्रबोधनकारांनीच लिहिल्याचं सिद्ध होत नाही किंवा गृहितही धरता येत नाही. प्रबोधनकारांच्या शैलीचा प्रभाव प्रबोधनच्या वाचकांवर तर होताच, पण दिनकरराव जवळकरांसारख्या प्रभावी लेखकावरही असल्याचं लक्षात येतं. शिवाय टोपणनावांनी आलेल्या लेखांवर प्रबोधनकारांनी संपादकीय संस्कार केलेले असणारच. त्यातूनही शैलीचा प्रभाव दिसू शकतो. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं हे की अनेकदा अंकातला बहुतेक मजकूर एकहाती लिहिणारे प्रबोधनकार या विषयांसाठी टोपणनाव का घेतील, याचं कारण सापडत नाही. अर्थातच या लेखातल्या विचारांचं प्रबोधनकारांच्या विचारांशी साधर्म्य असल्यामुळेच त्यांना प्रबोधनमध्ये स्थान मिळालं आहे आणि हे लेख आजही वैचारिकदृष्ट्या ताजे आहेत, हे महत्त्वाचं.
प्रबोधनच्या पाचव्या वर्षांच्या अंकांची पानं उलटत असताना या चार अंकांनंतर आपण पाचव्या अंकावर येऊन थबकतो ते देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें हे लेखाचं शीर्षक बघून. या अंकात तब्बल बारा पूर्ण पानं भरलेला हा लेख वाचता येतो. १९२६च्या डिसेंबर महिन्याच्या प्रबोधन अंकात प्रसिद्ध झालेला लेख पुढे १९२९ साली पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झाला. तेव्हा त्याच्या १० हजार प्रती छापण्यात आल्या होत्या, असं पुस्तिकेतच नमूद केलेलं आढळतं. त्यानुसार एक आणा किंमतीत हे छोटं पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात गेलं असणार. त्यानंतरही गेली शंभर वर्षं या छोटेखानी पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या वेगवेगळे प्रकाशक काढतच आहेत. त्याची इतकी मुद्रणं झाली आहेत की त्याचा तपास करणं आता शक्य वाटत नाही. प्रबोधनकारांचं महाराष्ट्रभर सर्वाधिक पोचलेलं लिखाण म्हणूनही या लेखाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यामुळेच `देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें`हा लेख प्रबोधनकारांची ओळख बनला.
प्रबोधनकारांचं काय वाचलंय, असं विचारलं की देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें असं उत्तर देणारे अनेकजण भेटतात. हा दीर्घलेख आणि पुढे त्याचं छोटेखानी पुस्तक ही प्रबोधनकारांच्या विचारांची ओळखच आहे. फक्त प्रबोधनकारांच्याच नाही, तर एकूणच सत्यशोधकी विचारांच्या वाचनाची सुरुवात या लेखाने झाल्याचंही अनेकजण सांगतात. हे त्या अर्थाने प्रबोधनी विचारांचं प्रवेशद्वारच म्हणायला हवं. प्रबोधनकारांच्या लिखाणाने अनेक वैचारिक भूकंप घडवले आहेत. त्याचा केंद्रबिंदू` देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें` या लेखातच आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. विचारशैली आणि लेखनशैली या दोन्ही दृष्टींनीही प्रबोधनकारांच्या लिखाणाचा दाखला म्हणून हा लेख देता येतो. इतिहासाच्या अंगाने वर्तमानाची केलेली चिकित्सा, हे प्रबोधनकाराच्या लिखाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य या लेखातही वाचता येतं.
प्रबोधनकारांचं प्रत्येक लिखाणात इतिहास आणि धर्मचिकित्सा आहेच. त्यानिमित्ताने बहुजनांना गुलामगिरीत ढकलणारं ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण त्यांनी उलगडून सांगितलं आहे. प्रबोधनकारांचं सुरवातीपासूनचं लिखाण हे सडेतोड आणि रोखठोक असलं तरी देव आणि धर्म या संकल्पनांविषयी एक सश्रद्ध आस्था काही प्रमाणात का होईना पण दिसून येते. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें या लेखापर्यंत ही आस्थेपेक्षा चिकित्सा प्रभावी झालेली दिसते. या लेखाच्या आसपासचं इतरही लिखाण असंच आहे. पण त्यानंतर साधारण वर्षभरानंतरच्या लिखाणात प्रबोधनकार देव आणि धर्म या संकल्पनांच्या बाबतीत अधिकच टोकाची मतं मांडताना दिसतात. आपण नास्तिक असल्याचा पुकारा करत ते देव धर्म पूर्णपणे नाकारताना दिसतात. ऑक्टोबर १९२९च्या आसपास लिहिलेल्या विजयादशमीचा संदेश या पोवाड्यात ते लिहितात,
देव धर्म हे भटी सापळे
घातक झाले देशा ।
मोडा तोडा उलथुनि पाडा
उखडा त्यांच्या पाशा ।।
धर्मावाचुनि प्राण न जाई
देवाविण नच अडते ।
आत्मशक्ती खंबीर तयाच्या
त्रिभुवन पाया पडते ।।
प्रबोधनकार हे प्रवाही विचारवंत होते. प्रत्यक्ष अनुभव, सतत वाचन आणि चिंतनाच्या आधारे त्यांनी आपल्या मतांमध्ये सातत्याने बदल केले आहेत. एकाच विचारांना धरून राहण्याचा पोथीनिष्ठपणा त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्या धर्मविषयक चिंतनाच्या या प्रवाही प्रवासात देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें हा लेख अनेक अर्थांनी केंद्रस्थानी येतो. सश्रद्ध आस्तिकतेपासून कट्टर नास्तिकतेपर्यंतच्या प्रवासात हा लेख बरोबर मध्ये आहेच, शिवाय हे प्रबोधनकारांचं सर्वाधिक लोकप्रिय लिखाण असल्यानेही त्यांच्या विचारांचं आकलन या लेखाच्या भोवतीच फिरत राहतं. त्यामुळे या लेखाचा विस्तृत आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं.
