शिवसेना संपली, शिवसेना संपली… अशी आवई सध्या उठली आहे… भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेली प्रसारमाध्यमं ही कंडी पिकवण्यात आघाडीवर आहेत… आपल्याला काहीतरी नवाच शोध लागला आहे, अशी त्यांची समजूत आहे… मुळात संघर्षातूनच जिचा जन्म झाला अशी ही संघटना जन्मापासून लढतच आलेली आहे… परक्यांबरोबरचा लढा तर होताच, पण स्वकीयांबरोबरही तिने नेहमीच चार हात केले आहेत… यातल्या प्रत्येक लढाईच्या वेळेला हीच आवई उठत आली आहे आणि शिवसेनेचा वाघ या सगळ्या उंदरांना बिळात पळायला भाग पाडून डरकाळी फोडत आलेला आहे… आजही सुरतमार्गे गुवाहाटी वारी करून आलेले शिंदेसैनिक सच्च्या शिवसैनिकांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत; मात्र त्याचवेळी उद्धवसाहेब गर्जून सांगताहेत, हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या. आमचं चुकलं असेल तर जनता आम्हाला घरी बसवेल. अशावेळी शिवसेनेने वामनराव महाडिकांच्या रूपाने पहिला सच्चा शिवसैनिक विधिमंडळात पाठवला, त्या १९७०च्या परळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेलं हे प्रेरक चित्र आठवतं… भाजपच्या पदराआड जाऊन बाकी सगळं मिळवाल… शिवसेनेवर जीव ओवाळून टाकणार्या शिवसैनिकांचं प्रेम आणि पाठबळ कधीच मिळणार नाही… शिवसेनेची खरी कमाई हीच आहे… ती कशी हिरावून घ्याल.