प्रबोधनकारांचे लेख असोत वा ग्रंथ, ते थेट वकिली बाण्याने विषयाला हात घालत नाहीत. ते वाचकांना हळूहळू विषयापर्यंत घेऊन जातात. लेख कितीही त्रोटक असो वा तातडीचा, ते प्रास्ताविक करतातच. त्यांचे समकालीन असणार्या ‘काळ`कर्ते शिवरामपंत परांजपे यांच्या संपादकीय लेखनाचं वैशिष्ट्य म्हणून ही शैली ओळखली जाते. पण प्रबोधनकार काळकर्त्यांइतकं पाल्हाळ लावत नाहीत. ते सुरवातीला विषयाची व्यापक पार्श्वभूमी मांडतात. ते करताना विषयाच्या तत्त्वज्ञानात्मक सूत्राचं सूतोवाच करतात. ते करताना त्यांची प्रतिभा अधिकच बहरते. सहज सोप्या मांडणीत ते वाचकाला गुंतवतात. आणि वाचक आपल्या ताब्यात आल्याचं लक्षात येताच ते अलगदपणे विचारांचे बॉम्बस्फोट करायला लागतात. `देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें या लेखात ही शैली विशेष लक्षात येते. या लेखाचा पहिला परिच्छेद याची साक्ष देतो. तेव्हाच्या लेखनपद्धतीनुसार हा परिच्छेद थोडा मोठा आहे. पण तो वाचायलाच हवा. तो असा-
कोणतीहि वस्तुस्थिति अथवा कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटीं जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे कीं आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेंच पुष्कळांना मोठें कोडें पडतें. पण तें उलगडणें फारसें कठीण नाहीं. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार. कालचें मूल सदा सर्वकाळ मूलच राहत नाहीं. निसर्गधर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेंहि अंतर्बाह्य एकसारखें वाढतच जातें आणि अवघ्या १८ वर्षांच्या अवधीत तेंच गोजीरवाणें मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेंत स्थित्यंतर व रूपांतर झालेलें आपणांस दिसतें. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिति आणि कल्पना, ती जर दगडाधोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत कांहींच चुकीचें नाहीं. जेथें खुद्द निसर्गच हरघडीं नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुनें तें सोंनें ही म्हण भाषालंकारापुरती कितीहि सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावानें आणि ठरलेल्या कसानें नव्या काळाच्या बाजारांत विकल्या जाणे कधीच शक्य नाहीं. उत्क्रांतीच्या प्रवाहांत वहाणीस लागलेल्या मानवांनीं काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचारविचारांचा घाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहींत. निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाहीं, पण त्याच्या भरधांव गतीपुढें कोणी आडवा येतांच छाटायला मात्र ती विसरत नाहीं. प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रा वेळीं एखाद्या रोग्याला मृत्यू-मुखांतून ओढून काढील, पण निसर्गाचा अपराधी ब्रम्हदेव आडवा पडला तरी शिक्षेवाचून सुटायचा नाही. पूर्वी को काळी मोठ्या पुण्यप्रद वाटणार्या किंवा असणार्याच गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुनें म्हणून सोने एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणीचे देव्हारे माजविणे म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखे आहे. अर्थात् असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार, हे सांगणें नकोच.
या लेखाची प्रस्तावना इथेच संपत नाही. त्यासाठी पुढचा परिच्छेदही वाचावा लागेल. पण या पहिल्या परिच्छेदात देव आणि धर्म या लेखाचा विषय असलेल्या संकल्पनांचा उल्लेखही न करता ते या दोन्ही संकल्पनांविषयी भाष्य करायला घेतात. देव धर्म या गोष्टी मुळात चांगल्या असतीलही, पण काळाच्या ओघात आज त्याचं अवमूल्यन झालेलं आहे आणि आज त्या आहेत त्या स्वरूपात स्वीकारणं चूक आहे, यासाठी ते वाचकांची मानसिकता लेखाच्या मुख्य विषयात उतरण्यापूर्वीच करून घेतात. य्ोा लेखातल्या विचारांचा आढावा आपण घेतच राहणार आहोत.
(देवळांचा धर्म आणि धर्माची देवळें हा पूर्ण लेख prabodhankar.com या वेबसाईटवर वाचता येईल.)